भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मविरोधी नाही! – मा. न्यायमूर्ती अभय ओक

-

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे व्याख्यान ‘भारतीय संविधान आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर पुणे येथे आयोजित केले होते. त्यानिमित्त त्यांनी केलेल्या भाषणाचे हे शब्दांकन…

नमस्कार,

माझे उच्च न्यायालयातील जेष्ठ सहकारी मा. हेमंतजी गोखले, डॉ. हमीद दाभोलकर व इतर सहकारी कार्यकर्ते तसेच व्यासपीठावरील इतर मान्यवर.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली याविषयी मी स्वतःला भाग्यवान समजतो. १९८८ वा ८९ मध्ये माझी आणि डॉ. दाभोलकरांची भेट झाली होती. कुठली तरी कायद्याची समस्या होती, त्या वेळेला कोणाच्यातरी मार्फत डॉ. दाभोलकर यांनी मला दूरध्वनी केला होता. नंतर आम्ही उच्च न्यायालयात भेटलो. त्या वेळेला मला कमी अनुभव होता, मी नुकतीच वकिलीला सुरुवात करून चार-पाच वर्षे झाली होती. आता नेमका काय विषय होता ते मला आठवत नाही. पण मी म्हटलं, आपण योग्य त्या ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील अतिशय ज्येष्ठ असे कायदेतज्ज्ञ श्री. एम. ए. राणे यांना भेटून आम्ही त्यांचा सल्ला घेतला होता. त्या मीटिंगमधलं डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे एकच वाक्य मला आठवतं. त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की, माझा श्रद्धेला विरोध नाही तर अंधश्रद्धेला विरोध आहे. हे वाक्य माझ्या मनात तेव्हापासून घर करून राहिलेले आहे. नंतर कधीतरी मी त्यांची दूरदर्शनवरची मुलाखत ऐकली होती, त्यात त्यांनी ते वाक्य अधोरेखित केलं होतं. तर अशा मोठ्या व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याखान आयोजित केलं आहे, त्यात मला बोलायची संधी मिळाली, ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची घटना आहे.

आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल, २६ जानेवारी २०२५ ला भारताच्या राज्यघटनेला पंचाहत्तर वर्षं झाली. या निमित्ताने न्यायालये, महाविद्यालये, महाराष्ट्र बार कौन्सिल अशा अनेक संस्थांनी कार्यक्रम आयोजित केले. अशा अनेक कार्यक्रमामध्ये मी भाषणं केली, पण कोणालाही आजचा ‘भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा विषय घ्यायचं कधी सुचलं नाही. या विषयाविषयी आपण काहीतरी करावं असं कोणालाही वाटलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा अंनिसचं कौतुक करावंसं वाटतं.

मला असं वाटतं की, डॉक्टर जे म्हणाले होते, श्रद्धेला विरोध नाही तर अंधश्रद्धेला विरोध आहे. हे पूर्णपणे राज्यघटनेच्या चौकटीत बसतं. घटनेत जी प्रस्तावना आहे, तिला भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या राज्यघटनेच्या मराठी प्रतीत ‘उद्देशिका’ म्हटलं आहे. खरं म्हणजे, घटनेचे सार त्या उद्देशिकेत आहे. त्यामध्ये समाजवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे. त्याच्यात विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आणि उपासनेचे  स्वातंत्र्य आहे. घटनेतील मूलभूत हकांचा जो भाग आहे, त्यातील अनुच्छेद पंचवीसमध्ये सुद्धा ते अधोरेखित केले आहे… आणीबाणीच्या काळामध्ये ४२ वी घटना दुरुस्ती  झाली, त्यातील बराचसा भाग नंतर आलेल्या सरकारने रद्द केला. त्यातील अनेक दुरुस्त्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्या, पण त्यातील एकच चांगली बाब होती, ती म्हणजे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये! तो अनुच्छेद ५१-ए हा या घटना दुरुस्तीमुळे आला.

धर्माचं आचरण किंवा त्याचा प्रचार करण्याचा हक आहे, तो अनुच्छेद २५ मध्ये होताच. फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा हक सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य ह्यांच्या आधीन आहे. तो अबाधित अमर्याद हक नाहीये.

राज्यघटनेत सुरुवातीला मूलभूत हक आहेत, त्यानंतर राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे (Directive principles of state policy) आहेत आणि त्यानंतर अनुच्छेद ५१ ए मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा ऊहापोह केलेला आहे. यात अनेक कर्तव्ये आहेत, त्यातील तीन महत्त्वाची कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत.  त्यातील पहिलं महत्त्वाचं कर्तव्य- संविधानाचे पालन करणं, त्याच्या आदर्शांचा सन्मान करणं, संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांविषयी आदरभाव बाळगणं हे आहे. दुसरं महत्त्वाचं कर्तव्य-पर्यावरणाचं संरक्षण करणं, वने, सरोवरे, नद्या यांचे संरक्षण आणि संवर्धन करणं आणि सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणा बाळगणं असे आहे. तिसरं महत्त्वाचं कर्तव्य- वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, मानवतावाद, शोधबुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे हे आहे.आधी वकील म्हणून आणि त्यानंतर २२ वर्षे न्यायाधीश म्हणून माझा अनुभव असा आहे की, या तीन मूलभूत कर्तव्यांचे पालन नागरिक अभावानेच करतात. दुर्दैवाने या ४९ वर्षांच्या काळामध्ये जवळजवळ सगळ्यांना त्यांचा विसर पडला आहे.

संविधानाचे पालन करणं, त्याच्या आदर्शांचा सन्मान करणं, संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांविषयी आदरभाव बाळगणं, या पहिल्या कर्तव्याचा आपण विचार केला तर असं दिसेल की, त्याच्याकडे आपण कानाडोळा केला आहे. आता राज्यघटना म्हणजे काय हे सर्वांना माहीत असतं, पण घटनेचे आदर्श म्हणजे काय? हे समजण्यासाठी आपण उद्देशिका वाचली तरी पुरेशी असते. उद्देशिकेत न्याय आहे. अर्थात, हा न्यायालयात मिळतो तो न्याय नाही. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय असा हा खूप मोठा न्यायाचा विचार आहे. अभिव्यक्ती, विचार, धर्म अशी निरनिराळी स्वातंत्र्ये आहेत. संधीची समानता आणि इतर अनेक समानता आहेत. बंधुत्व आहे. समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, गणराज्य घडवण्याचा निर्धार आहे. हे सगळे घटनेचे आदर्श आहेत. आपण या आदर्शांविषयी किती आदरभाव बाळगला आणि आपण घटनेचे पालन किती प्रमाणात केले याचा प्रांजळपणे विचार केला पाहिजे.

आपल्याला घटनेने जे मूलभूत हक दिले आहेत, त्या मूलभूत हकांची विशेषतः जगण्याचा हक किंवा विचारस्वातंत्र्य, व्यतिस्वातंत्र्य यांची पायमल्ली करणं हे राज्यव्यवस्थेकडून घडत असतं. मग कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ दे. तर आपण मूलभूत हकांची पायमल्ली व्यवस्थेला करून देतो, म्हणून त्या लोकांना असं वाटतं की, आपण ही पायमल्ली केली तरी चालेल. इथे राज्यघटनेचे पालन करण्याचा महत्त्वाचा भाग येतो. हे जे मूलभूत हक दिलेले आहेत, ते इतके महत्त्वाचे आहेत की, हे जर हक नसतील तर आपली लोकशाही टिकणार नाही. जेव्हा आपण म्हणतो घटनेचे पालन केलं पाहिजे, तेव्हा आपण सर्वांनी ते केलं पाहिजे आणि दुसरं कोणी करत नसेल तर त्याला आपण त्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. विशेषतः विचारस्वातंत्र्याची पायमल्ली होते, त्या वेळेला बर्‍याचदा आपण ही गोष्ट लांबून बघतो. आपण त्याच्याकरता काही करतो का? काही विधायक करतो का? हा प्रश्न आपल्याला विचारावा लागतो. त्यामुळे मूलभूत कर्तव्य हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.

आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळू या. ५१ ए (एच) मध्ये फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन नाहीये, त्याच्याबरोबर शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे या अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता जर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा असेल तर त्याच्याबरोबर शोधक बुद्धी हवीच, त्याच्याशिवाय आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाळगता येईल? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे आपण अगदी सोप्या भाषेत सांगायचं ठरवलं तर असं म्हणता येईल की, प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेणं किंवा पारखून घेणं! म्हणून प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेणं हे आपलं मूलभूत कर्तव्य ठरतं.

