ओडिशातील डाकीण प्रथा विरोधी कायदा

सौरभ बागडे -

मागील लेखात आपण सामाजिक चळवळी-आंदोलने न्यायाचा परीघ विस्तारण्यात कसे योगदान देतात, सुधारणावादी कायद्यांबद्दलची मते-मतांतरे यांचा थोडक्यात आढावा घेतला. या लेखात आपण डाकीण/ चेटकीण प्रथा म्हणजे काय आणि ओडिशा राज्याने या प्रथेविरुद्ध संमत केलेला The Odisha Prevention of Witch-hunting Act, 2013 या कायद्याचा परिचय करून घेऊ या.

डाकीण ही प्रथा केवळ अंधश्रद्धेतून आलेली नसून, तिच्यामागे जात-पितृसत्ताक समाज व्यवस्था ही आहे. डाकिणीच्या बहुतांश घटनांमध्ये एखाद्या विधवा महिलेला संपत्तीतून बेदखल करण्यासाठी किंवा मत्सर आणि खाजगी वैर किंवा लैंगिक प्रस्तावांना नकार देणे, प्रतिकार करणे यांसारख्या कारणांमुळे एखाद्या महिलेला डाकीण ठरवले जाते व हे झाकण्याकरिता त्या महिलेकडे अलौकिक किंवा जादुई दुष्ट शती आहे, त्यामुळे ती लोकांना किंवा त्यांच्या मालमत्तेला हानी पोहचतं आहे. असं पसरवून निपराध महिलेचे मानसिक, लैंगिक, आर्थिक शोषण केलं जातं. ही प्रथा भारतात जशी आढळते तशी युरोप-अमेरिका-आफ्रिकेत देखील आढळते.

डाकीण ठरवून महिलेला हिंसकपणे लक्ष्य केलं जाते, त्याचे तीन टप्पे आहेत. एक, डाकीण असल्याचा आरोप करणे. महिलेला मृत्यू, आजार, नैसर्गिक आपत्ती किंवा पीकनाश इ. दुर्दैवी घटनांसाठी दोषी ठरवले जाते. दोन, महिलेला डाकीण असल्याचे जाहीर करणे. दुर्दैवी घटनांसाठी दोषी ठरवल्यानंतर त्या महिलेला डाकीण/डायन म्हणून जाहीर केले जाते किंवा तसे लेबल लावले जाते, तिला समाजातून बहिष्कृत केले जाते. स्थानिक पातळीवर गुणिया, तांत्रिक (Witch-doctor) या नावाने ओळखले जाणारे व्यती विशिष्ट विधींच्या माध्यमातून महिलांना डाकीण असल्याचे ठरवतात. शेवटी त्या महिलेचा छळ केला जातो. छळामध्ये त्या महिलेला मानसिक, शारीरिक, लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते.

डाकीण प्रथेतून सर्वाधिक हत्या होणारे झारखंड हे देशातील पहिले राज्य आहे, तर दुसरा नंबर ओडिशाचा लागतो. २००८ ते २०१२ या कालावधीत ओडिशामध्ये ३१२ हत्या या प्रथेतून झाल्या आहेत. राज्यातील डाकीण शिकार व डाकीण विद्या या गंभीर समस्येला प्रतिबंध घालण्यासाठी ओडिशाच्या विधीमंडळाने The Odisha Prevention of Witch-hunting Act, 2013 हा विशेष कायदा आणला, त्याला १५ फेब्रुवारी २०१४ रोजी राज्यपालांची संमती प्राप्त झाली. या कायद्याचा प्रमुख उद्देश डाकीण शिकार या कुप्रथेचा प्रभावीपणे मुकाबला करणे तसेच डाकीण विद्येच्या प्रथेला प्रतिबंध घालणे हा आहे.

The Odisha Prevention of Witch-hunting Act, 2013 ने डाकीण शिकारीस प्रवृत्त करणे, त्यास साहाय्य करणे, एखाद्या महिलेला डाकीण म्हणून घोषित करून तिच्याशी जबरदस्तीने घृणास्पद वागणे, कोणत्याही व्यतीस हानी किंवा इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने डाकीणविद्येची प्रथा पाळणे किंवा डाकीण-डॉक्टरची प्रथा पाळणे या बाबी दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवल्या आहेत.

वर उल्लेख केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा कोणत्या स्वरूपाच्या आहेत ते पाहू या.

