कार्ल पॉपर, रंगीत राजहंस आणि आभासी-विज्ञान

अंजली चिपलकट्टी - 9422552985

वैज्ञानिक संशोधकांनी निरीक्षणाच्या आणि निष्कर्ष काढण्याच्या गाभ्याची तत्त्वं काटेकोरपणे पाळून निसर्गाचे नियम शोधले, नवीन शोध लावले. हे नियम परत तपासून पाहून त्यात सुधारणा करणं, बदलणं ही प्रक्रिया आजही अव्याहतपणे चालू आहे. हे वैज्ञानिकसुध्दा आम्हाला आता पूर्ण ज्ञान झाले,’ अशा वल्गना करत नाहीत. ज्ञान असं प्रवाही असणं हीच ज्ञानाची खरी ओळख आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगातील खूप काही आश्चर्यकारक शोध लागत होते तेव्हाची गोष्ट. एकीकडे आइनस्टाइनने (1879-1955) सापेक्षतेचा सिद्धांत (theory) मांडला होता; ज्यात त्याने विश्वाच्या नियमांची आमूलाग्र नवीन मांडणी करून ‘न्यूटोनिअन’ जगाला हादरा दिला होता; तर दुसरीकडे फ्रॉईड (1856-1938) मानवी मनाचा तळ शोधत होता. याच सुमारास या संशोधकांनी मांडलेले सिद्धांत कार्ल पॉपर(1902-1994) नावाचा तत्त्वज्ञानाचा एक तरुण विद्यार्थी बारकाईने तपासत होता. त्याला लक्षात येत होतं की, सिद्धांत कसोटीला उतरवण्याची या दोघांची पद्धत अगदीच वेगळी; म्हटलं तर परस्परविरोधी आहे. असा काय फरक होता दोन पद्धतीत? तेच शोधताना कार्ल पॉपरला विज्ञान आणि छद्मविज्ञान यातला फरक सांगणारी विज्ञानविचारांची एक नवीन पद्धत गवसली. या पद्धतीमुळे विज्ञानाने नवीन भरार्‍या घेतल्याच; पण त्यामुळे मानवी मनाच्या विचार करण्याच्या एका महत्त्वाच्या दोषावर त्यानं बोट ठेवलं. ते कसं, हे कळण्यासाठी आपल्याला आधी विज्ञानपद्धती म्हणजे काय, हे जाणून घ्यावे लागेल.

विज्ञानात नवीन ज्ञान/सिद्धांत तयार होण्याची प्रक्रिया कशी होते? त्याची सुरुवात होते निरीक्षणांपासून. 1. नियमितपणे तीच निरीक्षणं दिसली तर मग त्या निरीक्षणांचं स्पष्टीकरण कसं देता येईल, याचा विचार सुरू होतो. (निरीक्षणं कोणत्याही संशोधकाला स्वतंत्रपणे तपासून बघता आली पाहिजेत. त्यात संदिग्धता असून चालत नाही.) 2. मग संशोधक काही कल्पना गृहितकं म्हणून मांडून एक थिअरी तयार करतो. त्यात तो गृहितकांपासून सुसंगतपणे सुरुवात करून, तर्क वापरून उपलब्ध निरीक्षणांचं स्पष्टीकरण देतो. 3. त्या गृहितकांच्या आधारे पुढे कोणती निरीक्षणं दिसतील, अशी भाकितंही करावी लागतात. ती भाकितं सुसंगत असावी लागतात; परस्परविरोधी असून चालत नाहीत. 4. तशी निरीक्षणं प्रत्यक्षात दिसली तर ती भाकितं खरी ठरली, असं म्हणता येतं आणि मग ती थिअरी योग्य आहे असं मानतात. 5. पण पॉपर त्यापुढे असं म्हणतो की, कोणती निरीक्षणं दिसली तर आपलीच थिअरी खोटी ठरेल, हेही संशोधकानं मांडायला हवं.

