प्रभाकर नानावटी -
नुकताच डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याचा निकाल लागला. प्रत्यक्ष मारेकर्यांना शिक्षा झाली पण मुख्य सूत्रधार सुटले गेले. ‘डॉ. दाभोलकरांचा हा खून त्यांचे विचार संपवण्यासाठी केला होता’, असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नोंदवले आहे. परंतु खून करून विचार संपत नाही हे जागतिक सत्य आहे. आम्ही अंनिस संघटना म्हणून डॉ.दाभोलकरांचे विचार जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याचाच एक भाग म्हणून या २० जून ते २० ऑगस्ट २०२४ पर्यंत ‘नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी’ हे अभियान राबवत आहोत. या अभियानांतर्गत डॉ. दाभोलकर यांनी लिहिलेले १५ नव्या पुस्तकांचा संच ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ते वितरित करणार आहेत. आपणही या अभियानात सहभागी व्हावे. डॉ. दाभोलकरांच्या या नव्या पंधरा पुस्तिकांचा वाचकांना परिचय व्हावा म्हणून हा लेख…
समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेऊन काम करत असताना डॉक्टर दाभोलकरांना नेहमीच एक प्रश्न विचारला जात होता, ‘अशिक्षितांचे जाऊ दे डॉक्टर, सुशिक्षित वा विज्ञानाचे पदवीधरसुद्धा अंधश्रद्धेला बळी कसे काय पडतात व काही वेळा त्याचे समर्थन कसे काय करू शकतात?’ या प्रश्नाला उत्तर म्हणून डॉक्टर नेहमीच म्हणायचे की, पोटापाण्याची बर्यापैकी काळजी मिटली वा परीक्षा पास होण्याइतपत विज्ञानाचे शिक्षण घेतले की माणसांचा प्रवास पारंपरिकतेकडे होतो. कारण पारंपरिक विचारांचा पगडा काही हजार वर्षांचा असतो. त्याला धर्माचे अधिष्ठान असते. समाजमान्यता असते. या सर्वांच्या प्रभावातून मानसिक गुलामगिरी निर्माण होते. व हीच मानसिकता अंधश्रद्धांना खतपाणी घालत असते. राजकीय वा आर्थिक गुलामगिरीतील शोषण स्पष्ट असते, त्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करता येते. याच्या उलट मानसिक गुलामगिरी असते. ही घातक गुलामगिरी ती स्वीकारणार्यांना सोईची व सुखकारक वाटते. त्यामुळे या मानसिक गुलामगिरीचे समर्थन, संरक्षण, संवर्धन व उदात्तीकरण करण्याकडे कल असतो. या मानसिक गुलामगिरीच्या विरोधातील संघर्ष अवघड होऊ लागतो. त्याला एक सम्यक स्वतंत्र विचार, निर्भय मानसिकता व त्यातून प्रत्यक्ष कृती करणे शक्य होते.
म्हणूनच डॉक्टरांच्या या विचारांना घरोघरी पोचविणार्या या १५ पुस्तिकांचा संच ‘अंनिस’ने प्रकाशित केला आहे. या सर्व पुस्तिका विचार व कृतिप्रवण होण्यास प्रेरणादायी ठरतात. यातील प्रत्येक पुस्तिकेत अंधश्रद्धेवरील विविध पैलूंचा विचार असल्यामुळे ते एकसुरी न वाटता अत्यंत वाचनीय झाले आहेत.
