डॉ. नारायण भोसले -

‘महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती : धोरण, कार्य आणि वाटचाल’ या अश्विनी आडे यांच्या संशोधनपर पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना विशेष आनंद होत आहे. २०२० ते २०२३ या काळात प्रस्तुत विषयावर या विद्यार्थिनीने माझ्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठात, इतिहास विषयात एम.फिल.चे संशोधन केले. संशोधनाचे सर्व मापदंड वापरून केलेले हे संशोधन पुस्तकरूपाने येत असल्याने ते या विषयावरचा महत्त्वाचे दस्तावेज ठरणार आहे. पाच-सात वर्षे खपून केलेली ही विद्यापीठीय पातळीवरची बहुतेक संशोधने प्रकाशात येताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रस्तुतचे संशोधन प्रकाशित होत असल्यानेही विशेष आनंद होत आहे. यात अश्विनी आडे यांनी महाराष्ट्रातील श्रद्धा-अंधश्रद्धेचा वादविवाद, महाराष्ट्रातील श्रद्धा-अंधश्रद्धा, जात आणि स्त्रिया, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) व तिचे कार्य, तसेच अंनिसने केलेल्या धर्मचिकित्सेत जात-वर्ग-लिंगभावाच्या एकत्रित परिणामाचा ऐतिहासिक शोध घेतला आहे. इतिहास या ज्ञानशाखेत अशा प्रकारचे संशोधन अपवादानेच होताना दिसते, म्हणून अशा धाडसी संशोधनाचे विशेष महत्त्व असते. विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी अशी संशोधने होणे आवश्यक असतात.
१९८९ मध्ये स्थापन झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा इतिहास मोठा रंजक आहे. विज्ञान-निर्भयता-नीती या त्रिसूत्रीनुसार सुरुवातीला बारा शाखा आणि पन्नास कार्यकर्ते यांच्यासह सुरू झालेले हे संघटन आज ३० वर्षांनंतर ३५० पेक्षा जास्त शाखा, ५००० सक्रिय कार्यकर्ते व काही लाख हितचिंतक एवढ्या माणुसकीसह उभे आहे. अंनिसचा महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांत संपर्क असून तेथील समविचारी संघटनांशी सहकार्य करीत आपले काम ते पुढे नेत आहेत. शोषण करणार्या हानिकारक अंधश्रद्धा आणि अनुष्ठानांविरुद्ध आंदोलन करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन (scientific thinking), संशयवाद (scepticism), आणि चिकित्सक विचार (critical thinking) चा प्रसार करणे, सर्वांना धर्म, परंपरा आणि रीतीरिवाजांचे रचनात्मक आणि critical विश्लेषण करण्यास प्रोत्साहित करणे, प्रगतीशील सामाजिक सुधार संघटनांना सहयोग आणि कार्य करणे ही अंनिसची प्रमुख उद्दिष्टे राहिलेली आहेत. अंधश्रद्धा वा वैज्ञानिक धारणा एकमेकांविरोधी राहिलेल्यांचा इतिहास सततच्या टकरावाचा राहिला आहे. अंधश्रद्धा म्हणजे विज्ञानाच्या पलीकडील अलौकिक, पारलौकिक आणि चमत्कारी शक्तीच्या साहाय्याने मानवी जीवनात अपेक्षित बदल घडवून आणला जाऊ शकतो, यावर आपण दृढ विश्वास व्यक्त करणे होय. आपल्या आसमंतात घडणार्या घडामोडी ह्या कार्य/कृती आणि कारण/परिणाम या कार्यकारण भावामुळे घडतात. हा शास्त्रीय विचार अंधश्रद्धा रोखून धरतो. घराबाहेर, वाहनांच्या खाली किंवा रस्त्यांवर पडलेल्या लिंबू-मिरचीच्या, रेल्वे बसमध्ये वा सार्वजनिक ठिकाणी चिकटवलेल्या तांत्रिक बाबा-बुवांच्या जाहिराती, घराघरात चालणारी होम-हवन, जप, अनुष्ठाने, उपासतापास, त्यानंतरच्या पूजा, पूजा करणारे विशिष्ट जातीतले लोक, पूजेतला गैरव्यवहार, नाडवणूक, छळवणूक, जादूटोण्यावर विश्वास ठेवणारे आणि कोणतीही अडचण आली की वाईट नजर असल्याचा दावा करणारे भोंदू लोक आपल्या आसपास असतात. आजपर्यंत विज्ञानयुगात आपण या प्रकारच्या अंधश्रद्धेपासून स्वतःला आणि समाजाला पूर्णतः मुक्त करू शकलो नाही. एकविसाव्या शतकातील आधुनिकतेत चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर वा मंगळ ग्रहावर यान पाठवल्यानंतर सुद्धा आपण अशा कमकुवत मानसिकतेतून बाहेर पडू शकलो नाही. शालेय अभ्यासक्रम, आपले घर, समाज, प्रसारमाध्यमे यातून प्रकाशित होणारे कुविचारही काही अंशी अंधश्रद्धा पसरवणारी माध्यमे होत. याचा विवेकाने परिहार करण्याचे कार्य अंनिसने केले.
