ज्ञानाची आस असलेले नंदा खरे

प्रभाकर नानावटी -

नंदा खरे गेले, यावर क्षणभर विश्वास बसत नाही. कारण अगदी अलिकडे त्यानी लिहिलेले ‘धिस इज हाऊ दे टेल मी द वर्ल्ड एण्ड्ज’ (लेखिका निकोल पर्लरॉथ, प्रकाशक ब्लूम्सबरी, 2021) या पुस्तकाचे ‘एक नवंच शस्त्र’ हे परीक्षण वाचत असताना त्यांची ज्ञानाविषयी असलेली उत्कंठा, नवीन काही वाचत असल्यास त्याबद्दल लिहिणे व ते वाचकांपर्यंत पोचविणे, त्या विषयातील खाचाखोचा समजून देणे, विनोदी अंगाने मल्लीनाथी करणे इत्यादी गोष्टी पटकन लक्षात आल्या. त्यांच्या मते, काही संकल्पनांचा मुळातून पुनर्विचारही करावा लागणार आहे उदा : देश-राष्ट्र, खाजगी-जाहीर, नैतिक-अनैतिक… इ. इ. आज संगणकशास्त्र, माहिती-तंत्रज्ञान वगैरे विषयांच्या अभ्यासक्रमांत नीतिशास्त्र शिकवतात म्हणे; पण काही घटनांनंतर नेमकं काय शिकवलं जातं, याचीही जाहीर चर्चा व्हावी, असे त्यांना वाटते. नंदा खरेंच्या मते, सैन्य बाळगणे हा देशांचा लक्षणगुण झाला आहे; हेरगिरीला ऊत आला आहे; शस्त्रं आणि त्यांच्या ‘प्रणाली’चे पीक वाढत आहे; इंटरनेट जग व्यापत आहे. त्यामुळे पत्रांद्वारे दिलेल्या संदेशांना विजेचे पंख मिळत आहेत; पत्र-पाकिटं व टेलिग्राम मृत्युपंथास टेकले आहेत; दृक्श्राव्य आवृत्त्यांनी (स्काईप, झूम, इ.) सभा, सभागृहं वगैरेंना हद्दपार केले आहे; ‘ऑनलाईन’ शिक्षणच खरे शिक्षण हा समज दृढ होत आहे. समाजाची ‘आहे रे / नाही रे’ अशी दुभंगलेली अवस्था झाली आहे, असे त्यांना वाटते.

नंदा खरे यांचा परिचय विवेकवादाला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ (आ.सु.) मासिकामुळे झाला. तानाजी खिलारे आणि मी मिळून ‘आ.सु.’च्या तथाकथित ब्राह्मण्याविषयी एक पत्र लिहिले होते. त्यात ‘आ.सु.’च्या लेखकांच्या व सदस्यांच्या आडनावावरून “आ.सु.’ हे मासिक उच्चवर्णीयांनी, उच्च वर्णीयांसाठी छापत असलेले मासिक’ असा निष्कर्ष काढला होता. खरे पाहता त्या मासिकाबद्दल टीका करणार्‍यांनी आमचे पत्र न छापता केराची टोपली दाखविली असती तरी फार फरक पडला नसता. परंतु ‘आ.सु.’ने ते पत्र छापून भरपूर चर्चा घडवून आणली. या निमित्ताने नंदा खरे यांची ओळख झाली व आम्हा दोघांनाही त्यांनी सल्लागार मंडळावर घेतले. नंतरच्या काळात ‘जात-आरक्षण’ या विशेषांकासाठी अतिथी संपादक म्हणून आम्हाला संधी दिली. कुठलीही काट-छाट न करता हा अंक छापला गेला. या अंकाबद्दल उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. परंतु कार्यकारी संपादक म्हणून नंदा खरे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचा आणि आमचा परिचय वाढला. एखादे चांगले पुस्तक त्यांच्या वाचनात आल्यास त्याबद्दल ‘आ.सु.’त लिहिण्यास ते सांगत असत. त्यामुळे माझ्यासारख्याला नवनवीन गोष्टी कळू लागल्या.

