अॅड. रंजना गवांदे -
इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील वादग्रस्त विधान हे पी. सी. डी. एन. टी. अॅक्टचे कलम 22 चे उल्लंघन आहे, तसेच इंदुरीकर महाराजांनी वेळोवेळी केलेल्या त्यांच्या कीर्तनातून स्त्रियांची हेटाळणी व टिंगलटवाळी केली आहे. त्यासंबंधीचे व्हीडीओ यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड झाले आहेत. पी. सी. डी. एन. टी.चे कलम 22 अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरात करणेस बंदी आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व समान आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे.
इंदुरीकर महाराज मात्र स्त्रियांना लज्जा उत्पन्न होईल व स्त्रीत्वाचा अपमान करणारे वाक्य उच्चारून त्यांच्या कीर्तनातून ते स्त्रीद्वेष पसरवतात. म्हणून मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती व स्त्री प्रतिनिधी म्हणून दि. 17/02/2020 रोजी इंदुरीकर महाराजांविरोधात पी. सी. डी. एन. टी. अॅक्ट भारतीय दंड विधान संहितेचे कलम 503 (1), 504, 505 (2) व 509 नुसार गुन्हा दाखल व्हावा यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर यांचेकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता व त्यांनी तपासाअंती गुन्हा दाखल करू, असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर दुसर्या दिवशीच म्हणजेच 18/02/2020 रोजी इंदुरीकर महाराजांनी लेखी स्वरुपात दिलगीरी व्यक्त केली. परंतु त्यानंतर दि. 19/02/2020 रोजी मात्र महाराजांनी घुमजाव करत ‘मी असे वक्तव्यच केले नाही,’ असा लेखी खुलासा केला.
काल दि. 25/02/2020 रोजी सायबर क्राईम विभागाने यु-ट्यूबवर महाराजांचा व्हिडीओ उपलब्ध नाही, असा खुलासा जिल्हा शल्याचिकत्साकांकडे केला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनीही महाराजांना क्लिनचिट दिली आहे. परंतु महाराष्ट्र अंनिस पी. सी. डी. एन. टी. चे अॅक्टचे तरतुदीनुसार पुढील कारवाई करत आहे.