डॉक्टरांना ‘आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक’ असे का म्हणावेसे वाटले असेल याबद्दलचे विश्लेषण त्यांच्याच शब्दात या पुस्तिकेत वाचावयास मिळेल. समितीच्या ब्राह्मण्याच्या विरोधातील मवाळ भूमिकेबद्दल काही हितसंबंधीय गट नाराजी व्यक्त करत होते. डॉक्टरांनी मात्र त्यांच्या या पुस्तिकेत समितीच्या देव-धर्माविषयीच्या तटस्थ धोरणाविषयी विस्तृतपणे मांडणी करताना समितीने प्रत्यक्ष केलेल्या कृतीकार्यक्रमावर भर दिला आहे. सत्यनारायणाच्या पूजेवर बंदी, जन्मकुंडलींची होळी, वास्तुशास्त्र व फलज्योतिषाला विरोध, सत्यशोधकी विवाह पद्धतीचा पुरस्कार, यज्ञविरोधी परिषदेचे आयोजन, सिंहस्थ मेळ्यांना विरोध, इ. इ. उपक्रमांकडे थोडेसे विचारपूर्वकपणे बघितल्यास हे सर्व ब्राह्मणी संस्कृतीला विरोध दर्शविणारेच आहेत. समितीचे हे विचार आणि त्या प्रकारे घडणारा आचार हे एवढे स्पष्ट असताना समिती ब्राह्मणी कर्मकांडांना, बाबा-बुवांना, विचारप्रणालींना विरोध करत नाही हा आक्षेप क्षणभरही टिकला नाही.
परमेश्वर या संकल्पनेबद्दल कितीही उलट-सुलट मतं व्यक्त केली तरी त्याविषयीच्या चर्चेचे आकर्षण कधीच संपत नाही, यासाठीचे एक उदाहरण म्हणून डॉ. दाभोलकर व डॉ. लागू यांच्यातील वाद-संवाद याचा उल्लेख करता येईल. डॉ. दाभोलकर – डॉ. लागू यांचा ‘वाद संवाद ः विवेक जागराचा’ ही पुस्तिका या संवादासंबंधीची आहे.
ते दोघेही त्या काळात महाराष्ट्रातील गावा-गावात पदरमोड करून जात होते. मोठ्या समुदायासमोर तास-दीड तास भाषण करून आपले ईप्सित साध्य करत होते. देवाचे अस्तित्व, धर्माचे प्रयोजन, श्रद्धा-अंधश्रद्धा, धर्मांधता, धर्मनिरपेक्षता, अंधश्रद्धा निर्मूलन या बहुचर्चित विषयावरील जुगलबंदी अशा स्वरूपात हा कार्यक्रम होता. डॉ. लागू परमेश्वराचे अस्तित्व हीच मुळात अंधश्रद्धा असून प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते; त्यासाठी परमेश्वराला रिटायर करा अशी मांडणी करत. डॉ. दाभोलकर मात्र श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक असून देवधर्माच्या बाबतीत आम्ही तटस्थ आहोत, अशी मांडणी करत होते. त्यांच्या मते, खरा प्रश्न आहे तो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रत्यक्ष कृतीचा.
‘ग्रेट भेट’ ही पुस्तिका डॉ. दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची जडणघडण, त्यांच्या पूर्वायुष्यातील महत्त्वाचे काही प्रसंग, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामागील प्रेरणा, दाभोलकर कुटुंबीयांचे वैशिष्ट्य… इत्यादी अनेक विषयांवर प्रश्नोत्तर स्वरूपातील एक दस्तावेज आहे. प्रसिद्ध मराठी पत्रकार व संपादक निखिल वागळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टरांनी दिलेल्या उत्तरांचा हा आलेख आहे.
निखिल वागळे यांनी विचारलेल्या प्रश्नामधून डॉक्टरांनी इतर कुठल्याही सामाजिक क्षेत्रामधील कार्याऐवजी अंधश्रद्धा निर्मूलन हेच क्षेत्र का निवडले याला उत्तर मिळते. भोंदूबुवांना २१ लाखांचे आव्हान देऊनसुद्धा अजून एकही जण पुढे का आला नाही, फलज्योतिषावर अजून लोक का विश्वास ठेवतात, बुवाबाजी अजून का वाढत आहे, प्रवाहाविरुद्ध काम करताना लोकक्षोभ होतानासुद्धा डॉक्टर इतके शांत कसे राहू शकतात, डॉक्टरांच्या कार्याला निधीचा तुटवडा का जाणवत नाही… असे अनेक प्रश्न विचारून डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचे ते ओळख करून देतात.
