नरेंद्र लांजेवार -
‘अण्णा’ हे नाव उच्चारलं की घरातील मोठ्या कर्त्या माणसाची आठवण होते, आणि ‘भाऊ’ या नावातच रक्ताचे नाते समाविष्ठ असते. जो प्रत्येक प्रसंगी पाठीशी ‘उभा’ राहतो तो ‘भाऊ’ …
अण्णाभाऊ …तुमची जन्मशताब्दी आली आणि गेली… कोरोनाच्या काळात चार दोन आभासी कार्यक्रम झालेत, पण एकाही शहरामध्ये तुमचा ना नव्याने पुतळा उभारला,ना कोणत्या चौकाला तुमचे नाव दिले, ना तुमच्या नावाने एखादी चांगली योजना साकारल्या गेली.जीवंतपणी तुमची जशी उपेक्षा झाली तशीच उपेक्षा तुमच्या जन्मशताब्दी वर्षात ही झाली….
चार-दोन मासिकांमध्ये अण्णाभाऊ तुमच्यावर लेख लिहून आलेतही…काही विद्वानांनी तुम्ही आंबेडकरवादी की मार्क्सवादी यावरच बुध्दीभेद करण्यात धन्यता मानली. तुम्ही जपलेली मानवी मूल्य ,तुम्ही जपलेली साहित्यनिष्ठा आणि तुम्ही पाहिलेले भारताचे सामाजिक, राजकीय आणि समतामूलक स्वप्न कोणीच नाही चितारले…
अण्णाभाऊ खरं तर तुम्ही काळाच्या पुढचे पाहणारे लेखक, तसेच तुम्ही प्रगतीशील विचारांचे लेखक आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारे कामगार- कष्टकरी उपेक्षितांचे नेते सुध्दा !
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्यक्ष रणांगणावर उतरून संघर्ष करणारे तुम्ही लोकशाहीर… तुम्ही ज्या उपेक्षित वर्गातून पुढे आलात त्या वर्गाची कमॅकहाणी आपल्या साहित्यातून सांगत असताना एकाही व्यक्तीचा उपमर्द होणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली.तुमच्या कथा – कादंबर्या या जशा पुरुषप्रधान आहेत तशाच त्या स्त्रीप्रधानही आहेत.तुमची प्रत्येक नायिका ही व्यवस्थेला रोखठोक प्रश्न विचारून घायाळही करते. जीवन जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली होताच अण्णाभाऊ तुमची नायिका पेटून उठते व रणांगणात लढावे तशी ती लढते . तुमच्या नायिकांमध्ये मंगला, वैजयंता, आवडी, चित्रा, आबी, रत्ना, सिता या सार्याच नायिका आदर्श स्त्रीनायिका आहेत. आपली ‘आवडी’ ही कादंबरी ग्रामीण साहित्याची पायाभरणी करणारी कादंबरी आहे,पण समीक्षकांनी हेही श्रेय तुमच्या वाट्याला येऊ दिले नाही. एखाद्या लेखक, साहित्यिक, कलावंताची किती उपेक्षा व्हावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ तुम्हीच आहात…
अण्णाभाऊ तुम्ही 14 कथासंग्रह, जागतिक दर्जाच्या 35 कादंबर्या, अनेक कविता , 10 ऐतिहासिक घटनांवरील पोवाडे,16 नाटक-वगनाट्ये, तुमच्या सात कादंबर्यांवर मराठी चित्रपट , एक प्रवास वर्णन आणि खूप सारे सामाजिक विषयावरचे तुमचे लेखन आणि लोकचळवळीतील कार्य असूनही मराठी साहित्य विश्वातील तथाकथित समीक्षकांनी तुम्हाला बाजूला ठेवले. निदान जन्मशताब्दी वर्षात तरी तुमच्या उण्यापुर्या एकोणपन्नास वर्षांच्या कारकीर्दीत तुम्ही करून ठेवलेल्या प्रचंड काम चर्चेला येईल अशी अपेक्षा होती पण ती ही व्यर्थच…
एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेखन केलेल्या कोणत्याही इतर लेखकाची जन्मशताब्दी असती तर शासनाने ती देशपातळीवर साजरी केली असती; परंतु आता कोरोनाचे निमित्त करून अण्णाभाऊ तुमची पुन्हा उपेक्षाच झाली. तसेही उपेक्षा, वंचना, वेदना, अवहेलना,हाल आणि संघर्ष हेच तुमच्या आयुष्याला सोबत होते. दोन चार वर्ग शिक्षण घेतल्यावर तुम्ही वाटेगाव पासून मुंबईपर्यंत चालत आलात. मुंबईत कामगार वस्तीमध्ये, झोपडपट्टीमध्ये राहून तेथील माणसांच्या दुःखाशी समरस होत या दुःखातून, दारिद्य्रातून बाहेर पडण्याचा काही शास्त्रीय मार्ग आहे का याचा तुम्ही अभ्यास केला. मार्क्स, लेनीन, आंबेडकर, मॅक्झिम गॉर्की असा अनेकांच्या साहित्यातून तुम्हाला पडणार्या प्रश्नांची उकल होत गेली. हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या- श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, या तुमच्या एकाच विधानाने अण्णाभाऊ येथील साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक विश्व हादरून गेले. कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रत्यक्ष काम करीत पुरोगामी लेखकांसमवेत राहून तुम्ही रशियापर्यंतचा प्रवास करून आला.
