हृदयाला हात घालून मेंदूला चालना देणारा विज्ञानवादी लेखक : डॉ. शंतनू अभ्यंकर

राहुल विद्या माने - 8208160132

डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विशेष लेख..

मराठीमध्ये विज्ञानलेखन प्रामुख्याने विज्ञानकथेच्या अंगाने आले आणि विज्ञानाच्या प्रगतीबरोबर प्रसारमाध्यमांत येणारे समकालीन घडामोडींचे विश्लेषण, विज्ञानाचा इतिहास, वैज्ञानिकांची चरित्रे, वैज्ञानिक प्रगतीचे ठरलेले मापदंड, विविध टप्प्यांवरील महत्त्वाचे वैज्ञानिक शोध, तांत्रिक प्रगती यांवर केले जाणारे लिखाण असे पुढे गेले. यात आताच आपल्यातून गेलेले डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, माधुरी शानभाग, वीणा गवाणकर, संजय ढोले, मोहन आपटे, अरुण साधू, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अच्युत गोडबोले, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. विवेक सावंत अशा अनेक लेखकांचा उल्लेख करता येईल.

या सर्वांत डॉ. शंतनू अभ्यंकर हे विशेष उठून दिसतात. त्यांचा वैद्यकीय व्यवसाय आणि त्यातून आलेले एक जीवशास्त्रीय आरोग्यभान त्यांनी विज्ञानाच्या विविध लोकप्रिय, तसेच किचकट शास्त्रीय विषयांची खुसखुशीत उकल करून देण्यासाठी वापरले. त्यातही स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित गैरसमज, गुंतागुंत आणि लैंगिक विषयांबद्दल आपल्या समाजात असलेली खोल अढी अभ्यंकर यांनी आपल्या लेखणीतून जत्रेत बागडणार्‍या एखाद्या मुलाने खेळण्याच्या बंदुकीने अनेक फुगे सहज फोडावेत तशा खेळकरपणे फोडले आणि त्यांवर तुंबलेला संवाद सुरू केला. लोकांना यावर बोलण्याची, समजून-उमजून शिकण्याची सवय लावली.

एक कुतूहलपूर्ण प्रश्न मला नेहमी पडतो – आपल्याला कल्पनाशक्तीच्या अनंत  विश्वात नेऊन सोडणारे विज्ञानकथाकार, विज्ञान कादंबरीकार श्रेष्ठ की सत्यशोधनाचा वसा घेतलेले, विज्ञानाच्या अंगाने वास्तव विषयांची उकल करणारे लेखक? अर्थातच दोन्ही गटांतील लेखकांचे विशेष महत्त्व आहे; तुलनेचा प्रश्नच नाही. शेवटी विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्यात या दोन्ही प्रकारच्या लेखकांचे विशेष योगदान आहे. यापलीकडे किचकट गुंतागुंतीच्या शास्त्रीय विषयाच्या पोटात जाऊन आणि वाचकाच्या मनात जाऊन, त्यांच्या व्यक्त होणार्‍या भाषेत किंवा प्रचलित लोकप्रिय समज-गैरसमज यांच्या ओघाने विवेकवादी संवाद साधणार्‍या आणि तरीही त्यातील ओघवती शैली अजिबात कंटाळवाणी न होता लिहिणार्‍या लेखकांचा एक तिसरा गट मी माझ्यापुरता करतो. त्यांत ‘डॉ. शंतनू अभ्यंकर’ यांचा क्रमांक फार वरचा लागतो. याचे कारण एकाच वेळी लहान मुलांचा शोधक निरागसपणा (‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’), ज्ञानी-संवादी मैत्रिभाव (‘आरोग्यवती भव’), सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोन (‘पाळी मिळी गुपचिळी’), बदलत्या काळातील तारुण्यभान (‘डॉ. क्युटरस’), मिश्कील वात्रटपणाने रेखाटलेली व्यक्तिचित्रे (‘फादर टेरेसा आणि गोष्टी’), पुनरुत्पादन जीवशास्त्रविषयक अभ्यासूपणा (‘संभोग का सुखाचा’), उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक अवलोकन (‘जादुई वास्तव’), झेपावणारा आशावाद (‘मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे’), वस्तुनिष्ठ माहितीचा वस्तुपाठ (‘आधुनिक वैद्यकीची शोधगाथा’) अशी त्यांची विज्ञानविषयक लिहिलेली किंवा अनुवादित पुस्तकांतील विविध भावरूपे सांगता येतील. यांतील काही पुस्तकांत त्यांनी थेटपणे सांगितलेली किंवा त्यांतून व्यक्त झालेली विज्ञानविषयक मूल्ये किंवा विचार कसे आहेत, त्याबद्दल आपण या लेखाच्या उरलेल्या भागात पाहणार आहोत.

