-
‘अंनिस’च्या प्रयत्नाने जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील ७५ वर्षीय वृद्धास करणी करतो म्हणून तीन ते चार जणांनी जबर मारहाण केली. पीडित व्यक्तीने तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० अन्वये ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ ही कलमे लावली होती. परंतु करणी केली म्हणून मारहाण केल्याबाबत जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावण्यात आले नव्हते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
बिलोली तालुक्यातील सगरोळी हे छोटंसं गाव एका शैक्षणिक संस्थेमुळे नावारूपाला आलेले आहे. अनेक उच्चपदस्थ अधिकारी येथील शाळेने घडविले आहेत. अशा या गावात चांदू सटवाजी गायकवाड हे ७५ वर्षीय गृहस्थ राहतात, त्यांच्या कुटुंबात दोन मुले, सुना, नातवंडे आहेत. दोन्ही मुलं कामानिमित्त बाहेरगावी असतात.
२८ जून २०२४ रोजी चांदू सकाळी आठ वाजताच्या सुमारास सगरोळी येथील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेले होते. ते चहा पीत असताना गावातील शिवाजी गायकवाड, विकास गायकवाड व अंजू तिथे पोहोचले व “आमच्या मुलीवर करणी का केली?” अशी विचारणा करत यांनी चांदूला थापड, बुया व काठीने मारहाण केली. लोकांची गर्दी जमली. पण कोणीही मदतीला आले नाही. परंतु गर्दीत कोणीतरी उच्चारलेला ‘पोलीस’ हा शब्द चांदूच्या कानावर पडला. त्यामुळे जवळच असलेल्या पोलीस चौकीत ते कसेबसे पोहोचले. तेथे पोलीस, कर्मचारी कोणीही हजर नव्हते. लोकांनी त्यांना पोलीस चौकीतून बाहेर काढून रस्त्यावर मारहाण केली. ज्या मुलीवर करणी केल्याचा संशय त्यांच्यावर घेण्यात आला होता ती मुलगी घरी होती. मारहाण करणार्यांनी ओळख पटविण्यासाठी चांदूला तिच्याकडे घेऊन गेले व तेथेही मारहाण केली. घरून चौकात आणले व यापुढे करणी न करण्याचा इशारा देऊन पुन्हा मारहाण केली. चांदूला मारहाण होत असल्याची खबर त्याच्या घरी सुनेला कळली. सून चौकात आली. तिने पतीला म्हणजे चांदूचा लहान मुलगा धोंडिबा याला फोन केला व चांदूला सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली. धोंडिबा बोधन येथे होता. त्याने पोलीस हेल्पलाइनला फोन केला व नंतर तो बिलोली पोलीस स्टेशनला गेला, पण त्याला सोबत न घेताच पोलिसांची गाडी सगरोळीला गेली. जमलेल्या लोकांना पांगवले व परत आले. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून चांदूला नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालय येथे तत्काळ घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नांदेडला जातेवेळी चांदूचा दुसरा मुलगा बालाजी व धोंडिबा हे पोलीस स्टेशनला गेले. चांदूला अगोदर दवाखान्यात घेऊन जा आणि नंतर फिर्यादीसाठी या असे पोलिसांनी सांगितले. चांदूला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती बिलोली येथील अंनिसचे कार्यकर्ते कमलाकर जमदाडे यांना उशिराने कळली. त्यांनी नांदेड येथील कार्यकर्ते सम्राट हटकर यांना कळवली. सम्राट हटकर यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन पीडिताची भेट घेतली, तेव्हा पीडिताने व त्याच्या मुलांनी वरील घटनाक्रम त्यांना सांगितला.
२९ जून रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तोपर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. चांदूची दोन मुलं, एक बारावी शिकलेला व दुसरा व्हेटर्नरी कोर्स केलेला, यांना तक्रार कशी नोंदवायची व जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावणे कसे आवश्यक आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली व एफआयआर आम्हाला पाठवा असं सांगितलं होतं. परंतु त्यांनी अंनिसशी कुठलाच संपर्क साधला नाही. आम्ही फोन करत होतो. ते फोनवर बोलत, परंतु सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. शेवटी फारच आग्रह केल्यानंतर त्यांनी मोबाईलवर ‘एफआयआर’ची फोटोकॉपी पाठवली. त्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावले नसल्याचे लक्षात आलं. त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की, यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी कलम वाढवणे आवश्यक आहे, नाही तर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते. तुम्ही फक्त घटनेच्या सत्यतेवर ठाम रहा, आम्ही पुढचं बघून घेतो असे सांगितल्यावर ते तयार झाले. मग आम्ही या घटनेचा पोलिसांकडे पाठपुरावा केला. शेवटी १३ जुलै रोजी कलम वाढवले.
या घटनेच्या अनुषंगाने खालील बाबींची नोंद घेणे आवश्यक वाटते. बहुधा करणी-भानामतीची तक्रार नोंदविण्यास पीडित पुढे येत नाहीत. या घटनेमध्ये सुद्धा त्यास पूरक अशाच बाबी आढळून आल्या. हॉटेलवर, पोलीस चौकीबाहेर, आरोपीच्या अंगणात व चौकात अशा चार ठिकाणी पीडिताला मारहाण झाली, बघ्यांची गर्दी होती, पण कोणीही मदतीला आलं नाही.
