अनिल चव्हाण -

२६ डिसेंबरला दत्त जयंती होती. आदल्या दिवशी मुक्ता दाभोलकरांचा फोन आला. ‘कोल्हापुरात बावड्यामध्ये, झूम प्रकल्पाशेजारी ‘बाल स्वामी समर्थ’ या नावाने लहान मुलाला महाराज केले जात आहे आणि चमत्काराचाही दावा केला जातोय. भेट देऊन माहिती घ्या.’
मी दोन-तीन शाळांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या अंकाची माहिती दिली. त्यामुळे, स्वामींच्या दर्शनाला जायला दुपारचे दोन वाजले. प्रथम झूम प्रकल्प लागला. इथे कोल्हापुरातील सर्व कचरा एकत्रित केला जातो. कचर्याचा छोटा पर्वतच तयार झालेला आहे! कचर्यावर प्रक्रिया केली जाते. ‘या पर्वतावर काही कचरावेचक स्त्रिया प्लास्टिक बाजूला करतात आणि विकून आपले पोट भरतात. काही गावठी कुत्री अन्न मिळवतात, येणार्या-जाणार्यांवर गुरगुरतात, झुंडीने अंगावर येतात; कधी लचके तोडतात’ अशा बातम्या वृत्तपत्रांतून वाचल्या होत्या.
मनात विचार आला, ‘आध्यात्मिक कचर्याचेही असेच आहे. इथे सुद्धा काही जण अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्यावर गुजराण करतात, धनवान बनतात, काही जण गुरगुरतात, झुंडीने अंगावर येतात आणि लचकेही तोडतात.’
भौतिक कचर्याची सवय परिसरातील लोकांना झालेली दिसते; आध्यात्मिक कचर्याची सवय सुद्धा लोकांना झालेली असते. असे विविध विचार मनात येत असतानाच, एका गल्लीच्या कोपर्याला तो फलक दिसला. त्रिमूर्ती दत्त, त्यांच्या समोरच स्वामी समर्थ आणि त्यासमोर नवे बालस्वामी! क्रमाने लहान होत जाणार्या तीन फोटोंवरून कोण कुणाचा अवतार आहे हे समजत होते. रिकाम्या जागी मंडप घालण्याचे काम सुरू होतं. शेजारी तात्पुरते किचन उभा राहिले होते. मोठमोठ्या भांड्यांमधून तिथे काही पदार्थ रटरटत होते. ही जवळजवळ शंभर-दोनशे फुटांची रिकामी जागा ओलांडली की असणार्या दुमजली इमारतीजवळ पाच-सहा स्वयंसेवक उभे होते. आतल्या बाजूला असलेल्या टेबलावर दोन जण पावती करण्याची वाट पहात बसले होते. उभे असणारे आलेल्या भाविकाला पावतीच्या टेबलची आणि गादीच्या दर्शनाची वाट दाखवत होते. बाल समर्थांची गादी माडीवर होती. जिना चढून वर गेलं की गादीचं दर्शन होत होतं. इथे एक तरुण आणि दोन तरुणी आलेल्या भाविकांना मार्गदर्शन करत होते. एक तरुणी दर्शन घेतलेल्या भाविकांना चमच्याने प्रसाद देत होती. बुंदीचा लाडू कुस्करून तयार झालेल्या सुट्या कळ्यांचा प्रसाद ताटात घेऊन ती उभी होती. बाल समर्थांच्या गादी शेजारी मोठे स्वामी समर्थ फोटोमध्ये उभे होते.
आलेले भाविक क्रमाने दोन्ही ठिकाणी नम्र होत. काहीजण डोकं जमिनीला टेकवत. मगच प्रसादासाठी हात पुढे करत. मी सुद्धा दोन्ही समर्थांचे दर्शन घेतले आणि हात पुढे केला. अर्धा चमचा कळ्या पोटात गेल्यावर मी तिथेच हात जोडून उभा राहिलो. दोन-चार भाविक प्रसाद घेऊन गेले. मग मी पुढे झालो आणि कळ्या वाटपाची सेवा करण्यासाठी नम्रपणे ताट आणि चमचा मागून घेतला.
