सत्यशोधक चळवळीत स्त्रियांचा सहभाग

डॉ. छाया पवार - 9850928612

सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच यामध्ये सावित्रीबाईंचा सहभाग होता. यानंतरही परिवर्तनाची मूल्ये घेऊन ध्येयप्रेरित झालेल्या अनेक स्त्रिया यामध्ये दिसतात. काहींनी प्रत्यक्ष कार्य केले, तर काहींनी त्या कार्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावला. अशा सर्व स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे प्रबोधनाचे कार्य पुढे नेले आहे.

यामध्ये लक्ष्मीबाई नायडू, कमलाताई विचारे, सावित्रीबाई रोडे, विमलताई देशमुख, विमलताई बागल, नलिनीताई लढके, लक्ष्मीबाई पाटील, इंदुमती राणीसाहेब अशा असंख्य ज्ञातअज्ञात स्त्रियांनी सत्यशोधक चळवळीच्या कार्याला हातभार लावला आहे, सत्यशोधक विचारांचा अंगीकार केला आहे; तसेच हे विचार घरीकुटुंबातसमाजात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाचा मागोवा आपण या सदरातून इथून पुढे घेणार आहोत.

महात्मा जोतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर, 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी सर्वांसाठी एकच ‘सार्वजनिक सत्यधर्म’ सांगितला – “परमेश्वर एक आहे, आपण सर्व त्याची लेकरे आहोत. म्हणून सर्वांना समान हक्क असावेत. मूर्तिपूजा, नामस्मरणाचीही गरज नाही. दीन-दुबळ्या लोकांची सेवा म्हणजेच ईश्वरची पूजा.” अशा सत्य, न्याय, समानता, बंधुता व मानवतेवर आधारलेल्या समाजनिर्मितीचे ध्येय महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजासाठी निश्चित केले. सत्यशोधक चळवळ ही सामाजिक, धार्मिक गुलामगिरीविरोधातील आहे. सत्यशोधक समाजाने पुरोहित नाकारून साध्या पद्धतीने हुंड्याशिवाय, कमी खर्चातील विवाह लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पहिला विवाह 25 डिसेंबर, 1873 रोजी लावण्यात आला. नंतर ही चळवळ देशव्यापी झाली. देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासातल्या धार्मिक परंपरा नाकारून त्या विरोधात विद्रोह करणारे पाऊल सत्यशोधक समाजाने उचलले. त्यामध्ये सावित्रीबाईंचा पुढाकार होता, असे सत्यशोधक समाजाच्या पहिल्या अहवालात अभिमानाने नोंदविण्यात आलेले आहे. सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ग्यानोबा निंबणकर यांची कन्या आणि महात्मा फुले यांचे कार्यकर्ते सीताराम जबाजी आल्हाट यांचा हा विवाह होता. या विवाहासाठी सावित्रीबाई आणि बजूबाई निंबणकर यांनी भरपूर कष्ट घेतले. अशा पद्धतीच्या विवाहांना भटजींनी भरपूर विरोध केला, कोर्ट-कचेर्‍या झाल्या. सावित्रीबाई-जोतिबांना अपार कष्ट सोसावे लागले; पण ते डगमगले नाहीत. 4 फेब्रुवारी, 1889 रोजी त्यांनी आपला दत्तकपुत्र यशवंत याचा विवाह याच पद्धतीने केला.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक आगळे-वेगळे जोडपे होते. दीडशे वर्षांपूर्वी स्त्री-पुरुष समता आणि सामाजिक न्याय यांची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी कडवी झुंज दिली. शिक्षणाशिवाय स्त्रिया आणि दलित-बहुजनांची उन्नती होणार नाही, हे ओळखून शिक्षणप्रसाराच्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. संपूर्ण देशात मुलींची शाळा, वाचनालय, साक्षरता अभियान त्यांनीच सुरू केले. स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून त्यांनी जातिनिर्मूलनाच्या कार्यक्रमाला थेट हात घातला. स्वत:ला मूल-बाळ झाले नाही, तर एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला वैद्यकीय शिक्षण दिले आणि त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला.

