राज्यव्यापी जादूटोणाविरोधी कायदा जनसंवाद यात्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रशांत पोतदार -

२० ऑगस्ट २०२३, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा १० वा स्मृती दिन…. आणि जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात येऊनही १० वर्षे पूर्ण होत असताना एक आगळीवेगळी आदरांजली म्हणून डॉ. दाभोलकर यांना कृतिशील कार्यक्रमांमधून संपूर्ण महाराष्ट्रात सलगपणे ९० दिवस कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय महाराष्ट्र अंनिसने घेतला. त्याची जबाबदारी समन्वयक म्हणून पुण्याच्या नंदिनी जाधव व सातारचे प्रशांत पोतदार यांनी स्वीकारली. आणि यात्रेच्या नियोजनाची जोरदार तयारी सुरू झाली. यात्रेसाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रदर्शित करणारी थीम असलेली डिजिटल पोस्टर्स बनवून सुसज्ज अशी गाडी सातारा येथे बनविण्यात आली. गाडीसोबत सातार्‍याचे भगवान रणदिवे व नंदिनी जाधव यांनी पूर्णवेळ सहभागी होण्याचे ठरविले. सातारा येथून रमेश जगताप हा पूर्णवेळ चालक म्हणून येण्यास तयार झाला. त्या-त्या जिल्ह्यात विभागात गाडी पोचेल, त्या-त्यावेळी तेथील राज्य-जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते गाडीसोबत वेळ देतील, असे नियोजन झाले.

२० ऑगस्ट २०२३ ला सकाळी ११ वाजता ज्या ठिकाणी डॉ. दाभोलकर यांचा निर्घृण खून १० वर्षांपूर्वी करण्यात आला, त्याच विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून सुसज्ज अशा गाडीला माजी पोलिस महासंचालक मा. अशोक धिवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यव्यापी जादूटोणाविरोधी कायद्याच्या जनसंवाद यात्रेला पुणे येथून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. मान्यवरांची मनोगते अत्यंत जोशपूर्ण घोषणा आणि गाणी याने संपूर्ण परिसर दुमदुमला. एका बाजूला डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांच्या सूत्रधारापर्यंत पोचण्यात आलेले अपयश आणि दुसर्‍या बाजूला जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाची असलेली उदासिनता मान्यवर व कार्यकर्ते यांनी उद्वेगाने व्यक्त केली. धो-धो पडणार्‍या पावसातही ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया,’ ‘जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे,’ अशा जोरदार घोषणांनी सारा परिसर दुमदुमला.

२१ ऑगस्टला सकाळी १० वाजता पहिला कार्यक्रम पार पडला तो हवेली पोलिस स्टेशनमध्ये. यासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस उपायुक्त मा. मितेश घट्टे साहेब यांनी एका फोनवर उत्तम नियोजन केले. परिसरातील सर्व पोलिस पाटील, नागरिक व हवेली पोलिस स्टेशनचे सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला. सुरुवातीला यात्रेतील नंदिनी जाधव, भगवान रणदिवे व प्रशांत पोतदार यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सूत्रं आमच्याकडे दिली. प्रास्ताविक व केवळ पाण्याने दिवा पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशांतने याला जोड दिली. लंगर सोडवण्याच्या चमत्काराने आणि कार्यक्रमाने सुरुवातीलाच आगळीवेगळी सुरुवात करून एक उंची गाठली आणि सर्वांना भारावून टाकले. जादूटोणा विरोधी कायदा प्रत्यक्ष नेमका काय आहे? याची मांडणी करून सूत्रं नंदिनी जाधव यांच्याकडे दिली. नंदिनी जाधव यांनी कायद्याची गरज आणि अंमलबजावणी यामधील त्रुटी याबाबत तसेच जटा निर्मूलन व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याची काही उदाहरणे देऊन याचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. भगवान रणदिवे यांनी प्रत्यक्ष देवीचा अंगातील संचार याचे प्रात्यक्षिक करताना जळता कापूर खाऊन आणि जीभेतून त्रिशूळ आरपार करून सर्वांना अचंबीत करून टाकले. कार्यक्रमाच्या शेवटी चमत्कारामागील विज्ञान प्रशांतने सांगितले आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुरुवातीला मिलिंद देशमुख यांनी धावती भेट देऊन सर्वांना सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वच पोलिस अधिकारी/कर्मचारी/पोलिस पाटील यांनी अशा प्रबोधनाची गरज असल्याची भावना व्यक्त केली आणि यात्रेचा पहिलाच कार्यक्रम उत्तमपणे सादर झाल्याचा आनंद घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी अहमदनगर जिल्ह्याकडे निघालो. पुणे ते अहमदनगर प्रवासात शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पी.आय. प्रमोद क्षीरसागर व त्यांचे १२ सहकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. पुढे ६.३० ते ७.१५ च्या दरम्यान कारेगाव रांजणगाव पोलिस स्टेशनचे पी.आय. महेश ढवाण यांना व त्यांच्या १८ सहकारी पोलिसांना भेट देऊन चर्चा केली. दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायदा पुस्तिका भेट देऊन आम्ही रात्री ११ वाजता स्नेहालय संस्थेमध्ये मुक्कामासाठी पोचलो.