अंधश्रद्धाविरोधी भूमिका घेणार्या शास्त्रज्ञाला, समाजसुधारकाला आणि विचारवंताला खूपदा बळी सुद्धा पडावे लागले आहे. महात्मा गांधी यांनी समुद्र लांघला म्हणून त्यांच्या समुदायाने त्यांना बहिष्कृतीसारख्या शिक्षा फर्मावल्या होत्या. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांसोबत बिस्कीट खाल्ले आणि चहा पिला म्हणून त्यांनाही पंचगव्य घेण्याची शिक्षा झाली होती. भगतसिंग हे शीख धर्माचे असूनही त्यांनी दाढी, कंगन, पगडी, कृपण आदी त्यागल्याने त्यांना बहिष्कृतीसारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या बाबतही असेच घडले होते. १९ व्या शतकात महाराष्ट्रात मुलीला शिकवले, विधवेचा विवाह केला, सतीप्रथा बंद केली, इंग्रजी शिक्षण घेतले, विधवेचे वपन केले नाही म्हणून अनेकांना बहिष्कृती सारख्या शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस व गॅलिलिओ यांनाही, ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ असे सप्रमाण सिद्ध केल्यानंतरही हिंसक शिक्षेला सामोरे जावे लागले होते. शेवटी प्रयोगाने जे सिद्ध होते ते विज्ञान असते, असे असूनही अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक धर्मग्रंथांमध्ये जे सांगितले आहे तेच सत्य आहे, ते बदलू शकत नाही, बदलता कामा नये, कोणी प्रयत्न केला तर तो धर्मद्रोह ठरवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करतात. गौरी लंकेश, कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या झालेल्या हत्या ह्या याच प्रकारच्या आहेत. त्यामुळे प्रबोधन चळवळीचा इतिहास वा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा इतिहास अभ्यासणे आवश्यक असले, तरी त्यातल्या हिंसात्मक घटनांना बगल देता येणार नाही.
मध्ययुगीन महाराष्ट्रातील पहिले महत्त्वाचे प्रबोधक म्हणून संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याकडेही आपल्याला बघावे लागेल. यातील अनेक संतांना देहदंडासारख्या शिक्षा झाल्या होत्या, असे अभ्यासक सांगतात. बाराव्या-तेराव्या शतकात मराठी संतांनी केलेली धर्मचिकित्सा व अंधश्रद्धाविरोधी केलेली जागृती हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा केलेला प्रयत्न आजच्या युगात महत्त्वाचा आहे. धर्मांधांनी स्वर्ग, नरक, जन्म-मरण, जात, स्त्रीजन्म, मासिक धर्म, गरिबी, दु:ख यावर अंधश्रद्धेची हजारो पुटे चढवून ठेवली आहेत. यावर संतांनी कठोर प्रहार केले आहेत. ज्ञानेश्वर माउलींनी (तेरावे शतक), ‘स्वर्गुनरकु या वाटा। चोरांचिया॥ असे स्पष्ट शब्दात म्हटले आहे. सोयराबाईचा (चौदावे शतक) एक अभंग स्त्रियांच्या मासिक पाळी धर्माविषयी सुद्धा बोलतो. आजही हा अभंग खूप महत्त्वाचा आहे. धर्ममार्तंडांविरुद्धचा बंडाचा खणखणीत आवाज उठविणारे चोखोबा, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत कबीर, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई यांच्या अभंगातील कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.
