-

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि राज्य कार्यकारिणी सदस्य शालिनीताई ओक (सोलापूर) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन..! शालीनीताईंसोबत काम करणार्या त्यांच्या तीन मैत्रिणींनी त्यांना वाहिलेली आदरांजली…
शालिनीताई ‘अंनिस’ चळवळीला तन-मन-धनाने वाहून घेतलेलं व्यक्तिमत्त्व
महाराष्ट्रातल्या कोणत्याही कार्यकर्त्याने शालिनीताई हे नाव घेतले तर त्याच्या डोळ्यांसमोर एक उमदे सतत हसतमुख आणि उत्साहाने भरलेलं व्यक्तिमत्त्व येईल.
गेली 25-26 वर्षे एकत्र काम केलेली ही आमची साथी, मैत्रीण अशी अचानक न भेटता सर्वांनाच मोठा धक्का देऊन जाईल आणि तिच्या आठवणी लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते; पण ती खरंच गेली.
किती आठवणी, किती प्रसंग, घटना एवढ्या वर्षांचा काळ कालपासून डोळ्यांसमोरून जाता जात नाही. या महामारीने ‘अंनिस’चे बिन्नीचे मोहरे काळाच्या पडद्याआड गेले.
तिची माझ्याबाबतीत पहिली आठवण ही माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची घटना.
21 सप्टेंबर, 1995 या दिवशी भारतासह व जगभरात गणपती दूध पितो, ही बातमी वार्यासारखी पसरली. माझा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. कोणीतरी हे होऊ शकत नाही, असे जाहीरपणे सांगितले पाहिजे, असे वाटत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते टीव्हीवर येऊन स्पष्टीकरण देऊन या घटनेमागचे कारण सांगू लागले. मला खूप आनंद झाला. मी ‘अंनिस’चा शोध सुरू केला आणि एका कार्यक्रमात शालिनीताईंची भेट झाली व त्यांनी मला ‘अंनिस’ची सभासद करून घेतले आणि आमच्या दोघींचा ‘अंनिस’च्या कामात सहप्रवास सुरू झाला.
अत्यंत सुखवस्तू घरातील असूनही कधीही त्याचा गर्व नाही किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न नाही. एकदम सामान्य माणसासारखी वागणूक. शनिशिंगणापूरच्या चौथर्यावर महिलांना जाता यावे, म्हणून केलेल्या सत्याग्रहात सोलापूर येथून आम्ही तिघी महिला सामील झालो होतो – मी, शालिनीताई आणि प्रीती श्रीराम. सोलापूर शहर ही महिलांची शाखा म्हणूनच ओळखली जात होती. महिलांची संख्या जास्त होती, तेव्हा त्या संपूर्ण यात्रेत आम्ही बरोबरच होतो. शालिनीताईंचा आवाज खूप गोड होता आणि ‘अंनिस’ची बहुतेक सर्व गाणी त्यांना तोंडपाठ असत. त्यामुळे गाणं आणि शालिनीताई हे समीकरणच झालं होतं. त्या यात्रेत तर आम्ही सर्वजणी एखाद्या रणरागिणीच्या थाटातच जात होतो. नगरमध्ये 3 दिवसांचे धरणे होते. महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यात सहभाग घेतला होता.
शनिशिंगणापूरकडे कूच केले आणि आम्हाला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी आम्ही तिघीजणी; तसेच संगमनेरच्या निशा शिऊरकर आणि पुष्पाताई भावे अशा पाचजणी जेलमध्ये गेलो आणि पिकनिकला गेल्यासारखे, गप्पा-गोष्टी करत जेलमधली रात्र काढली.
लातूरला झालेल्या महिला परिषदेत मंजूर करण्यात आलेला महिला जाहीरनामा घेऊन मी आणि शालिनीताई नांदेडपासून पुढे संपूर्ण विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांत गेलो. एक जीप केलेली आणि आम्ही दोघी. कधी तरी स्थानिक कार्यकर्ता बरोबर असायचा. मुक्काम कार्यकर्त्यांच्या घरीच असे; पण तिथे जशा सोयी उपलब्ध असतील, त्यात निभावून नेत असू; पण मला शालिनीताईंचे फार कौतुक वाटे. हे असे आहे, मला याची सवय नाही किंवा मला अडचणीचं होतंय किंवा मला अमुक एक गोष्ट आवडत नाही, अशी त्यांनी कधी तक्रार केली नाही. अतिशय आनंदाने आम्ही तो साधारण वीसएक दिवसांचा दौरा नागपूरला रूपा कुलकर्णीच्या अध्यक्षतेखाली पूर्ण केला
‘आमची शाखा म्हणजे पायलट प्रोजेक्ट राबविणारी शाखा आहे,’ असे डॉक्टर नेहमी म्हणायचे. पहिली महिला परिषद सोलापूरमध्येच घेतली, ‘विज्ञानबोध वाहिनी’ची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातच झाली होती. कारण आमच्याकडे उत्तम नियोजन करणे, त्यासाठी निधी जमा करणे, कार्यक्रमाची आखणी करणे अशा शालिनीताईंसारख्या महिला होत्या.
शालिनीताई वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर अंमलबजावणी करणार्या होत्या. सतत हसतमुख असल्या तरी एखादी गोष्ट चुकीची असेल, तर त्यावर परखडपणे बोलत असत. त्यांना कामाची आवड होती. ‘अंनिस’च्या कामात तर अग्रेसर होत्याच; पण इतर अनेक संस्था-संघटनांबरोबर त्या काम करत असत. कौटुंबिक जबाबदारी फारशी नव्हती; आणि कामाचा उत्साह खूप होता. त्यामुळे अनेक आघाड्यांवर त्या उत्तम काम करत होत्या.
बागकाम हे त्यांचं अत्यंत आवडतं क्षेत्र! त्यांची बाग बघण्यासारखी आहे. त्यांच्याकडे गेलं की एखादं तरी वेगळ्या प्रकारचं झाड बघायला मिळायचंच.
किती आठवणी जाग्या झाल्या! पण आता आपली मैत्रीण आपल्याबरोबर असणार नाही, ही कटु जाणीव मन विदीर्ण करते.
ज्या ‘अंनिस’साठी आपले पूर्ण आयुष्य समर्पित केले, अखंडपणे काम केले; अगदी डॉक्टर गेल्यानंतर सुद्धा दुःख बाजूला सारून संघटनेला बळ देण्यासाठी शालिनीताई पुन्हा उभ्या राहिल्या. ज्या व्यक्तीने ‘अंनिस’ हा जीवनाचा जगण्याचा भाग बनवला होता, त्या व्यक्तीला अलिकडे संघटनेच्या अंतर्गत चाललेली धुसफूस आणि वादविवाद पाहून खूप वेदना होत होत्या. त्यावर आम्ही अनेकदा बोलत असू. त्यांना हे असे होऊ नये, असे खूप मनापासून वाटत होते. त्यांच्या मनातली खंत सतत बोलून दाखवत असत! हे दुःख मात्र शालिनीताईंच्या मनात राहूनच गेलं.
–निशा भोसले, सोलापूर
निसर्गप्रेमी शालिनीताई ओक
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची शालिनी सगळ्यांना सोडून गेली, हे मनाला समजून सांगणे अजूनही जमत नाहीये. तिच्या शेकडो आठवणींनी मनात वादळ निर्माण केलेले आहे. तिच्या सामाजिक कार्याची माहिती सर्वांनाच आहे. याव्यतिरिक्त ती इतर अनेक गोष्टींतून जीवनाचा आनंद घ्यायची. त्यातील एक म्हणजे निसर्गप्रेम. तिच्या घरच्या बागेची निगराणी ती स्वतः सकाळी एक तास वेळ देऊन करायची. तिच्या बागेत शोभेची, फुलझाडे, फळझाडे अशी पन्नास-साठ तरी झाडं असतील. त्या सर्वांची नावं तिला पाठ होती. सेवासदन शाळेतील वनस्पतिशास्त्र विभागाच्या बागेची निर्मिती तिने स्वतः लक्ष घालून केली. बी. सी. गर्ल्स हॉस्टेल या संस्थेत पालेभाज्या व फळभाज्यांची परसबाग निर्मिती आणि पुढे तिची निगराणी यामध्ये ती स्वतः लक्ष घालत असे. याशिवाय नान्नजचे माळढोक अभयारण्य, ताडोबा, रणथंबोर, काझीरंगा, व्हॅली ऑफ फ्लॉवर इत्यादी अनेक अभयारण्यांना तिने भेटी दिल्या होत्या. काश्मीर, हैदराबाद, बंगळुरू येथील मोठमोठ्या प्रसिद्ध बागाही तिने आवर्जून पाहिल्या होत्या. पक्षिनिरीक्षणाचीही तिला आवड होती. सोलापुरातील डॉ. निनाद शहा यांच्या ‘विहंग पक्षिमित्र मंडळा’च्या बरोबर ती अनेक ठिकाणी पक्षिनिरीक्षणासाठी जायची. तिला अनेक पक्ष्यांची नावासह गुणधर्मांविषयी माहिती होती. कर्नाटक-गोवा सीमेवरील ‘कॅसल रॉक जंगल ट्रेक’ला मी तिच्याबरोबर गेले होते. पक्ष्यांच्या आवाजावरून ती पक्ष्यांची नावे सांगायची. तिने भारतातील आणि परदेशातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या होत्या. तेथील वेगळ्या असणार्या फुलझाडांचे फोटो काढून लगेच ती मला पाठवायची. तिचे हे निसर्गप्रेम तिच्या निरलस समाजसेवेची प्रेरणा असणार, याची मला खात्री वाटते.
– उषा शहा, सोलापूर
मार्गदर्शक मैत्रीण
रोटरी क्लबच्या फॅशन शोमध्ये चाळीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा शालिनी ओक यांना पाहिले. शालू, शेला, नथ, अंगभर दागिन्यांनी नटलेली पेशवाई थाटाची सुंदर महिला एवढंच तिच्याविषयी तेव्हा वाटलं होतं. जसजशी मैत्री होत गेली, तर वरवरचा मुलामा उतरला. बुद्धिमान, शिस्तशीर, प्रत्येकाला मदत करण्याला तत्पर अशी मैत्रीण आपल्याला मिळाली, याचा खूप आनंद झाला. मैत्री घट्ट होत गेली आणि लक्षात आलं विज्ञाननिष्ठ विचारांची शालिनी, झोकून देऊन कार्य करणारी हाडाची सामाजिक कार्यकर्ती आहे. समान निष्ठेने अनेक संस्थांशी बांधिलकी जपणारी, त्या संस्थांची आधारस्तंभ आहे. आतापर्यंत ‘आहे’ हे क्रियापद जिच्याविषयी वापरलं, तिच्याबद्दल ‘होती’ असं लिहिणं अत्यंत क्लेषकारक आहे. पण आयुष्यात आलेले दु:खाचे प्रसंग मागे टाकून स्वीकारलेली कामं शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करायची, ही शालिनीची वागणूक कायम स्मरणात ठेवत पुढे जायचे, हे आज मी स्वत:ला बजावत आहे.
–अंजली नानल, सोलापूर