तक्रार नोंदवताना पीडिताचे दोन्ही सुशिक्षित मुले उपस्थित होते. पोलिस पीडिताचा जबाब नोंदवून घेताना, करणी केली म्हणून आरोपींनी मारहाण केल्याचे पीडिताने सांगितले असं ते म्हणाले. पण जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ‘एफआयआर’मध्ये करणीचा उल्लेखही नाही. याविषयी पोलिसांना विचारणा केली तेव्हा त्यांच्या तक्रारीनुसारच गुन्हा नोंदविण्यात आल्याचं व त्यांच याबाबत काही म्हणणं नसल्याचे पोलीस सांगत होते.
चांदू गायकवाड त्यांचा पूर्ण समाज त्यांच्या विरोधात गेला होता. त्यांच्यावर अघोषित बहिष्कार होता. चांदूचं मूळ गाव नायगाव तालुक्यातील सातेगाव काही भावभावकीतील लोकांना मदत करून, सोबत घेऊन सगरोळीला स्थायिक झाले होते. ती भावकीही त्यांच्या विरोधात आहे. त्यांना गावात ठेवायचं नाही असा ठराव त्यांचा समाज घेत असल्याची चर्चा चालू होती.
घटनेच्या दिवशी पोलीस गावात येऊन गेले होते. त्यानंतर चांदूला घेऊन त्याची मुलं पोलीस स्टेशनला गेली तेव्हा, अगोदर दवाखान्यात घेऊन जा, नंतर पोलीस स्टेशनला या असं पोलिसांनी सांगितलं. घटना घडून चार-पाच दिवस होऊन गेले होते. तरीही आरोपीविरुद्ध कोणतीही कार्यवाही झाली नाही.
तक्रार कशी नोंदवायची याबद्दल अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले होते, पण आपण त्याप्रमाणे तक्रार नोंदवू शकलो नाही. अशा भावनेतून चांदूची मुलं आमच्या संपर्कात राहात नसावेत. आम्ही मात्र सतत त्यांच्या आणि पोलिसांच्या संपर्कात होतो.
चांदू काकुळतीला येऊन, शपथा घेऊन सांगत होता की, मला करणी करता येत नाही, मी करणी केली नाही. परंतु आरोपींचा ठाम विश्वास होता की, करणी चांदूनेच केली आहे. त्याला कारणही तसंच होतं. आरोपींना माहीत होतं की, चांदूला त्याच्या मूळ गावाहून लोकांनी करणी करतो म्हणून हाकलून दिलं होतं. या बाबीची खात्री लोकांना पटवून देण्यासाठी आरोपी चांदूला व काही गावकर्यांना घेऊन दुसर्या गावी एका मठात घेऊन गेले. मठातील महाराजांनी चांदूने करणी केली नसल्याचा निर्वाळा दिला. यालाही एक कारण आहे. हे महाराज पूर्वी करणी करणार्यांची नावे उघड करीत असत. परंतु एका केसमध्ये यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून अंनिसशी सामना झाला होता, तेव्हापासून त्यांनी असे करायचे सोडले. विशेष म्हणजे त्या महाराजाकडे जाण्यासाठी भाड्याने केलेल्या जीपचा व इतर खर्च चांदूला करण्यास सांगण्यात आलं.
पाच-सहा दिवसांपासून आम्ही चांदूच्या मुलांकडे पाठपुरावा करत होतो. भीतीमुळे असेल किंवा इतर कारणामुळे, ते सुधारित तक्रार देण्यास तयार नव्हते. पीडिताचीच इच्छा नसेल तर काय करू शकतो, असा विचार करून आम्ही त्या प्रकरणात लक्ष घालायचं सोडून दिलं. योगायोगाने त्या घटनेची व्हिडिओ क्लिप आम्हाला मिळाली आणि नियमित पोलीस निरीक्षक बिलोलीला रुजू झाले. कमलाकर जमदाडे पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या भेटीसाठी गेले आणि त्यांना ती व्हिडिओ क्लिप दाखवली व वरिष्ठ अधिकार्यांना पण पाठवली. लगेच त्यांनी पीडिताला जबाब नोंदवण्यासाठी संध्याकाळपर्यंत पाठवून द्या, असं सांगितलं.
कमलाकर यांनी चांदूच्या मुलाला आणि मला फोन केला. तेव्हा आम्हाला कळलं की चांदूला त्याच्या मुलांनी नांदेडच्या पुढे अर्धापूर तालुक्यातील लोणी येथे वृद्धाश्रमात दाखल केले आहे. कोणत्याही परिस्थितीत चांदूला संध्याकाळपर्यंत बिलोली पोलीस स्टेशनला घेऊन जायचं असं आम्ही ठरवलं. वेळ कमी होता, प्रवास जास्त होता, पावसाचाही जोर होताच. चांदूच्या मुलांनी मोटारसायकलने लोणीला जाऊन वृद्धाश्रमाची प्रक्रिया करून ते नांदेडला आले, पाऊस सुरू होता. नांदेडहून आम्ही माझ्या चारचाकी वाहनाने बिलोलीला पोहोचलो. कमलाकर तिथे हजर होतेच. चांदूचा पुरवणी जबाब घेतला. जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावलं. पुढील कार्यवाही तत्काळ करू असं पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी आम्हाला आश्वासन दिलं. धन्यवाद मानून आम्ही पोलीस स्टेशन सोडलं.