एल. व्ही. भास्कर -
“धनरेषांच्या चर्यांनी तळहात रे फाटला,
देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला,
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या,
बापा नको मारू थापा,
अशा उगा खर्या खोट्या”
खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ही कविता. सध्या नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याच्यासारख्या ज्योतिषाला हात दाखवून आपलंच अवलक्षण करून घेण्याआधी लोकांनी आपल्या संत परंपरेने अध्यात्म म्हणजे काय आणि भोंदूगिरी, अंधश्रद्धा म्हणजे काय हे अनेक ठिकाणी लिहून ठेवले आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात पुसटशी रेषा आहे. एखाद्याची डोळस श्रद्धा, दुसर्याची ती अंध वगैरे असे काही नसते. निर्जल उपवास करणे, काही खाऊन उपवास करणे, स्वतः घरात किंवा देवळात पूजा करणे, श्रीखंड, बासुंदी, पेढे तसेच कोंबडे, बकरे, बोकड वगैरेचे नैवेद्य दाखवणे ही जर श्रद्धा मानली तर, हेच प्रकार किंवा नैवेद्य दुसर्याच्या दारात, सार्वजनिक ठिकाणी किंवा तिकाटण्यावर (तीन रस्ते मिळतात ते ठिकाण) केले तर ती श्रद्धा मात्र अंधश्रद्धा ठरते. बरं, अंधश्रद्धा जात-पात धर्म मानत नाही. इतकेच नव्हे, तर आर्थिक कुवतही पहात नाही. उलट माणूस जितका धनवान तितका तो श्रद्धा- अंधश्रद्धांच्या फेर्यात अडकलेला दिसतो. यात राजकारणी मंडळी यांचे पान तर अग्रमानाचे. ग्रामपंचायत अगर सोसायटीच्या निवडणुकीपासून ते थेट आमदारकी, खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत कुठेही कशाही अंधश्रद्धेच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात. या वेळच्या जि. प., पं. स.च्या निवडणुकीच्या तोंडावर विटा पंचायत समितीच्या इमारतीसमोर कुणीतरी कोंबडे मारून, तिथं हळद, कुंकू, काळे तीळ वगैरे टाकलं होतं. का? तर पंचायत समितीत आपल्या पार्टीची सत्ता यावी म्हणून. आता ऐन निवडणुकीत उगाच वाद वाढेल म्हणून तिथल्या अधिकार्यांनी परस्पर विल्हेवाट लावली. तसाच काहीसा प्रकार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर मतदान झाल्यानंतर घडला. एका बहाद्दराने थेट काळे उडीद, मीठ, हळद-कुंकू, वगैरे वस्तू त्यांच्या घराच्या सभोवती टाकल्या. आता हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने प्रकरण पार पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. काही आपले सर्व उमेदवार निवडून यावेत म्हणून मतमोजणी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत विशिष्ट देऊळ सोडत नाही, तर दुसरा एकाने भागणार नाही म्हणून गावभर तेल घालत सुटतो. मागे एका कुठल्याशा निवडणुकीत एका बहाद्दराने स्थानिक लोकांकडून जमत नाही, म्हणून खास कोकणातून काही वस्तू आणल्या. पहिल्यांदा म्हणे, त्यांना त्याचा भलताच सकारात्मक अनुभव आला. पण नंतर मात्र त्या वस्तू उलट्या फिरल्या. काय खरे काय खोटे, पण आजही निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी वार, वेळ, नक्षत्र, तिथी या बरोबरच सोबत कोणत्या अक्षराच्या नावाचा माणूस नेला तर हमखास यशाची खात्री होईल इत्यादी गोष्टी बघितल्या जातात. मागे एका उमेदवाराने ऐन अमावास्येच्या दिवशी वाजत गाजत अर्ज भरला होता. त्यावर काहींनी त्याला असे का? विचारले तर तो पुरोगामित्वाच्या गप्पा मारू लागला. पण हे सुद्धा कोण्या बुवाच्याच सांगण्यावरून त्याने केले, हे मागाहून कळले होते. निवडणूक संपेपर्यंत अमुक एक दोरा घाला, अमुक रंगाचे कपडे घाला, घराबाहेर पडताना अमुक एक पाय बाहेर टाका इथपासून स्पर्धक उमेदवार कसा पराभूत होईल इतकेच नव्हे, तर जीवनातूनही उठेल असले अघोरी प्रयोगही सर्रास सांगितले आणि ते आचरणात आणले आहेत. आता अलीकडच्या काळात तर कोकण कमी पडतो म्हणून लोक विदर्भ, मराठवाडा वगैरे भागाकडे विशेष संपर्क साधून आहेत. संपूर्ण खानापूर मतदारसंघ हा आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील यांची ही जन्म आणि कर्मभूमी आहे. आपले राज्य शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर, फुले यांचा वारसा सांगणारे पुरोगामी राज्य आहे आणि तरीही अंधश्रद्धेचे झोटिंग सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांच्या मानेवर बसून उड्या मारत आहे, याला काय म्हणाल?