महात्मा फुले यांच्या या सर्व कार्यांत सावित्रीबाई त्यांच्या बरोबरीने सहभागी होत्या. शाळा काढणे (1848-1853), बालहत्या प्रतिबंधक गृह काढणे (1853), शेतकरी व शेतमजूर स्त्री-पुरुषांसाठी रात्रशाळा सुरू करणे (1855), महात्मा फुले यांच्या भाषणाचे पुस्तक प्रकाशित करणे (1856), अनाथ बालिकाश्रम चालविणे (1864), दुष्काळग्रस्तांसाठी चालविलेल्या अन्नछत्रात अग्रभागी राहून काम करणे (1875-1877), प्लेगच्या साथीत समाजाची सेवा करणे (1890), महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या भाऊबंदांनी वाद उपस्थित केला, तेव्हा धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन शिंकाळे/टिटवे धरणे (1890). यानंतरही महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्या सत्यशोधक समाजाच्या कार्यात त्या अखंड सहभागी होत्या (1890-1897). या सर्व घटनांमधून सावित्रीबाईंच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा अनुभव येतो.

सावित्रीबाईंनी ‘महिला सेवा मंडळा’ची स्थापना केली होती. या संस्थेच्या अध्यक्षपदी पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी ई. सी. जोन्स या होत्या. या संस्थेमार्फत जानेवारी 1852 मध्ये तिळगूळ वाटप समारंभ साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाची पत्रिका अशी होती – “13-1-1852 रोजी पुणे कलेक्टर साहेबांच्या पत्नी मिसेस जोन्स यांचे अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगूळ समारंभ होणार आहे, तरी सर्व स्त्रियांनी आपल्या लेकी-सुना घेऊन यावे. समारंभ सायंकाळी पाच वाजता आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील. जातिभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरून हळदी-कुंकू लावण्यात येईल आणि तिळगूळ वाटण्यात येईल.”

सौ. सावित्रीबाई भ्रतार जोतिराव फुले, सेक्रेटरीज, महिला सेवा मंडळ.

(संदर्भ – सावित्रीबाई फुले – सौ. फुलावंताबाई झोडगे, पृष्ठ-22)

तिळगूळ वाटप समारंभात राबणार्‍या महिला व उपस्थितांची संख्या लक्षात घेता सावित्रीबाईंच्या सेवावृत्तीची, संग्राहक वृत्तीची, जातिभेद निर्मूलनाची व पुरोगामित्वाची कल्पना येते.

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सहकार्याने ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरोधात नाभिकांचा जो ऐतिहासिक संप घडवून आणला, त्या मागची प्रेरणाही सावित्रीबाईच होत्या.

सावित्रीबाईनी मौलिक लेखनही केले आहे. ‘सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय’ शासनाने 1988 मध्ये प्रकाशित केलेले आहे. त्यामध्ये सावित्रीबाईंचे साहित्य एकत्रित केले आहे. त्यात 1) काव्यफुले कवितासंग्रह (1854) 2) जोतिबांची भाषणे-संपादक-सावित्रीबाई फुले 3) सावित्रीबाईंची जोतिबास पत्रे (25 डिसेंबर, 1856) 4) बावन्नकशी सुबोध रत्नाकर-कवितासंग्रह (7 नोव्हेंबर, 1832) 5) मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे (1892).

‘काव्यफुले’ या 1854 साली प्रकाशित झालेल्या सावित्रीबाईंच्या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत. त्यात निसर्गविषयक, सामाजिक बोधपर आणि ऐतिहासिक कविता समाविष्ट आहेत. हा काव्यसंग्रह केशवसुतांच्या पूर्वी 30 वर्षे प्रसिद्ध झालेला आहे. ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या कवितासंग्रहात देशाचा इतिहास काव्यरुपात सांगितला असून जोतिरावांच्या कार्याचे चित्रण त्यात आले आहे.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर अथक काम केले. त्यांनी केलेल्या कार्याच्या प्रेरणांची बीजे रुजली, अंकुरली, रोपे वाढली. समाजात शिक्षणाचा प्रसार झाला. विधवांचे पुनर्विवाह होऊ लागले. जोतिरावांच्या नंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोचवली. या चळवळीतून शिक्षणसंस्थांची जाळी महाराष्ट्रात निर्माण झाली. सहकारी चळवळी फोफावल्या, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात अभूतपूर्व स्थित्यंतर घडले.

सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच यामध्ये सावित्रीबाईंचा सहभाग होता. यानंतरही परिवर्तनाची मूल्ये घेऊन ध्येयप्रेरित झालेल्या अनेक स्त्रिया यामध्ये दिसतात. काहींनी प्रत्यक्ष कार्य केले, तर काहींनी त्या कार्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावला. अशा सर्व स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे प्रबोधनाचे कार्य पुढे नेले आहे. याबाबत आईच्या ममतेने जोतिबांचा सांभाळ करणार्‍या व पुढे त्यांच्या शिक्षणकार्यामध्ये बालहत्या प्रतिबंधकगृहाच्या कार्यामध्ये मदत करणार्‍या ‘सगुणाबाई क्षीरसागर’ यांचे नाव महत्त्वाचे आहे. तसेच सावित्रीबाईंच्या सहकारी ‘फातिमा शेख’ यांचीही मदत मोलाची आहे. शिक्षणकार्य करताना जोतिरावांना घर सोडावे लागले, अशावेळी त्यांना आपल्या घरी राहण्यासाठी जागा देणारे मित्र उस्मान शेख यांच्या भगिनी म्हणजे ‘फातिमा शेख’ होत. त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मुस्लिम समाजातील त्या पहिल्या शिक्षिका होत.

सावित्रीबाईंच्या मुक्ता नावाच्या मातंग समाजातील एका विद्यार्थिनीने स्वत:चे आत्मकथन करणारा निबंध लिहिला होता. मांग-महारांच्या दु:खाविषयीचा 11 वर्षांच्या या विद्यार्थिनीने लिहिलेला हा निबंध अक्षरवाङ्मयातला एक श्रेष्ठ मानदंड ठरावा इतका महत्त्वाचा आहे. ‘ज्ञानोदय’च्या दि. 15 फेब्रुवारी व 1 मार्च 1855 रोजी हा निबंध दोन भागांत छापला होता.

ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये ‘स्त्री-पुरुष समानता’ हे पुस्तक लिहिले. त्या काळात ‘चूल आणि मूल’ हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले जात होते. जगात कोठेच स्त्रीवादी विचारांचा उदय झाला नव्हता, अशा काळात ताराबाई शिंदे यांनी परखड शब्दात स्त्री-पुरुष नात्यासंबंधी व स्त्रियांच्या शोषणासंबंधी अत्यंत मूलगामी प्रश्न उपस्थित केले आहेत. 1882 मध्ये ‘स्त्री-पुरुष’ तुलना या नावाचे पुस्तक लिहावेसे वाटणे, हेच क्रांतिकारक आहे.

वासुदेव बिर्जे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी ‘तानुबाई बिर्जे’ यांनी ‘दीनबंधू’ हे पत्र चार-पाच वर्षेचालविले. ‘महिला संपादक’ म्हणून तानुबाई बिर्जे यांचे कार्य मोलाचे आहे.

‘जागृती’कार भगवंतराव पालेकर यांच्या पत्नी ‘शांताबाई पालेकर’ यांनी 32 वर्षे भगवंतरावांना वृत्तपत्रासाठी मजकूर लिहिणे, पत्राच्या घड्या घालणे, कामावर देखरेख ठेवणे या व अशा कामांत मदत केली. 1929 च्या मंदीच्या काळात त्यांनी ‘जागृती’साठी शांताबाई पालेकर यांनी संपूर्ण सहकार्य दिले.

‘गावगाडा’चे चालक दादासाहेब झोडगे यांना फुलवंताबाई झोडगे यांनी अखेरपर्यंत साथ दिली. इतकेच नव्हे, तर फुलवंताबाई झोडगे यांनी सावित्रीबाई फुले यांचे छोटेसे चरित्रही लिहिले आहे.

महात्मा फुले यांनी 1873 मध्ये ‘गुलामगिरी’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. 1911 मध्ये रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी ‘गुलामगिरी’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. ही दुसरी आवृत्ती अवघ्या दहा महिन्यांतच संपली; मात्र दरम्यान अय्यावारूंचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी श्रीमती रत्नम्माबाई अय्यवारू यांनी या पुस्तकाची तिसरी आवृत्ती 1912 मध्ये प्रसिद्ध केली. रत्नमाबाई अय्यावारूंचे हे कार्य अतिशय मोलाचे आहे.

अशाच प्रकारे लक्ष्मीबाई नायडू, कमलाताई विचारे, सावित्रीबाई रोडे, विमलताई देशमुख, विमलताई बागल, नलिनीताई लढके, लक्ष्मीबाई पाटील, इंदुमती राणीसाहेब अशा असंख्य ज्ञात-अज्ञात स्त्रियांनी सत्यशोधक चळवळीच्या कार्याला हातभार लावला आहे, सत्यशोधक विचारांचा अंगीकार केला आहे; तसेच हे विचार घरी-कुटुंबात-समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाचा मागोवा आपण या सदरातून इथून पुढे घेणार आहोत.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]