घटनेच्या अनुच्छेद २१ विषयी देखील मी नंतर विस्ताराने बोलणार आहे, कारण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचा संबंध आहे.

सुदैवाने महाराष्ट्रामध्ये डॉ. दाभोलकरांबरोबर अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या, त्यांनी असं ठासून सांगितलं की, प्रत्येक गोष्ट आपण विज्ञानाच्या किंवा विवेकाच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे. या निमित्ताने मला एका नामांकित व्यक्तीचे नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं. ते म्हणजे डॉ. जयंत नारळीकर. त्यांचे ‘चार नगरातील माझे विश्व’ हे पुस्तक आपण वाचलं असेल. पूर्ण त्यांचे शब्द वापरत नाही, पण त्यांनी जे काही म्हटलं ते सांगतो. विज्ञान प्रसार व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणार्‍या समाजावरही अंधश्रद्धेचा पगडा आहे. डॉ. नारळीकर अतिशय आशावादी आहेत. म्हणून त्यांनी असंही म्हणून ठेवलं आहे की, कितीही विघ्नं कोसळली तरी शहाणी माणसं आपलं नियत कर्तव्य सोडत नाहीत. हा आशावाद जगताना आपण अनेक व्यक्ती बघतो. डॉ. दाभोलकर यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे… आपण डॉ. नारळीकर यांची पुस्तकं वाचलीत तर एक गोष्ट लक्षात येईल की, त्यांचे विज्ञानविषयक विचार किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीचे विचार, अंधश्रद्धा निर्मूलनाविषयीचे विचार हे अतिशय संतुलित आहेत, संयत आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाहीये. हे डॉ. दाभोलकर यांच्या पुस्तकातून देखील जाणवतं. त्यांनी कुठेही आक्रस्ताळेपणा केला नाहीये. या मंडळींनी कुठेही मी विज्ञानवादी आहे किंवा मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या जगाकडे बघतो असा अभिनिवेश बाळगलेला नाहीये. कारण त्यांना माहीत होतं की, त्यांचे ते मूलभूत कर्तव्य आहे. आता मी माझं कर्तव्य केलं म्हणून माझी पाठ थोपटून घेऊ शकत नाही, कारण ते मूलभूत कर्तव्य करणं माझ्याकडून अपेक्षित असतं….२० किंवा २१ मेच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने डॉ. दाभोलकर यांच्याबरोबर डॉ. नारळीकर बसलेले एक छायाचित्र छापलं होतं.

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे डॉ. नारळीकर यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींकडून शिकलं पाहिजे. डॉ. नारळीकर यांनी फलज्योतिष हे विज्ञान नाही, हे अगदी ठासून सांगितलं होतं. नुसतं त्यांचं मत म्हणून सांगितलं नव्हतं, तर त्यांनी संशोधन करून सांगितलं होतं. पण ज्योतिषशास्त्राला वैज्ञानिक आधार नाही हे त्यांनी अतिशय संयतपणे सांगितलं होतं. मला असं नेहमी वाटतं की, ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, जे खरोखर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतात, ते कधीही अभिनिवेश बाळगत नाहीत.

आपल्याला माहीत आहे की, माझा अभिव्यक्तीचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला तर मी उच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि हकाच्या अंमलबजावणीसाठी मँडॅमस रिट मागू शकतो. मात्र राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांसाठी कोर्टात जाऊन त्यांची अंमलबजावणी करा असं सांगू शकत नाही….

२००२ सालचा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या  ए. आय.आय.एम.एस. स्टुडंट युनियन वि. ए. आय.आय.एम.एस. या निकालात असं म्हटलं होतं की, अनुच्छेद ५१ ए मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत. शासनाची नाहीत. त्यांनी पुढे असं म्हटलं होतं की, ५१ ए मधली नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पार पाडणं हे शासनाचे एकत्रित कर्तव्य आहे.” शेवटी शासन व्यवस्था म्हणजे नेमकी काय असते? नागरिकांचीच व्यवस्था असते, नागरिकच असतात. (Duty of every citizen is the collective duty of state) त्यामुळे असं म्हणता येईल की, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला प्रवृत्त करणं हे शासनाचे किंवा शासनाने निर्माण केलेल्या संस्थांचे कर्तव्य ठरतं. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा असेल तर आपल्याला अंधश्रद्धेचा त्याग केला पाहिजे… आपण अंधश्रद्धेचा त्याग करू शकलो नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पालन कधीही करू शकणार नाही.