मॅक्झिम गोर्की यांच्या साहित्याचा प्रभाव तुमच्या मनावर होता पण तुमच्या साहित्यामध्ये कुठेही प्रचारकी लेखन तुम्ही होऊ दिले नाही . तुमच्या कथा- कादंबरीतील नायक हे उपेक्षित वर्गातील नायक आहेत. तुम्ही ज्या वर्गातून आलात त्या वर्गातील शोषण, वाईट चालीरीती, अनिष्ट रुढी व परंपरा यावर आघात केले. अण्णाभाऊ तुम्ही नेहमी म्हणायचे, माझं लेखन हे माझ्या माणसांच्या जीवनावरील लेखन आहे.
अण्णाभाऊ तुमची ‘चिखलातली कमळ’ ही मुरळीच्या जीवनावरील कादंबरी. सीता नावाचे एक मुरळी नायिका ज्या पद्धतीने धर्मचिकित्सा करते तशी धर्म चिकित्सा आज कुणी करताना दिसत नाही. तुमची सीता मुरळी तिच्या आईला विचारते, तुझं खंडोबाशी लग्न लागलं होतं, त्याच देवाशी तिच्या मुलीचं लग्न कसे लावले जाते? देव स्वतःच्याच मुलीशी लग्न करतात का? अशा भेदक प्रश्न विचारून ती बंडखोर नायिका खंडोबाशी लग्न करण्याला विरोध करते.
अण्णाभाऊ तुमचे सर्व कथाविश्व म्हणजे जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या कथा आहेत. अण्णाभाऊ तुमची फकीरा ही कादंबरी तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. अनेकांना कल्पना नसेल पण या फकीरा कादंबरीला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. अण्णाभाऊ तुम्ही फक्त एक ‘फकिरा’ ही कादंबरी आणि ‘स्मशानातील सोनं’ ही एक कथा, एवढेच साहित्य लिहिले असते, तरी मराठी साहित्यात तुमचं नाव अजरामर राहिलं असतं, कारण या दोन कलाकृतींमधून तुमची दिसणारी प्रतिभेची उत्तुंग झेप, काल आणि आज लिहिणार्या अनेक लेखकांमध्ये दिसत नाही हे कटू सत्य आहे.
अण्णाभाऊ, तुम्ही नाटक आणि वगनाट्ये यांना नवी दिशा दिली. पारंपारिक वगनाट्यांमध्ये राजा, प्रधान, राणी, गोपीका, पेंद्या, गवळणी, हवालदार अशी पारंपरिक पात्र तुम्ही नामशेष केली आणि सामान्य माणूस हाच नायक बनवून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. लोकनाट्य रंगभूमीवर एक नवा नाट्यअविष्काराची तुम्ही उभारणी केली.
अण्णाभाऊ, तुम्ही तुमच्या साहित्यात मुंबईची झोपडपट्टी तर आणलीच पण त्याबरोबरच गावगाडा हा सुद्धा दमदारपणे चित्रीत केला. यात सामान्य शेतकरी, जमीनदार, आलुतेदार, बलुतेदार, गावाबाहेरचे दलित, भटके, फिरस्ते या सार्यांना आपल्या सत्तेच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या वेदनांना तुम्ही शब्द दिला. अण्णाभाऊ, तुमच्या साहित्यात मांग, महार, चांभार, रामोशी, भिल्ल, कोळी, माळी, साडी, गुरव, मराठा, माकडवाले, डोंबारी, मुसलमान, बेलदार, ब्राह्मण, कुंभार, गोसावी, कंजारी, जंगम, फासेपारधी, वडार, कोल्हाटी, खावटी, हटकर, धनगर, चित्रकर्ता, बेलदार, फकीर, इत्यादी सर्वच जाती वर्गाचे प्रतिनिधीत्वाच्या दुःखाचे चित्रण तुम्ही नायक रूपाने केले आहे.
अण्णाभाऊ आपला समाज दारिद्य्रातून, अज्ञानातून आणि विशेषता अंधश्रद्धेतून दूर व्हावा यासाठी तुम्ही आपल्या कथेमध्ये -कादंबरीमध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात लेखन केलं. भैरोबा, खंडोबा, म्हसोबा, अंबाबाई, मरीआय, खंडोबा, ज्योतिबा या सर्व कुलदेव देवतांच्या दृष्ट चालीरीतींवर तुम्ही आघात केलात. कुलदेवता प्रसन्न करण्यासाठी देवांना मुली – मुले वाहण्याची समाजात अनिष्ट प्रथा होती. त्यांना मुरळी, जोगिन, वाघ्या, असं म्हटले जाते. देवाला मुली सोडण्याचं प्रमाणसुद्धा अधिक होतं. मुलांमध्ये पोतराज, वाघे जन्माला घातले जात. या सर्वांच्या विरोधात अण्णाभाऊ सर्वप्रथम तुम्ही परखड लेखन करून समाजाचे प्रबोधन केले. तुम्ही केलेल्या प्रबोधनाची चळवळ आज आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले पुढे नेत आहोत. अजूनही देवाच्या नावावर सोडणार्या देवदासींना आम्हाला मुक्त करावं लागत आहे. जटा निर्मूलनाचा कार्यक्रम सुरूच आहे. अजूनही समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि शिक्षणापासून दूर आहे.
एक समाजवादी, समतावादी भारताचे स्वप्न अण्णाभाऊ तुम्ही बघितलं होतं ते पूर्ण झालं नाही. अण्णाभाऊ, तुमचा लढा एकजुटीच्या व अस्मितेच्या शोधासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी होता. एका ठिकाणी तुम्ही म्हणता, माझा माझ्या देशाच्या जनतेवर नि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भुमीत नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात.. ती मंगल स्वप्ने पाहत पाहत मी लिहीत असतो म्हणूनच अण्णाभाऊ तुम्ही तुमच्या लिखाणाचा सार सांगताना लिहून गेलात,
जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव !!
गुलामगिरीच्या या चिखलात, रुतून बसला का ऐरावत !
अंग झाडुनी निघ बाहेरी, घे बिनी वरती घाव!!
धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले !
मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव!!
ठरवून आंम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करूनी अंकित !
जिणे लादुनी वर अवमानित, निर्मून हा भेदभाव !!
एकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊनी चल बा पुढती!
नव महाराष्ट्र निर्मूनी जगती, करी प्रकट निज नाव !!
आज विवेकवादी नव महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, अशा लोकांना जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ तुम्ही आम्हाला हवे आहात… आज तुमच्या सारखे परखड लिहिणारे, बोलणारे, संघर्ष करणारे आणि प्रसंगी विचारांसाठी जेलातही जाण्यासाठी तयार असणार्या लेखक, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला गरज आहे.. ही गरज अण्णाभाऊ तुमच्या प्रेरणेतूनच साकार होणार आहे.. म्हणून अण्णाभाऊ तुम्ही आम्हाला हवे आहात..
तुमच्या विचारांचा आणि साहित्याचा चाहता..
– नरेंद्र लांजेवार, बुलढाणा
लेखक संपर्क : 94221 80451