‘स्त्री-आरोग्याच्या चष्म्यातून अभ्यंकर यांची लिखाणदृष्टी विकसित झाली’ असे म्हणता येईल, पण या विषयीच्या ज्ञानाचा अहंगंड त्यांच्या लिखाणात नाही. उलट ‘मला फक्त इंचभर जास्त कळले आहे… आता आपण मिळून ते समजून घेऊ’ अशी नम्र भावना आहे. पण हे करताना त्यांनी समाजाच्या, विशेषत: त्यांना भेटलेल्या व्यावसायिक, सामाजिक जगातील तज्ज्ञ/यशस्वी/वजनदार लोकांच्या ढोंगी स्वभावावर आपल्या नर्मविनोदाने शालजोडीतून मारून कोरडे ओढलेच, शिवाय वाचकाला अंतर्मुख करून त्यावर अधिक वाचन करायला, चिंतन करायला प्रेरित केले.

‘मानवी जीवनातील भौतिक सुखाचा शोध घेण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांत आपण निखळ व निरोगी लैंगिक संबंधाच्या दिशेने गेलो, तर आपण ते मनमोकळेपणाने, प्रामाणिकपणे स्वीकारून त्यायोगे सतत नवनवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत’ अशी भूक त्यांनी मराठी वाचकांत निर्माण केली. पण हे करताना त्यांनी सवंग, लोकप्रिय लिखाणाचे समर्थन किंवा तसे लिखाण केले नाही. उलट त्यांचे संस्कृत व इतर साहित्याबद्दलचे ज्ञान, आपल्या समाजातील मिथके, ऐतिहासिक उदाहरणे, प्रचलित चालीरीती, तसेच वाक्प्रचार, बोली भाषेतील गोडवा, भाषा लिहिण्याच्या व व्यक्त होण्याच्या विविध शैली या सर्वांचा वेध घेत ते वाचकाशी जणू गप्पा मारत असल्याचा जिवंत अनुभव यावा, ही त्यांच्या लिखाणाची ताकद आहे.

डॉ. शंतनू यांच्या लिखाणात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन यांबद्दल आलेला भाव खूप सहजपणे येतो. उदाहरणार्थ, ‘पाळी मिळी गुपचिळी’ या पुस्तकात ते पाळीविषयी समाजात असलेल्या कलंकपूर्ण व नकारात्मक भावनेला सोप्या भाषेतील वैज्ञानिक माहिती व त्याच वेळी शोषक परंपरांना विरोध या दोन्ही  पातळ्यांवर स्पर्श करतात. त्यांच्या ब्लॉगवरील, वर्तमानपत्रांतील किंवा पुस्तकांतील अनेक लेखांमध्ये दिसून येणारी, इतक्या विविध स्तरांवर विषयाला स्पर्श करण्याची ही तळमळ एक चिंतक, कार्यकर्ता, तज्ज्ञ आणि सुजाण नागरिक यांच्या सुंदर मिलाफातून आलेली आहे, असे वाटते. याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते अशा प्रकारचे लिखाण करण्यामागची भूमिका स्पष्ट करतात. ते म्हणतात, ‘उगाच अमका आजार आणि तमके उपचार असं साचेबद्धपणे काहीही लिहायचं नाही. अभ्यासाची पुस्तकं (कधीच) भाषांतरायची नव्हती मला! प्रत्येक आजाराला एक सामाजिक, कौटुंबिक, भावनिक, आर्थिक बाजू असते. तीदेखील महत्त्वाची असते. चुकीचं निदान किंवा चुकीच्या औषधयोजनेइतकाच चुकीचा दृष्टिकोनही हानिकारक. तेव्हा यावर जोर हवा, असं माझं मत. विज्ञान आणि समाज यांच्या सीमारेषेवरील विषय हाताळताना विज्ञानवादी, मानवतावादी, समानतावादी सूर उमटायला हवा, हीच माझी धारणा…’ (पा. क्र. ११) याच आशयाचे विचार त्यांनी ‘स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध : आरोग्यवती भव’ या पुस्तकाच्या सुरुवातीला आलेल्या मनोगतातसुद्धा व्यक्त केले आहेत.  

