बुवाबाजी आणि महिलांचे शोषण याबाबत समाजात घुसळण

-

१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या महाराष्ट्राला उद्देशून आपण ‘राकट देशा, कणखर देशा’ ही विशेषणे वापरत आलेलो आहोत त्याला यापुढे ‘भोंदूंच्या देशा’ म्हणावे लागेल की काय अशी सध्याची स्थिती आहे. महाराष्ट्राला हादरवून टाकणारे कारनामे करणार्‍या भोंदू अशोक खरातवर लैंगिक अत्याचार, फसवणूक व इतर कलमांखाली चौदापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. आध्यात्मिक शक्तीच्या नावाखाली श्रद्धेचा गैरफायदा घेत त्याने भक्त महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जमिनी हडप करणे असे अनेक गुन्हे केलेले आहेत. महाराष्ट्रातील बडे राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी खरातचे भक्त आहेत. प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू ज्या उत्पादनांची जाहिरात करतात ती उत्पादने विकत घेण्याकडे जसा सामान्यांचा कल झुकतो तद्वतच राजकीय नेते, हेलिकॉप्टर आणि आलिशान गाड्यांमधून ये-जा करणार्‍या व्यक्ती जर बाबांच्या भक्त असल्याचे दिसले तर लोक त्या भोंदूंच्या अधिकच आहारी जातात. प्रत्यक्ष पाहणी करून खरातच्या भोंदूगिरीवर लिहिलेला वृत्तांत या अंकात वाचता येईल.

            खरातच्या अटकेला महिना होतो न होतो तोच सुमारे पाच वर्षांपूर्वी जादूटोणाविरोधी कायद्याखाली अटक झालेल्या ‘मनोहरमामा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. जादूटोणाविरोधी कायदा व लैंगिक अत्याचाराच्या आरोपांखाली एकदा अटक होऊन जामिनावर सुटलेला असताना जागा बदलून या मनोहरमामाने त्याच्या भोंदूगिरीचे साम्राज्य विस्तारल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या भोंदूला एकतर जामीन मिळता कामा नये किंवा जामीन देताना त्याचा दरबार पुन्हा सुरू होणार नाही, याची खात्री पटवणार्‍या अटी घालून त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.          

            खरात प्रकरणानंतर बुवाबाजीमधून होणार्‍या महिलांच्या शोषणाबद्दल समाजात भरपूर चर्चा सुरू झाली. बुवाबाजीमधून होणार्‍या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये  स्त्रिया या पीडित व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांना त्यासाठी दोष देणे चुकीचे आहे. बहुतेक वेळा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती त्या महिलेला बाबांच्या चरणी घेऊन जातात. एकतर त्या महिलेचाही बुवाबाजीवर विश्वास असतो आणि काही खटकत असेल तरी संपूर्ण कुटुंबाने ज्याला गुरु मानले आहे अशा व्यक्तीकडे मी येणार नाही असे सांगणे तिला शक्य नसते. समाजात रुजलेल्या गुरू संकल्पनेनुसार गुरूला संपूर्ण शरण जाणे अपेक्षित असल्यामुळे आपल्या बाबतीत जे घडते आहे ते शोषण आहे की तो गुरूचा अनुग्रह आहे अशा द्वंद्वात भक्त महिला काही काळ असते. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झालेली एखादी महिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर शोधून जेव्हा संपर्क करते तेव्हा तिच्याशी बोलताना तिची उलघाल जाणवते.

            डोळ्यावर बांधलेली भक्तीची पट्टी काढली की दाहक वास्तवाची जाणीव झाली, तरी  वेगवेगळ्या कारणांमुळे महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. जग हसेल, छी: थू करेल अशी भीती वाटते. न्याय मिळण्याची खात्रीही वाटत नसते. स्त्री सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून भोंदूकडे गेलेली असली, तरी लैंगिक शोषणाचे तपशील घरी कळल्यावर आपल्या संसाराचे काय होईल, अशी भीती तिला असते. अशोक खरात प्रकरणानंतर भोंदू ऋषिकेश वैद्यने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे जे प्रकरण उघडकीस आले; त्यामध्ये ‘मी शंकराचा अवतार आहे व तू माझी या जन्मातील पार्वती आहेस’, असे सांगून त्याने पीडित महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. भोंदू बाबाच्या अशा प्रकारच्या बोलण्याला भुलून जर महिला स्वतःहून त्याच्याकडे गेली असेल, तर तक्रार दाखल करणे अजूनच कठीण बनते. सध्या बुवाबाजी व महिलांचे शोषण याबद्दल समाजात जी घुसळण होत आहे त्यातून किमान एवढे साध्य व्हावे की, आपल्याबाबत असा प्रकार घडला असेल तर समाज आपल्याला नावे न ठेवता आपल्याकडे पीडित म्हणून बघेल याची पीडित स्त्रियांना खात्री वाटावी. या विषयावर व्यक्त होताना आपण सर्वांनी हे भान ठेवले पाहिजे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]