वैशाली आनंदा जंगम -

माझी एक मैत्रीण! माझ्या जातीची! माझ्या धर्माची! जंगम लिंगायत! आम्ही एकत्र खेळलो. एकत्र अभ्यास केला. एकत्र परीक्षा दिल्या. या काळात तिच्या जीवनात एक मित्र आला. आमच्याच धर्माचा!! दोघांची मैत्री झाली. स्वभाव आवडले. प्रेम जुळले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
दोघांचा धर्म एक असला, तरी जात एक नाही. घरी समजले. घरच्यांनी विरोध केला. भावाचा विरोध तर एवढा टोकाचा की त्याने सांगितले, “आमचे घराणे मोठे! आमच्या घराण्यात कोणीच अशी धर्मबाह्य कृती केलेले नाही. भाऊबंद तोंडात शेण घालतील. असे लग्न करण्यापेक्षा तू आत्महत्या कर. मी समजेन मला बहीण नव्हती.” घरचा विरोध! सख्ख्या भावाचे बोचरे, तीक्ष्ण शब्द!!
आज ही माझी मैत्रीण बिन लग्नाची राहिलेली आहे. भावाला बहिणीच्या प्रेमापेक्षा जात धर्म आणि तथाकथित परंपरा महत्त्वाची वाटली. आम्ही जंगम लिंगायत आहोत. एके काळी बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाह लावून समता आणण्याचा प्रयत्न केला.
लिंगायत धर्म
बसवण्णानी वैदिकांच्या शास्त्रावर कठोर टीका केली आहे. वैदिकांना त्यांनी अविवेकी आणि अविचारी म्हटलेले आहे. एका वचनात ते म्हणतात,
"प्रभू तुमची वाणी म्हणविती, ती वेदशास्त्रे, पुण्यकारक म्हणणे पाहा असत्य ठरे। शास्त्रांचे वचन घातक ठरे बोकडास, तयावर ठेवू कसा मी विश्वास? मी न वधिले दोरीने प्राण घेतले! म्हणणार्या वधकर्मीना काय म्हणावे? कुडल संगम देवा. वेदपाठी विप्र प्रवाहात वाहून गेल्याने, नाशाधीन झाले पहा हो, ‘भर्गो देवस्य धीमहि’ म्हणती परी एका ठायी ही ना विचार, ना विवेक, कुडलसंगम देवा।
जंगम – जंगमानी बसवण्णांचा विचार सर्व समाजात निःस्पृहपणे, पोहोचवावा, अशी अपेक्षा आहे. आजच्या भाषेत ते फुलटाईमर कार्यकर्ते; पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसते. त्यांना मिळालेला आदर, गौरव आणि उच्च स्थान त्यांच्या समतेच्या विचारामुळे होते, हे ते विसरून गेले, आणि आज उलट्या दिशेने पोहत आहेत. आजही ते स्वतःला उच्च समजतात. वैदिक धर्मातील ब्राह्मणांच्या प्रमाणे सर्व आदर सत्कार करून घेतात. तशीच धार्मिक कृत्ये करतात. परित्यक्ता आणि विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांचा विरोध असतो. धर्म सुधारणेमध्ये ते सर्वांच्या मागे राहणार, यात काही शंका नाही. अनेक बाबतीत आम्ही बसवेश्वरांच्या विचारावर बोळा फिरवलेला आहे. पण आता काही लोक विचार करू लागलेत. काही अनुभवाने, परिस्थितीमुळे शहाणे झाले आहेत.
आमचा “लिंगायत धर्म, निराकार, शिवोपासक आहे. तो भक्तकेंद्रित, मानवकेंद्रित आहे. शरणांच्या दृष्टिकोनातून शिव म्हणजे सत्य, मांगल्य, आणि सुंदरत्वाचा अविष्कार. शिव म्हणजे वर्ण, वंश, जाती, कुल, लिंगभेदातीत मानवी बंधुत्वाचा संकेत. दिव्य गुणसंपदा! शिव म्हणजे कायक आणि दासोहाचे नंदनवन! शिव म्हणजे सकल जीवात्म्याच्या हितचिंतनाचा निरंतर मंत्र जपणारा मनोगाभारा!” ‘महात्मा बसवण्णा’ या अनिल चव्हाणद्वारा लिखित पुस्तकाला ‘बसव पथ’ चे संपादक बाळासाहेब पाटील यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकामधील या ओळी आहेत.
पुढे ते म्हणतात, “समाज विभाजक कुटिल व्यवस्थेच्या विरोधात, शरणांनी, जातिभेदमुक्त, शोषणमुक्त, कायक दासोह-भक्ती- समताधिष्ठित एकेश्वरवादी नवधर्म, समान न्याय व श्रमाधिष्ठित नवसंस्कृती आणि उन्नत मानवी जीवन मूल्ययुक्त, नवसमाज उभारणीसाठी प्रस्थापित व्यवस्थेला प्रचंड हादरे दिले. शरण धर्म हा तत्कालीन कर्नाटकातील शूद्रातिशूद्र श्रमजीवींनी एकत्र येऊन निर्मिलेला, कृत्रिम भेदमुक्त, अवैदिक, मानवतावादी धर्म! समतेच्या प्रस्थापनेसाठी त्यांना कुल जातींच्या बंधनात जखडण्यात आलेल्या नानाविध कायकांना मुक्त करायचे होते. कायकास परमोच्यस्थानी प्रतिष्ठित करायचे होते. उच्च तुच्छ भेदभावांच्या, अन्याय अत्याचार शोषण आणि गुलामगिरीच्या पाताळात खितपत पडलेल्या श्रमिक बहुजनरूपी बळीराजाची अशी दुर्दशा केलेल्या, कुतंत्री जाती वर्णवादी प्रस्थापित व्यवस्थारूपी वामनाची इडा पिडा टाळून श्रमजीवी बळीराजास सन्मानाने कायक साम्राज्याचा चक्रवर्ती बनवायचे होते!”
जाती, वर्ग, वर्ण, लिंगभेद, नष्ट करून समता आणण्याचा हा विचार नऊशे वर्षांपूर्वी मांडला गेला. अंगावर इष्टलिंग धारण करून एका झटक्यात, मंदिर संस्कृती दूर लोटण्यात आली; पण भेदाभेद करणारी, लुबाडणूक, शोषण करणारी, मंदिर संस्कृती दूर झाली का?
आज काय दिसते?
शिव उपासना – पूर्वीपासून मंगळवेढा, पंढरपूर, कूडल संगम, कल्याण, इत्यादी परिसरात शिवोपासना प्रचलित होती. त्यामुळे बसवेश्वरांची शिवोपासना लोकांना अपरिचित वाटली नाही. त्यांनी शिवोपासनेत बदल केला. मूर्तिपूजा टाळली. देव देवळात नाही, हृदयात आहे. अशी शिकवण दिली. ‘देव मंदिरापेक्षा, देह मंदिर शुद्ध ठेवा; अंतकरण शुद्ध करा; देव देवतांना अनेक मंदिरात, तीर्थक्षेत्री शोधत फिरू नका; भक्ती सहज व मनापासून करा;’ अशी शिकवण दिली.
देव मंदिरात नाही असं सांगणारे लिंगायत जंगम, आता अनेक देवळांमध्ये पुजारी आहेत. वैदिक पद्धतीने मंदिरातील पूजा करून प्रार्थना आणि संस्कृत श्लोक म्हणून ते आपले पोट भरतात.
इष्टलिंग – इष्टलिंग धारण करणारा लिंगायत बनतो. त्याने लिंगायत धर्मानुसार आचरण करावे लागते. बसवण्णांनी सांगितलेले इष्टलिंग छोटे असून, सद्गुरुंनी दीक्षापूर्वक द्यावे लागते. आज इष्टलिंग सोबत बाळगले जाते; पण त्या मागील तत्त्वज्ञान मात्र विसरलेले आहे.