एक उदाहरण घेऊन पाहू – पृथ्वीवर सर्व वस्तू खाली पडतात, या निरीक्षणावरून न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला; म्हणजे त्यानं अशी कल्पना केली (गृहितक) की, वस्तुमान असणार्‍या कोणत्याही गोष्टी एकमेकांना खेचतात. याआधारे त्याला पृथ्वीवर वस्तू का पडतात, याचं तार्किक स्पष्टीकरण देता आलं. मग चंद्र, सूर्य, इतर ग्रह या खगोलीय वस्तूंचं काय? तर न्यूटनचे नियम वापरून त्यांच्या भ्रमणांविषयी जी भाकितं केली, ती अचूक ठरली! इतकंच नाही, तर ‘युरेनस’ ग्रहाचं भ्रमण नियमानुसार नव्हतं. तर त्याचं कारण शोधताना त्याच्या जवळ अजून एक ग्रह असणार, असं भाकीत केलं गेलं. ते खरं ठरून ‘नेपच्युन’चा शोध लागला! नंतर मात्र बुध ग्रहाच्या भ्रमणांचे स्पष्टीकरण न्यूटनचे नियम वापरून देता येईना, तेव्हा न्यूटनच सिद्धांत अपुरा आहे, असं लक्षात आलं. आइनस्टाइननं मग सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला, ज्यामुळे बुधाच्या भ्रमणांचं सुद्धा स्पष्टीकरण मिळालं. यातलं मुख्य गृहितक असं आहे की, कोणतंही वस्तुमान असलेल्या गोष्टींच्या आजूबाजूची अवकाशपोकळी वाकते आणि वाकण्याचं प्रमाण हे त्यांच्या वस्तुमानाच्या सम प्रमाणात असतं; म्हणजे एखाद्या जाळीत चेंडू टाकला तर ती जाळी जशी ताणली जाते, तशा काल्पनिक अवकाशरेषा वाकतात. समजायला थोडं अवघड आहे; पण त्यात न गुंतता आपण पुढे जाऊ. आता अवकाश वाकतं, हे सिद्ध करणं अवघडच. मग त्यानं असं भाकीत केलं की, हा सिध्दांत योग्य असेल तर प्रकाशसुध्दा सूर्यासारख्या महाकाय वस्तुमानाच्या जवळून जाताना वाकेल आणि तसं झालं तर सूर्याच्या पाठीमागच्या तार्‍यांकडून येणारा प्रकाशही सूर्यामुळे वाकून आपल्यापर्यंत पोचेल व एरव्ही न दिसू शकणार्‍या या तार्‍यांच्या प्रतिमा सूर्यग्रहणादिवशी दिसू शकतील. तसं दिसलं नाही तर माझा सिद्धांत जरूर खोटा ठरवा, असं आइनस्टाइनचं म्हणणं होतं; म्हणजेच आपली थिअरी कोणत्या निरीक्षणाने खोटी ठरू शकते, हे खुद्द त्यानंच सांगून मोठा धोकाच पत्करला होता! हाच तो पॉपरने मांडलेला विरोधी पुरावे शोधायचा पाचवा मुद्दा.

आणि नेमका इथंच फ्रॉईडचा सिद्धांत कमी पडत होता. अबोध मन, स्वप्न म्हणजे अतृप्त इच्छांची पूर्ती, माणसाच्या बहुतेक विकारांचा संबंध लैंगिकतेशी जोडणं, इडिपस गंड अशा अनेक गृहितकांची त्याने कल्पना केली होती. ती सिद्ध करणारे पुरेसे अनुभवजन्य (empirical) पुरावे फ्रॉईड देऊ शकला नाही. काही निरीक्षणं ओढून-ताणून त्यानं गृहितकांशी जोडली; पण त्याची अनेक भाकितं खोटी ठरत असत. समजा – एक निरीक्षण असं असेल की, एखादा मुलगा – जॉन – लग्न करायला फार उत्सुक नाही आणि लहानपणीच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. त्यावरून समजा आपण असं गृहितक मांडलं – लहानपणी आई-वडिलांच्या घटस्फोट झाला असेल तर ती व्यक्ती मोठेपणी लग्न करायला उत्सुक नसते. आता समजा आपल्याला अतुलचं एक वेगळं उदाहरण सापडलं. त्याच्याही आई-वडिलांचा घटस्फोट झालाय. पण अतुलनं लग्न तर केलंच; शिवाय तो आपल्या पत्नी/मुलावर खूप प्रेमही करतो. अशी गृहितकाविरोधी उदाहरणं मिळाली तर आपण काय विचार करू? बहुधा आपलं गृहितक चुकलं असावं; पण त्याऐवजी लहानपणी झालेल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा काही ना काही परिणाम होणारच, असं गृहितक मांडलं तर? हे इतकं ढोबळ गृहितक आहे की, जो दिसेल तो परिणाम घटस्फोटामुळे झाला, असं म्हटलं की झालं; म्हणजे ते गृहितक खोटं आहे, हे सिद्धच करता येणार नाही. समजा – मी असं म्हटलं की, माझ्याकडे एक अदृश्य पोपट आहे आणि तो नाही, असं दुसरं कोणी सिद्ध करा; आणि सिद्ध नाही करू शकला तर तो आहे, असंच त्यांनी मान्य करावं! चालेल का?