१) जो कोणी डाकीण शिकार करतो किंवा डाकीण शिकारीस प्रवृत्त करतो, साहाय्य करतो अथवा उकसवतो, त्यास तीन वर्षांपर्यंत वाढविता येणार्‍या कारावासाची शिक्षा किंवा किमान एक हजार रुपयांपेक्षा कमी नसलेला दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

२) जो कोणी एखाद्या महिलेला डाकीण म्हणून कलंकित करून तिला जबरदस्तीने न खाण्यायोग्य कोणताही पदार्थ किंवा इतर कोणताही घृणास्पद पदार्थ पिण्यास अथवा खाण्यास भाग पाडतो किंवा तिचा चेहरा किंवा शरीर रंगवून सार्वजनिकरीत्या धिंड काढतो किंवा मानवी प्रतिष्ठेला अवमानकारक अशा स्वरूपाची तत्सम कोणतीही कृती करतो, अथवा तिला तिच्या निवासस्थानातून जबरदस्तीने विस्थापित करतो, त्यास किमान एक वर्षापेक्षा कमी नसलेली व पाच वर्षांपर्यंत वाढविता येणारी सतमजुरीची शिक्षा तसेच दंडाची शिक्षा होईल.

३) जो कोणी कोणत्याही व्यतीस इजा किंवा हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने डाकीणविद्या किंवा तत्सम इतर कोणत्याही प्रथा करतो, त्यास किमान एक वर्षापेक्षा कमी नसलेली व तीन वर्षांपर्यंत वाढविता येणारी कारावासाची शिक्षा किंवा किमान पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसलेला दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

४) जो कोणी स्वतःला डाकीण-डॉक्टर म्हणून कार्यरत ठेवून, जाणीवपूर्वक अशा प्रथा करतो की ज्या प्रथांमुळे ज्याच्यावर त्या केल्या जात आहेत त्या व्यतीस इजा किंवा हानी होण्याची शक्यता आहे, त्यास किमान एक वर्षापेक्षा कमी नसलेली व तीन वर्षांपर्यंत वाढविता येणारी कारावासाची शिक्षा किंवा किमान पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसलेला दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

५) या कायद्यांतर्गत शिक्षेस पात्र ठरणार्‍या गुन्ह्यासाठी आधी दोषी ठरलेली व्यती, दुसर्‍यांदा किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी पुन्हा अशा गुन्ह्यासाठी दोषी ठरल्यास, तिला किमान तीन वर्षांपेक्षा कमी नसलेली व सात वर्षांपर्यंत वाढविता येणारी कारावासाची शिक्षा तसेच किमान दहा हजार रुपयांपेक्षा कमी नसलेला दंडाची शिक्षा होईल.

न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावताना, पीडित व्यतीस झालेल्या शारीरिक, मानसिक हानीचा विचार करावा, तसेच त्याच्या मालमत्तेस झालेल्या हानीचाही विचार करावा व ती रकम पीडित व्यतीस नुकसानभरपाई म्हणून द्यावी अशी या कायद्यात तरतूद आहे. मात्र, याच कायद्यानुसार दंडाची शिक्षा जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंतच करता येते. डाकीण प्रथेमुळे होणार्‍या पीडितेच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक हानीचा विचार केल्यास, पीडित व्यतीस पुन्हा प्रतिष्ठेने जगण्यास ही नुकसानभरपाईची रकम तुटपुंजी आहे.

The Odisha Prevention of Witch-hunting Act, 2013 ने राज्य सरकारवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम राबवण्याची, लोकांमध्ये प्रबोधन करण्याची, त्यांना शिक्षित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, ओडिशा सरकारच्या महिला व बाल विकास विभागाचा २०२४-२५ वर्षांचा वार्षिक अहवाल पाहिला असता, असा कोणताही उपक्रम त्यांनी घेतला असल्याचे आढळले नाही. ओडिशा गुन्हे शाखेची crime against women and children wing ही डाकीण प्रथेशी संबंधातील गुन्ह्यांचा तपास करते व तपासाशिवाय महिला, स्थानिक नेते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनजागृती मोहीम राबवते, अशी महिती ओडिशाच्या crime against women and children wing च्या संकेतस्थळावर आहे. मात्र त्यांनी या संदर्भात कोणत्या व कशा प्रकारच्या मोहिमा राबवल्या याचा शोध घेतला असता, काहीही आढळले नाही. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाहीये, असं दुर्दैवाने म्हणावे लागते.

– अ‍ॅड. सौरभ बागडे
(लेखक अंनिसचे कार्यकर्ते असून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात.)
संपर्क :  ७८२१९५७१४७

पंधरा वर्षांत डाकीण प्रथेमुळे २००० हून अधिक व्यतींचे खून   
राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार डाकीण प्रथा झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार देशभरात सन २००८ ते २०२३ मध्ये २०२४ व्यतींचे खून डाकीण प्रथेमुळे झाले आहेत. अर्थात, खरा गुन्हा नोंदविण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांकडून नकार दिला जाणे किंवा इतर कारणांमुळे ही प्रकरणे नोंदवली न जाणे, या शक्यतांचा विचार केला तर खरी आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र, उपलब्ध आकडेवारी सुद्धा डाकीण प्रथेची समस्या किती गंभीर स्वरूपाची आहे याकडे अंगुलीनिर्देश करते.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]