नालासोपारा येथील भूत उतरविणार्‍या नागदा बाबावर गुन्हा दाखल

अक्षिता पाटील -

पालघर, वसई, ठाणे अंनिसची संयुक्त कामगिरी

नालासोपारा (मुंबई) येथील भैरवनाथाच्या मंदिरात एका आजारी महिलेला अंगातील भूत उतरवतो, असे सांगून अमानुष मारहाण करणार्‍या हेमराज नागदा या बाबाचा व्हिडिओ 16 सप्टेंबर रोजी ‘व्हायरल’ झाला.

हा व्हिडिओ पाहून वसई शाखेच्या कार्याध्यक्ष अंजना देवकांत आणि शैला कंठे यांनी त्वरित 17 सप्टेंबर रोजी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली. 18 सप्टेंबर रोजी अण्णा कडलास्कर (पालघर), अंजना देवकांत (वसई), वंदना शिंदे (ठाणे), प्रकाश पारखे (ठाणे), अक्षिता पाटील (ठाणे), मनोज धोडी (पालघर) यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित महिलेची भेट घेतली. महिला आजारी आणि अत्यंत अशक्त होती. तिच्या डोळ्याला लागले होते, तसेच हातालाही मार लागला होता. पीडित महिलेला त्वरित सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा आग्रह महिलेच्या पतीकडे धरला.

भेटीदरम्यान समजले की, 16 सप्टेंबरला संबंधित महिलेची तब्येत ठीक नसल्याने ती तिच्या कामाच्या ठिकाणाहून (भाईंदर) रिक्षाने घरी आली. तिला चक्कर येत असल्याने तिच्या शेजारील दोन महिलांनी बाजूच्याच भैरवनाथाच्या मंदिरात नेले. हेमराज नागदा या मंदिरातील पुजार्‍याने महिलेच्या आजाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हिला भूतबाधा झाली असून तिच्या अंगातील भूत काढावे लागेल, असे सांगून अंगावर पाणी शिंपडले, गंध लावले, महिलेचे केस मोकळे सोडले आणि मोरपिसाच्या गुच्छाच्या पाठीमागील बाजूने पाठीवर मारण्यास सुरुवात केली. तसेच मोरपिसाचा गुच्छा तिच्या भोवती फिरवून आणि तिच्या दंडास धरून तिला इथून तिथे फिरवत ‘जो भी अंदर है वह निकल जा, परेशान मत कर’ असे बोलत होता.

कार्यकर्त्यांनी मंदिराचे निरीक्षण केले. मंदिरात मोरपिसाचा गुच्छ, लाल-पिवळे धागे, लोखंडी गोलाकार कडी असलेली साखळी ठेवलेली आढळली. हेमराज नागदा याच्याशी संवाद साधताना ही लोखंडी कडी कशासाठी, असे विचारल्यास ज्यांच्या अंगात येते ती माणसं इथे येऊन स्वतःला या लोखंडाने मारून घेतात. त्यांच्यासाठी ही ठेवली आहे, असे सांगितले. स्थानिकांशी संवाद साधला असता असे आढळले की, काही महिन्यांपूर्वी त्याच वस्तीतील तिघांचा तलावात बुडून अपघाती मृत्यू झाला आणि त्यांचे आत्मे आजही लोकांना झपाटतात, असा दावा हेमराज नागदा करत असे. थोडक्यात, भूत, आत्मा यांची भीती पसरवण्याचे कृत्य या बाबाकडून केले जात होते.

ही सर्व शहानिशा केल्यावर कार्यकर्त्यांनी नालासोपारा पोलीस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांची भेट घेऊन त्यांना संबंधित भोंदू बाबावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे लेखी निवेदन दिले. त्यांनी संपूर्ण तक्रार ऐकून घेऊन गुन्हा दाखल करण्यास सहकार्य केले आणि जादूटोणाविरोधी कायदा कलम 3 अन्वये हेमराज नागदा याच्यावर गुन्हा दाखल झाला.

‘इस व्हिडिओ के वजह से मैं और ज्यादा फेमस हो रहा हूँ, अभी और लोग मुझसे इलाज करवाने आएँगे,’ असे म्हणणारा बाबा माफीनामा देण्यास तयार झाला. परंतु त्याच्यावर गुन्हा हा दाखल झालाच.

या संपूर्ण घटनेत ज्याने व्हिडिओ काढला त्या अफजलने दाखवलेली सामाजिक तत्परता, सामाजिक कार्यकर्तेसचिन पवार, आणि सीमा माणिक पाटील, मनसे कार्यकर्तेमोरजकर, परवीन मॅडम यांनी केलेलं सहकार्य विशेष आहे. लोकशाही, आय.बी.एन. लोकमत, एच.पी. लाईव्ह अशा मीडिया चॅनल्सने देखील या प्रकरणाची दखल घेतली.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]