कार्यकारी संपादक म्हणून ‘आ. सु.’तील लेख निवडताना शेती, माती, पाणी, नगररचना, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, उत्क्रांती, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी विविध विषयांवरील लेख छापण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे ‘आ.सु.’त एक प्रकारे ज्ञानशाखांचा संगम दिसत असे. त्यांची ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’, ‘2050’, ‘अंताजीची बखर’, ‘संप्रती’, ‘जीवोत्पत्ती’ ‘दगडावर दगड विटेवर वीट’, ‘नांगरल्यावीण भुई’, ‘कहाणी मानवप्राण्याची’, ‘बखर अंतकाळची’ इत्यादी पुस्तकं वाचताना, अनेक दिशांनी जगाचं दर्शन होतं. विषयातील विविधतेमुळे त्यांचा आवाका लक्षात येतो. ते आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा करून दाखवतात. कारण त्यांना मुळात आतून कुतूहल आहे, समजून घेण्याची आस आहे. मग ते ‘जीवोत्पत्ती आणि नंतर’ असेल किंवा ‘कहाणी मानवप्राण्याची’सारखा अतिशय महत्त्वाचा मोलाचा ग्रंथ. त्यांच्या पुस्तकातून ते वाचकाला मुळापर्यंत घेऊन जातात. ‘अंताजीची बखर’मधून इतिहासाकडे तटस्थपणे पाहण्याची नजर देताना त्यांची विनोदबुद्धी मनापासून खुलून जाते.

ते संगणकतज्ज्ञ नव्हते; परंतु संगणक तंत्रज्ञानातील सर्व धोक्यांची कल्पना त्यांना होती. ते इतिहासकार नव्हते; परंतु पूर्वीच्या काळातील सर्व काळ्या धंद्यांची कल्पना त्यांना होती. ते मानववंशशास्त्रज्ञ नव्हते; परंतु ‘कहाणी मानवप्राण्याची’ या पुस्तकातून मानवप्राणी कसा घडला, याचे दर्शन ते घडवू शकले. नंदा खरे यांची पुस्तकं अत्यंत वेगळ्या प्रकारची आहेत व त्या पुस्तकांत कुठल्याही प्रकारचे मनोरंजन, स्वप्नरंजन वा स्मृतिरंजन हा प्रकार नसतो.

इतिहास/वर्तमानकालीन प्रसंगांचा खुबीने वापर करून आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची सतत आठवण करून देत भविष्यवेध घेण्याचा प्रयत्न ते नेहमी करत. विषमतेचे आणि हवामानबदलाचे धोके ते अधोरेखित करत होते. ‘सत्य दाबून ठेवण्याचा प्रकार सर्वकाळात कमी-जास्त प्रमाणात सुरूच असतो. प्रत्येक वेळी कुणीतरी खरे बोलण्याची गरज असते. जोपर्यंत सत्य बोलत राहण्याची गरज आहे, तोपर्यंत मी लिहित राहणार आहे,’ अशा भावना नंदा खरे यांनी एके ठिकाणी बोलून दाखविल्या आणि त्याप्रमाणे आयुष्यभर वागलेसुद्धा.

अलिकडेच मी त्यांना एका ई-मेल द्वारे पत्र लिहिले होते. त्यातील मजकूर असा होता – ‘आजच मी आपले पुस्तक ‘ऐवजी’ वाचून संपविले. भरपूर मजा आली. स्मरणरंजनाचा असाही उपयोग करता येतो, हेही लक्षात आले. Born with golden/silver spoon असूनसुद्धा तुमचे पाय जमिनीवर होते/आहेत, हे पुस्तक वाचत असताना प्रकर्षाने जाणवले. अपघाताने आपल्याशी झालेल्या ओळखीचा पुरेपूर आनंद घेऊ शकलो नाही, याचे फार वाईट वाटले.

जॉन स्टाइनबॅक हा माझाही आवडता लेखक. त्याच्या गाजलेल्या Grapes of wrath d East of Eden पेक्षाही तुमच्याप्रमाणे Winter of our discontent मला फार आवडलेले पुस्तक. इथन/मार्गी यांना मी कधीच विसरू शकत नाही. (इतर वाचकांप्रमाणे मलाही ‘संप्रती’ वाचताना Winter of our discontenter शी संबंध जोडता आला नाही. कदाचित मार्गीचा इनोसेन्स मला त्यात दिसला नसेल.) रेन मार्टिन यांच्या इंग्रजी ग्रामरबरोबरच तर्खडकर भाषांतरमालेनेसुद्धा माझ्या मोडक्या-तोडक्या इंग्रजी शिक्षणाला हातभार लावला होता. ‘पावकी’, ‘औटकी’, ‘रामरक्षा’, ‘परवचा’ हे सर्व सांस्कृतिक सोपस्कार आमच्यावरही झाले होते. कॅथरीन मान्सफील्डचा संबंध ‘अ कप ऑफ टी’ या कथेपुरताच सीमित राहिला. कास्टीचे Paradise regained हे पुस्तक आवडले होते. Alan Turning वर एक प्रदीर्घ लेखही मी लिहिला होता. असो.

पत्रास मुख्य कारण की, मी आजकाल बेळगाव येथे आहे. तुमचे मुनवळ्ळीशी असलेले नाते व त्याबद्दल आपण केलेले वर्णन आवडले. जनरल श्रीकृष्ण सरदेशपांडे हल्ली धारवाड येथे आहेत. (त्यांचा भाऊ दिलीप देशपांडे हे माझे मित्र दिलीप कामत यांचे वर्गमित्र. दिलीप देशपांडे मुनवळ्ळीहून सौंदत्तीला घोड्यावरून शाळेला यायचे म्हणे!) माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण (पत्नी विद्यागौरीसह) वेळ काढून माझ्या येथे मुक्कामासाठी दहा-पंधरा दिवसासाठी येणे. (फक्त जमिनीवर झोपायची तयारी हवी!) मग आपण मुनवळ्ळी, नवीलतीर्थ, सोगल, धारवाड अशी फेरी मारू. अळ्ळीट्टू, तंबिट्टू (तंबिट्टीन लाडू नव्हे), तोक्कू, मंडिगी, कुंदा, धारवाड पेढे, गोकाक करदंटू, गोदी हुग्गी, हुळ्ळानुच्चु यांसारख्या कर्नाटकी पदार्थाची चव घेऊ. तुम्हाला आपल्या बालपणाची नक्की आठवण येईल. गप्पा होतील, (टिंगल टवाळी करता येईल.) बघा कसे जमेल ते. जनरल सरदेशपांडेनाही आपले अचानक येणे नक्कीच आवडेल. ही आग्रहाची विनंती. (कृपया वयाची सबब सांगू नये!)’

परंतु वेळ निघून गेली होती. आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या मनात असूनही ते माझी इच्छा पूर्ण करू शकले नाहीत, याची मला फार हळहळ वाटते.

जेव्हा ते पुण्यात येत असत, तेव्हा आवर्जून भेटत होते. सुधीर बेडेकर आमचे मित्र होते. चर्चेसाठी विषयांची कमी नव्हती. सुधीर बेडेकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी एक मृत्युलेख लिहिला होता. ते वाचल्यानंतर मी ‘फारच छान मृत्युलेख… (अशाच प्रकारचा माझाही मृत्युलेख लिहित असाल तर आजच माझी मरायची तयारी आहे…)’ असे कळविले होते. त्याला ‘जियो मेरे लाल! आता ना मला चालता येत आहे, ना सोबत सुधीर आहे. कॉफीची टपरी, हेच शाश्वत सत्य!अधूनमधून खिडकीतून (windows!) हात काढून हॅलो म्हणत राहू!’ असे उत्तर त्यांनी पाठविले होते. त्यांचे हे शब्द सतत आठवणीत राहतील.

त्यांच्या कुटुंबीयाच्या व मित्रपरिवारांच्या दुःखात आम्ही सर्व ‘अंनिस’चे कार्यकर्ते सहभागी आहोत.

‘अंनिस’तर्फे मनःपूर्वक आदरांजली!

लेखक संपर्क ः 95033 34895


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]