20 ऑगस्ट – राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने

-

“अंधश्रद्धा निर्मूलन करण्यापासून वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात होते आणि एक निकोप, समर्थ लोकशाही निर्माण करण्यापर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला घेऊन जातो.”
– शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर

            अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत डॉ. दाभोलकरांनी  वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय कार्यकर्त्यांची शिबिरे, जाहीर व्याख्याने, संघटनेच्या मोहिमा, लेख यातून समाजातील विविध स्तरात पोहोचविला. त्यातून डॉ. दाभोलकर वैज्ञानिक दृष्टिकोनासंदर्भात जी मांडणी करायचे ती आजवर केल्या जाणार्‍या विज्ञानवादी संघटनांच्या मांडणीपेक्षा खूपच वेगळी असायची. त्यांची मांडणी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या अंगाने केलेली मांडणी होती. आजवरच्या प्रचलित मांडणीत निरीक्षण, परीक्षण, काटेकोर तर्क, गणित, प्रत्यक्ष प्रचिती, आणि प्रयोग या प्रक्रियेद्वारे सिध्द झालेल्या विधानाला वैज्ञानिक दृष्टिकोनाने सिद्ध झालेले विधान मानले जाते. पण डॉ. दाभोलकरांनी त्या विधानाला शास्त्रीय विचार पद्धतीने सिद्ध झालेले विधान असे संबोधत शास्त्रीय विचार पद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोन यात “जाणीवपूर्वक” फरक केला आणि शास्त्रीय विचार पद्धतीला स्वायतत्ता, सम्यकता, निर्भयता, नम्रता आणि शोधकता या मूल्यांची जोड दिली की, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो असे प्रतिपादन केले. याचा अर्थ केवळ विज्ञानप्रसार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार नव्हे, केवळ विज्ञानाचा वापर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे रुजणे नव्हे तर स्वायत्तता, सम्यकता, निर्भयता, नम्रता आणि शोधकता ही मूल्ये स्वत:च्या जीवनामध्ये पर्यायाने समाजात रुजवणे यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल अवलंबून असते अशी मांडणी त्यांनी केली.

            या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीकडे आपण बघितले तर आपल्या जीवनाला स्पर्श करणार्‍या प्रत्येक अंगात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व प्रचंड आहे, हे आज आपल्याला दिसते. त्यामुळेच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आणि त्याचा प्रसार, प्रचार करणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे आपल्या राज्यघटनेत सांगितले आहे, आपल्या शिक्षणाच्या गाभा घटकात वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती हा महत्त्वाचा विषय आहे. मूल्य शिक्षणातही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. आज आपण ज्या विज्ञान युगात जगत आहोत त्या युगाचा पाया वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे. आपण जे विज्ञानाचे शिक्षण घेतो त्याचं तत्वज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन हेच आहे. हे एका बाजूला आहे आणि दुसर्‍या बाजूला याच्या बरोबर उलटे चित्र आज दिसत आहे.

मूलतत्ववादी शक्तीवैज्ञानिक सिद्धांतावर हल्ले चढवत आहेत, पुराण कथांना विज्ञान मानले जात आहे, पारंपरिक अन्याय, अघोरी रूढी, परंपरा यांचे गौरवीकरण केले जात आहे. पाठ्यपुस्तकात अवैज्ञानिक गोष्टी घुसविण्यात येत आहेत. दैववादी मानसिकता निर्माण केली जात आहे. त्याच्याच परिणामी समाजात बुवा, बाबा, महाराज, भगवान यांचे प्रस्थ वाढत आहे. छद्म विज्ञानाच्या जंजाळात सुशिक्षित, उच्च शिक्षित फसत आहेत. समाजात जातीय धार्मिक द्वेष, हिंसा पसरविली जात आहे. दुसर्‍या बाजूला आर्थिक विषमतेची दरी प्रचंड वाढत आहे. शिक्षण, आरोग्य सारख्या जीवनावश्यक व्यवस्था बाजाराच्या ताब्यात जात आहेत. समाजावरचा बाजारू मूल्यांचा प्रभाव वाढत आहे. या विरोधातील लोकांचा आवाज या बाजारू आणि धर्मांध शक्ती दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्याला  आजच्या सत्ताधार्‍याकडून बळ आणि प्रतिष्ठा मिळत आहे. यामुळे निकोप लोकशाहीपुढे निश्चितच मोठे आव्हान उभे राहिले आहे.  अशा परिस्थितीत डॉ. दाभोलकरांनी स्वायत्तता, सम्यकता, निर्भयता, नम्रता आणि शोधकता या मूल्याच्या आधारे प्रतिपादन केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाहीसाठी आवश्यक असणार्‍या लोकांच्या मुक्त अभिव्यक्तीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. २० ऑगस्टच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीला अभिवादन करत निकोप व समर्थ लोकशाहीसाठी त्यांना अभिप्रेत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार करण्याचा निर्धार आपण करू या.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]