असंच काहीसं फ्रॉइडच्या थिअरीबाबत झालं. त्यात इतकी गृहितकं होती की, दिसलेली कोणतीही निरीक्षणं परस्परविरोधी असली तरी त्याची थिअरीत ‘बसत’ असत. पॉपरच्या हे लक्षात आलं म्हणून त्यानं असं मांडलं की, थिअरी मांडणार्‍यानेच ती खोटी कशी ठरेल, अशी भाकितं आधी सांगून ठेवायला हवीत.

मानवी मनासारख्या अमूर्त गोष्टीबाबत काही सिद्धांत मांडण्याच्या फ्रॉइडचा प्रयत्न थोरच होता. त्याच्या काही कल्पनांचा अजूनही मानसशास्त्रात उपयोग होत असला, तरी त्याच्या बर्‍याच कल्पनांना शास्त्रीय बैठक नाही, म्हणून त्याच्या सिद्धांतांना आभासी-विज्ञान मानलं जातं. आइनस्टाइन मात्र थोर वैज्ञानिक ठरला आणि त्याचं संशोधनही मैलाचा दगड ठरलं. (आपण जे GPS – Global Positioning System – वापरतो, त्याची अचूकता या सापेक्षतेच्या सिद्धतांशिवाय मिळणं शक्यच नाही.)

सिद्धांत चुकीचा ठरेल, अशी निरीक्षणं शोधायची हे मनाला फार रुचत नाही. कारण एरव्ही आपल्याला आपलं मत खरं ठरेल, अशी निरीक्षणं शोधायचीच सवय असते. अगदी सोपं उदाहरण घेऊन पाहू. समजा तुम्हाला असं सिद्ध करायचंय की, सर्व राजहंस पांढरे असतात; तर तुम्ही कोणती निरीक्षणं करायचा प्रयत्न केला पाहिजे? तुम्ही पांढर्‍या राजहंसांच्या शोधात फिरत राहिलात आणि तुम्हाला तसेच एक कोटी राजहंस जरी दिसले तर तुमची सिद्धता पूर्ण होईल का? याच्या उलट तुम्ही पांढरे सोडून इतर कोणत्या रंगाचे राजहंस दिसतात का, याचा शोध घेणं जास्त संयुक्तिक ठरेल, नाही का? म्हणजे दर वेळी पांढर्‍या रंगाचा राजहंस दिसला की ‘बघा, माझा सिद्धांत कसा खरा…’ असा दावा तुम्ही करत राहिलात, तरी केवळ एक वेगळ्या रंगाचा राजहंस तुमचा सिद्धांत (दावा) खोटा ठरवू शकतो; म्हणजेच तुम्ही तुमचा सिद्धांत खोटा ठरेल, अशा निरीक्षणांच्या शोधात फिरलं पाहिजे आणि तशी ती दिसली नाहीत तर तो सिद्धांत अधिकाधिक बळकट होईल, नाही का? म्हणजे दृढीकरण करत राहणार्‍या निरीक्षणांपेक्षा विरोधी निरीक्षणं (counter-example) शोधणं जास्त महत्त्वाचं ठरतं. असं विरोधी निरीक्षणांचं भाकीत करणं याला फॉल्सिफिकेशन (falsification) असं म्हणतात. कोणताही सिध्दांत अशी विरोधी निरीक्षणं मिळत नाहीत, तोपर्यंतच खरा आहे, असं मानायची पद्धत विज्ञानात आहे.

तर हे सगळे आत्ता सांगणं एवढं का बरं महत्त्वाचं वाटतंय? यातली तीन महत्त्वाची कारणं सध्या पाहू.

