‘विवेकरेषा’ व्यंगचित्र प्रदर्शन २०२५

गौरव सर्जेराव -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित ‘विवेकरेषा’ व्यंगचित्र प्रदर्शन २०२५, नुकतेच पार पडले. हे महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन होते. यामध्ये भारतामधील २५ नामवंत आणि प्रतिभावंत व्यंगचित्रकारांनी भाग घेतला होता.

सध्या देशात ज्या प्रकारे तरुणांना भुलवण्यासाठी, कट्टरतावादी धार्मिक विचारांना ताकद देण्यासाठी वेगवेगळ्या बुवा महाराजांचा वापर केला जात आहे ते बघून मला अत्यंत वेदना होतात.

कधीकाळी मी देखील अशा मागासलेल्या विचारांच्या चिखलात अडकलो होतो. आमच्या घरात सनातनी विचारांचा प्रसार करणार्‍या एका संस्थेचं वातावरण होतं. माझ्या आजीचा मी लाडका असल्याने ती मला त्या संस्थेच्या कार्यक्रमांना घेऊन जायची. बालसभासदांच्या नामस्मरणाच्या वर्गात घेऊन जायची. त्यांनी तिला भुलवून त्यांचा अत्यंत महागडा पेपर आमच्या घरी लावला होता. आजी अशिक्षित असल्याने तिला त्यातलं अवाक्षरही वाचता यायचं नाही, म्हणून तिला तो पेपर उशीखाली घेऊन झोपायला सांगितलं होतं. म्हणे, त्यातून सकारात्मक ऊर्जा डोक्यात शिरते. मला लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने मी तो पेपर वाचायचो. इथेच माझी अंनिस आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख झाली. ही ओळख पूर्णपणे नकारात्मक स्वरूपाची होती. लहानपणापासून व्यंगचित्र हा माझा आवडीचा विषय असल्याने मी पहिल्यांदा त्या पेपरमधील व्यंगचित्र बघायचो. मुस्लीम, ख्रिश्चन यांच्याबद्दल अत्यंत प्रक्षोभक चित्रण त्यामध्ये असायचं. सोबतच बर्‍याचदा शिंगे असलेला, दातांना सुळे असणारा उघडाबंब राक्षस दाखवायचे आणि तो धर्मकार्यात विघ्न आणतोय असं दाखवलेलं असायचं. त्याच्या शरीरावर अंनिस असं लिहिलेलं असायचं. लहान असताना मला हे कळायचं नाही की अंनिस म्हणजे काय? मला वाटायचं की तो राक्षसाला समानार्थी शब्द आहे. पुढे त्या पेपरमध्ये अनेक चमत्कारिक गोष्टींची चित्रं आणि माहिती असायची. त्यात पेपरचा लेखक लेख लिहितोय आणि वाईट शक्ती त्याला त्रास देत आहेत असा फोटो कुणीतरी काढल्याचं म्हटलेलं असायचं. कलाकार म्हणून घडत असल्याने उपजत चिकित्सक बुद्धी जागृत होती. मला प्रश्न पडायचे की असा कोणता कॅमेरा आहे जो वाईट शक्तींचे फोटो काढतो आणि तो बाकीच्या देशांकडे नसून फक्त ह्या लोकांकडे कसा? किंवा मग आणखी एक फोटो छापलेला असायचा ज्यामध्ये त्यांच्या गुरुमंडळींच्या फोटोंवर दैवी सुवर्णकण आलेले असायचे. मला प्रश्न पडायचा, अरेच्या.. हस्तकलेचं काम करताना माझ्या अंगावर सोनेरी चमकी सांडली की मी ही असा दैवी दिसतो. मग माझा फोटो का बरं कुणी घरात लावत नाही? असे ढीगभर प्रश्न पडायचे. त्या पेपरमध्ये जे छापून येते त्याला सुडोसायन्स (फसवे विज्ञान) म्हणतात असं मला कालांतराने समजलं. हा तर सायन्सवर सूड उगवण्याचा प्रकार झाला.