वैदिकांमध्ये धर्माचा अधिकार महिलांना नाही; पण लिंगायतांमध्ये महिलांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सर्व धार्मिक अधिकार आहेत. त्यासुद्धा इष्टलिंग सोबत बाळगतात. त्यावरून दोघे समान आहेत, हे सुद्धा लक्षात येते. लिंगधारणेनंतर व्यक्तींव्यक्तींमधील भेद नष्ट होतो. कोणी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य वा शूद्र नाही. त्यांना विशेष जात उरत नाही. त्यामुळे या आंदोलनाला जातिभेदविरहित समाजरचनेचा मोठा सामाजिक आशय प्राप्त झाला. आज इष्टलिंग धारण केले जाते. पण त्या मागचा आशय पुसला गेला आहे.
इंद्रिय दमन नको – भक्ती करणारे अनेक साधक शारीरिक साधना करतात. व्रत वैकल्ये करतात, शरीर कृश करतात, अनवाणी चालतात, उघडे राहतात, नेमके अन्न घेतात. कठोर ब्रह्मचर्य, इंद्रिय निग्रह करतात.
बसवण्णा म्हणतात, शारीरिक इंद्रिये ही शरीरधर्मासाठी आहेत. त्यांच्यावर भलतीच जबरदस्ती करू नये. अकारण इंद्रिय दमन करण्याने दोष उद्भवतात. पंचेंद्रियांचे महत्त्व जाणून घ्यावे. त्यांना त्यांचे कार्य करू द्यावे. त्यांचे बळ वाढवावे. म्हणजे तुम्ही जनतेची सेवा चांगली करू शकाल. इंद्रिय दमनाने वाकडी पावले पडतात. सती-पती, रतिउपभोग हा शारीरिक धर्म आहे. त्याचा अकारण संयम केला तर परस्त्रीकडे साधक आशाळभूत होऊन पाहील. मोह त्याच्यावर मात करेल. त्याचा योग्य आस्वाद घेणे गैर नाही. तसेच, अतिरेक करू नये. उपवास करणे, ब्रह्मचर्य पाळणे यांची गरज नाही.
आज अनेक लिंगायतांचा वेळ उपास तापास करण्यात जातो. मंदिरे, तीर्थक्षेत्रे, फिरण्यात जातो. यात्रा काढण्यात जातो.
स्त्री मुक्ती – पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला पायाची दासी बनवले होते. मनुस्मृतीने त्यावर शिक्कामोर्तब केले. बालपणी तिचा सांभाळ पित्याने करावा, तरुणपणी पतीने तर वृद्ध झाल्यावर पुत्राने सांभाळावे; असा कायदा सांगितला. तिचे लग्न बालपणीच लावल्यामुळे ती पुरुषावर पूर्णपणे अवलंबून राहिली. तिला ज्ञानापासून, धनापासून, मानापासून, धार्मिक कार्यापासून, दूर करण्यात आले. वंचित ठेवण्यात आले. बसवण्णांनी मात्र तिला सुतकांच्या पातकातून मुक्त करून सर्व अधिकार देण्याचा प्रयत्न केला. मुलाबरोबरच मुलीला लिंगधारणा करण्याचा अधिकार मिळाला. ती एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून गणली जाऊ लागली. स्वतंत्रपणे भक्ती कायक करू शकली. अनुभव मंटपात त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळाला. इच्छेप्रमाणे भक्तिमय जीवन निवडण्याचा अधिकार मिळाला. त्यांचा बसवण्णांच्या कार्याला हातभार लागला. अनेक शिवशरणींनी वचने लिहून समाजप्रबोधन केले. बसवण्णांनी बालविवाहाला विरोध केला. पुनर्विवादाला पाठिंबा दिला, आणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. पण अजूनही खेड्यापाड्यांतून बालविवाह सुरू आहेत. निरक्षरता आणि दारिद्य्र या दोन कारणांनी बालविवाह टिकून राहिलेत. तर पुनर्विवाहाला जंगम प्राणपणाने विरोध करतात. पुनर्विवाहितांना इतरांपेक्षा कनिष्ठ समजतात.
