प्रा. अशोक गवांदे -

संगमनेर (जि. नगर) तालुक्यातील चिखली येथे एका घरात भोंदूगिरी करीत असताना मल्लीअप्पा ठकाजी कोळपे या भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केल्याची घटना मंगळवार, दि. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यानंतर शहर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोघा साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरिभाऊ ज्ञानोबा उगले हे अकोले तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणचे राहणार असून ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्यही आहेत. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी या ठिकाणी असलेला मल्लीअप्पा ठकाजी कोळपे हा बाबा भोंदूगिरी करीत असल्याची माहिती त्यांना समजली होती. त्यामुळे त्यांनी या भोंदूबाबाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचे ठरविले. त्यानुसार उगले यांनी मुलाचे लग्न होत नाही. घरात अडीअडचणी आहेत, असे खोटे कारण सांगून या भोंदूबाबाकडे संपर्क साधला आणि त्या बाबाने सांगितले की, तुमचे काम होण्यासाठी काही विधी करावा लागेल; पण त्या विधीसाठी सात हजार रुपये व गाडीभाडे, असा सर्व खर्च द्यावा लागेल. याबाबतची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांना दिली.
त्यानंतर या कोळपे भोंदूबाबाला कोपरगावहून चिखली या ठिकाणी असलेल्या उगले यांच्या बहिणीच्या घरी बोलविण्यात आले. मंगळवारी दुपारी हा कोळपेबाबा त्याच्या दोन साथीदारांसोबत चिखली येथे आला. उगले यांच्या बहिणीच्या घरात विधी करण्यासाठी पिशवीतील सर्व साहित्य जमिनीवर मांडले. त्यानंतर विधी करण्यास सुरुवात केली. पूजा चालू असतानाच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, सागर धुमाळ, दत्तात्रय गोरे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव हे वेशांतर करून त्या ठिकाणी आले. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समतीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे, अशोक गवांदे, काशिनाथ गुंजाळ, प्रशांत पानसरे या सर्वांनी त्या भोंदूबाबासह त्याच्या दोघा साथीदारांना पूजा करताना रंगेहाथ पकडले.
भोंदूबाबाला पकडल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनीही त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर भोंदूबाबासह त्याच्या इतर दोघा साथीदारांनाही शहर पोलिसांनी गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी या भोंदूबाबाची कसून चौकशी केली. त्यानंतर हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.