बरेचशे विज्ञानविषयक लेखक केवळ माहितीचा भडिमार करतात. ते वाचकांच्या आयक्यूचा अंदाज घेऊन लिखाण करतात. विज्ञानकथा लिहिणारे थोड्याफार प्रमाणात वाचकांच्या इक्यूला हात घालतात. डॉ. अभ्यंकर मोठ्या प्रमाणात वाचकांच्या (Acultural Quotient) सीक्यूला खतपाणी घालतात आणि वाचकाच्या संदर्भविश्वाबरोबर कालबाह्य, शोषण करणार्‍या व अज्ञानी गोष्टी टाकून, परिवर्तनवादी ज्ञानप्रकाशाची किरणे पेरणार्‍या जमिनीवरून वाचकाला फिरायला घेऊन जातात. वाचकाबरोबर अशा प्रकारे एकत्र पायवाट चालणे फार महत्त्वाचे आहे. तज्ज्ञ लेखक आपल्या ज्ञानाने किंवा अनुभवाने वाचकाला एवढे दिपवून टाकतात की, विवेकी विज्ञानवादी दिशेने सामान्य माणसाला एक हलकाफुलका प्रयत्न करावासा वाटला, तरी त्याची दमछाक व्हावी. शंतनू नेमकेयाविरोधात जाऊन, विज्ञान-लेखनातील ‘तज्ज्ञ’वादी लेखनशैलीला हसत हसत वळसा घालून पुढे जातात आणि मोकळे होऊन लिहितात.

ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचे रसिक भोक्ते होते, पण तज्ज्ञ व्यक्तीचा शुष्कपणा त्यांच्यात नव्हता. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करायचा असलेल्यांनी शंतनू यांची चौफेर वाचनाची-प्रवासाची, सामान्य लोकांशी सतत करुणेने संवाद साधण्याची हातोटी तर आत्मसात करावीच, पण त्याचबरोबर ‘सखोल ज्ञान असल्याशिवाय सोपे लिहिता-बोलता येत नाही’ हेसुद्धा लक्षात ठेवावे. अभ्यासू लेखक, प्रभावी अनुवादक याचबरोबर ते अधिक प्रभावी रूपांतरकार होते. मूळ तेलगू असलेल्या मुद्दूपलणी या कवीच्या ‘राधिकासांत्वनम्’ या रसाळ आणि कामोत्कट शृंगारकाव्याचा त्यांनी इंग्रजीतून भावानुवाद केला. यात त्यांच्या या कौशल्याचा सर्वोच्च आविष्कार पाहायला मिळतो.

अलीकडच्या दिवसांत महाराष्ट्रात मराठीविषयक आग्रह व चळवळ वाढत असताना आणि त्याच वेळी ‘अभिजात दर्जा मिळालेली ही भाषा ज्ञान-विज्ञानसमृद्ध कशी व्हावी’ यावर मंथन होत असताना त्यांनी यावर व्यक्त केलेले मत समजून घेऊ. ‘Why is Sex Fun’ या जेरेड डायमंड यांच्या ‘संभोग का सुखाचा’ या नावाने रूपांतरित केलेल्या पुस्तकाच्या मनोगतात ते म्हणतात, ‘रूपांतर करायला सुरुवात केली आणि मग एक मजेदार खेळ सुरू झाला… प्रत्येक शास्त्रीय संज्ञेला मराठी प्रतिशब्द शोधणे… तो क्लिष्ट किंवा फारच अपरिचित असेल, तर कंसात इंग्रजी शब्द देणे अशा युक्त्या करत मी निघालो होतो; पण या सर्वांत थरारक अनुभव म्हणजे, मराठी भाषेचे शब्दवैभव माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले. अपेक्षेपेक्षा फारच कमी शब्दांना मी अडखळलो. शब्द आहेत, पण ते वापरात नसल्याने झपाट्याने विस्मृतीत जात आहेत, असेही माझ्या लक्षात आले.’ मराठीबद्दलची त्यांची ही तळमळ खरोखरच पुढच्या सर्व लेखकांनी घेण्यासारखी आहे.  

त्यामुळे चळवळीला पुढे नेण्यासाठी ज्ञानी-अभ्यासू लेखक-वक्ते-संशोधक यांची गरज आहेच, पण लोकांच्या जीवनाला समोर ठेवून त्यावर टोकदार, तार्किक, पण त्याच वेळी मनस्वी मार्मिक भाष्य करून, त्यावर वाचकांना त्यांच्या दृष्टिकोनातील चुका दिलखुलासपणे मान्य करण्याचे आणि त्या दुरुस्त करण्याचे मानसिक बळ विवेकी, मैत्रिपूर्ण सुसंवाद करणाराच देऊ शकतो, असे मला वाटते. डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी हेच केले. त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहून ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सर्वत्र प्रसार करण्याचे हे लिखाण-संवादाचे काम आपण सर्व जण मिळून पुढे घेऊन जाऊ’ असा निर्धार करू या.                   

-राहुल विद्या माने

  लेखक संपर्क : ८२०८१ ६०१३२


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ]