चळवळीचे वकील : आपटेदादा

शंकर चौगुले -

वयाच्या ९७ व्या वर्षीही सदाबहार, संयमी, प्रत्येक बाबतीत कार्यकारणभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकाने शोधणारे, जगणारे अ‍ॅड. राम आपटेदादा! त्यांनी बेळगाव येथे २३ डिसेंबर २०२२ रोजी शेवटचा श्वास घेतला. त्या आधी देहदान करून मरणानंतरही समाजाचे ऋण फेडण्याचा, समाजाची सेवा करण्याचा मार्ग पत्करला. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सामाजिक बांधिलकीतून राबविलेले लोकोपयोगी उपक्रम, कार्यक्रम, सहाय्य, सेवेमुळे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांव्यतिरिक्त अनेक संस्थांचे अध्यक्षपद खरे तर ते अध्यक्ष कार्यकर्ता या नात्याने त्यांच्याकडे आले आणि त्यांनीही ते पूर्ण ताकदीने सांभाळले, कृतीत आणले. त्यातील बेळगाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संस्था, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अगोदर १९६० पासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम गुरुवर्य नारायण अतिवाडकर यांच्यासोबत करत होते. ते गावोगाव जात. व्याख्याने, पदयात्रा, चमत्कार प्रात्यक्षिके, गाणी याद्वारे कार्य करत. अतिवाडकर गुरुजींना सर्वतोपरी आर्थिक, बौद्धिक मदत करत. त्यांनी अंनिसची पुस्तके लिहावीत म्हणून दादा नेहमी आग्रही असत. त्यासाठी प्रकाशन, प्रचार व प्रसार यासाठी संघटना प्रबळ व मजबूत करण्यासाठी त्यांना दादांचे बोलाचे सहाय्य लाभत असे.

अंधश्रद्धा निर्मूलनावर अनेक युवक-युवतींची, शिक्षकांची, सामाजिक कार्यकर्त्यांची शिबिरे घेणे, जाहीर व्याख्याने, संवादसभा घेणे, कॉलेज, हायस्कूल व शाळाशाळांमधून अंधश्रद्धा निर्मूलनार्थ जागृती करत, त्यांना वैज्ञानिक दृष्टी देण्याचे कार्य केले होते. भविष्य सांगणारे, भोंदूगिरी करणारे, अमावस्या-पौर्णिमेला लोकांना उतारे, अंगारे, धुपारे यांसारख्या निषिद्ध कामात गुंतवून त्यांचे आर्थिक, शारीरिक, नैतिकदृष्ट्या खच्चीकरण करणार्‍यांना चाप बसावा म्हणून संघटनेद्वारे नेहमीच प्रयत्नशील असत. तसेच दारिद्य्राने हवालदिल झालेल्या लोकांना आणखी गरिबीच्या खोल गर्तेत बुडवणार्‍या, लुबाडणार्‍या अनेक ज्योतिषी, बुवा-बाबा, फसवे डॉक्टर, मांत्रिक, तांत्रिक, देव अंगात येणार्‍या बाया यांना जनतेसमोर आणून त्यांचा खोटारडेपणा, फसवेपणा, लुटारूपणा उघड करून सांगणे, यासाठी ते वर्तमानपत्रातूनही आव्हान देत असत.

याप्रकारे त्यांनी नऊ बाबा-बुवांवर न्यायालयात खटले घातले. यावर चिडलेल्या तीन भोंदूबाबांनी उलट अंनिसविरोधात फिर्याद नोंदविली. ‘आपल्याला मारहाण केली, आमचे पैसे चोरले,’ असा उलट कांगावा त्या तीन भोंदूबाबांनी अंनिसबद्दल केला. दरम्यान, न्यायालयात जबाब नोंदवताना न्यायाधीशांनी प्रथेप्रमाणे दादांना व कार्यकर्त्यांना ‘देवाशपथ खरे बोलेन’ असे म्हणताच, ‘आम्ही असे म्हणणार नाही!’ म्हणून ‘माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून’ अशी शपथ दादांनी घेतली व कुशलतेने सगळ्यांना निर्दोष सोडविले, तसेच या भोंदूबाबांना पोलिस अधिकार्‍यांसमोर उभे करून यापुढे अशी भोंदूगिरी यापुढे करणार नाही, असे लेखी लिहून घेतले. अशा प्रकारे बरीच वर्षे भोंदू बाबांवर अंनिसचा दबदबा होता.

व्यवहारातल्या साध्या गोष्टीतूनही दादांचा सत्यशोधकी दृष्टिकोन दिसून यायचा. त्यांनी कधीही देवापुढे नारळ फोडला नाही, उदबत्ती फिरवली नाही, देवासमोर हात जोडले नाहीत. लग्नानंतर देवदर्शनावेळी सूज्ञांनी त्यांच्या मातोश्रींना त्यांच्यासमोर आणले व दादांनी जोडीने त्यांना वाकून नमस्कार केला. ठराविक रकमेवर दिल्या जाणार्‍या एक रुपयात दादांना अंधश्रद्धा दिसायच्या. तसेच समारंभात आकर्षक वेष्टणात गुंडाळून दिलेली भेट हा नाहक खर्च दादांना अंधश्रद्धा वाटायचा, मूर्तिपूजन, आरास, नैवेद्य, पानसुपारी तसेच आनंदोत्सवात फटाकड्या, चिरमुरे, भंडारा, गुलाल आदी ते मानत नसत. याबाबत चर्चा करत, थांबवण्याचा प्रयत्न करत. प्रामाणिक, पराक्रमी मुली, कार्यकुशल तरुणांचा, माणसांचा सन्मान करत. सत्यशोधकी लग्नाला आवर्जून उपस्थित राहत. विनाभटजी, विनाअक्षता, विना बँड अशा लग्नांना त्यांचा पाठिंबा असे. लग्नात पती-पत्नीने घ्यायची शपथ त्यांनी लिहिली आहे. अशी शपथेची अनेक लग्ने त्यांनी लावली आहेत.

असे आम्हा सर्वांचे दादा, लहान-मोठ्यांत रममाण होत. विद्वत्ताप्रचुर, पण त्याचा कधीच अभिनिवेश नसलेले, सरळमार्गी, व्यासंगी, तर्ककठोर संत शिरोमणी तुकारामांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास –

मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास|

कठीण वज्रास| भेदू ऐसे॥

या वृत्तीचे. आम्हा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. सबब, आम्ही अंनिसचे कार्यकर्तेसतत त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जाऊ व त्यांची संघटनेत भासणारी कमतरता भरून काढू!

दादांच्या मधुर स्मृतींना वंदन!

शंकर चौगुले


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]