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह – जातिभेद आणि धर्मभेद टिकवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा हा विवाहाचा आहे. दुसर्या जातीच्या किंवा धर्माच्या व्यक्तीशी विवाह निषेध या मार्गाने जाती टिकल्या आहेत. वैदिकांनी अशा विवाहांना विरोध केला आहे. समाज चार वर्णात आणि शेकडो जातीत विभागलेला आहे.
खालच्या समजल्या जाणार्या वर्णातील मुलीने वरच्या वर्णातील मुलाशी विवाह केल्यास त्याला अनुलोम विवाह म्हणतात. इतर वर्णातील मुलगी वरच्या वर्णातील पुरुषास उपलब्ध होत असल्यामुळे, वैदिकांची अनुलोम विवाहास मान्यता आहे. ही बाब विवाह जुळवताना छत्तीस गुण पाहिले जातात, त्या कोष्टकावरून दिसून येते. पण प्रतिलोम विवाहास मात्र टोकाचा विरोध केला जातो. वरिष्ठ वर्णातील मुलगी इतर कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाला मिळू नये, यासाठी हा उपाय आहे. अनुभव मंटपाच्या मान्यतेने बसवण्णांनी चांभार मुलगा आणि ब्राह्मण मुलगी, असा प्रतिलोम विवाह लावला. त्याबरोबर सनातन्यांनी हल्लकल्लोळ माजवला. लिंगायतांच्या कत्तली केल्या; आणि प्रतिक्रांती केली. हा बसवण्णांचा विवाहविचार आज विसरला जाऊन वैदिकांच्या पद्धतीप्रमाणे जाती टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. किंबहुना वैदिकमान्य वर्तन श्रेष्ठ समजले जाते. इथे प्रत्येकाला ब्राह्मण व्हायची घाई आहे.
आज लिंगायत आपापल्या जाती काटेकोरपणे पाळतात. विवाह जातीमध्येच केले जातात; पण व्यवहारात मुलींची संख्या कमी झाल्यामुळे गरज म्हणून असे विवाह अलीकडे होताना दिसत आहेत, ते काही विचार-विवाह नव्हेत. सीमा भागात मराठा लिंगायत असे आंतरधर्मीय प्रेम विवाह काही वेळा झालेले दिसतात. त्यासंबंधी समंजस भूमिका दोन्ही बाजूनी घेतली गेलेली दिसते.
कोल्हापुरातल्या एका मराठा मुलावर लिंगायत मुलगी भाळली. तिने याच तरुणाशी लग्न करण्याचा निश्चय केला, आणि तो घरी जाहीर सुद्धा केला. मुलगा ग्रॅज्युएट आणि मुलगी डॉक्टर झालेली. लिंगायत असल्यामुळे घरच्यांनी विरोध केला आणि मुलीला चिकोडीला नेऊन ठेवले. एकत्र कुटुंबात तिला बाहेर पडणे अवघड होते. एके दिवशी घरचे सर्व जण लग्नाला गेले आणि तिला सांभाळण्यासाठी फक्त आई मागे राहिली. आई आंघोळीला गेल्याची संधी साधून बाहेरून कडी घालून मुलगी एसटीने कोल्हापूरला आली. तिने मुलाच्या मामाशी संपर्क केला. मामाने मराठा मुलाचे या मुलीशी लग्न लावून दिले. ही बातमी बाहेर गेल्यावर दोन्ही बाजू शस्त्रसज्ज झाल्या. एकमेकांना आव्हान देऊ लागल्या; पण समाजातील विचारी लोकांनी त्यांना थांबवले.
महिनाभराने युती झाली. वराकडील मंडळी वधुसह मुलीच्या घरी गेली. जाताना त्यांनी सोबत एक कन्नड भाषिक मित्र नेला. आतल्या खोलीतील संभाषण कानावर पडल्यावर, या दुभाषाच्या चेहर्यावरील भाव बदलू लागले. परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी ताडले, तशा खाणाखुणाही सोबत्यांना केल्या. आपल्याला डांबून ठेवले जाईल आणि चोप मिळेल याची सर्वांना खात्री झाली. एवढ्यात त्यांच्या संभाषणात घरातील वृद्ध स्त्रीचा प्रवेश झाला, ती म्हणाली “आपली मुलगी आपल्या काळजाचा तुकडा आहे. तिचा आनंद तोच आपला आनंद! तिच्या सुखासाठी आपण आपले विचार बाजूला ठेवले पाहिजेत!”
वातावरणातला ताण नाहीसा झाला. पुढे एक महिन्यानंतर मुहूर्त पाहून मोठ्या थाटामाटात पुन्हा दुसर्यांदा या दोन प्रेमिकांना लिंगायत पद्धतीने विवाहबंधनात अडकवण्यात आले. आज त्यांचा संसार सुखाने चालला आहे. या प्रकरणी तरुण अविचाराने वागत होते; तर घरातील ज्येष्ठ महिलेने योग्य दिशा दाखवली. काळाची गरज म्हणून अनुभवाने समाज काठावर उभा आहे त्याला छोटासा धक्का देण्याची गरज आहे. आणि हे काम तरुणच करतात असे नाही. धर्मचिकित्सेबद्दल बोलताना ‘बसव पथ’चे संपादक बी. एम. पाटील यांनी मात्र लिंगायत धर्माला पुरोगामी ठरवले.
पुरोगामी धर्म – हिंदू धर्मातील बहुसंख्य जाती लिंगायत धर्मात आहेत. त्यांची संख्या सुमारे १०० आहे. अपवाद फक्त ब्राह्मण आणि खाटीक; या दोन जाती लिंगायतामध्ये नाहीत. सर्व जाती श्रमजीवी, म्हणजे, बी सी, ओबीसी आहेत. अलीकडे त्यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह होत आहेत. मुलींचा तुटवडा हे त्यामागील कारण आहे; पण या आंतरजातीय विवाहांचे स्वागत केलेले दिसते. कुटुंब सुरुवातीचे दोन-तीन महिने विरोध करते. तेही लाजेकाजेस्तव. त्यानंतर मात्र नवदाम्पत्याला कुटुंबात सामावून घेतले जाते. विवाह केला म्हणून चिडून जाऊन मारहाण किंवा ऑनरकिलिंगची उदाहरणे घडलेली नाहीत.
आंतरधर्मीय विवाहही होत आहेत. मराठा लिंगायत या विवाहांचे प्रमाण जास्त आहे. अलीकडे जैन-लिंगायत असे विवाह कोल्हापूरच्या एका तालुक्यात होताना दिसतात. मुलींचा तुटवडा, तसेच भाषा आणि शाकाहारी आहार संस्कृती समान, ही यामागील कारणे आहेत. पुण्यातील काही बसववादी कार्यकर्ते आंतरजातीय विवाह जुळावेत म्हणून वर्षातून एकदा जाहीर वधु-वर मेळावा घेतात.
बसव क्रांतीत पेरलेले समतेचे विचार प्रतिक्रांतीनंतर वरवर छाटले गेले, तरी मुळे मात्र कायम आहेत, हेच यावरून दिसून येते. अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर मूळ विचारांना पुन्हा अंकुर फुटत आहेत, त्यांना सांभाळण्याचं काम आणि खतपाणी घालण्याचं काम समाजातील सजग तरुणाई करते आहे.