राजर्षी शाहू महाराज यांनी श्रद्धा आणि धर्म यांची सांगड घालत मानवतावादी व परम सहिष्णुतेचा स्वीकार केला होता. मूर्तिपूजा, भिक्षुकशाही, दलाली यांना विरोध करणारा, सर्व माणसांना समान लेखणारा व जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारा धर्म त्यांना हवा होता. म्हणून त्यांनी धर्माला रूढी-परंपरा आणि कर्मकांड यापासून मुक्त करण्याचा, शुद्ध मानवतावादी आशय शोधण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सातत्याने चालूच ठेवला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही धर्मचिकित्सा करून धर्म या शब्दाचा क्रांतिकारी अर्थ मांडला. ‘असा कसा तुमचा देव, घेतो बकर्याचा जीव’ असा परखड प्रश्न संत गाडगेबाबांनी उपस्थित केला होता. ‘केडगावचे नारायण महाराज पळाले!’ असा सनसनाटी अग्रलेख लिहून आचार्य अत्र्यांनी नारायण महाराजांच्या कृष्णकृत्यांची चिरफाड केली होती. भारतीय राज्यघटनेच्या ‘भाग चारमधील कलम ५१ क’ मध्ये भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून, जी काही कर्तव्ये सांगितली आहेत, त्यामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, हे भारतीय नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य नमूद केले आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्राला अंधश्रद्धा निर्मूलनाची आणि वैज्ञानिक विचाराची दीर्घ परंपरा राहिलेली आहे. मध्य काळातील संतांचे विचार विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन विषयकच असल्याचे दिसते. त्यांच्या विचार आणि कार्यातून याची प्रचिती येत जाते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सुधारकांनीही ही वहिवाट पुढे चालूच ठेवली. भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्त्वांचा संकोच करणार्या कृती अंधश्रद्धा वाहकांकडून घडत होत्या. अंधश्रद्धा वाहकांमध्ये प्रारब्ध, दैववाद, ईश्वरी इच्छा आदी गोष्टींचा मोठा प्रभाव जाणवतो. पारंपरिक जातिव्यवस्था आणि पितृसत्ताक समाजव्यवस्थेनेही अंधश्रद्धेला खतपाणीच घातल्याचे दिसते. बुवाबाजी, भूत, करणी, भानामती, ज्योतिष, चमत्कार, मूठ मारणे, अंगात देवी येणे, काळी जादू, तंत्र-मंत्र, भानामती, जादूटोणा, नरबळी, भूत-प्रेत, पिशाच या बाबींनाही अंधश्रद्धेने प्रभाव दिला. या सर्वांचा विवेकी विचार करण्याचे, वैज्ञानिक वहिवाट निर्माण करण्याचे महत्तम कार्य अंनिसने केल्याने आधुनिक महाराष्ट्राच्या ज्ञानव्यवहारांमध्ये ही संस्था आणि विचारसरणी पुढेही महत्त्वाची ठरणार आहे. त्या दृष्टीने अश्विनी आडे यांनी केलेले हे संशोधन आपणास उपयोगी ठरणार आहे.
मनुष्याची उत्तरोत्तर होत चाललेली प्रगती अंधश्रद्धेने कुंठित होऊन त्यात बुरसटलेपणा येतो. म्हणूनच अंनिसच्या महत्प्रयत्नाने २०१३ मध्ये कायदा केला गेला. याचे संक्षिप्त नाव ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३’ असे आहे. त्याने महाराष्ट्र आणि देशातील या विषयावर चर्चा झडत गेल्या. अंधश्रद्धेचे वाहक उघडे पडले. भोंदू बुवा-बाबांसारख्या अनेकांची दुकाने बंद झाली. अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागली. हे अंधश्रद्धेच्या विरोधी चळवळीचे यश आहे.
शिक्षकांचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असतो. दंडे-गंडे-माळा-टिळा-नाम-टोपी-पगडी-जानवे-शेंडी-ताईत विविध प्रकारची धार्मिक आभूषणे घालून शिक्षकच वर्गामध्ये प्रवेशित असतील तर विद्यार्थी या प्रकारच्या कृतीला तसाच प्रतिसाद देतील आणि अंधश्रद्धेच्या ज्वाला या भावी पिढीला घेरून टाकतील! समाजातील पितृसत्ता स्त्रियांना विविध प्रकारच्या ज्ञान व्यवहारापासून अंकित ठेवत असते. स्त्रियांची आर्थिकता दुबळी ठेवत असते. पुरुषसत्तेचा पेच करकचून आवळल्यानेही स्त्रियांचे पंख कापले जातात. अनेक संकटांतून सोडवणूक करून घेताना स्त्रियांच्या पुढचे विवेकाचे मार्ग अवरुद्ध केले असल्याने त्या संकटातून सोडवणूक करून घेण्यासाठी अंधश्रद्धेच्या रस्त्याला लागल्याची शेकडो नव्हे, तर हजारो उदाहरणे आपल्याला दिसतील.
विविध धर्मांचे प्रसारक आपलाच धर्म खरा असे सांगताना अनेक अंधश्रद्धेच्या कृतीचा सहारा घेतात. धर्मप्रसार करताना ते अंधश्रद्धाही पसरवत असतात. ‘इतक्या वेळेस जप करा, इतक्या वेळा नामस्मरण करा, या दिशेला पहा, त्या दिशेला पाहू नका, हा धर्म खरा, तो धर्म खोटा’, अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या धर्माचे प्रसारक लढवत असतात. अशा धर्मप्रसाराच्या मार्फतही समाजामध्ये अंधश्रद्धा वाढत जात असते. अशा प्रकारची अंधश्रद्धा समाजात वाढू नये, समाज निकोप व्हावा, गरीब-श्रीमंतातील दरी कमी व्हावी, माणसाने अधिकाधिक जाणत रहावे, सतत अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये स्वतःला गुंतून ठेवावे असा विवेकी विचार सांगणारे महाराष्ट्रात, भारतभर आणि जगात अनेक लोक आहेत. पण या विवेकी विचाराला अडवणारे, यांची हिंसा करणारे, यांचे खून करणारेही लोक लिंगभाव एकारलेले, धर्मांध, जात्यंध लोक-समुदाय डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या विवेकी विचारांच्या व्यक्तींचे खून करताना दिसत आहेत. जितका विवेकी विचार वाढेल तितकी समाजामध्ये संवाद आणि शांतता नांदेल. अंधश्रद्धेला विवेकी विचारानेच संपवता येऊ शकते. कोणत्याही हिंसेने अंधश्रद्धा संपणार नाही. वैज्ञानिक कायदे करून, विवेकी विचाराने कायद्याचे पालन करीत राहण्याने अंधश्रद्धा संपेल.
सुशिक्षित बेकारांची वाढती संख्या, देवळांची वाढती संख्या आणि भक्तांची वाढती संख्या यांच्यात एक प्रकारचा ताळमेळ आहे. दवाखान्यांची घसरती संख्या, खाजगीकरणाचा वाढता आलेख, लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची कमतरता या सर्व बाबी अंधश्रद्धा पसरण्यास कारणीभूत आहेत. एखाद्या गरीब कुटुंबातील बाईचं लेकरू आजारी पडल्यास ती महागड्या दवाखान्यात जाईल की फुकटमध्ये छूमंतर करणार्या बुवा-बाबाकडे जाईल? याचे विवेकी उत्तर आपणास माहिती आहे. समाजातील लोकांचे वाढते दारिद्य्र, दैन्य, दुःख, निरक्षरता, बेरोजगारी, वाढती महागाई, भांडवली बाजार हे अंधश्रद्धा पसरण्याचे महत्त्वाचे कारण आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी आडे यांच्या ‘महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती : धोरण कार्य आणि वाटचाल’ या पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण असे राहणार आहे.