एक दिवस ‘खुपते तिथे गुप्ते’ या टीव्ही कार्यक्रमात मी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ऐकलं. त्यांचं बोलणं इतकं श्रवणीय होतं की त्यांनी मला विचार करायला भाग पाडलं. मग मी डॉ. दाभोलकरांची पुस्तकं वाचू लागलो. त्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आणि सोबत आणखी नवे प्रश्न मला पडू लागले. माझ्या चिकित्सक बुद्धीला चालना मिळाली. पुरोगामी, विज्ञानवादी,विवेकवादी विचार माझ्या डोक्यात खेळू लागले. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत असताना मला हे जाणवलं की समाजासाठी चांगलं काम करणार्‍या लोकांना राक्षस, असुर, दानव दाखवणं हे नवीन नसून पूर्वापार चालत आलेलं आहे.

अचानक डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्याची बातमी कानावर आली आणि मी सुन्न झालो. मी तेव्हा १६ वर्षांचा होतो. डॉक्टरांना ऐकताना आणि वाचताना मला कधीही असं वाटलं नाही, की त्यांनी अशी कोणतीही गोष्ट केली आहे, ज्यामुळे कुणाच्या भावना इतक्या दुखाव्यात. मी कधीकाळी ज्या संस्थेमध्ये होतो, त्या संस्थेच्या लोकांकडे संशयाची सुई गेल्यानंतर मला प्रचंड राग आला होता. घरातले त्यांचे सगळे पेपर मी त्यानंतर फेकून दिले.

खरंच मी आज हा विचार करतो की, जर डॉ. दाभोलकर यांच्या आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल मी वाचलं नसतं तर मी आज कुठे असतो? प्रश्न पडले नसते, तर मला सुद्धा सनातन्यांनी जाळ्यात ओढून हातात बंदूक देऊन कुणाचा तरी खून करायला पाठवलं असतं. पण विवेकवादी माणसांनी मला वाचवलं. तर मला मनापासून वाटलं की हा विवेकवादी विचार भरकटलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे,

आज ज्या प्रकारे समाजातला वैज्ञानिक दृष्टिकोन कुठेतरी हरवत चालला आहे आणि अंधश्रद्धेच्या एका मोठ्या खड्ड्यात आपल्याला ढकलण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे ते मला अत्यंत सलत होते. पण याबद्दल कसं व्यक्त व्हावं हे मला सुरुवातीला समजत नव्हतं. त्यानंतर माझा कुंचला हे हत्यार माझ्या लक्षात आलं आणि व्यंगचित्र नावाचं हे समाजप्रबोधनाचं माध्यम माझ्याकडे आहे आणि त्याचा वापर मला करायला हवा हे मला सुचलं. पण सोबतच हे ठाऊक होतं की, ही फक्त माझी भावना नाही तर या देशातल्या अनेक विवेकवादी व्यंगचित्रकारांची भावना आहे. त्यामुळेच माझ्यासोबत आणखी २४ व्यंगचित्रकार जोडले. २०२५ म्हणून २५ व्यंगचित्रकार अशी संकल्पना आकाराला आली.

ही संकल्पना मी महाअंनिसचे कार्यकर्ते असणार्‍या मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांना ऐकवली. आधी आमची ओळख नसतानाही त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून यासाठी संपूर्ण साहाय्य केलं. त्यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत.

भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य, मंजुल, सजिथ कुमार, घनश्याम देशमुख यांच्यासारख्या नावाजलेल्या व्यंगचित्रकारांनी या प्रदर्शनासाठी त्यांची व्यंगचित्रे देण्याची तयारी दर्शवली, ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. या प्रदर्शनासाठी एकाही व्यंगचित्रकाराने एक रुपयाचे देखील मानधन घेतले नाही. एका महिन्याच्या कालावधीत सगळ्या व्यंगचित्रकारांनी एकूण १५० व्यंगचित्रे दिली. यामध्ये काही जुन्या, तर काही नव्या व्यंगचित्रांचा समावेश होता. ही सगळी चित्रे अंधश्रद्धा, कट्टरता, भोंदूपणा आणि अज्ञानाविरुद्ध रेखाटलेली होती. आम्ही या वेळी व्यंगशिल्प नावाचा एक नवा प्रकार देखील यामध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला. यासाठी पेपरचा वापर करून आम्ही काही शिल्पे घडवली होती. सोबतच आम्ही महाराष्ट्रासाठी लहान गट आणि खुल्या गटामध्ये व्यंगचित्र स्पर्धा देखील आयोजित केली होती, त्याला देखील तुफान प्रतिसाद आला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वतःच्या कामामधून विवेकी विचार जपण्याचा मार्ग अवलंबलेल्या व्यक्तींकडून व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल यांनी या कार्यक्रमाला येण्याचं लगेच कबूल केलं आणि त्यांचा मौल्यवान वेळ या कार्यक्रमासाठी दिला. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविकातून महाअंनिसची भूमिका स्पष्ट केली. देशाचे समाजाचे चित्र कुठे बिघडले आहे हे व्यंगचित्र दाखवते, असं स्पष्ट मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं

त्याचसोबत अरविंद जगताप यांनी नेतेमंडळी आणि व्यंगचित्रकार यांच्यामध्ये पूर्वी कसे चांगले संबंध असायचे याचे छान किस्से सांगितले. व्यंगचित्रकार हा या समाजातील किती महत्त्वाचा भाग आहेत हे मंजूल यांच्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट झाले. इतक्या मोठ्या मान्यवरांसमोर माझंही मत मला मांडायला मिळालं, याहून मोठी गोष्ट काय असणार?

पुढील दिवसांमध्ये वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके झाली. यामध्ये ओंकार बागवे यांनी कॉमिक्स स्ट्रीप बद्दल, जयेश दळवी यांनी अ‍ॅनिमेशनबद्दल, मी व्यंगचित्र कलेबद्दल आणि घनश्याम देशमुख यांनी त्यांच्या हास्य रेषांबद्दल प्रात्यक्षिके दिली. भारत विठ्ठलदास यांनी चमत्कारांची पोलखोल करण्यासाठी त्यांच्या खास शैलीत त्या चमत्कारांमागचं विज्ञान समजावून सांगितले. या सर्व कार्यक्रमांना लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लोक आम्हाला येऊन भेटले. यामध्ये अगदी ५-६ वर्षांच्या लहानग्यांपासून ते ९० वर्षांच्या आजी- आजोबांपर्यंत सगळी रसिक मंडळी होती.

मिलिंद देशमुख, अनिल वेल्हाळ, श्रीपाल ललवाणी, सौरभ बागडे, विजय सुर्वे, राहुल थोरात असे महाअंनिसचे अनेक कार्यकर्ते आणि ओंकार बागवे, जयेश दळवी, आदित्य उल्हारे या माझ्या जिवलग मित्रांनी हे प्रदर्शन घडवून आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले. फक्त संकल्पना असून चालत नाही, तर तिच्या पूर्तीसाठी असे अनेक चांगले हात असावे लागतात. तेव्हाचं हे साध्य होतं. महाअंनिसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांची जिद्द आणि या कामाविषयीचं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. त्यांच्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार स्वरूपाने आजही जिवंत आहेत हे जाणवलं. माणूस मारता येतो पण त्याचा विचार मारता येत नाही!

डॉ. दाभोलकर यांच्या मुलाखती, त्यांची पुस्तकं वाचण्यापासून सुरू झालेला हा माझा प्रवास आज त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी जोडण्यापर्यंत येऊन पोहोचला याचा मला खूप आनंद आहे. हे प्रदर्शन पुण्यानंतर आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि गावांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. अधिकाधिक लोक यामध्ये जोडले जातील आणि भूलथापांना बळी न पडता, लोक स्वतःच्या तर्कबुद्धीचा वापर करून आयुष्यातील समस्यांवर मात करतील, हा आम्हाला विश्वास आहे! या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही ही विवेकाची ज्योत सतत तेवत ठेवू!

गौरव सर्जेराव (व्यंगचित्रकार)

संपर्क : ८४२२० ८२१८५


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ]