आशा धनाले -
आमोशाची काळीकुट्ट रात हुती. रातीचं नऊ धा वाजलं असत्याल. धोंडीला रानातनं आज घरी परतायला उशीरच झाल्ता. त्याचं रान आणि घर यात आंतर हुतं फकस्त अर्ध्या कोसाचं. पर मधोमध हुता मुंजा पिंपळाचा पसारा. जिकडं बगावं तकडं गच्च पिंपळच पिंपळ. दिवसा सूर्याचं कवडसं पिंपळाखाली पडतील तर बेहत्तर. मग रातीची काय कथा! कडुसं पडायच्या आतच काय त्यो राबता. त्येच्यानंतर कोन बी त्या पसार्यात शिरायचं धाडस करीत नव्हतं. आज तर काय बोलून चालून आमोशा. डोळ्यांत बोट घातलं तरी दिसायचं न्हाय. अशा अंधारात धोंडी पिंपळाच्या पसार्यात शिरला आन् सुरू झाली की पिंपळाची सळसळ. गच्च अंदारात पाय फुडच्या वाटंवरच पडतायत का, ह्ये बी कळंना.
खाली मान घालून सवयीनं झपाझप चालणार्या धोंडीच्या तोंडात रामराम कदी सुरू झालं ह्ये त्याला बी कळालं न्हाई. त्याचा तसा त्याला आधारच वाटला म्हणा. ‘राम राम राम राम…’ वाट काय संपत नव्हती. अचानक धोंडीचं लक्ष पिंपळाच्या माथ्यावर ग्येलं. गच्च फांद्या अशा काय खाली वाकल्या हुत्या की, धोंडीला वाटलं त्या आता आपल्याला कवटाळणारच. त्यातच माकडांचा किचकिचाट सुरू झाला. वरच्या सावल्या जास्तच हालाय लागल्या. रातकिड्यांच्या किरकिरीनं धोंडीला काय सुचंना. धोंडी रामनाम विसरला. “आईच्यान्, का म्हून आलो हितं?’ धोंडीच्या अंगात आता कापरं भरू लागलं. पुन्यांदा ‘राम राम’ सुरू झालं. आता तर त्येचा पण आधार वाटंना आन् त्याच येळंला धोंडीच्या नदरला आलं का, समोरनं येक पांडरं गटुडं आल्लाद तरंगत येत हुतं. खाली आन् वर कायच न्हाय. फकस्त येक पांढरंधोट गोल गटुडं. धोंडीचं राम राम अंधारात विरलं. पाय थरथराय लागलं. अंगाला कापरं सुटलं. खच्चून वरडावं म्हटलं तर जीभ कवाच टाळ्याला चिकटल्याली. डोस्क्याचं आन् अंगावरचं क्यास ताट उभं राहिलं.
समोरचं गटुडं अजून जवळ आलं. ‘नकी ह्यो पिंपळाचा मुंजाच. त्येचंच पागोटं हाय ह्ये. आता ह्ये उसवून माझ्या नरड्याला आवळणार’, धोंडीच्या मनात ह्ये आलं आन् जवळ आलेल्या त्या गटुड्यानं येक सपाकन् उसळी घेतली आन् त्ये जमिनीवर आदाळलं. ह्ये समदं बगाय धोंडी जाग्यावर हुता. कुटं फेफरं यिऊन त्यो कवाच धरणीवर पडला हुता. आपला बा अजून का आला न्हाई बघाय त्येचा पोरगा शिवा पोरांसंगं हातात पेटता बुधा घिऊन येका तासानं तितं आला. तवा येका ठिकाणी त्येचा पायच आडकाळला. हितं लुगडं कुटनं आलं म्हून त्येनं उजेड धरला तर त्या लुगड्यात आडवी तिडवी पसारल्याली शिंगाका. डोळं पांडरं, जीभ दातात आडाकल्याली आन् आंग निपचित् गार. तिचं आसं काय कशानं झालं? आन् बा बी कुटं दिसंना म्हून जरा फुडं जाऊन शिवानं बगितलं तवा बा बी घावला. पाय फताडं पसरून धरणीशी नातं सांगत पसारल्याल्या धोंडीला सुद नव्हती. दोगांनी धोंडीला उचालला, दोगांनी शिंगाकाला पाटुंगळी घाटली. घिऊन आलं घराकडं. कांदा हुंगावला, हात-पाय श्येकलं तवा कुटं दोगांच्या तोंडातनं ‘हुं, हुं’ निगायला लागलं.