गेल्या पंचवीस वर्षांत अंनिसने अनेक जाती-धर्मातील लुच्चा, लफंग्या, बुवा, बाबा यांचा भांडाफोड केला आहे. त्यासाठी प्रसंगी कार्यकर्त्यांना जिवावर उदारही व्हावे लागले आहे. त्यांना धर्ममार्तंडांचा आणि त्यांच्या भक्त-चेल्यांचा रोष अंगाखांद्यावर वागवावा लागलेला आहे. अंधश्रद्धा वाहकांना अनेकदा आव्हाने देऊन त्यांचे प्रबोधनही करावे लागले आहे. माफक प्रमाणात का होईना, अंनिसच्या पारड्यात प्रबोधनाचे यश जमा झाले आहे. छू मंतर, जादू, हातचलाखी करणार्या कोणालाही अंनिसने ठेवलेले २५ लाखांचे बक्षीस अजून तरी जिंकता आलेले नाही. जेव्हा केव्हा भारतातील प्रबोधन परंपरेचा आणि वैज्ञानिक वातावरण निर्मितीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अंनिसचे हे कार्य सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल हे नकी!
१९९० च्या आणि २००० च्या दशकात वशीकरण, जारण मारण, प्रेमाच्या समस्या सोडवणारे तथाकथित बाबा, बंगाली लोक धुमाकूळ घालत होते. अंनिसने खूप प्रयत्न करून पोलीस व लोकांच्या मदतीने बर्याच प्रमाणात या प्रकारचा बीमोड केला आहे. आजपर्यंत अंनिसमार्फत जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत पाचशेहून अधिक विविध जाती-धर्मांच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत, अनेक जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत. तसेच अंनिसचे उपक्रम शासनाच्या धोरणात व शिक्षण व्यवस्थेतही प्रतिबिंबित झाले आहेत, ही खूप मोठी उपलब्धी आहे. अंनिसच्या उपक्रमांमध्ये शाळेतील मुलांमध्ये वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देणे, धर्माच्या नावाखाली भोळ्या-भाबड्या लोकांना लुबाडणार्या धर्ममार्तंडांच्या तोंडावरचे मुखवटे उतरवणे, विविध सणांच्या दिवशी लोकजागरणाचे कार्यक्रम करणे, उदा. नागपंचमीच्या दिवशी नागांवरती होणारे अत्याचार थांबवणे, विविध जत्रेत प्राण्यांचे, पशूंचे दिले जाणारे बळी थांबविणे आणि त्यांना मुक्त करण्याचे काम अंनिसचे कार्यकर्ते करतात, लग्नांमधील अवास्तव खर्च टाळण्याकरिता प्रबोधन करणे व कमी खर्चात सामूहिक लग्न लावणे अशा गोष्टींचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांची नोंद अश्विनी आडे यांनी आपल्या ‘महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती : धोरण, कार्य आणि वाटचाल’ या पुस्तकात घेतलेली आहे.
काही लोकांचे व्यवसायच अंधश्रद्धेच्या संदर्भातले असतात. समाजात कायम आपलेच वर्चस्व राखले जावे म्हणून ते देव-धर्माच्या नावावर निरर्थक कर्मकांडात सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग सतत करत असतात. जोपर्यंत जगात असे अंधश्रद्धेचे उद्योग सुरू राहतील तोपर्यंत हा अंधार दूर करायचे कार्य आपणास करणे आवश्यकच आहे. हा फक्त भारताचा किंवा भारतातील कुठल्या विशिष्ट जाती-धर्माच्या विरोधातला लढा नाही तर, माणूसपणाचा सत्यासाठीचा वैश्विक आग्रह आहे, जो आपण सर्वांनी धरावयाचा आहे.
– डॉ. नारायण भोसले
(इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई)
(पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संपादित अंश)
पुस्तकासाठी संपर्क : अश्विनी आडे मो. ९८२१२ २२५९०