पहिलं म्हणजे आपल्यावर अलिकडे विविध माहिती अनेक मार्गांनी आदळत असते. हे सर्व स्रोत विश्वसनीय आहेत की नाही, हे माहीत करून घ्यायच्या आतच आपण ती माहिती स्वीकारून टाकतो. विशेषतः तशी माहिती त्याआधी आपल्या वाचण्यात आली असली, तर मग ती आपल्याला खरीच वाटायला लागते; म्हणजे आपलं तसे ‘मत’ आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. मग या मताला दुजोरा देणार्‍या बातम्या आपल्याला आवडू लागतात. यालाच ‘कन्फर्मेशन बायस’ असं मानसशात्रात नाव आहे. माणसाची ही सहजप्रवृत्ती आहे आणि तिथंच खरी गोची आहे. यापासून सावध राहायला हवं. आपली अनेक मते कशी बनली, याच्या खोलात शिरायचं असेल तर स्वतःलाच प्रश्न विचारावे लागतील. आपण विरोधी मते किंवा निरीक्षणं लक्षात घेतली आहेत का? नसतील तर ती मुद्दामहून शोधावी लागतील. ‘त्या’ राजहंसाच्या गोष्टीसारखी. तशी निरीक्षणं दिसली तर आपल्या मतात/धारणेत फेरफार करण्याचं धाडस दाखवावं लागेल. पण प्रत्यक्षात असे धाडसी लोक कमीच दिसतात; उलट अनेक जण आपल्या मतांबाबत अवाजवी ठाम राहतात आणि त्याविरोधी पुरावे मिळाले तरी त्याकडे ते चक्क दुर्लक्ष करतात! असं झालं तर मग या धारणा वर्षानुवर्षे आपल्या मनात तशाच कोरल्या जातात.

आपल्या धारणांना/ श्रद्धेला दुजोरा देणारे लिखाण/मत ‘आवडणे’ ही आपली सहजप्रवृत्ती का बरं असते, याबद्दल डॅनियल कान्हेमान या नोबेल विजेत्या तज्ज्ञाने चांगली मांडणी केली आहे. कोणतीही माहिती, मत किंवा प्रसंगाला आपण सामोरं जातो, तेव्हा आपला प्रतिसाद दोन प्रकारचा असू शकतो – एक भावनात्मक मनाने (सिस्टिम-1) दिलेला आणि दुसरा बुद्ध्यात्मक मनाकडून (सिस्टिम-2) मिळू शकणारा. ‘मिळू शकणारा’ अशासाठी म्हटलं, कारण आपण प्रयत्नपूर्वक स्वतःला विचार करायला वेळ दिला तरच हा प्रतिसाद येतो. पण त्याआधी सिस्टिम-1 झटपट काम करते आणि तिनं आपला निर्णय देऊन टाकून तुमचं मत / धारणा पक्की केलेली असते. पण सिस्टिम-1 ला थोपवून इतर संदर्भ, माहिती लक्षात घेऊन फेरविचार करण्याइतका वेळ आपण स्वतःला देत नाही. त्यासाठी ऊर्मीही तयार होत नाही. कारण एकदा तयार झालेलं मत बदलणं, हे आपल्याला ‘स्व’वर हल्ला झाल्यासारखं वाटतं!.

खरं तर तसं वाटण्याचं काही कारण नाही. आपलं मत तथ्याच्या जवळ जाणारं असलं पाहिजे, असं वाटत असेल तर आपल्या धारणांना प्रश्नचिन्ह लावायला हवीत; म्हणजेच ‘सेल्फ डाऊट’ची क्षमता अंगी जोपासायला हवी. ‘सेल्फ डाऊट’ म्हणजे स्वतःवर शंका घेणं नसून उलट स्वतःच्या क्षमता वाढवणे आहे. आपली धारणा चुकीची असू शकते, असा छोटा झरोका मनात उघडा ठेवणं म्हणजेच ‘सेल्फ डाऊट.’ पण ज्या धारणांना केंद्रस्थानी ठेवून आपण अनेक कृती केलेल्या असतात, त्या सगळ्या कवडीमोल होतील, याची भीती वाटते. आपण जपलेल्या अस्मितेवर तो मोठा आघात ठरू शकतो, म्हणूनच ‘अस्मिते’ला मध्ये न आणता आणि ‘स्व’वर आघात न होऊ देता धारणा बदलण्याची लवचिकता जोपासणं आवश्यक असतं. त्याला हाताळायला जमलं पाहिजे, म्हणून ‘सेल्फ डाऊट’ हाताळायला जमला तर आत्मविश्वास वाढतो; आणि खरं तर ‘सेल्फ डाऊट’ हे मजबूत आत्मविश्वासाचं लक्षणच ठरतं.