आता माझ्या हस्ते चमचाभर कळ्यांचे वाटप सुरू झाले. बाल स्वामींचे दर्शन किती वेळात होईल याची मी चौकशी अधूनमधून करत असे. कधी “येतील आत्ता” तर कधी “सहा वाजता येतील” असे उत्तर मिळत होते. तासाभरात शंभर एक भाविकांना मी कळ्या वाटपाची सेवा दिली. गंमत म्हणजे, या काळात वीस-पंचवीस महिला अशा निघाल्या की त्यांनी माझे लक्ष नसताना, माझ्या पायावर डोकं ठेवलं. मला आवडल्यासारखे वाटले आणि बरेही वाटले. आलेल्या भाविकांना डोकं टेकायला कुठे ना कुठे जागा हवी आहे. आपण कुठे डोकं टेकतोय याच्याशी त्यांना काही देणे-घेणे नव्हते.
तासाभरात बाल समर्थांना घेऊन एक भाविक आला. रोजच्या जीवनातल्या अडचणी सोडवतील म्हणून या बाल समर्थांकडे पाहावे, तर ते स्वतःच दुसर्याच्या काखेत बसून आले होते.
त्यांच्या आजीने कौतुकाने त्याला हाक मारली तेवढ्यात मी फोटो काढून घेतला. बाल समर्थ दिसतायेत सात-आठ वर्षांचे; पण चौकशी करता कळले त्यांचे शारीरिक वय पंधरा वर्षे आहे.
‘विकलांग व्यक्तीला दैवी शक्ती आहे असे म्हणून महाराज बुवा-बाबा बनवणे हा गुन्हा आहे.’
शिवाय शाळेत जायच्या वयात बाल समर्थ जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन करत होते. त्यांच्या नावावर छोटे छोटे चमत्कार सांगण्याचं काम स्वयंसेवकांकडे होते.
अवतार कल्पना बर्यापैकी रुजलेली आहे. त्यामुळे एकच देव पुन्हा पुन्हा अवतार घेतात. अवतार सुद्धा पुन्हा अवतार घेतात. अवतार कल्पनेची सुरुवात झाली विष्णूंनी अवतार घेतल्यावर. आर्य आणि अनार्य यांच्या संघर्षात विष्णूंनी अवतार घेऊन अनार्य राक्षस राजांना मारलेले दिसते. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, बळी या राक्षसराजांना विष्णूने अवतार घेऊन मारल्याच्या कथा पुराणात आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व राजे जनहितदक्ष होते. त्यांनी यज्ञ संस्कृतीला विरोध केला. इथल्या शेतकर्यांची गुरे-ढोरे पळवून आणून यज्ञात मारणार्या पुरोहितांना त्यांनी जवळ केले नाही. हा त्यांचा सर्वांत मोठा गुन्हा. प्रत्यक्षात या जनहितदक्ष राजांना कपटाने मारल्यानंतर लोकक्षोभ टाळण्यासाठी वैदिकांनी अवतार कल्पनेला जन्म दिला. त्यामुळे त्यांचे पाप झाकले गेले.
पुढच्या काळात ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय असा संघर्ष उभा राहिला. तेव्हा विष्णूने परशुरामाचा अवतार घेतला आणि क्षत्रियांचा संहार केल्याचे दाखवले आहे. म्हणजे ब्राह्मण पुरोहितांचे, त्यांच्या अन्यायी हितसंबंधांचे संरक्षण करणे हे काम विष्णूच्या अवतारांना दिले आहे.
अवतार कथा लिहिताना वैदिकांनी आपल्या संस्कृतीचा प्रचार, प्रसार उत्तम प्रकारे केलेला दिसतो. आपल्याला पाहिजे असलेल्या रूढी, नियम, कायदे त्यांनी अवतारांच्या नावावर खपवल्या आहेत. पुढे बौद्ध धर्माला पचवण्यासाठी गौतम बुद्धांनाही नववा अवतार जाहीर करण्यात आले. अवतार जाहीर केल्यावर बौद्ध विहारांचा ताबा घेता आला.
दत्त संप्रदाय हा समतेचा विचार सांगणारा आहे. भेदाभेद न पाळता, सर्वांना सामावून घेणारा आणि सोप्या पद्धतीने भक्तीची सोय करणारा दत्तपंथ लोकप्रिय बनला. पण त्यामध्ये अवतार कल्पनेचे रोपण करून मनुस्मृतीचे समर्थन केल्याचे दिसते. गुरुचरित्र हे त्याचे चांगले उदाहरण आहे. अनेक शूद्र भाविकांच्या घरात देव्हार्यामध्ये गुरुचरित्राला जागा देण्यात आली आहे.
सोवळ्या-ओवळ्याची कल्पना पाळण्यात लोकांना धन्य वाटते. बाल समर्थांच्या दर्शनाला येण्यापूर्वी पाणी देणारा एक आणि पाय धुतले का पाहणारा दुसरा असे दोन स्वयंसेवक जिन्याखाली उभा होते. त्याशिवाय एक जण फुलाच्या साह्याने येणार्या भाविकांच्या अंगावर गोमूत्राचे चार थेंब शिंपडून त्यांना शुद्ध करून घेत होता. थोड्या वेळाने तांब्यावर पाणी पायावर ओतण्यापेक्षा थेंबभर गोमूत्र शिंपडणे अधिक फायद्याचे आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी एकाच पद्धतीने शुद्ध करून घ्यायला सुरुवात केली.
महिलांच्या बाबतीत तर सोवळ्या-ओवळ्याचे नियम अधिक कडक असतात आणि ते सर्व जण कौतुकाने पाळतात. सर्व स्वयंसेवक आनंदाने आणि उत्साहाने या सोहळ्यात सामील झालेले दिसले. दिसेल ती, पडेल ती सेवा करण्यात त्यांना धन्यता वाटत होती. जिन्यात उभी असणारी स्वयंसेविका तर गरज नसताना भाविकांना अडवून ठेवायची. तर दुसरा स्वयंसेवक त्यांना ओळीने आले तरी पुन्हा पुन्हा सूचना देण्याची सेवा करत होता.
आमचा दर्शन सोहळा आटोपला होता.
फोटो आणि माहितीची खात्री करून घेतल्यावर मुक्ता दाभोलकर यांनी फोननेच सर्व सूत्रे शाहूपुरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सिंदकर यांच्याकडे दिली. केस फाईल करण्याचे काम पोलिसांचे होते. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी लुडबुडण्याची गरज नव्हती. पोलिसांनी हे काम व्यवस्थित केले.
संध्याकाळी काही हजार लोकांसाठी महाप्रसादाची म्हणजे जेवणाची सोय होती. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी येऊ नये, अशा बेताने स्वामी समर्थांच्या माता-पित्यांना पोलिसांनी बोलवून घेतले. त्यांना योग्य ती समज दिली आणि दुसर्या दिवशी त्यांच्यावर एफ. आय. आर. दाखल केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली आणि केस दाखल झाली. अशी बातमी पसरली तेव्हा आठ जानेवारी रोजी बाल समर्थांच्या भाविकांनी गंगावेश येथील नृसिंह सरस्वतीच्या देवळापासून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. नृसिंह सरस्वती सुद्धा दत्ताचे अवतार समजले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आक्षेप चुकीचे आहेत, असे मोर्चेकर्यांचे म्हणणे होते.
काही कार्यकर्त्यांचे पोट भोंदू बुवा, बाबा, स्वामी आणि महाराज यांना मदत करण्यावर अवलंबून असते. त्यांनाही या निमित्ताने काम मिळाले. शेवटी झूम प्रकल्पाचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
–अनिल चव्हाण
संपर्क : ९७६४१ ४७४८३