मी त्याच्यासाठी काय करू?

डॉ. प्रसन्न दाभोलकर -

अनिकेत हा आमच्या वर्गातील हळवा आणि कमी बोलणारा मुलगा होता. त्या दिवशी तो जरा अस्वस्थ होता. त्याच्या मनात काहीतरी खदखदत होतं, पण ते नेमकं काय असावं हे आमच्या लक्षात येत नव्हतं.

नेहमीप्रमाणे सर येऊन त्यांच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी वर्गावर एक नजर टाकली. अनिकेतची चुळबुळ सुरू होती. त्याच्याकडे प्रेमाने बघत सर म्हणाले, “अनिकेत, तुला काही विचारायचं आहे असं दिसतंय. काय प्रश्न आहे तुझा?”

अनिकेत उभा राहिला पण तो बोलेनाच. त्याचा चेहरा उतरला होता. सर शांतपणे बसून होते. शेवटी अनिकेत बोलू लागला, “सर, मला काही कळत नाहीये. मला काही विचारायचं. पण हा वर्गात विचारायचा प्रश्न आहे का हे मला समजत नाहीये.”

“कळत नाही तर बोलतो कशाला?” कोठून तरी खवचट वटवट आलीच.

तिकडे जरा रागाने बघत सर अनिकेतला म्हणाले, “अरे, मुक्त प्रश्नांच्या या तासाला कोणताही प्रश्न तुम्ही विचारू शकता. मोकळेपणानं विचार.”

“सर, आमच्या शेजारी माझ्याच वयाचा रक्षित राहतो. नुकतीच त्याची आई गेली. तो खूप दुःखी आहे. मी त्याच्यासाठी काय करू?” आपल्या मनातलं विचारून अनिकेत मोकळा झाला.

त्याच्या बाकाजवळ जाऊन सरांनी विचारले, “अनिकेत, नेमकं काय झालं ते सांगू शकशील का?”

अनिकेत बोलू लागला, “रक्षित माझा मित्र आहे. माझ्या शेजारी राहतो. त्याच्या आईला कॅन्सर झाला होता. दोन वर्षं खूप इलाज चालू होते. शेवटी ती गेली. रक्षित सारखा रडत असतो. मला त्याच्यासाठी काहीतरी करायचंय.”

त्याच्या पाठीवर हलकेच थोपटून सर परत आपल्या खुर्चीवर येऊन बसले आणि सर्वांकडे पहात शांतपणे बोलू लागले, “अनिकेतला आपल्या मित्राला मदत करायची आहे. त्याचं दुःख हलकं करायचं आहे. किती चांगला आहे हा विचार. आपण सारे मिळून अनिकेतला काही सांगू शकू का? मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला घरचं किंवा जवळचं माणूस जाण्याचा अनुभव आहे?”

वर्गात विचित्र शांतता पसरली. धीट मैत्रेयी हळूच उभी राहिली आणि ती म्हणाली, “गेल्या वर्षी माझी आजी मरण पावली. मला खूप वाईट वाटलं. मग माझ्या बाबांनी मला समजावून सांगितलं. गेलेल्या माणसाची आठवण आपण मनात जागी ठेवायची, त्याचे चांगले गुण आठवायचे. हळूहळू माझं दुःख कमी झालं.”

“आमचा टॉमी गेला तेव्हा मी दोन दिवस नीट खाल्लं नव्हतं. सारखा तो डोळ्यांसमोर यायचा. मग घरच्यांनी मला नवीन पिल्लू आणून दिलं. आता मी त्याच्याबरोबर खूप खेळतो.” आपलं मन मोकळं करीत विक्रम म्हणाला.

सर आमच्याकडे प्रेमाने बघत होते. घसा खाकरून त्यांनी बोलायला सुरुवात केली, “जो जन्माला येणार तो जाणार. पण जाणार्‍या माणसाशी आपलं काही नातं असतं, आठवणी असतात, त्याच्यावर आपण अवलंबून असतो. या सर्व गोष्टींमुळं आपल्या जवळचं कोणी गेलं की आपण सैरभैर होतो. मग इतर लोक आपली समजूत काढतात, दुसर्‍या गोष्टीत आपलं मन रमवायचा प्रयत्न करतात आणि काही काळानं आपलं दुःख कमी होत जातं.”

“काळ हे दु:खावरचं औषध आहे.” लेखक अमेय बोलला.

“पण अनिकेतनं त्याच्या मित्रासाठी करायचं काय?” अनिकेतच्या शेजारी बसलेल्या कल्पेशने विचारले.

“अनिकेत आपल्या मित्रासाठी काय करू शकेल? तुम्हाला सुचेल ते तुम्ही सांगा.” देशमुख सरांनी चेंडू आमच्या कोर्टात टाकला.

इतर वेळी फटाफट बोलत सुटणारी आमच्या वर्गातली मुलं आज जरा शांतपणे विचार करून बोलू लागली.

अनेक सूचना पुढे येऊ लागल्या. “अनिरुद्धने रक्षितशी दररोज गप्पा माराव्यात.” “रक्षितबरोबर खेळावे, त्याला फिरायला न्यावे.” “त्याला अभ्यासात मदत करावी.”

यावर सर म्हणाले, “बरोबर. अनिरुद्धने रक्षितच्या संपर्कात राहिले पाहिजे. त्याला त्याचे दैनंदिन व्यवहार परत सुरू करायला मदत केली पाहिजे. तो दुःखातून बाहेर पडण्यासाठी हे आवश्यक आहे. आणखी काही?”

“असं म्हणतात रडलं पाहिजे, रडणं दाबून ठेवलं तर त्रास होतो. पण रक्षित तर सारखा रडत असतो म्हणे.”

सर आम्हाला समजून सांगू लागले, “रक्षितचे रडणं कमी होण्यासाठी आपण त्याचे मन मोकळं व्हायला मदत करू शकतो. त्याला आधार देऊ शकतो. त्याची आई दोन वर्षं आजारी होती. रक्षितच्या मनात अनेक गोष्टी साचून राहिल्या असतील. त्यांना वाट फुटली पाहिजे. त्याचं दुःख कमी करायचा हा एक मार्ग आहे.”

“आमच्या घरी अजून कोणी गेलंच नाही. मला तर मरणाची भीती वाटते.” अबोल सायली हळूच म्हणाली.

“हिचं वेगळंच काहीतरी.” कोणतरी म्हणालेच.

“सायलीचं म्हणणं महत्त्वाचं आहे. मुलांच्या मनात अनेकदा मृत्यूविषयी खूप भीती असते. रक्षितच्या मनात अशी भीती असली. तर अनिकेत त्याला घरच्यांशी मोकळेपणानं बोलायला सुचवू शकतो. जमलं तर त्याला धीरही देऊ शकतो.” सायलीची बाजू घेत सर म्हणाले.

“पण त्याला सावत्र आई आली तर?” परीकथा खूप आवडणारी विशाखा म्हणाली.

सर जरा गंभीर झाले. ते म्हणाले, “रक्षितबरोबर बोलताना आपणहून असा विषय काढायचा नाही. पण रक्षितच्या मनात जर अशी भीती असेल तर त्याबद्दल कोणीतरी त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे. त्याचे वडील लगेचच दुसरं लग्न करतील असं नाही. आणि सावत्र आई वाईटच असते असं नसतं. मलाही सावत्र आई होती. ती माझ्यावर खूप प्रेम करायची.

अनिकेत बोलू लागला, “सर, मला वाटतं, रक्षित मरणाला आणि कॅन्सरला घाबरतो. आपण पण कॅन्सरनं मरू अशी भीती त्याला वाटत असेल का?”

सर म्हणाले, “शक्य आहे. पण अशा गोष्टींची चौकशी हळुवारपणे करायची असते. तू त्याला असं काही विचारलंस तर एखाद्यावेळी ते त्याला आवडणार नाही. त्याच्या मनात काही भीती आहे का याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न कर. अशी भीती आहे असे वाटलं तर आपण त्याच्या बाबांना त्याच्याशी बोलायला सांगू शकतो.”

“अनिकेतनं नेमकं करायचं काय?” मॉनिटर सर्वेशनं विचारले.

अनिकेतला देशमुख सर म्हणाले, “हे बघ अनिकेत, असं करायला तुला जमेल का? तू त्याला दररोज भेटत जा, त्याच्याशी गप्पा मार, त्याच्याबरोबर खेळ, त्याला अभ्यासात मदत कर, शाळेविषयी बोल, त्याच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज घे. मुख्य म्हणजे, त्याला जास्त बोलू दे, तू ऐक. त्याला काही जास्त त्रास असला. काही भीती असली तर काय करायचं याचा विचार नंतर करता येईल. सध्या तुझा आधार त्याला मिळणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.”

अनिकेतच्या चेहर्‍यावरील ताण आता कमी झाला होता. वर्गालाही आपण थोडे मोठे झाले आहोत असं वाटलं.

“हो सर,” अनिकेत म्हणाला. “मी नकी असं करेन. मला वाटतं, रक्षितच्या मनात कॅन्सरबद्दल खूप भीती आहे. त्याबद्दल मी त्याला काय सांगू? मला काहीच ठाऊक नाही.”

पटकन उभे राहून तेजस्विनी म्हणाली, “हो सर. आम्हालाही कॅन्सरबद्दल माहिती मिळाली तर आवडेल.”

अडचणीत असलेल्या मित्राला मदत करण्याची तुमची कळकळ माला अगदी आवडली. मदत करण्याची भावना जशी महत्त्वाची तसंच नेमकी मदत काय करायची याचं ज्ञानही आपल्याला असलं पाहिजे. पुढच्या बुधवारचा आपला प्रश्न ‘कॅन्सर म्हणजे काय?’ तुम्ही सर्वांनी तुम्हाला मिळेल ती माहिती व अनुभव गोळा करायचे. त्यावर आपण अधिक चर्चा करू.” असे बोलून स्वतःशीच विचार करीत सर बाहेर पडले.

डॉ. प्रसन्न दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]