‘कर्मकांडांचे मायाजाल’ या पुस्तिकेत जातपात, दैवतोपासना, बळी देण्याची पद्धत, मंत्रतंत्र, शकुन, ताईत, या सार्या गोष्टींचा आणि त्याबरोबर होणार्या कर्मकांडांचा हे मायाजाल नेमके काय आहे, याचा उगम काय, यामागील कार्यकारणभाव कोणता इत्यादी गोष्टींचा ऊहापोह डॉक्टरांनी केला आहे. कर्मकांडाचा हा इतिहास प्रत्येक विचारी माणसाला अंतर्मुख करणारा आहे. कर्मकांडाचा हा पुरातन धंदा अजूनही जोरात चालू आहे. हे एक मायाजाल असून बहुसंख्य जनता या मायाजालात फसत आहे. डॉक्टरांची ही पुस्तिका वाचत असताना या कर्मकांडांचे अक्राळविक्राळ स्वरूप उघडत जाते व वाचक दिङमूढ होतो.
‘माझा न संपणारा प्रवास’ हा आत्मचरित्रपर लेख वाचताना एखादी व्यक्ती किती प्रांजळ असू शकते याची कल्पनाही आपण करू शकत नाही. डॉक्टरांच्याच शब्दात सांगायचे तर दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा दहा लाख रुपयांचा पुरस्कार मला अमेरिकेत महाराष्ट्र फाऊंडेशनने दिला. त्याच्यासकट एकाही पुरस्कारातील कसलेही मानचिन्ह माझ्या घरात नाही. मागच्या आठवणींत गुंगणारे मन मला लाभलेले नाही; मात्र सावधपणा लाभलेला आहे. मी कधीही ‘आर नाही तर पार’ अशा पद्धतीने क्रीडांगणावर खेळलो नाही वा समाजकारणात जगलो नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल वा व्यवस्थेबद्दल आडाखे कोसळले, आधीची समज हा निव्वळ भ्रम ठरला, असे माझ्या बाबतीत घडलेले नाही. अपमान जिव्हारी लागला, असा एकही प्रसंग मला आठवत नाही. माझा अपमान दुसरा कोणी करू शकतो, यावर माझा विश्वास नाही. समोरच्या व्यक्तीच्या वर्तनामुळे नाराजी, दु:ख, उदास वाटले असेल; परंतु अपमानित वाटलेले नाही किंवा धमकावणीनेही माझ्यावर काही परिणाम झालेला नाही. डॉक्टरांचा हा न संपणारा प्रवास वाचकाच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरेल, यात शंका नसावी.
रूढी-परंपरांना विधायक पर्याय देण्याचा प्रयत्न समितीने जाणीवपूर्वक केला आणि आपल्या कुवतीनुसार त्यासाठी आग्रह धरले व कृतिशीलता दाखविली. यापैकी महत्त्वाचा भाग म्हणजे सत्यशोधकी विवाहाचा. भटजी, मुहूर्त, हुंडा, मानपान, देणेघेणे, वरात, रोषणाई, दारू-पान, जेवणावळी अशा सर्व गोष्टींना फाटा देऊन हे सत्यशोधक विवाह समितीने साजरे केले.
