रवी सांगोलकर -
दोन शेजार्यांच्या मधील वाद अंनिसने मिटवला!
जत तालुक्यातील माडग्याळ या गावी दोन शेजारी राहणार्या कुटुंबामध्ये अंधश्रद्धेतून वाद निर्माण झाला होता. तो वाद अंधश्रद्धा निर्मूलन समिती जाडर बोबलाद शाखेच्या कार्यकर्त्यांनी सामोपचाराने मिटवला.
याबाबत अधिक माहिती अशी की, माडग्याळ गावी एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या शेजारी राहणार्या कुटुंबामध्ये मुले आणि महिला सतत आजारी पडत. त्यामुळे त्या कुटुंबाला असे वाटले की “शेजारील मयत वृद्ध व्यक्तीचा आत्मा अशांत आहे. तो आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबीयांना त्रास देतो, आजारी पाडतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मृत वडिलांच्या आत्म्याची शांती करा, त्याला खानादाना द्या, म्हणजे तो शांत होईल.” असा तगादा मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडे लावला. या गोष्टी करण्यास त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाने नकार दिला. त्यामुळे या दोन कुटुंबात मोठा वाद झाला. मृत कुटुंब हे करणी जादूटोणा करते असा अपप्रचार गावात केला गेला. त्यामुळे शेजारी राहणार्या या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी अबोला धरला.
‘तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृतात्म्याची शांती का करत नाहीत’ अशी विचारणा करून मृत व्यक्तींच्या कुटुंबांना गावांमध्ये सतत अपमानित केले जात होते. त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा सचिव रवि सांगोलकर यांच्याशी संपर्क केला. सांगोलकर यांनी माडग्याळ गावी जाऊन त्यांनी दोन्ही कुटुंबांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीस गावचे पोलीस पाटील सिद्धांना ऐवळे हेही उपस्थित होते.
यावेळी अंनिसचे कार्यकर्ते रवी सांगोलकर म्हणाले की, “आत्मा पुनर्जन्म या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या नाहीत. कोणताही मृत आत्मा येऊन आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. घरातील सततच्या आजारपणाला वेगळी कारणे असू शकतात. ती आपण शोधली पाहिजेत. आत्म्याची शांती करून आजारपण दूर होणार नाही. वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला तर आजारपणावर नक्की मात करता येईल.”
सांगोलकर पुढे म्हणाले की, “अंधश्रद्धेतून असे खोटे आरोप करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. तुम्ही जर या कुटुंबाची पुन्हा बदनामी केली तर आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास पोलिसांना सांगू.”
सामोपचाराच्या बैठकीमध्ये दोन्हीही कुटुंबांचे समाधान झाले. त्या कुटुंबाने अंधश्रद्धेतून आरोप करणे आम्ही थांबवू अशी ग्वाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. या बैठकीस अंनिस जाडरबोबलाद शाखेचे अध्यक्ष संतोष गेजगे, संतोष शिंदे उपस्थित होते. अंधश्रद्धेतून असे खोटे आरोप करून कोण बदनामी करत असेल तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन रवी सांगोलकर, राहुल थोरात, डॉ. संजय निटवे यांनी केले आहे.
– रवी सांगोलकर, जत, जि. सांगली