यश का मिळाले नाही? – शरणानी अनुभव मंटपामध्ये समतेचा विचार मांडला. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आंतरजातीय विवाह लावला. ही बाब सनातन्यांच्या लक्षात आल्यावर, राजसत्तेला हाताशी धरून त्यांनी बसवक्रांती मोडून काढली आणि प्रतिक्रांती केली. लिंगायतांच्या कत्तली केल्या. वचन साहित्य घेऊन शरण दूरवर पसरले. पण लिंगायतांना यश का मिळाले नाही? ते समता का आणू शकले नाहीत? असा प्रश्न वारंवार सतावत असतो! त्या सुमारास महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी होऊन गेले. त्यांनीही समतेचे प्रयत्न केले. त्यानंतर शंभर वर्षांनी संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, अशा वारकरी संतांनी सुमारे चारशे वर्षे जातिभेद आणि वर्णव्यवस्था मोडून समता आणण्याचे प्रयत्न केले; पण त्यांनाही यश मिळाले नाही. याचे कारण काय असेल?
विषमता नष्ट करायची आहे की नाही? काही विचारवंत आरोप करतात की, या मंडळींना आध्यात्मिक समता हवी होती. प्रत्यक्ष व्यवहारातील समता आणण्याचे प्रयत्न ते करत नव्हते! हा आरोप खरा नाही; पण त्यांना यश आले नाही. त्याचे कारण मार्क्सवादामध्ये मिळते. ऐतिहासिक भौतिकवादानुसार उत्पादन साधने बदलली की समाज बदलतो!
संत तुकारामांपर्यंत आणि त्यानंतर शिवराय आणि संभाजी महाराजांच्या काळामध्येही उत्पादन साधने पूर्वीचीच राहिली. बारा बलुतेदारांच्या साह्याने शेतकरी शेती पिकवत असत. शेती हेच उत्पादनाचे साधन होते. जाती व्यवसायावर अवलंबून होत्या. उत्पादन व्यवस्था आणि व्यवसाय बदलणे शक्य नव्हते.त्यामुळेच ,”जो जे वांच्छिल, तो ते लाहो, प्राणिजात” हे ज्ञानेश्वरांचे स्वप्न, स्वप्नच राहिले.
ब्रिटिशांच्या काळात विज्ञानाचे नवीन शोध लागले. कारखानदारी आली, व्यापार वाढला. रेल्वे आली. आता तर जुने लाकडी नांगर जाऊन लोखंडी नांगर आणि ट्रॅक्टरने नांगरणी सुरू झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून समाजजीवन बदलले. ते बदलावे म्हणून अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. राजाराम मोहन रॉय, रानडे, गोखले, पुढे फुले शाहू आंबेडकर यांनी या बदलाला वैचारिक रसद पुरवली.
आज व्यवहारात शिवाशिव, सोवळे-ओवळे आणि जातिभेद पाळणे रोजच्या रोज अशक्य बनत आहे. बसवण्णांनी आणि वारकर्यांनी पाहिलेले समतेचे स्वप्न आज प्रत्यक्षात येऊ शकते; पण त्यासाठी वैचारिक प्रबोधनाची गरज आहे. सनातनी आपले पारंपरिक अधिकार स्वतःहून सोडणार नाहीत.
उत्पादन साधने बदलली तरी, सामाजिक बदल आपसूक होत नाहीत. त्यासाठी प्रयत्नांची गरज असते. साहिर लुधियानवी एका चित्रपट गीतात म्हणतात, “आ चल के तुझे, मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो, आँसू भी ना हो, जहाँ प्यार ही प्यार पले|” जग बदलाची दिशा हीच आहे.
समतेचा विचार सांगणारे अनेक गट तयार होत आहेत. त्यांना आपण बळ पुरवू या.
– वैशाली आनंदा जंगम, कोल्हापूर
संपर्क : ९६७३६ ५७४८९