नीता सामंत -
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा आश्रम शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्यात ४००हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. पालकांनीही घाईघाईने शाळेकडे धाव घेतली आणि आपल्या मुलांना घेऊन गावाकडे रवाना झाले. यामागील कारण म्हणजे आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीला भूत दिसल्याची अफवा पसरल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी शाळा सोडली.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहे. येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र या शाळेत भूत असल्याची चर्चा सुरू आहे. घटनेची सुरुवात एका विद्यार्थिनीला अचानक काहीतरी भयानक दृश्य दिसल्यामुळे झाली. तिने जोरजोरात किंचाळत घाबरणं सुरू केलं. काही क्षणातच तिला भोवळही आली. तिच्या प्रतिक्रियेने अन्य विद्यार्थीही घाबरले आणि भूत असल्याची चर्चा शाळाभर पसरली. कोणताही तर्कशुद्ध विचार न करता अनेक विद्यार्थी घाबरले, रडू लागले आणि ही अफवा वार्याच्या वेगाने पसरली. शाळेतील वातावरणच एकदम भयभीत आणि अनिश्चित झालं.
ही घटना समजताच काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी फोन करून घडलेली गोष्ट पालकांना सांगितली. यानंतर पालकांनी रात्रीच आश्रम शाळेकडे धाव घेतली. एकाच वेळी शेकडो पालक शाळेवर पोहोचले आणि आपल्या मुलांना तात्काळ घेऊन गावी निघून गेले. विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी केला, पण घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी ऐकून न घेता शाळा रिकामी केली.
ही बातमी वाचताच महाराष्ट्र अंनिसच्या चाळीसगाव शाखेच्या नीता सामंत, विजयाताई चव्हाण, सागर नागणे, संभाजीनगर शाखेचे जगदीश परदेशी सर, व्यंकट भोसले सर आणि जालना शाखेचे शंकर बोर्डे सर या कार्यकर्त्यांनी २५ जुलै २०२५, शुक्रवारी धानोरा आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांकडून आणि तेथील शिक्षकांकडून सर्व घटना जाणून घेतली. शाळेत १० मुली आणि अंदाजे १५० मुले उपस्थित होती. जगात भूत नसत ते तुमच्या मनात असत. लहानपणापासून भुतांच्या गोष्टी ऐकल्याने असा भ्रम भास होऊ शकतो. कधी कधी मन आजारी पडलं तर सुद्धा असा मनोजन्य भास होऊ शकतो. हे सगळ्या मुलांना समजावून सांगितल्यावर बर्यापैकी मुलांचं आणि शिक्षकांचंसुद्धा समाधान झालं. जालन्याच्या शंकर बोर्डे सरांनी चमत्काराचे प्रयोग करून त्या मागचं विज्ञान समजावून सांगितल्यावर सर्व मुलं खुष झाली.
अंनिसच्या या प्रबोधनाबद्दल शाळा प्रशासनाने संघटनेचे आभार मानले.
-नीता सामंत
