डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या १२ व्या स्मृतिदिनी अंनिस कार्यकर्त्यांचे कृतीशील अभिवादन!

राजीव देशपांडे -

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊन ११ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल १० मे २०२४ ला लागला आणि त्यात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली व इतर आरोपींना निर्दोष ठरवून मुक्त केले. खरे तर सीबीआयसारख्या तपासयंत्रणेने या निकालाविरोधात वरच्या कोर्टात अपील करायला हवे होते, परंतु अजूनही त्याबाबत काहीच हालचाल सीबीआयतर्फे झालेली नाही. आजही  खुनामागच्या सूत्रधारांचा छडा लावण्यात सीबीआय अपयशी ठरलेली आहे. ते अजूनही मोकाटच आहेत. याचे तीव्र पडसाद या वर्षीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या १२व्या स्मृतीदिना निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध शाखांनी घेतलेल्या अभिवादन कार्यक्रमात उमटले. महाराष्ट्रातील जवळजवळ पन्नास शाखांनी या बद्दल तीव्र नाराजी, निषेध व्यक्त करणारे व खुनामागच्या सूत्रधारांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला दिले. (संपूर्ण निवेदन या अंकात इतरत्र दिलेले आहे) तसेच पुणे येथील कार्यक्रमात माजी पोलिस अधिकारी डॉ. मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी डॉ. दाभोलकर स्मृती ग्रंथमालेचे प्रकाशन केल्यानंतर केलेल्या भाषणात डॉ. दाभोलकरांच्या खुनामागचे सूत्रधार न सापडण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण राजकीय हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट केले. तरीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्व न्यायालयीन, राजकीय अडथळ्यांना तोंड देत हा प्रश्न मोठ्या जिद्दीने न्यायालयात अ‍ॅड. अभय नेवगी यांच्यासारख्या हितचिंतकाच्या सहाय्याने तर रस्त्यावर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व दाभोलकर कुटुंबियांनी गेली बारा वर्षे लढवला. त्यामुळे दोन आरोपींना शिक्षा तरी होऊ शकली. तरीही हा न्याय अपुराच आहे. त्यामुळे न्यायालयातील आणि रस्त्यावरील संघर्ष या पुढील काळात  आपल्याला अधिकच तीव्र करावा लागणार आहे हे निश्चित.

            दरवर्षी प्रमाणे या वर्षीही २० ऑगस्टच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी ‘खुनाच्या सूत्रधांराना अटक करा’ या मागणीचे निवेदन देण्याच्या व्यतिरिक्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहीदत्वाला अभिवादन केले. या वर्षीच्या  डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानात माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर व्याख्यान दिले. अनेक शाखांनी निर्भय मॉर्निंग वॉक, अभिवादन सभांचे कार्यक्रम घेतले, जागतिक वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने शाळा-कॉलेजमध्ये चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम घेतले, तर कोणी जटा निर्मूलन करून, ग्रंथविक्री करून अभिवादन केले. काही शाखांनी जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती देणारी पोस्टर प्रदर्शने, अंधश्रद्धा निर्मूलनावरचे व्यंगचित्र प्रदर्शन भरविले. मुंबईच्या गोरेगाव शाखेने डॉ. रखमाबाई राऊत यांच्यावरील नाटकाच्या  नाट्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला. काही शाखांनी कार्यकर्ता प्रशिक्षणाची शिबिरे घेतली. गडचिरोली येथील प्रशिक्षण शिबिरात १५० शिबिरार्थी दोन दिवस उपस्थित होते. अंनिसच्या प्रकाशन विभागाने ‘घरोघरी दाभोलकरांचे विचार’ या अभियानांतर्गत प्रकाशित केलेल्या डॉ. दाभोलकर स्मृती ग्रंथमालेचे लोकार्पण सोहळे अनेक शाखांनी त्या-त्या शाखेच्या परिसरातील मान्यवरांच्या हस्ते घेत डॉ. दाभोलकरांना अभिवादन केले. मेळघाटातील डंबाविरोधी प्रबोधन मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्याचा प्रारंभ पुणे येथून करण्यात आला, तर अंनिसने नुकतेच सुरू केलेल्या आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह व वधूवर सूचक केंद्राचे उद्घाटनही २० ऑगस्टच्या कार्यक्रमात करण्यात आला.

            महाराष्ट्रभरातील शाखांनी केलेल्या या सर्व कार्यक्रमांचे, उपक्रमांचे विस्तृत वृत्तान्त वाचकांना या अंकात वाचायला मिळतील. त्यावरून वाचकांना नक्कीच कल्पना येईल की सनातन्यांनी केलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतरही गेल्या बारा वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जराही विचलित झालेली नाही. उलट अतिशय प्रतिकूल राजकीय, सामाजिक वातावरण असतानांही  डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी दाखविलेल्या विवेकी, अहिंसक मार्गाने जास्तीत जास्त व्यापकपणे राज्यातील विविध भागात पसरत चालली आहे,  ती अशीच जास्तीत जास्त पसरवीत विवेकी समाज निर्मितीच्या उद्देश्याप्रत नेणे हेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहीदत्वाला खरेखुरे अभिवादन ठरेल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]