५१ ए (एच) मध्ये मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी, सुधारणावाद या चार गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. त्यातून एक वेगळा संदेश जातो. मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा फार जवळचा संबंध आहे. शोधक बुद्धी नसेल तर आपण मानवतावाद कसा विकसित करू शकू? शोधक बुद्धी आपल्याकडे खरोखरच असायला पाहिजे, जी मानवाकडे खरोखरच आहे. म्हणूनच एवढे शोध लागले. जवाहरलाल नेहरूंनी फार वर्षांपूर्वी सांगितलं होतं, विज्ञान ही एकच गोष्ट आपले अनेक प्रश्न सोडवणारी आहे. त्यांनी असं म्हटलं होतं,‘ुहे लरप रषषेीव ीें ळसपेीश ीलळशपलश?’ म्हणून मला अनुच्छेद ५१ ए (एच) चा विचार करताना असं वाटतं की, आपल्याला सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुधारणावाद हा बाळगळाच पाहिजे. आपल्याकडे शोधक बुद्धी नसेल तर आपण विज्ञानाची कास कशी धरणार? लोक विज्ञानाने दिलेल्या साधनांचा वापर करतात, याचा अर्थ त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टी असतोच असे नाही. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो, आपल्याकडे अनेक उत्सव होतात, त्यात डिजेचा वापर होतो. ध्वनीप्रदूषण नियमांमध्ये दिलेल्या डेसिबल लेव्हलपेक्षा त्यांचा आवाज जास्त असतो. त्याने कानठळ्या बसतात, हादरे बसतात. आता डीजे सिस्टिम ही विज्ञानाने निर्माण केली आहे म्हणून त्याचा वापर केला म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आला असं म्हणता येत नाही. मी दुसरं उदाहरण देतो. अणुशास्त्र विकसित झाले, त्यातून अणूबॉम्ब तयार करण्याची क्षमता निर्माण झाली. अणुबॉम्ब विज्ञानाची निर्मिती आहे, पण त्याचा वापर करणार्‍यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता असं म्हणणं अशक्य आहे. त्यामुळे विज्ञानाचा वापर करतात त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतोच असं नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. अनुच्छेद ५१ ए (एच) मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर मानवतावाद पण आहे. जर आपण विज्ञानाचा वापर मानवतेच्या विरोधात करायला लागलो तर जे तो वापर करत आहेत त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टी होती असं आपण म्हणू शकत नाही. शेवटी विज्ञानाचा वापर कशाकरता केला पाहिजे? त्याच्यामागचे तत्त्वज्ञान काय आहे? त्याचा वापर मनुष्य संहाराकरता किंवा त्याला काही नुकसान होईल याच्याकरता नाही तर मनुष्याच्या विकासाकरता केला पाहिजे.

आपल्याला एक आवर्जून सांगावंसं वाटतं. डॉ. नारळीकर किंवा डॉ. दाभोलकर यांच्या विचारातही कुठेतरी त्याचा उल्लेख आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे असं म्हणणे हा काही धर्म विरोध होत नाही. कारण कोणत्याही धर्मात सुधारणावाद हा होताच. महाराष्ट्रातील गाडगे महाराजांपर्यंतची संत परंपरा होती, त्या सर्वांनी सुधारणावादच सांगितलेला आहे. आपण गाडगे महाराजांची  प्रवचने ऐकली तर आपल्याला दिसेल की, त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आपला समाज सुधारला पाहिजे, आपल्या धार्मिक संकल्पना सुधारल्या पाहिजेत हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला… जोपर्यंत मानव जात अस्तित्वात आहे तोपर्यंत धर्म आणि श्रद्धा राहणार आहे याचा आपण स्वीकार केला पाहिजे. आता मी नास्तिक आहे, पण जे कुठल्यातरी धर्मावर किंवा देवावर श्रद्धा बाळगतात ते वाईट आहेत असं मी म्हणू शकत नाही. आपण जर इतिहास पहिला तर असं दिसतं की, जे धर्म परंपरेचा भाग होते अशा अनेक व्यक्तींच्या मनामध्ये कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार होता. म्हणून त्यांनी धर्मामध्ये सुद्धा परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. घटनेला किंवा सुशिक्षित माणसाला अभिप्रेत असलेली परिवर्तने धर्मात झालेली नाहीयेत. पण धर्मामध्ये सुद्धा काही परिवर्तने झाली आहेत. मला नेहमी असं वाटतं की, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं म्हणजे आपण धर्माच्या विरुद्ध काही करतोय असं होत नाही. कारण जसा काळ बदलला तसं विज्ञानाचे महत्व पण वाढत गेलं आहे. आता प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर पारखून पहावी लागते.