‘सत्यशोधक विवाह’ या पुस्तिकेत डॉक्टरांनी अशा प्रकारच्या विवाहाची का गरज आहे याची मुद्देसूद मांडणी केली आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विवाह पद्धतीचा मूळ ढाचा तसाच ठेवून कालसुसंगत बदल करूव विवाह साजरा करण्यास समिती उत्तेजन देत असते. अशा प्रकारचे शेकडो विवाह समितीने साजरे केले आहेत. निरर्थक खर्च व कर्मकांडे टाळून केलेले अशा प्रकारचे विवाह तरुण वर्गात लोकप्रिय होत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रत्यक्ष कृती-कार्यक्रमाबरोबरच धर्म, तत्त्वज्ञान व अध्यात्म इत्यादी विषयातील तथाकथित तज्ज्ञ म्हणविणार्याबरोबर डॉक्टरांना वाद-प्रतिवाद करावा लागत होता. समितीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रा. प. रा. आर्डे यांनी संपादित केलेली ‘श्रद्धा–अंधश्रद्धा ः वाद प्रतिवाद’ ही पुस्तिका अशाच एका (वितंड) वाद-प्रतिवादाच्या वृत्तांताचे हे संकलन आहे. विद्यावाचस्पती असे प्रसिद्धीच्या झोतात असलेले शंकर अभ्यंकर यांच्या बरोबरचा हा वाद-प्रतिवाद त्या काळी भरपूर गाजला होता. श्रद्धा आणि पर्यायानं धार्मिकता म्हणजे मानवतावादी नीतिमूल्यांचा शोध की शब्दप्रामाण्यावरील निष्ठांचा तुरुंग या दुविधेतून काही विचार मंथन होण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शंकर अभ्यंकर यांच्यात झालेल्या वाद-संवादाच्या इतिवृत्ताची ही पुस्तिका आहे.
प्रा. प. रा. आर्डे यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतीची ‘विवेकसाथी ः डॉ. दाभोलकर’ ही पुस्तिका आहे. सरांनी विचारलेले प्रश्न व कुठलाही आडपडदा न ठेवता डॉक्टरांनी दिलेले उत्तर यामुळे आर्डे सरांनी घेतलेली डॉक्टरांची ही मुलाखत अत्यंत वाचनीय झाली आहे. म्हणूनच ही पुस्तिका वाचत असताना डॉक्टरांच्या जीवनातील अनेक पैलूंचे आपल्याला दर्शन होते व हे सर्व खरे असेल का हा प्रश्न विचारावासा वाटतो.
प्रा. प. रा. आर्डे यांनी मुलाखतीच्या शेवटी डॉक्टरांबद्दल लिहिताना देव न मानणारा देवमाणूस, नशीब न मानणारा नशीबवान, आम्हीच खरे धार्मिक असे विरोधकांना ठणकावून सांगणारा धर्मचिकित्सक असा डॉ. दाभोलकर एक सच्चा पण निर्भय माणूस, असे नमूद केले आहे.
डॉक्टर दाभोलकरांच्या मते, देवी अंगात येणे वा भुताने झपाटणे हे दोन्ही सारखेच असून त्यांचे मूळ ढोंगीपणात शोधता येते. आपल्याकडे भूत ही संकल्पना अपवित्र मानले जाते, तर देवी पवित्र मानले जाते. मुळात या सर्व गोष्टी मनोविकाराशी संबंधित असल्यामुळे डॉक्टर आपल्याला मन म्हणजे काय, मन कुठे असते, ब्रेन डेड म्हणजे काय, अंतर्मन, बाह्य मन हा काय प्रकार असतो, आपल्याला आठवते म्हणजे नेमके काय होत असावे, अंतर्मन ही आठवणींची वखार म्हणजे काय, स्वसंमोहनाचा संचार कसा होतो, मनोविघटन कसे होते, या रुग्णांना प्राक्तन, प्रारब्ध असे लेबल चिकटविणे योग्य ठरेल का इत्यादी अनेक गोष्टींचा आपल्याला परिचय करून देतात. यात कुठलेही वैद्यकीय परिभाषा न वापरता आयुष्यात घडलेल्या उदाहरणावरून ते सोप्या भाषेत समजून सांगतात. डॉक्टरांचा भर प्रबोधनावर जास्त होता. क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे असे त्यांना वाटत होते. व समितीच्या कृतीकार्यक्रमांना त्यांनी याच अनुषंगाने वेगळी दिशा दिली.
‘भुताने झपाटणे’ या पुस्तिकेत डॉक्टरांनी भूत या संकल्पनेचा छानपैकी आढावा घेतला आहे. भुताचे प्रामुख्याने काही प्रकार करता येतात. पहिला ढोंग किंवा भास. दुसरे संस्कार, तिसरे सूचनावर्तन आणि चौथे इंद्रियजन्य भ्रम. या चार गोष्टींपैकी कोणत्याही एका गोष्टीद्वारे किंवा या चारही गोष्टी एकत्रित झाल्यानंतर ‘भूत’ या कल्पनेची निर्मिती होते. डॉ. अब्राहम कोवूरांनी लिहिलेल्या एका प्रसंगाचे वर्णन करून डॉक्टरांनी भुताचे झपाटणे नेमके कसे असते, हे लिहिले आहे. जनसामान्यातील अज्ञानाचा फायदा घेत अंधश्रद्धा व तथाकथित चमत्कारांच्या जोरावर स्वतःचे साम्राज्य उभारणार्या बुवाबाजीच्या विरोधात समितीने मोठ्या प्रमाणात लढा उभा केल्यामुळे या बुवाबाजीचे अक्राळविक्राळ स्वरूप उघडे पडलेले आहे.
डॉक्टर दाभोलकरांनी ‘बुवाबाजीचे घातक जाळे’ या पुस्तिकेत उल्लेख केल्याप्रमाणे बुवाबाजीविरुद्धची लढाई हा चळवळीतील नेहमीच आकर्षणबिंदू राहिला आहे. तथाकथित बुवा-बाबा, स्वामी-महाराज, मांत्रिक, देवऋषी, संत-महंत असे सर्वच जण स्वत:च्या आध्यात्मिक दैवी शक्तीचा छुपेपणाने व खुलेपणाने प्रसार करत लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा करत असतात. या प्रत्येकाचे मंत्र-तंत्र, गिर्हाईक, कार्यपद्धती वेगवेगळी असते. यापैकी ज्याची बुवाबाजी थेट असते, ते सहजपणे लक्षात येते.
बुवाबाजीविषयी डॉक्टरांनी केलेल्या मूलभूत मांडणी व विश्लेषणामुळे ही पुस्तिका अत्यंत वाचनीय झालेली आहे. बुवाबाजी फोफावण्याची कारणं, जनसमूहाची भीतिग्रस्त मानसिकता, भक्तगणांची कृपाप्रसाद घेऊन परमकल्याणाचा मार्ग व आधार शोधण्याचा दुराग्रह, अनुग्रहासाठी तडफडणे, एखाद्या गुरूचे शिष्यत्व ही फॅशन होणे, पारंपरिक धार्मिक विचारांचा पगडा, अवतार कल्पना, बाबा-गुरुंच्या रूपातील ईश्वराचे प्रगटीकरण, कर्मविपाक सिद्धांताचा प्रभाव इत्यादी गोष्टीवरील त्यांचे भाष्य वाचकांना अंतर्मुख करतात. यात श्रद्धेचा मामला असल्यामुळे जरा जपूनच पाऊल उचलावे लागते याबद्दल डॉक्टरांच्या मनाच शंका नव्हती, हे पुस्तिका वाचताना जाणवते.
डॉक्टरांच्या ‘खेळाचे मानसशास्त्र’ या पुस्तकाला माजी मुख्यमंत्री मा. शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली होती व गौरवोद्गार काढले होते. कबड्डी खेळाचे एक व्यासंगी अभ्यासू आणि क्रीडाप्रेमी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कबड्डी ह्या खेळावर एक पुस्तक लिहून क्रीडा वाङ्मयात मोलाची भर घातली आहे, असे त्यांनी उल्लेख केला होता. पाश्चात्त्य देशात खेळाडू, क्रीडा संघटना आणि क्रीडा समीक्षक ह्या बाबतीत अतिशय जागृत असतात… डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाने ही उणीव काही प्रमाणात भरून काढण्याचे कार्य केले आहे, असेही त्यांना वाटत होते.
या खेळप्रकाराचे मैदान कसे असावे, नाणेफेकीचे महत्त्व, प्रतिस्पर्ध्याबद्दल सावधगिरी, संघनायकाची नेतृत्वशैली, आत्मविश्वास, सूक्ष्म निरीक्षणाचे फायदे, सामन्याची गती, उतावीळपणामुळे होणारे नुकसान, इत्यादी अनेक गोष्टींबद्दलचे डॉक्टरांचे विचार वाचताना या खेळात ‘हनुमान उडी’ला महत्त्व प्राप्त करून देणार्या डॉक्टरांच्या एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला दर्शन घडते.
डॉक्टर दाभोलकरांनी ‘नवसाच्या पशुहत्येचा गळफास’ या पुस्तिकेत एके ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नवस फेडण्याच्या नावाने जत्रेत होणार्या पशुहत्येला यासाठी विरोध आहे की हे कर्मकांड म्हणजे गरिबाला गरीब ठेवण्याचे कारस्थान आहे. नवस फेडावा लागतो; अन्यथा, देवाचा कोप होण्याची शक्यता असते. नवस बोललेला नसेल तरी अनेकदा परंपरेने, प्रथेने पार पाडावयाचे धार्मिक कृत्य म्हणून पशुहत्या अटळ असते. नवस फेडण्याचा धाक असो अथवा प्रथापालनाचा प्रश्न असो, तो बहुसंख्य वेळा गरीब बांधवांच्या माथीच मारला गेलेला असतो. पशुहत्येचे अर्थकारण व धर्मकारण समजून घेतल्यास नवसाच्या पशुहत्येचा गळफास गरिबांचा कसा जीव घेतो हे कळू लागते. मुळात धर्मविचाराचा नव्हे, तर समाजाचे हित बघण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचा आग्रह होता.
आरेवाडी, चिवरी इत्यादी ठिकाणच्या पशुहत्या थांबवण्याच्या प्रयत्नात कशा प्रकारच्या अडचणी आल्या, कशा प्रकारच्या शेरेबाजीला तोंड द्यावे लागले, किती टीका सहन करावी लागली, प्रशासनाचा, पंचायतीचा, यात्रा समितीचा सहभाग कसा होता, कार्यकर्त्यांना काय काय सोसावे लागले इत्यादी हकिकती पुस्तिकेत वाचताना डॉक्टरांच्या सहनशीलतेची नकीच कल्पना येईल.
दैवी प्रकोपाबद्दल प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या शनिशिंगणापूरच्या लढ्याचे डॉक्टर दाभोलकरांच्या शब्दातील वर्णनाची ‘लढा शनिशिंगणापूरचा’ ही पुस्तिका अत्यंत वाचनीय आहे. शनिशिंगणापूरचे देवस्थान चमत्कारासाठी ऐन प्रकाशझोतात होतं. लक्षावधी भाविकांची गर्दी खेचत होतं. ‘या गावातील शनीच्या चौथर्यामुळे येथे चोरी होत नाही; त्यामुळे या गावातील घरांना दारे नाहीत; कडी कोयंडा नाहीत; कुलपं नाहीत. जर कुणी चुकून चोरी केल्यास शनीच्या प्रकोपामुळे चोर आंधळा होईल’, अशी आख्यायिका पसरलेली (की पसरवलेली) होती. तसेच शनिशिंगणापूरची सर्वांत अस्वस्थ करणारी अंधरूढी कोणती असेल, तर शनिदेवाच्या दरबारात पाळण्यात येणारी स्त्री-पुरुष असमानता. शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श सोडाच, शनीचा जो चौथरा बांधलाय त्या चौथर्यावर स्त्रियांना चढण्यास मनाई होती.