स्नेहालयाच्या गेटवरच नोंद करत असताना एक अ‍ॅम्बुलन्स पाठिमागून आमच्याजवळ आली. त्यामध्ये एक मनोरुग्ण महिला १५ दिवसांपासून जंगलात एकटीच फिरत असल्याने तिला उपचारासाठी आणल्याचे समजले. तिला प्रचंड मोठ्या जटा डोक्यात असल्याचे सांगितले. बरे झाले अंनिसची टीम भेटली. आता तिचे जट निर्मूलन करावे, असा आग्रह धरला. नंदिनीताई खुश झाल्या. त्वरित जट निर्मूलनचे साहित्य बॅगमधून काढले आणि काय १० मिनिटांत तिच्या जटा काढून तिला जटमुक्त केले. गंमत म्हणजे जटा निर्मूलन झाल्यावर ती महिला रुग्ण खुश झाली. डोके हलके झाले, असेही म्हणाली आणि मला बाथरूमला जायचे म्हणून गेली, ती परत आलीच नाही. आम्ही रात्री १२ ते १.३० या दरम्यान स्नेहालय परिसरात अंधारात बॅटरीच्या सहाय्याने तिचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. आमचे टेन्शन खूप वाढले. कारण अंधारमय रात्र, प्रचंड झाडी, साप, विंचू यांची भीती यामुळे तिच्या जीवाला काही होऊ नये, या चिंतेत आम्ही कसेबसे दोन ते तीन तास झोपलो. परत सकाळी सहा वाजता शोध घेतला, तर झाडीमध्ये अंगावर पोते/बारदान घेऊन ती फिरत असताना आढळली. आम्ही खूप आनंदित झालो. तिला स्नेहालयच्या मनोरुग्णालयात दाखल केले.

२२ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर शहरात प्रा. अनाप सर, महेश धनवटे यांनी स्वागताची व कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. सिव्हिल चौक येथे पोलिस उपनिरीक्षक वाहतूक शाखा राजेंद्र पाटोळे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. पहिला कार्यक्रम राधाबाई काळे कन्या महाविद्यालयात तारकपूर, अहमदनगर येथे प्राचार्य थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

दुपारी ११.३० ते १२.४५ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १२० मुले-मुली यांच्यासमोर कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी २.३० ते ४.३० डॉ. प्रशांत शिंदे अध्यक्ष असलेल्या शांतिनिकेतन फार्मसी कॉलेज, धोत्रे (ता. पारनेर) च्या ३५० विद्यार्थ्यांनी तर अत्यंत आगळेवेगळे यात्रेचे स्वागत केले. कॉलेजच्या मुख्य गेटपासून ते हॉलपर्यंत दोन्ही बाजूला मुलांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत कार्यक्रमस्थळी नेले. कॉलेजचे अध्यक्ष म्हणाले, आजपर्यंत अनेक मोठे नेते कॉलेजवर आले; पण अशा पद्धतीने आम्ही त्यांचे कधीही स्वागत केले नाही. आपण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकी विचार पुढे नेण्याचे मोठे काम करीत आहोत, त्याचा हा सन्मान आहे. एवढेच नव्हे, तर स्वखुशीने त्यांनी यात्रेच्या खर्चासाठी १० हजार रुपये रोख मदत दिली. अंनिसने प्रकाशित केलेल्या नवीन पुस्तकांच्या ५० संचांची त्वरित मागणी केली. रात्रीचे उत्तम जेवण महेश धनवटे यांचे घरी घेऊन आम्ही स्नेहालय येथे मुक्काम केला.

२३ ऑगस्टला सकाळी शेवगावकडे प्रवास सुरू केला. ९.३० वाजता शेवगाव गावाच्या वेशीवरच डॉ. लढ्ढा व सायकल क्लबचे २० सभासद यांनी आमचे स्वागत केले. सर्वांनी मिळून चटकदार मिसळचा आस्वाद घेतला. १०.३० ते १२.१५ न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज एन.एस.एस. व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर केला. यानंतर दुपारी १२.३० ते २ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अश्विनी गोरखे यांच्या अध्यक्षतेखाली ७६ महिलांसाठी (आशा स्वयंसेविका) कार्यक्रम घेण्यात आला. दुपारचे भोजन डॉ. लढ्ढा यांच्यासोबत करून आम्ही रात्री ८ ते ९ उचल फाऊंडेशन या अनाथ मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला भेट दिली व मुलांसाठी मनोरंजनातून विज्ञान हा कार्यक्रमही सादर केला. रात्री डॉ. लढ्ढा यांचे घरी मुक्काम केला. त्याआधी दुपारी २.२० ते ४ शेवगाव पोलिस ठाण्यात आय.पी.एस. अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांना भेटून जवळपास २२ पोलिस पाटील यांचे प्रशिक्षण पोलिस ठाण्यातच घेतले.

२४ ऑगस्टला सकाळी ६ वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड गावाकडे आमचा प्रवास सुरू झाला. कन्नडमध्ये सकाळी १० वाजता प्रा. लहाने सर व भुयागळे सर यांनी उत्तम नाष्टा, चहा व पुस्तक देऊन आमचे स्वागत केले. ११ ते १२ जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड येथे कार्यक्रम सादर करून आम्ही औरंगाबाद शहराकडे एम.जी.एम. युनिर्व्हसिटीमधील कार्यक्रमासाठी निघाला. सोबत प्रा. लहाने सरही आले. बरोबर दोन वाजता आम्ही एम.जी.एम. मध्ये पोचलो. एम.जी.एम. चे कुलपती अंकुशराव कदम सर, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख व डॉ. रेखा शेळके यांनी एका मोठ्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जवळपास ८०० च्यावर विद्यार्थ्यांनी हॉल खचाखच भरला होता. सोबत औरंगाबादचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. शाम महाजन होतेच. सर्वच टिमने उत्तम कार्यक्रम करून सर्वांची मने जिंकली. कॉलेजने यात्रेला मदत म्हणून ४ हजार रुपये दिले. यानंतर आम्ही डॉ. महाजन यांच्या दवाखान्यात सर्व कार्यकर्त्यांची संघटनात्मक मीटिंग घेतली व मुक्कामी डॉ. महाजन यांच्या घरी गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी २५ ऑगस्टला औरंगाबाद पोलिस अधीक्षक कार्यालयात सकाळी १० वाजता कार्यक्रमासाठी पोचलो. स्वत: पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक ग्रामीण सुनील लांजेवार या कार्यक्रमास उपस्थित होते. २३ अधिकारी स्वत: उपस्थित राहिले. तर व्ही.सी.द्वारे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुका पोलिस स्टेशन जोडून घेण्यात आले होते. पोलिस अधीक्षक कार्यालयातील हा कार्यक्रम अत्यंत आगळा वेगळा असा ठरला. दुपारचे भोजन डॉ. महाजन यांचेकडे करून आम्ही जालना जिल्ह्याकडे दुपारी ३ वाजता प्रवास चालू केला.

२५ ऑगस्टला ५ वाजता प्रा. मधुकर गायकवाड यांच्या घरी आम्ही पोचलो. त्यांनी ६ वाजता सर्व कार्यकर्त्यांची मीटिंग ठेवली होती. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर सरांच्या घरीच उत्तम घरगुती जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला. २६ ऑगस्टला सकाळी ७ वाजता जालना आर.टी.ओ. मॅडम सोळुंखे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेच्या गाडीचे स्वागत करण्यात आले. ७.३० ते ८.२० कै. बाबूराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय येथे कार्यक्रम करून आम्ही कंडारी खुर्द या गावाकडे जाहीर कार्यक्रमासाठी निघालो. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिकांनी एका घरात पूजा केली. पोलिसांना कळताच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गावात आपली अंनिस शाखाही आहे. शंकर बोर्डे. पी. यू. आरसूड, मुख्याध्यापक शिंगारे यांनी परिश्रम घेतले. गावात जाहीर कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपवून आम्ही गाडीत बसलो, तर अख्खं गाव आम्हाला निरोप द्यायला गाडीभोवती जमा झाले होते. दुपारी १ ते २.३० वाजता मत्सोदरी शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालय, जालना येथे पोचलो. जवळपास ३०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर झाल्याने पुढील कार्यक्रम नर्सिंग होम मुलींच्या समोर करण्यासाठी नंदिनी जाधव पुढे गेल्या. सोबत गिराम सर, मधुकर गायकवाड पूर्ण वेळ होतेच. दुपारी २.३० वाजता जालना गेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याला १० पत्रकार उपस्थित होते.

यात्रेच्या निमित्ताने काही अनुभव

  • जादूटोणा विरोधी कायदा याबद्दल जनसामान्यच नव्हे, तर पोलिसांना देखील प्रशिक्षणाची गरज जाणवली.
  • गाव पातळीवर अंनिस कार्याबद्दल प्रचंड आदर व आपुलकी अनुभवली.
  • शाळा/कॉलेज या ठिकाणी मॅनेजमेंट यांचा उत्तम प्रतिसाद जाणवला/ काही अपवाद वगळता सर्वत्र उत्साह जाणवला.
  • कायदा प्रबोधनाला जोडून चमत्कार सादरीकरण याला नागरिक/विद्यार्थी/शिक्षक/प्राध्यापक याचा प्रचंड प्रतिसाद अनुभवला.
  • काही जिल्ह्यांत सलग ८ ते १० दिवस यात्रा सुरू राहील, इतका प्रचंड प्रतिसाद.
  • अंनिस संघटनात्मक बैठका व गृहभेटी याचा संघटनेला खूपच फायदा होईल, अशा प्रतिक्रिया.
  • यात्रेतील गाडीसोबत संघटनेची सर्व प्रकाशित पुस्तके विक्रीसाठी असणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. यासाठी स्वतंत्र एखादा कार्यकर्ता सोबत असणे आवश्यक.

सायंकाळी ५ ते ६.४५ वाजता महाराष्ट्र वन विभाग तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था येथे ४१ प्रशिक्षणार्थींसमोर संचालक तृप्ती मिरवाले यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम सादर करण्यात आला. २७ ऑगस्टला गिरामसर यांच्याकडे नाष्टा करून आम्ही ८ वाजता राखीव पोलिस दल गट क्र. ३ समोर कार्यक्रम सादर केला. जवळपास ३२ जवान यासाठी उपस्थित होते. दुपारी १ वाजता आम्ही पोचलो नालंदा बुद्ध विहार संघभूमी नागेवाडी येथे. भन्ते धम्मधर शाक्यपुत्र भन्ते शिवली शाक्यपुत्र यांनी उत्तम नियोजन केले होते. जवळपास २०० जणांच्या उपस्थितीमध्ये ए फेस लाईव्ह कार्यक्रम सादर करण्यात आला.

सायंकाळी जालना टीमचा निरोप घेऊन आम्ही परभणी जिल्ह्याकडे प्रवास चालू केला. रात्री ९.३० वाजता परभणी शहरात पोचलो. डॉ. जगदीश नाईक, डॉ. माणिक लिंगायत हे स्वागतासाठी थांबलेच होते. एका उत्तम लॉजवर आमची मुक्कामाची सोय त्यांनी केली होती. सर्वजणांसोबत रात्रीचे भोजन केले.

२८ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजताच डॉ. नाईक यांच्याकडे जेवण करून आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलिस अधीक्षक काळेसाहेब यांना भेटलो. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार्यक्रमाचे संयोजन करून कार्यक्रम लगेचच ४ वाजता ठरविला. ११.३० व १.१५ शारदा महाविद्यालयात नियोजित कार्यक्रम प्राचार्य शामसुंदर वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुंजाजी कांबळे हा गंगाखेड येथून सकाळीच आमच्यात सहभागी झाला होता. दुपारी ३.३० ते ४.४५ पंचायत समिती परभणी येथे १२० आशा वर्कर्स स्वयंसेविका यांच्यासमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. ५.१५ ते ७.३० अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या उपस्थितीमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी कार्यक्रम करून आम्ही नवरचना या अनोख्या मुलामुलींच्या संस्थेत जवळपास ५०० मुला-मुलींसाठी कार्यक्रम सादर करून पुढे गंगाखेड येथील मुंजाजी कांबळे यांच्या निवासस्थानी रात्री ११.३० वाजता मुक्कामासाठी पोचलो.

२९ ऑगस्टला मुंजाजीकडे नाष्टा करून सकाळी १० वाजता संत जनाबाई महाविद्यालय येथे प्राचार्य बी.एम. धूत व समन्वयक संतोष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जवळपास ३०० च्या वरती विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुपारी १ ते २ पंचायत समिती, गंगाखेड येथे आशा स्वयंसेविकांसमोर कार्यक्रम सादर करून आम्ही दुपारचे उत्तम असे भोजन मुंजाजी कांबळे यांच्या घरी करून पुढील हिंगोली जिल्ह्याच्या कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये इंजि. सम्राट हयकर यांच्याकडे सायं. ६ वाजता पोचलो. राज्यकार्यकारिणी बैठकीचा हॉल, निवास व्यवस्था या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रात्री हॉटेल टेबल येथे हटकर सर यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही रात्री हटकर सर यांच्या घरी मुक्कामी पोचलो.

३० ऑगस्टला सकाळी ७ वाजता आम्ही निघालो. वसमत येथील बहिर्जी स्मारक विद्यालयात ८ ते ९.३० जवळपास २ हजार विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. ११ ते १२.३० शिरड शहापूर, ता. औंढा (जि. हिंगोली) येथील श्री. शांती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ३०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करून आम्ही नागनाथ कला, वाणिज्य विद्यालय, औंढा नागनाथ येथील विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर केला. जवळपास १५ प्राध्यापक व ५० ते ६० विद्यार्थी यांनी याचा आनंद घेतला. वसमत तालुक्यातील कार्यकर्ते चिमाजी दळवी सोबत होते. गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनी कार्यक्रम संयोजन करण्यास मोलाचे सहकार्य केले.

१ सप्टेंबरला नांदेड जिल्ह्यात कार्यक्रम सुरू होणार, याचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होताच. आदल्या दिवशी कार्यकर्त्यांची मीटिंग हटकर सर यांच्या घरी झाली होतीच. मी यात्रेतून पुढील संयोजन व इतर कामे यासाठी सातारला आलो आणि हटकर सर यात्रेत सामील झाले. सकाळी आर.टी.ओ. कामत साहेब यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून नांदेड शहरात स्वागत करण्यात आले. नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयात पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे पोलिस अधिकारी यांच्यासमोर कार्यक्रम उत्तमपणे पार पडला. २ सप्टेंबरला पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हदगाव येथे ३०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करून पुढे दत्त कला, वाणिज्य महाविद्यालय हदगाव येथे ४०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. परत रात्री मुक्कामी नांदेडला थांबून ३ सप्टेंबरला सकाळी यवतमाळकडे प्रकाश आंबीलकर यांचेकडे सर्वजण पोचले. सकाळी ८ ते १० होमगार्ड प्रशिक्षण कार्यशाळा येथे जवळपास ७० होमगार्ड यांचेसमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. ११ ते ११.३० शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, यवतमाळ येथे १५० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करून ४.३० ते ६ डॉ. के. टी. राठोड व अ‍ॅड. विरेंद्र देवीदास दरणे, अ‍ॅड. शुभांगी दरणे यांच्या गृहभेटी घेण्यात आल्या. यवतमाळ बार असोसिएशन वकिलांच्यासमोर कार्यक्रमस सादर करण्यात आला. विशेष म्हणजे अघोरी प्रकार झालेल्या सपनाकांड मधील सरकारी वकील यांच्याशी महत्त्वाची चर्चा झाली.

५ व ६ सप्टेंबरला यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात आली. सोबत रामभाऊ डोंगरे सहभागी झाले. भद्रावती शाखेचे जिल्हाध्यक्ष डॉ. साळवे यांनी निवास य भोजनाची सोय केली. पोलिस स्टेशन, भद्रावती येथे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचेसमोर कार्यक्रम सादर करून यशवंत शिंदे महाविद्यालयात जवळपास ३५० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. पुढे नॅशनल गर्ल्स हायस्कूल, ऊर्जानगर, चंद्रपूर येथे ३०० विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.

६ सप्टेंबरला मूल येथे नवभारत कनिष्ठ विद्यालय येथे ८०० विद्यार्थ्यांसमोर, तर मौन्ट वगनवेट उच्च माध्यमिक विद्यालय येथे ३५० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम उत्तमपणे पार पडला. मूल गावात एका कुटुंबावर जादूटोणा करतात, असा आरोप केला जात होता. त्या गावात दोन्ही गटांबरोबर यात्रेतील कार्यकर्त्यांनी संवाद साधला. मूल पोलिस स्टेशनचे पी.आय. यांना भेटून केस संदर्भात माहिती घेतली. याबाबत मूल शाखेचे कार्यकर्ते पुढे पाठपुरावा करीत आहेत.

ऋणनिर्देश

जनसंवाद यात्रेचे स्वागत सर्वच जिल्ह्यांत कार्यकर्त्यांनी अत्यंत आपुलकीने व उत्साहात केले. सर्वच कार्यक्रमाचे नियोजन, राहण्याची व नाष्टा भोजनाची उत्तम सोय केली. आपल्या कुटुंबातीलच कोणी आल्याच्या भावनेने कार्यकर्ते त्या-त्या ठिकाणी कार्यक्रम संयोजनापासून ते सर्वच व्यवस्थेबद्दल काळजी घेत होते.

या संयोजनातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्ञात-अज्ञात यामागील हात या सर्वांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी समितीच्यावतीने आम्ही अत्यंत मन:पूर्वक ऋणी आहोत.

कोणत्याही राज्यव्यापी अभियानासाठी आपण सर्वच जिल्हे सक्षम आहोत, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

७ व ८ सप्टेंबरला यात्रेने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली द्वारा संचलित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे जवळपास ३०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करून पुढे विद्याभारती विद्यालय, गडचिरोली येथे ३५० विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.

पोलिस स्टेशन, गडचिरोली येथे पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांच्यासह जवळपास ८०० नागरिकांसमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन पत्रकार बंधूंशी संवाद साधण्यात आला. ओमनगर, ब्रह्मपुरी येथील बुद्धविहार येथे ४० जणांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यात आला. ८ सप्टेंबर रोजी १२ ते १ पोलिस स्टेशन, कोटगुल येथे पोलिस कर्मचारी पोलिस पाटील विद्यार्थी, ग्रामस्थ असे जवळपास ३०० जणांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सादर करण्यात आला. ९ व १० सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यासाठी यात्रा रवाना झाली. गोंदिया येथील बन्सोड सर व त्यांचे सर्व सहकारी यांनी गोंदिया शहरात गाडीचे उत्तम स्वागत केले. पोलिस स्टेशन, गोंदिया येथे १०० जणांच्या उपस्थितीमध्ये पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला. पुढे एम. जी. मेडिकल कॉलेज, गोंदिया येथे जवळपास २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासमोर कार्यक्रम सादर करून पुढे मैत्रीय बुद्धविहार येथे १०० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम सादर करण्यात आला. बुद्धिस्ट समाज संघ संथागार, बुद्धविहार येथे ३०० च्यावर उपस्थित नागरिकांसमोर कार्यक्रम पार पडला. शहीद सुरेश हुकालाला नागापुरे तुमखेडा खुर्द येथे जाऊन त्याच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यात आली. आवरी टोला (गुदमा) येथे १०० ग्रामस्थांसमोर कार्यक्रम करण्यात आला. अदासी, ता. जि. गोंदिया येथे ग्रामस्थांसमोर मंदिरामध्ये जवळपास ८० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला.

महत्त्वाचे मुद्दे

जनसंवाद यात्रेमुळे शाखेतील व जिल्ह्यातील कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह व स्फूर्ती निर्माण झाल्याचे अनुभवास आले.

  • शाळा/महाविद्यालये/बचत गट/अंगणवाडी सेविका/ आशा वर्कर्स/ पोलिस स्टेशन/ पोलिस अधीक्षक कार्यालय/ वनविभाग कर्मचारी/ होमगार्ड/ वकील बार असोसिएशन/ गाव पातळीवर जाहीर कार्यक्रम/ अनेक बुद्ध विहार अशा विविध स्तरांवर प्रबोधनाचे कार्यक्रम झाले.
  • औरंगाबाद जिल्ह्यात पोलिसप्रमुख कार्यालयात पोलिस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जिल्ह्यांतील पी.आय. यांना ऑनलाइन व्ही.सी. द्वारे जोडण्यात आले. यामुळे एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले.
  • जादूटोणा विरोधी कायद्याची थिम ठेवून सजवलेली आकर्षक गाडी रस्त्यावरून धावताना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सिग्नलला थांबल्यावर अनेक नागरिक गाडीचे फोटो घेत. त्यावरील नंबर घेऊन आम्हाला फोनही करत. एकूण गाडी आगळीवेगळी सजवलेली असल्याने सर्वांना याबाबत कुतूहल व आकर्षण वाटत होते. अनेकांनी भरभरून कौतुक केले.
  • २० ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत सलगपणे एकूण ८२ कार्यक्रम झाले. त्याला १८,७१९ जणांची उपस्थिती होती.

हा पहिला टप्पा संपला असून दुसरा टप्पा नांदेड राज्यकार्यकारिणीनंतर नियोजन करून सुरू होईल.

दि. ११ व १२ सप्टेंबर रोजी यात्रेची गाडी भंडारा जिल्ह्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी यात्रेच्या गाडीचे उत्साहात स्वागत केले. भंडारा पोलिस स्टेशन येथे पोलिस अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील यांचे उपस्थितीतमध्ये उत्तम कार्यक्रम पार पडला. लाल बहाद्दूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कार्यक्रम करून पुढे १२ सप्टेंबरला जे. एम. पटेल, कॉलेज, भंडारा येथे ३०० विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. जवाहर कनिष्ठ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, भंडारा येथे २०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम करून महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, भंडारा येथे जवळपास ३०० च्या वर विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम पार पडला.

१३ व १४ सप्टेंबर रोजी यात्रा नागपूर जिल्ह्यात आली. मी सातारा येथून १३ ला सकाळी विजयाताई श्रीखंडे मॅडम यांच्या घरी सकाळी ७.३० वाजता पोचलो. दोन्ही दिवस नागपूर टीमने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. श्रीखंडे मॅडम यांनी दोन्ही दिवस निवास व भोजनाची सोय केली. १३ सप्टेंबरला अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज माध्यमिक व उच्च माध्यमिक येथे १०० विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करून दुपारी संचालक विज्ञान संस्था, नागपूर येथे प्रसिद्ध अशा महाविद्यालयात १५० च्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. ४ ते ५ टिळक विद्यालय बालमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे १०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करून आम्ही दुसर्‍या दिवशी १४ सप्टेंबरला कळमेश्वर शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी कळमेश्वर गावी पोचलो. शाखेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी यात्रेच्या गाडीचे स्वागत आंबेडकर पुतळ्याजवळ उत्साहात केले. पहिला कार्यक्रम इंदिरा गांधी कला, वाणिज्य महाविद्यालय येथे सोशॅलॉजी विद्यार्थ्यांसमोर उत्तमपणे पार पडला. दुपारी कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचारी यांच्यासाठी कार्यक्रम करून आम्ही सायन्स कॉलेज, ब्राम्हणी येथे जवळपास १५५ विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर केला. सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत ३ कार्यक्रम सुट्टीचा व सणाचा दिवस असूनही उत्तम पार पडले.

यात्रेतील कार्यकर्त्यांनी केलेले प्रत्यक्ष फिल्डवरील प्रकरणे जादूटोण्याचा आरोपाची दखल

१) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल गावात एका कुटुंबावर जादूटोणा केला जात होता, असा आरोप केला गेला. त्या गावात दोन्ही गटांबराबेर अंनिस कार्यकर्त्यांनी चर्चा केली. पोलिस स्टेशनचे पी.आय. यांना भेटून केसबाबत संपूर्ण माहिती घेतली. जादूटोणा कायद्याची प्रत भेट दिली व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. यामध्ये मूल शाखेचे कार्यकर्ते व यात्रेतील सर्व कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

२) भानामतीची केली उकल

नागपूर जिल्ह्यातील रिधोरा गावात एका कुटुंबाच्या घरी शिजवलेला भात अचानक गुलाबी-लालसर रंगाचा होत असे. हा सर्व प्रसार अनेकदा होत असल्याने भानामती असल्याचा त्यांचा समज झाला. याची सत्यता व उकल करण्यासाठी यात्रेची गाडी घेऊन सर्व कार्यकर्ते रिधोरा गावात गेलो. प्रत्यक्ष कुटुंबीयांशी चर्चा करून घरी भेट दिली. चर्चेदरम्यान लेखी सविस्तर अर्ज घेतला आणि प्रत्यक्ष भात लाल कसा होतो, याचे प्रात्यक्षिकच प्रशांत पोतदार यांनी करून दाखविले. यामध्ये डॉ. भगत सर, सौ. भगत मॅडम, विजयाताई श्रीखंडे, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, रिधोरा गावचे पत्रकार बंधू, पोलिस पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळमेश्वर गावापासून ३० कि. मी. अंतरावर रिघोरा गावात भानामती सदृश्य घटनेने एक कुटुंब पीडित असल्याची माहिती मिळताच आम्ही थेट गाव गाठले. कुटुंबीयांना भेटलो. पीडित, पोलिस पाटील व पत्रकार यांचेसमवेत मीटिंग घेऊन चर्चा करून सविस्तर भानामतीचा प्रकार समजून घेतला व यातील सत्य शोधणारा सविस्तर लेखी अनुमतीचा अर्ज लिहून घेतला.

घरातील शिजवलेला पांढरा भात आपोआप गुलाबी/लाल रंगाचा गेली अनेक दिवस होतो. यामुळे भीतीचे वातावरण होते. प्रत्यक्ष पीडितांच्या घरी जाऊन आम्ही भात लाल कसा होतो याचे प्रात्यक्षिकच करून दाखवले. तेव्हा सर्वच जण अवाक् झाले. या संपूर्ण मोहिमेत नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी डॉ. भगत, विजयाताई श्रीखंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. रामभाऊ डोंगरे यांनी संपूर्ण नियोजन उत्तमपणे केले होते.

१५ व १६ सप्टेंबरला आम्ही वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला. नरेंद्र कांबळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी उत्तम असे स्वागत केले. पोळा सण असूनही दोन्ही दिवस भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन सर्वांनी केले. पहिलाच कार्यक्रम तक्षशिला बहुुउद्देशीय संस्था, वर्धा येते बुद्धविहार तक्षशिला मध्ये जवळपास १५० नागरिकांच्या उपस्थितीत उत्तमपणे पार पडला. यानंतर आनंदराव मेगे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव मेघे येथे २०० विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आला. तिसरा कार्यक्रम अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथे ५० विद्यार्थ्यांसमोर सादर केला गेला.

चेतना नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेज, शांतीनगर, वर्धा येथे ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासमोर कार्यक्रम करून आम्ही पुढील अमरावती जिल्ह्यात कार्यक्रम करण्यास प्रवास सुरू केला. त्यापूर्वी महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामला भेट दिली.

१७ व १८ सप्टेंबरला अमरावती शहरात श्रीकृष्ण धोटे यांनी उत्तम नियोजन केले होते. सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला हार घालून अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यात्रेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिला कार्यक्रम भीमनगर येथील वस्तीमध्ये जवळपास १०० जणांच्या उपस्थितीमध्ये सादर करण्यात आला. सायंकाळी संत तुकडोजी महाराज यांच्या गावी मोझरी येथे ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामपंचायत हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अशा एकूण ५० ते ६० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम सादर झाला. पुढे दुसर्‍या दिवशी १८ सप्टेंबरला सकाळी श्री. शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय, अमरावती मध्ये जवळपास ३५० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादरीकरण केले. दुपारी २ वाजता विद्याभारती महाविद्यालय येथे २०० विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर करून यात्रेची गाडी दर्यापूरकडे रवाना झाली. मी अमरावतीवरून सातारला परत आलो व श्रीकृष्ण धोटे हे गाडीसोबत अकोला जिल्ह्यात जाण्यासाठी दर्यापूरकडे रवाना झाले.

दर्यापूर पोलिस स्टेशनचे पी.आय. संतोष ताले यांची स्थानिक कार्यकर्ते यांना घेऊन भेट घेतली व त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. निमित्त होते गावातील अंगात येण्याचे प्रकार थांबविण्याचे. येथील कार्यकर्ते संतोष कोल्हे यांनी सर्वांची उत्तम सोय केली. रात्री ९.३० वाजता बुद्ध विहारात कार्यक्रमाचे आयोजनही केले. याला ७०-८० नागरिक उपस्थित होते. पुढे अकोला शहरात प्रा. राजाभाऊ शंभरकर यांनी यात्रेतील सर्वांची राहण्याची उत्तम सोय केली.

२० सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रेला बरोबर १ महिना पूर्ण झाला होता. सलगपणे अविश्रांतपणे यात्रा उत्तमपणे पार पडली. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या नांदेड बैठकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेचा पहिला टप्पा येथेच थांबवून गाडी सातारा येथे परत पोचली. यात्रेचा दुसरा टप्पा नांदेड राज्यकार्यकारिणीमध्ये नियोजन करून ठरवला जाईल व अधिक जोमाने तो पूर्ण केला जाईल, असा विश्वास आहेच.

असा झाला दौरा

  • २० व २१ ऑगस्ट २०२३ : पुणे – प्रशांत पोतदार (सातारा), नंदिनी जाधव (पुणे), भगवान रणदिवे (सातारा), मिलिंद देशमुख (पुणे), रमेश जगताप (सातारा)
  • २२ व २३ ऑगस्ट २०२३ : अहमदनगर – वरीलप्रमाणे सर्व + मधुकर अनाप सर व महेश धनवटे (अहमदनगर), डॉ. संजय लढ्ढा (शेवगाव)
  • २४ व २५ ऑगस्ट २०२३ : औरंगाबाद – डॉ. शाम महाजन, डॉ. लहाने सर, भुयागळे सर
  • २६ व २७ ऑगस्ट २०२३ : जालना – मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर गिराम सर
  • २८ व २९ ऑगस्ट २०२३ : परभणी – मुंजाजी कांबळे, डॉ. जगदीश नाईक, डॉ. माणिक लिंगायत
  • ३० व ३१ ऑगस्ट २०२३ : हिंगोली – सम्राट हटकर
  • १ व २ सप्टेंबर २०२३ : नांदेड – सम्राट हटकर, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, प्रकाश आंबीलकर
  • ३ व ४ सप्टेंबर २०२३ : यवतमाळ : प्रकाश आंबीलकर, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे
  • ५ व ६ सप्टेंबर २०२३ : चंद्रपूर : रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे
  • ७ व ८ सप्टेंबर २०२३ : गडचिरोली : रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे
  • ९ व १० सप्टेंबर २०२३ : गोंदिया – रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, बन्सोड सर
  • ११ व १२ सप्टेंबर २०२३ : भंडारा – नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, देवानंद चौरे
  • १३ व १४ सप्टेंबर २०२३ : नागपूर – प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, डोंगरे सर, प्रा. भगत, विजयाताई श्रीखंडे
  • १५ व १६ सप्टेंबर २०२३ : वर्धा – प्रा. नरेंद्र कांबळे, अ‍ॅड. पूजा जाधव, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे.
  • १७ व १८ सप्टेंबर २०२३ : अमरावती – श्रीकृष्ण धोटे, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे.
  • १९ व २० सप्टेंबर २०२३ : श्रीकृष्ण धोटे, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे.

राज्यव्यापी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने सविस्तर वृत्तांत वाचकांसाठी देताना मनस्वी आनंद होत आहे. संपूर्ण यात्रेतील संयोजनासाठी ज्या-ज्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले, त्यांचो म.अंनिसच्या वतीने आम्ही सर्वजण अत्यंत ऋणी आहोत. अनावधानाने नाव/कार्यक्रम उल्लेख लेखात राहिला असल्यास क्षमा मागतो.

सर्वांचे पुन:श्च एकदा मन:पूर्वक आभार.

पुढील यात्रेचा टप्पा अधिक जोमाने करूया या निश्चयासह लेखाला पूर्णविराम देतो. मन:पूर्वक धन्यवाद!

नंदिनी जाधव : ७०८३७ ३४२४४

प्रशांत पोतदार : ९४२११ २१३२८

भगवान रणदिवे : ९९२२० ४८८३२

राज्य समन्वयक,

जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रा


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]