विजय खरात -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेलापूर शाखा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीशी निगडित दर महिन्याच्या 20 तारखेला ऑनलाईन ‘सत्यशोधक व्याख्यानमाला’ आयोजित करते. 14 जुलै गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन. त्यामुळे या महिन्यातील ‘सत्यशोधक व्याख्यानमाले’तील 11 वे व्याख्यान त्यांच्या जीवनकार्यावर आयोजित करण्यात आले होते. ‘गोपाळ गणेश आगरकर : बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि समाजसुधारक’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रा. डॉ. अरविंद गणाचारी, मुंबई विद्यापीठातील इतिहास विभागाचे निवृत्त विभागप्रमुख व प्राध्यापक यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रा. अरविंद गणाचारी यांनी त्यांच्या व्याख्यानात आगरकर यांचे बुद्धिप्रामाण्यवादी व सुधारणावादी विचार मांडताना पुढील मुद्दे मांडले.
आगरकरांनी उदारमतवादी भूमिका व सदसद्विवेकबुद्धी आधारित वैचारिक भूमिका सातत्याने मांडली. कुठलाही प्रगत विचार हा पाश्चिमात्य, पौर्वात्य वगैरे असा नसतो, तर सार्वत्रिक, वैश्विक, समाजाचे हित साधणारा असतो. त्यामुळे तो आपण स्वीकारायला हवा. कुठल्याही बदलाची प्रक्रिया ही मन – विचार, वाणी – उच्चार आणि आचार म्हणजेच कृती या माध्यमातून होत असते. लोकशिक्षणाबाबत आगरकर कायम आग्रही असत. सुधारणा म्हणजेच विकास होय. माणसाचे सामाजिक वर्तन गुरुभय, राजभय, लोकभय, धर्मभय आणि आता रोगभय या बाबींवर अवलंबून असते. धर्म व सत्ता यांची सांगड घालणे धोकादायक आहे, प्रगतीला खीळ बसवणारे आहे. विचारांना प्रभावित करण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी विचार खूप महत्त्वाचे आहेत.
जवळजवळ दीड तास गणाचारी सरांनी अतिशय साध्या, सोप्या भाषेत आगरकरांच्या समग्र विचारांची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली. व्याख्यानाच्या अखेरीस आगरकरांच्या विचारांचे सार सांगताना ते म्हणाले, बुद्धिप्रामाण्यवादी विचार प्रखरपणे मांडले पाहिजेत आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारानेच पुढे जायला हवे. यानंतर उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही प्राध्यापक गणाचारी यांनी अतिशय समर्पक व सविस्तर उत्तरे दिली. या व्याख्यानाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ‘अंनिस’चे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक उपस्थित होते. दिल्लीवरूनही सामाजिक कार्यकर्ते जुडले होते, हेही विशेष…
व्याख्यानाचे सूत्रसंचालन बेलापूर शाखेचे वार्तापत्र व प्रकाशन कार्यवाह साथी रमेश साळुंखे यांनी केले. साथी विजय खरात व त्यांच्या सहकार्यांनी चळवळीच्या गाण्याने सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांची ओळख राजीव देशपांडे यांनी करून दिली. तसेच प्रास्ताविक करताना गेली वर्षभर सलगपणे सुरू असलेल्या ‘सत्यशोधक व्याख्यानमाले’ची आतापर्यंतची वाटचाल मांडली. व्याख्यानाचा समारोप व आभार प्रदर्शन बेलापूर शाखेचे प्रधान सचिव साथी विजय खरात यांनी केले.
– विजय खरात, बेलापूर