खरे पाहता समितीकडे त्या गावातील पोलीस दाखल्यावरून चोरी झालेले पुरावे होते. परंतु गावकर्यांच्या दबावाखाली त्यांचा तपास होत नव्हता. जर गावात चोरी होत नसल्यास देवस्थानात कुलूपबंद दानपेटी कशाला? या डॉक्टराच्या प्रश्नाला उत्तर नव्हते. कुठलेही देवस्थान अशा प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी देवळाचे पुजारी व गावातील व्यापारी व इतर व्यावसायिकांचे संगमनत असते. कारण, त्यातून सर्व संबंधितांना मोठी अर्थप्राप्ती होत असते, हे एक उघड गुपित आहे. त्यामुळे समितीची बदनामी करण्यात याच वर्गाचा छुपा पाठिंबा होता, असे म्हणण्यास भरपूर वाव होता. या लढ्याची संपूर्ण हकिकत या पुस्तिकेत असून ते मुळातूनच वाचाला हवे.
मानवी बुद्धीला अनाकलनीय अशी वास्तुपुरुष ही शक्ती व्यक्तीचे जीवन नियंत्रित करीत असते, यावर बहुसंख्यांचा विश्वास असतो. या शक्तीला शरण जाणे, तिची पूजा करणे, तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे यामध्येच अंतिमत: आपले हित आहे अशी मानसिकता या विश्वासातून निर्माण होते. विज्ञानाच्या देणग्या हरघडी वापरणारा माणूस विज्ञानाची विचारसरणी नाकारत असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारून प्राचीन ग्रंथाचा आधार घेत वास्तुश्रद्धेला वास्तुशास्त्राचा दर्जा देण्याचा प्रयत्न होत असल्यामुळेच समितीने या तथाकथित शास्त्राचा भांडाफोड करण्याचा विडा उचलला होता.
डॉक्टरांनी या वास्तुशास्त्राच्या संबंधातील सर्व पैलूंचा अभ्यास केला होता, याचा प्रत्यय भ्रामक वास्तू (श्रद्धा) शास्त्र ही पुस्तिका वाचताना लक्षात येते.
प्राचीन वास्तुशास्त्रातील भंपकपणाची अनेक उदाहरणं डॉक्टरांनी दिलेली आहेत. विहीर वा पाण्याची टाकी कुठे असावी, दरवाजा कुठल्या दिशेला हवे, स्वयंपाकाचा कट्टा कुठे असावा, शौचालय कुठे असावे इत्यादी बाबतीत सल्ला देणार्यांचे पीक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात उगवले व बांधकाम व्यवसायात नको तितके अडचणी उभे करण्यात आले. आपण घर कशासाठी बांधतो हेच लोक विसरून गेले. बुद्धी गहाण ठेवून वास्तुशास्त्रज्ञावर विश्वास ठेवणे कितपत बरोबर आहे हा प्रश्न विचारल्यास वावगे ठरणार नाही.
डॉक्टरांनी एके ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे विवेकवादी कार्याचे विचार, उच्चार, प्रचार, संघटन, आचार व संघर्ष असे सहा टप्पे असतात. योग्य विचार समजून घेणे हा या विवेकनिष्ठतेच्या वाटचालीतील पहिला टप्पा आहे. डॉक्टरांचे विचार समजावून देणार्या या पंधरा पुस्तिकांचा संच प्रत्येक विवेकवादीकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. ओघवती सोपी साधी भाषा, वाचकांशी थेट संवाद, शब्दबंबाळ व संदर्भबंबाळ नसलेली मुद्देसूद मांडणी, विचारातील स्पष्टता व कुठलाही आडपडदा न ठेवता केलेले लेखन हे या पुस्तिकांचे वैशिष्ट्य आहे. यामुळे डॉक्टरांचे विचार समजून घेण्यासाठी ही वैचारिक शिदोरी घरोघरी पोचायला हवी.