मी आता घटनेच्या अनुच्छेद २१ च्या राइट टू लाइफचा थोडासा ऊहापोह करतो. राइट टू लाइफ म्हणजे  नुसतं जगण्याचा अधिकार नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, माणूस म्हणून अतिशय समृद्ध जीवन जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे. तो नुसता जिवंत राहण्याचा अधिकार नाहीये. मी मगाशी म्हणालो, पर्यावरणाचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हे नागरिकांचे कर्तव्य आहे. परंतु घटनेच्या अनुच्छेद २१ ची विस्तृत व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने केली आहे; त्यात असं म्हटलं आहे की, प्रदूषणमुक्त पर्यावरणात राहण्याचा अधिकार घटनेने प्रत्येक माणसाला दिला आहे.

घटनेच्या अनुच्छेद १९ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचारस्वातंत्र्य आहे, भारतात फिरायचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य फक्त नागरिकांना दिलेले आहे. पण अनुच्छेद २१ हा अधिकार फक्त नागरिकांपुरता मर्यादित नाही. तर या भारत देशात जे जे कोणी आहेत त्यांना तो उपलब्ध आहे. जर आपण पर्यावरणाचं संवर्धन, संरक्षण केलं नाही तर त्याचा आपण उपभोग कसा घेणार? पर्यावरणाचं संवर्धन, संरक्षण याच्याशी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार अतिशय जवळून निगडित आहे. अनुच्छेद २१ मध्ये प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा हक दिलेला आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावीच लागेल.

मी एका निकालपत्रात म्हटलं आहे की, घटनेच्या अनुच्छेद २१ प्रमाणे आपल्याला नुसतं सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार नाही तर चांगलं, अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. चांगले विचार वाचायला मिळाले, चांगलं साहित्य वाचायला मिळालं, एखादी कलाकृती बघायला मिळाली, एखादे हास्यचित्र पहायला मिळाले, एखाद्या स्टँड अप कॉमेडियनचा शो पाहिला तर आपलं आयुष्य समृद्ध होत असतं… आपल्याला समृद्ध आयुष्य जगण्याचा अधिकार दिला आहे. तो परिपूर्ण होण्याकरता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा लागेल, शोधक बुद्धीचा विकास करावा लागेल. आपल्या संतांकडे शोधक बुद्धी होती, धर्म सुधारकांकडे होती. धर्मामध्ये सुधारणा होण्यासाठी ही शोधक बुद्धी हवी. मला असं वाटतं की, देवावर श्रद्धा ठेवून, पण अंधश्रद्धा न ठेवता, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता येतो. आपण जर इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, अनेक शास्त्रज्ञ होते, ते काही नास्तिक नव्हते. त्यांची श्रद्धा होती, पण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं म्हणजे काय हे  कळलं होतं, त्यांनी शोधक बुद्धीचा विकास केला होता.

मला नेहमी असं वाटतं की, राज्यघटनेचे पालन करणं किंवा राज्यघटनेने निर्माण केलेले आदर्श आहेत त्यांचा आदर करणं, पर्यावरणाचा आदर करणं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर करणं ही जी आपली मूलभूत कर्तव्ये आहेत, हा एक आपल्या समाजाच्या उद्धाराचा मार्ग आहे. शासन यंत्रणेकडून अपेक्षा करणे अगदी रास्त आहे, त्यांनी मूलभूत हकांची पायमल्ली करता कामा नये. मात्र, नागरिकांनी  ५१ ए मध्ये लिहिलेल्या कर्तव्यांचे पालन केले तरच आजच्यापेक्षा प्रगत, प्रगल्भ समाज बघायला मिळेल.

आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर त्याचे समतेशी नातं आहे. माणसामध्ये जाती कशा निर्माण होऊ शकतात? धर्म कसे निर्माण होऊ शकतात? किंवा जातीवर आधारित असमान वागणूक कशी दिली जाते?.. कारण, हे विज्ञानात कुठेच लिहिलेले नाही. मनुष्य जात ही एकच आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याप्ती खूप आहे. सामाजिक चळवळीत त्याचा उपयोग आहे.  कुठल्याही दृष्टीने आपण समाजाच्या उद्धाराचा विचार करायला लागलो तर वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे याबद्दल आपली खात्री पटेल.

आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय घेतला आहे. मला असं वाटतं की, ह्या विषयावर खूप चर्चा व्हायला पाहिजे. आपण विज्ञानाने निर्माण केलेली साधनं वापरतो. आपला मोबाईल फोन असेल किंवा ही ध्वनिक्षेपक यंत्रणा असेल; हे सर्व विज्ञानाने निर्माण केलं आहे. ज्याने निर्माण केलं त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टी होती म्हणून निर्माण केलं. त्याचा आपण वापर करतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन विसरतो किंवा प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या आधारावर तपासून घेतली पाहिजे, हे महत्त्वाचे तत्त्व विसरतो. आपण समृद्ध जीवन जगण्याकरता फक्त विज्ञानाचा उपयोग करून घेतोय, त्यासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनही बाळगला पाहिजे.

आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की, वैज्ञानिक दृष्टिकोन हा नुसता विचार नाहीये. ते घटनादत्त कर्तव्य आहे. हा विचार चुकीचा आहे असं आपण म्हणू शकत नाही. घटना चुकीची आहे असं म्हणू शकत नाही. घटनेची  एखादी तरतूद चुकीची आहे असं एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असेल, तर त्याला एकच मार्ग आहे. तो म्हणजे न्यायालयाचा दरवाजा ठोठावून ती तरतूद बेकायदेशीर आहे असं जाहीर करून देण्याची मागणी करणे. मला असं वाटतं की, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचाराचा स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाहीये. या विचाराचे महत्त्व पटवून द्यायचे असेल तर आपल्याला लहान मुलांमध्ये जावं लागेल, शाळा-कॉलेजेसमध्ये जावं लागेल. आपण ५०-६० वर्षांच्या माणसाला सांगितलं की, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा किंवा तुम्ही शोधक बुद्धी विकसित करा तर ते होणार नाही.

आज जे आपल्यासमोर मांडत आहे त्याचा उद्देश इतकाच आहे की हे जे घटनेत लिहिले आहे, ते पुढपर्यंत पोहचवले पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की, एखादी व्यक्ती जेव्हा एखादा विचार मांडते. डॉ. दाभोलकर यांनी विचार मांडले, लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर, म. गांधी यांनी विचार मांडले. विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे फार जवळचं नातं आहे. या पुण्यात विवेकबुद्धी वापरून गोपाळ गणेश आगरकर यांनी लिखाण केलं आहे. या सर्व मंडळींनी विचारप्रवर्तक लिखाण केलेलं आहे. म. गांधी यांचे काही विचार काही लोकांना पटणार नाहीत, त्यांना ते पटावेत असंही नाही. प्रत्येकाला व्यक्ती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्या विचारांचा प्रतिकार हा नेहमी विचारांनी करावा लागतो. विचारांचा मुकाबला हा विचारांनी करावा लागतो. तेच तर आपल्या लोकशाहीचे मर्म आहे. घटनेच्या अनुच्छेद १९ (१) चे ते मर्म आहे.

इथे आपण सर्व सुशिक्षित मंडळी जमलेले आहात, इथले बरेचसे लोक अंनिसचे काम करतात. आपल्याला घटनेत लिहिलेला विचार पसरवायचा आहे. मला असं वाटतं की, आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधक बुद्धीवर भर दिला तर खर्‍या अर्थाने आपल्याला डॉ. दाभोलकर यांची स्मृती जागवता येईल. आज आपण मला बोलायची संधी दिलीत. आपण रविवारी इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. माझे चुकीचे किंवा बरोबर विचार शांतपणे ऐकून घेतलेत. त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

शब्दांकन : सौरभ बागडे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]