न्यायालयीन लढाई चालूच राहील!

-

वीस ऑगस्ट २०२६, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनाच्या दोन दिवसच आधी मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. दाभोलकर खून प्रकरणातील गुन्हेगार सचिन अंदुरेला जामीन दिला. त्या आधी एप्रिलमध्ये दुसरा मारेकरी शरद कळसकरलाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. शरद कळसकरला दिलेल्या जामीनाच्या विरोधात दाभोलकर कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या प्रकरणातील इतर तीन आरोपी होते, जे पुराव्याअभावी सुटले, त्यांच्या विरोधात देखील कुटुंबियांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले आहे. दाभोलकर प्रकरणात सीबीआयने एकही अपील दाखल केलेले नाही. सचिन अंदुरेच्या जामीनाविरुद्ध देखील दाभोलकर कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहेतच; पण सीबीआयने देखील अंदुरे आणि कळसकर यांच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे आवश्यक आहे. 

२०१३ साली डॉ. दाभोलकरांचा खून झाल्यानंतर २०१७ पर्यंतच्या चार वर्षांत अजून तीन विवेकवाद्यांचे खून झाले. २०१७ ते २०२६ या काळात विवेकवादी व्यक्तीचा खून झालेला नाही. या चार खुनांमधील सर्व संशयित आरोपी आणि प्रत्यक्ष शिक्षा झालेले दोन गुन्हेगार हे सर्वजण आज जामिनावर सुटलेले आहेत. हे सर्व खून संघटितपणे काम करणार्‍या एका गटाने घडवून आणलेले आहेत हे देशातील सर्वोच्च तपासयंत्रणा आणि न्यायालयानेच सांगितलेलं आहे. एकीकडे तपासयंत्रणा या महाराष्ट्रातील व देशातील विवेकवाद्यांच्या जीवाला धोका आहे, असे सांगतात आणि दुसरीकडे विवेकवाद्यांच्या खुनातील सर्व आरोपी जामीन मिळून तुरुंगाबाहेर येतात अशा सामाजिक वास्तवात आपण जगत आहोत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करतो की, डॉ. दाभोलकरांच्या खून प्रकरणातील आरोपसिद्ध आरोपींच्या जामीनावरील सुटकेविरुद्ध सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील केले पाहिजे, हे त्यांनी सीबीआयला सांगायला हवे.

ही न्यायालयीन लढाई चालूच राहील. पण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एकच उत्तर असू शकतं ते म्हणजे चळवळ जोमाने चालू ठेऊन तिचा समाजातील विविध क्षेत्रात विस्तार करणे. त्याबद्दलचे मोजके संदर्भ आम्ही येथे नमूद करत आहे.

सर्वाधिक शोषित अशा आदिवासी समाजाचे शोषण अंधश्रद्धेमुळे अधिक तीव्र होते. त्यामुळे गेल्या २० ऑगस्टच्या सुमारास अंनिसने आदिवासी विभागात काम वाढवायचा निर्णय घेतला. शासनाला आम्ही सांगितले की, आम्हाला फक्त तुमची अनुकूलता हवी. तुमचा एकही पैसा आम्हाला नको. गेल्या वर्षभरात अंनिसचे कार्यकर्ते सुमारे ४५० आदिवासी आश्रम शाळेत पोहोचले. गेल्या महिन्यात मेळघाटातील एका आश्रम शाळेतील १२ मुली भूत दिसले म्हणून शाळा सोडून घरी गेल्या. त्यानंतर ती आश्रमशाळा पूर्ण रिकामी झाली. हे घडल्या घडल्या अंनिसचे रामभाऊ डोंगरे, प्रवीण देशमुख आणि नंदिनी जाधव त्या गावांमध्ये गेले, त्या मुलींची भेट घेतली. त्यानंतर आठ दिवसांत त्या मुली शाळेत परत आल्या. गेले वर्षभर अंनिसने या गावांशी उत्तम नातं निर्माण केलं त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं.

मेळघाटातील आदिवासी भागात बाळाला कुठलाही आजार झाला की, तापलेल्या कोयतीने बाळाच्या पोटावर डंबा किंवा चटका देतात. गावातील भगत/ भुमका हे करतात. त्यात बाळाचा जीवही जाऊ शकतो. या ३५० गावांमध्ये नंदिनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंनिसने यात्रा काढली. लोकजागृती केली. गेल्या महिन्यात एक भुमका स्त्री आजारी बाळाच्या आईच्या मनाविरुद्ध घरात गेली आणि तिने बाळाच्या पोटाला डागण्या दिल्या. त्या आईने त्या भूमकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाळाच्या आईने या प्रथेविरुद्ध पाऊल उचलण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.

गेल्या वर्षभरात अंनिसच्या प्रकाशन विभागाने विविध विषयांवरील जवळजवळ ८५ टायटल्स प्रकाशित केली. राज्यभरातील अंनिस कार्यकर्त्यांनी ही पुस्तके मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचविली.

हे सर्वच कार्यकर्त्यांची उमेद वाढविणारे आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]