दुसरं कारण असं की, अलिकडे ‘वैज्ञानिक’ या नावाखाली कोणीही काहीही खपवत असतं आणि ते आपण खरं मानून चालतो. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत विज्ञानाने कमावलेली विश्वासार्हता. त्यामुळं विज्ञानाबद्दल आपल्या मनात एक सकारात्मक ‘श्रध्दा/भावना’ असतं. नेमका याचा गैरफायदा अनेक व्यक्ती, संस्था चुकीची माहिती पसरवण्यासाठी करतात. मग scientific असं लेबल लावून आलेली माहिती लोक शहानिशा न करता स्वीकारून मोकळे होतात. आपल्या समाजात अशा किती प्रकारच्या ‘अवैज्ञानिक’ श्रध्दा पसरल्या आहेत, याला काही गणतीच नाही. या कोरोना काळात तर आपल्याला याचे अगणित पुरावे मिळाले. अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर कोरोनाच्या लसीविषयी अनेक खोट्या अफवा ‘वैज्ञानिक’ म्हणून खपवणं चालू झालंय – स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात लस घेऊ नये, त्या काळात त्यांच्या शरीरातून निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते वगैरे खूपच अवैज्ञानिक समज आहेत.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विचार करण्याची आपली एक खास अवैज्ञानिक पद्धती अगदी लहानपणापासूनच विकसित झालीय आणि अजूनही होताना दिसतं. आजही शाळांमध्ये आणि विज्ञान/अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये प्रयोगांतून सिद्धता मांडताना निष्कर्ष काय पाहिजे, त्यानुसार निरीक्षणं/डेटा जुळवून आणली जातात; म्हणजे निरीक्षणातून जो काही निष्कर्ष येईल, तो स्वीकारण्याऐवजी निष्कर्ष आधीच ठरवायचा आणि डेटा चक्क चतुराईने बदलायचा! आपल्याकडे पीएच.डी. करणार्‍या काही ‘संशोधकां’नी असा खोटा डेटा जुळवून त्यांना हवे ते ‘चमकदार’ निष्कर्ष काढल्याची उदाहरणं कमी नाहीत. आता हीच मानसिकता सामाजिक संदर्भातही दिसून येतं. समाजाच्या कोणत्या धारणा ‘घडवायच्या’ आहेत, त्यानुसार घटना घडवून आणायच्या किंवा बदलायच्या किंवा संदर्भाची अफरातफर (manipulate) करून पसरवायच्या. अशाच ‘फेक न्यूज’ पसरवल्या जातात. असं विपर्यास झालेलं सत्य आपण खरं मानतो, म्हणून अलिकडे वैयक्तिक-सामाजिक असुरक्षिततेची पातळी वर गेलेली आपण सर्वच अनुभवतो आहोत.

याचे दूरगामी परिणाम अतिशय घातक आहेत, याची जाणीव ठेवून गाफील न राहता विज्ञानाने दिलेली ही मर्मदृष्टी आपण तेवती ठेवली पाहिजे. आपल्या भारतीय विज्ञान इतिहासात पाणिनी, आर्यभट्ट, कणादासारखे अनेक वैज्ञानिक अशी दृष्टी ठेवूनच काम करत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात, अशी मर्मदृष्टी बाळगण्याची जबाबदारी फक्त वैज्ञानिकांचीच आहे, असं मानणं ही पळवाट ठरेल. ‘वैज्ञानिक दृष्टी’चा जप करणारे अनेक जण वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक ‘अवैज्ञानिक’ श्रद्धा बाळगतात. त्यामुळे आपण प्रत्येकानं स्वतःलाही काटेकोरपणे तपासणं आवश्यक आहे. सबंध समाजच या पद्धतीने विचार करणारा व्हावा, यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनीच आपल्या रोजच्या आयुष्यात याचा अवलंब केला पाहिजे.

वैज्ञानिक संशोधकांनी निरीक्षणाच्या आणि निष्कर्ष काढण्याच्या गाभ्याची तत्त्वं काटेकोरपणे पाळून निसर्गाचे नियम शोधले, नवीन शोध लावले. हे नियम परत तपासून पाहून त्यात सुधारणा करणं, बदलणं ही प्रक्रिया आजही अव्याहतपणे चालू आहे. हे वैज्ञानिकसुध्दा ‘आम्हाला आता पूर्ण ज्ञान झाले,’ अशा वल्गना करत नाहीत. ज्ञान असं प्रवाही असणं हीच ज्ञानाची खरी ओळख आहे. तसेच आपल्या धारणा प्रवाही ठेवणं, ही विज्ञान युगातील माणसाची खरी ओळख म्हणता येईल.

(लेखिका विज्ञान अभ्यासक, वैज्ञानिक व विवेकवादी विचारपद्धती अभ्यासक, प्रसारक आहेत.)

लेखिका संपर्क : 9422552985

anjalichip@gmail.com


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]