-
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे गुप्तधनाच्या आमिषाने एका घरमालकाचा बळी देण्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. अघोरी विधीच्या भोंदूबाबांनी नावाखाली घरमालकालाच खड्ड्यात ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
गंजगाव येथील रहिवासी दत्तराम विठोबा जाधव यांची गावात एक पडीक जागा आहे. या जागेत मोठ्या प्रमाणावर गुप्तधन असल्याचा दावा बाहेरगावाहून आलेल्या १० ते १२ भोंदू बाबा व अघोरीकर्त्यांनी केला. या धनासाठी अघोरी विधी करावा लागेल असे सांगून त्यांनी जाधव यांचा विश्वास संपादन केला. विधी सुरू असताना या भोंदू टोळीने चक दत्तराम जाधव यांनाच खड्ड्यात ढकलून देऊन त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने, या जीवघेण्या प्रसंगातून जाधव बचावले. या प्रकारात केवळ बाहेरचे भोंदूच नव्हे, तर गावातील काही व्यतींनीही त्यांना साथ दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामध्ये रामराव हिवराळे, संतोष बाजीराव हिवराळे, अशोक रामराव हिवराळे आणि गोविंद जाधव या स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकारानंतर भयभीत झालेल्या दत्तराम जाधव यांनी तातडीने बिलोली पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दाखल केली. संबंधित सर्व आरोपींवर जादूटोणाविरोधी कायदा (निर्मूलन कायदा), फसवणूक, जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमान्वये कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बाहेरून आलेल्या त्या भोंदू बाबांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती अतुल भोसले, पोलीस निरीक्षक बिलोली यांनी दिली आहे.
बिलोली तालुका सीमावर्ती असल्यामुळे कर्नाटक व इतर राज्यांतून येणारे भोंदू बाबा गुप्तधनाच्या नावाखाली गरीब शेतमजूर व गोरगरिबांची फसवणूक करत आहेत. गुप्तधन काढून देतो म्हणणारे हे लोक फसवे असून, नागरिकांनी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि प्रशासनाने अशांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कमलाकर जमदडे, (राज्य सदस्य, बुवाबाजी संघर्ष विभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नांदेड) यांनी केली आहे.