तवा शिवा वैतागून म्हणाला, “निस्तं हुं हुं काय कराय लागलायसा? हितं काय रामदासाची कथा चाललीया व्हय? आता सांगा की इस्कटून आसं काय झाल्तं राती त्ये.”
रामाचं नाव ऐकल्यावर धोंडीला हुशारी आली. उटून बसला. तकडं बायकांनी कोंडाळं करून शिंगाकाला बी हुशारी आणली हुती.
“आगं मसणे, सांग आता तरी काय झाल्तं? पिंपळाच्या पसार्यात त्ये! त्या मुंजाच्या कानात कोणती गोस्ट सांगाय गेल्तीस त्ये बी सांग.” म्हटल्यावर शिंगाका उटून बसली आन् म्हणली, “व्हय, त्या मुंजाला कवा भीत नव्हतो म्या. म्हून आज आमोशा का असंना, पल्याड आमच्या रानात दाल्ल्याला जरा राकनीला मदत म्हून चाल्लो हुतो. पिंपळाचा पसारा जवळ आल्यावर म्होरनं निस्तं येक पांडरं धोतार चालत यायला लागल्यालं दिसलं तवा पाचावर धाराण बसली माज्या. धोतार जवळजवळ येताना लईच हालाय लागलं तवा पिंपळावरचा मुंजाच धोतरातनं यिऊन माझ्या नरड्याला आवळणार म्हून माझा जीवच नरड्याला आला. पर वरडायचं बी सुचलं न्हाई. डोळ्याला अंदारी आली, तवा गटुळ्यावरचा हात कवा सुटला, गटुळं कुटं पडलं आन् म्या कुटं पडलो काय बी कळालं न्हाई. आत्ता कळतंय बग. या पोरास्नी मी घावलो म्हून बरं झालं. न्हायतर म्या आज काय जित्ती नसतो.—पिंपळावरच्या मुंज्याची भन हून पिंपळावर लटाकला असतो.”
“आगं ए मसणे, तुझी तिरडी आडाकली पिंपळाला, आगं, काल तूच माज्या म्होरं राती आल्तीस व्हय गं काळे? आगं, किती मोट्ट्या संकटात घातलं हुतंस मला!”
“आरं मुडद्या, तू हुतास व्हय त्या धोतरात? आरं कोळशा, धोतरावर तू दिसला असतास तर माजी आशी का गत झाली असती? आरं ह्येकण्या, आमोशाला राती भुतावानी फिरत जाऊ नगंस. सांगतो तुला.”
“आन् तू गं ह्येटकाळे, तू बी काळी म्हस तुझ्या गटुळ्याखाली दिसली न्हाईस मला. आता समद्यांसमोर आण घे राती फिरणार न्हाई म्हून.”
धोंडी आन् शिंगाकाच्या कालव्यानं कानात जाळ झाल्याला शिवा आणि पोरं एकदमच वराडली, “आरं, बसा गप. अमोशाच्या रातीच काय, कुटल्याबी राती भुतं येत नसत्यात. तुमच्या रंगामुळं फकस्त पांढरी कापडंच अंदारात दिसली तुम्हास्नी आन् येकामेकाला भूत समजून आकडी आली तुम्हास्नी. थुत् तुमच्या! तुमच्यापरास भुतंच बरी लेकानु…”
-आशा धनाले, मिरज मो. ९८६०४ ५३५९९