भर पाटील वस्तीत काही वर्षांपूर्वी मोकळ्या पडलेल्या जागेवर अचानक चार पत्रांचा आडोसा तयार झाला, त्यावर पत्र्याचेच छत चढले आणि सुरू झाला, एक बाजार. श्रद्धेचा, लोकांच्या भावनेचा, असहाय्यतेचा. चक्क महाराजांच्या नावाचा. बाजार मांडणारे परगावचे. गेल्या पाच-दहा वर्षांत म्हणे धार्मिकता वाढली. त्यातल्या त्यात हिंदू धर्माच्या दृष्टीने जमीन फारच भुसभुशीत. एके दिवशी या पत्र्याच्या घरावर फ्लेक्स लागला, ‘श्री कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’. यात लोकांचे भविष्य सांगणे, होमहवन करणे, हे करा ते करू नका, असे उपाय सांगितले जाऊ लागले. गोरगरीबच नव्हे, तर अडले नडले, मोठंमोठे शेठ, राजकीय नेतेही इथे दिसू लागले. या पूजा, ते हवन, इतका जप करा. विशेषतः महिला वर्ग जमू लागला. एकीने दुसरीला, दुसरीने तिसरीला गुण येतोय बरं का, ह्या अक्कीला आला, त्या ताईला आला, त्या वहिनीला तर हमखासच येणार… अमुक एका प्रकारचे कपडे घाला, तमुक नंबरच्या गाड्या घ्या, इतक्या बेरजेचे मोबाईल नंबर घ्या, गाड्यांचे नंबर हेच ठेवा म्हणजे राजकारणात यशच यश. विटा म्हणजे सुवर्णनगरी, पैशाला काय कमी? मग प्रत्येक विधीचा दर ठरला. साधी पूजा पाच हजार, होमहवन एकवीस हजार, तुमच्या नावाचा जप करतो-द्या एक्कावन्न हजार… बुवा तेथे बाया, चमत्कार तेथे राया म्हणजे राजे धनिक मंडळी. महिलांची गर्दी जसजशी वाढू लागली, तशी आश्रमातली चालक मंडळींना वेगळ्याच गोष्टीची चटक लागली. ‘तू मागच्या जन्मी नागीन होतीस, हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे’, असे म्हणत महिलांच्या कानाला लागणे, लगट करणे असले प्रकार राजरोस सुरू झाले. काल परवापर्यंत लुकडी दिसणारी आश्रम चालक मंडळी अचानक बाळसेदार दिसू लागली. त्यांचे कपडे बदलले, बोलण्याची पद्धत बदलली, गंडे-दोरे आणि हातात कडे, सोनसाखळ्या दिसू लागल्या. तरीही लोकांचं दुर्लक्षच. पण अनैतिकतेची वाफ फार काळ दबून राहात नाही. काही पीडित महिला, विशेषतः अल्पवयीन मुलींना हे सारं असहाय्य झालं. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले, दबलेल्या वाफेचा स्फोट झाला आणि महेश मोहन बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत संदीप निकम (रा. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली) आणि सूरज मणिकांत उपाध्ये (विटा) या तीन भोंदूबाबांचे बिंग फुटले. आता या दोन्ही गोष्टीत एक साम्य, पहिल्या गोष्टीतला शेंदरी दगड सध्या आकडी भरल्यासारखा पडून आहे. तर दुसर्यातल्या संबंधित आश्रमाबाहेरचा भला मोठा फ्लेक्स फाडून पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.
‘अंगात शिवाजी महाराज येतात’ असं सांगून नरबळीचा सल्ला
‘आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज संचार करतात, ते महाराज तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील’ असे सांगून एका कुटुंबाची शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील विट्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबातील पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महेश बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत निकम (रा. घोगाव, ता. पलूस, सध्या रा. भवानी माळ, विटा) आणि सूरज उपाध्याय (रा. विटा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा येथील पाटील वस्ती परिसरात गेल्या काही काळापासून नव्यानेच आश्रम सुरू झाला आहे. ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ असे या आश्रमाचे नाव. या आश्रमात येथील भवानी माळ परिसरात राहणारे महेश बाबर, संकेत निकम (मूळचा पलूस तालुक्यातील घोगावचा) हे दोघे आणि इथलाच सूरज उपाध्याय हे असतात.
भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि नरबळीच्या भीतीचा वापर करून एका कुटुंबाची मानसिक, शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपींनी ‘देव अंगात येतो’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज’ अंगात येतात, येथे लोकांचे भविष्य सांगणे, राजकीय नेते मंडळींना अमुक एक प्रकारचे कपडे घाला, तमुक नंबरच्या गाड्या घ्या, अमक्या ठिकाणी अमावस्या, पौर्णिमेला जाऊन पूजा करा, पूजा, हवन, जप करा असे तोटके सांगणे, याबरोबरच अघोरी कृत्येही केली जातात अशा गोष्टी कानावर येत होत्या. संबंधित पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनाही १ मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ आश्रमात आणि त्यांच्या घरी जाऊन या तिघांनी असेच तोटके सांगितले. तसेच नरबळी व गर्भपाताचे सल्ले देत शारीरिक व आर्थिक फसवणूक केली. याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेश बाबर आणि संकेत निकम यांनी आपसात संगनमत करून, संकेत निकम याच्या अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिले बाबा, काळभैरव आणि थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होतो, असा खोटा दावा केला. तसेच ‘महाराज, तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील’, असा विश्वास या तिघांनी फिर्यादी महिला व तिच्या पतीला दिला.
यानंतर त्यांनी या कुटुंबाला घरातील संकटे दूर करण्यासाठी वेगवेगळी पूजा, हवन करण्याचे सांगितले, तसेच नरबळी आणि गर्भपात करण्यासारखे अत्यंत अघोरी आणि कायद्याने प्रतिबंधित असलेले सल्ले दिले. या पूजेच्या आणि हवनाच्या खर्चाच्या नावाखाली सूरज उपाध्याय याच्याकडे रोख स्वरूपात मोठी रक्कम देण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे, तर दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी अघोरी कृत्य करत फिर्यादीच्या पतीला वेताच्या काठीने बेदम मारहाण देखील केली. दीर्घकाळ चाललेल्या या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळानंतर अखेर पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. याप्रकरणी विटा पोलिसांनी गुन्हा रजि. नं. २११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५) आणि ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
