-
डॉ. दाभोलकर को इंसाफ़ तब मिलेगा जब उनकी हत्या से जुड़े बड़े सवालों का जवाब मिलेगा।
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या के मामले में तीन आरोपियों का बिना सबूत के आधार पर छूट जाना इस बात को लेकर आश्वस्त नहीं करता है कि इस मामले में जाँच एजेंसी ने सूक्ष्म नज़रों से काम किया है| आज भी दाभोलकर की हत्या का मास्टरमाइंड सामने नहीं आया है| दस साल की जाँच और मुकदमे के बाद भी दाभोलकर की हत्या को एक सामान्य मर्डर की तरह ही सामने लाया जा रहा है| ६७ साल के तर्कशील व्यक्ति से अपराधियों को दिकत नहीं हो सकती थी|़ जाहिर है साज़िश के तार कहीं और होंगे लेकिन लगता है जाँच एजेंसियों में वहाँ तक जाने का साहस नहीं है|
ख़ासकर तब जब दाभोलकर की हत्या को गोविन्द पनसारे, एम. एम. कलबुर्गी और गौरी लंकेश की हत्या से भी जोड़ा जाता है| इन सभी के काम को देखें तो साफ समझ आता है कि किसी डिज़ाइन के तहत इन्हें निशाना बनाया गया है| चारों का काम अंधविश्वास, सांप्रदायिक राजनीति के विरोध से जुड़ा है| इसलिए जब दस मई को ़फैसला आया तब इतना भरोसा नहीं हुआ कि दाभोलकर को इंसाफ़ मिला है| दो लोगों को सज़ा हुई है| इंसाफ़ तब मिलेगा जब उनकी हत्या से जुड़े बड़े सवालों का जवाब मिलेगा|
– रविशकुमार, पत्रकार
ही केस कमजोर करण्यात आली
या निकालाबाबत माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. या निकालाने दोन जणांना शिक्षा होणार आहे, ज्याचे नकीच स्वागत केले पाहिजे. दुसर्या बाजूने बघता हे स्पष्ट दिसते की तुम्ही गोळी झाडणार्या व्यक्तीला पकडले आहे, मात्र ज्यांनी याचे नियोजन केले ते अजूनही बाहेर आहेत. या व्यक्ती अशा आहेत जे अतिशय ताकदवान तर आहेतच, पण त्याचसोबत ते अतिशय ताकदवान राजकीय व्यक्ती देखील आहेत.
याला कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत जे घडत आहे ते असू शकते. पोलिसांनी असा तपास केला का की ज्याने खटला कमजोर झाला? त्यामुळे मी अत्यंत असमाधानी आहे. आणि एवढेच नाही, तर हा निकाल पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खून खटल्यासाठी उदाहरण होण्याची भीती आहे. म्हणून केवळ मारेकरी पकडले जाणे आणि त्यांना शिक्षा देऊन खरे खलनायक अजूनही बाहेर असणे हे माझ्या दृष्टीने चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांत जे कोणी सत्तेवर आले त्यांच्या सोयीने ही केस कमजोर करण्यात आली, असे माझे स्पष्ट मत आहे.
– पी. साईनाथ, पत्रकार
तपास यंत्रणांनी या खुनामागील खरे सूत्रधार पकडावेत
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचे एक आधारस्तंभ होते. त्यांच्या खुनामुळे संपूर्ण देश हळहळला. अलीकडे त्यांच्या खुनासंदर्भातला जो निकाल न्यायालयाने दिलेला आहे. त्यासंबंधी मनात अतिशय संताप आहे. कारण अजून खर्या मारेकर्यापर्यंत जे या खुनाच्या कटाचे सूत्रधार आहेत त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेल्या दिसत नाहीत किंवा खरे मारेकरी माहीत असूनही त्याच्याकडे दुर्लक्षित केले जात आहे. म्हणूनच तपास यंत्रणांनी या खुनामागील खरे सूत्रधार दोषी पकडून न्यायालयासमोर आणावेत व त्यांना शिक्षा द्यावी.
– रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत
या मातीची संस्कृती दूषित झाली आहे
२० ऑगस्ट २०१३… नारळी पौर्णिमेचा दिवस होता. वेळ सकाळची होती. कधी नाही ते नारळीभात करण्याचा मी घाट घातला होता आणि हादरवून टाकणारा, पोटात खोल खड्डा जाणवणारा मेसेज फोनवर आला. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा बालगंधर्वच्या पुलावर खून झाला आहे.’ फोन सुरू झाले. हातातले सामान तसेच ठेवून मी (प्रेत) यात्रेत सामील व्हायला गेले. अनेक मित्र मैत्रिणी, ओळखीचे चेहरे… न बोलता एकमेकांचे हात हातात घेत, स्पर्शातून एकमेकांशी बोलण्याचे ते क्षण मला आजही आठवतात. डॉक्टरांशी अनेकदा झालेल्या गप्पा आठवतात. त्यांच्या सांगण्यावरून सातार्यात केलेला ‘व्हय मी सावित्रीबाई!’ चा प्रयोग आठवतो.
या घटनेला आता १० वर्षे पूर्ण होऊन गेली. सरकारे बदलली, खुन्यांच्या शोधाच्या उलटसुलट बातम्या आपण ऐकत राहिलो. अनेक गुन्ह्यांचा शोध लावणारी पोलीस यंत्रणा अशा घटनेबाबत हवे तसे काम का करू शकत नाही? असे प्रश्न पडले. मला महात्मा ज्योतिबा फुल्यांवर झालेला मारेकर्यांचा हल्ला आठवत राहिला. रोडे आणि कुंभार त्यांची नावे. रोडे पुढे फुल्यांचे शरीररक्षक झाले आणि कुंभारांनी ‘वेदाचार’ हा ग्रंथ लिहिला. मी सावित्रीच्या प्रयोगात लिहिले होते, ‘तवा इचार व्हता म्हून मारेकर्यांची मन पालटली’. आता विचार करण्याची क्षमताच गाडली जात आहे का?
आता तब्बल १० वर्षांनंतर कोर्टाचा निकाल आला. प्रत्यक्ष खून करणार्यांना जन्मठेप झाली. पण हा खून कसा घडवून आणायचा? कोणाला खून करण्यासाठी निवडायचे, हे कसे ठरले?, हे कोणी ठरवले? आणि का ठरवले? हे स्पष्ट करणारे पुरावे मिळाले नाहीत. आपली शासकीय यंत्रणा इतकी पोखरली गेली आहे की दोष कोणाला द्यायचा? प्रत्यक्ष घटना घडवणारी प्यादी नजरेत येतात, मात्र त्या प्याद्यांना चाल देणारा, त्या मागचा कर्ता शोधणं महत्त्वाचे असते.
समाजात ‘आम्हाला हवे ते आम्ही करणार’ असा विचार करणारे स्थिरावले तर काळ सोकावतो म्हणतात तसे घडेल याचे भान शासकीय यंत्रणांना येईल का? यातून अराजकता माजते. सुसंस्कृतता गाडली जाते. फुल्यांचा खून करायला आलेली प्यादीच सत्यशोधक समाजाबरोबर काम करायला लागली. मात्र ते कृत्य करायला पाठवणारे या मातीत होतेच आता ते सोकावले आहेत, असे म्हणायचे का?
या मातीची संस्कृती दूषित झाली आहे हे खरं आहे. हा दोष या मातीतून घालवायचा असेल तर लढत रहावं लागेल.
– सुषमा देशपांडे, नाट्य अभिनेत्री
समाजातील विवेकच संपवून टाकण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले ते कृत्य आहे
डॉक्टर दाभोलकरांचा खून हा माथेफिरू वगैरेंनी केलेला नसून अतिशय योजनाबद्ध रितीने, रेकी वगैरे करून करण्यात आलेला खून आहे. समाजातील विवेकच संपवून टाकण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले ते कृत्य आहे. ज्यांनी त्यांना मारले त्यांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले, त्यांना शिक्षा झाली हे सर्व ठीक आहे, पण ज्यांनी हे सर्व घडवून आणले ते लोक कोण होते? ते कोणत्या पंथाचे होते? कोणत्या संघटनेचे होते? कोणत्या धर्माचे होते? अशा मूळ मुद्यांकडे खटला गेलाच नाही. ते लोक हिंदू धर्माचे किंवा इतर कोणत्याही धर्माचे असोत, पण ज्यांचे हितसंबंध अंधश्रद्धेत गुंतलेले आहेत असे हे लोक होते हे मात्र निश्चित! त्यामुळे गुन्हेगार कोण? प्रत्यक्ष मारणारे की त्यांना मारण्यासाठी प्रवृत्त करणारे?
दाभोलकर महाराष्ट्राचा विवेकशील आवाज होता. दाभोलकरांचा खून हा तो आवाज संपवून समाजातील सर्वसामान्य माणसावर दहशत पसरवण्याचा मोठा कट होता. या संदर्भात मला एक मुद्दा मांडायचा आहे, या खुनानंतर समाजातील सर्व घटक या विरोधात उभे राहिले का? दाभोलकरांचे अनुयायी सोडले तर इतर सर्व गप्पच बसले. तसेच या खुनाचा गांधी खुनाशी संबंध जोडला तर जसा गांधींचा मारेकरी सापडला, पण सूत्रधार मात्र बाजूलाच राहिले. तसेच याही बाबतीत होण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे या प्रवृत्तीचा निषेध करणे आणि अशा प्रवृत्तीविरोधात लढत राहणे हेच आपल्या हातात आहे.
– प्रेमानंद गज्वी, नाटककार
उद्या अशा किती जागल्यांना संपवलं जाणार आहे?
तुम्हारे शहर का इंसाफ़ है अजब इंसाफ़ | इधर निगाह उधर ज़िंदगी बदलती है | – महबूब ख़िज़ां
हा शेर मला राहून राहून आठवतो आहे. अकरा वर्षांपूर्वी डॉ. दाभोलकरांच्या झालेल्या हत्याप्रकरणाचा निकाल नुकताच लागला. अतिशय असमाधानकारक आणि अपूर्ण निकाल वाचल्यानंतर मन खिन्न झालं. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र, विविध माध्यमांतून नाराजीचे सूर उमटू लागले. जरासा दिलासा मिळाला. किती विचित्र आहे हे! ज्या न्यायपालिकेकडून न्याय मिळाल्याबद्दल आनंद वाटणं अपेक्षित आहे, तिथे न्यायपालिकेच्या निर्णयाविरोधात उमटलेल्या नाराजीच्या सुरांमुळे दिलासा वाटावा!! अजबच!!!
ज्या समाजात लेखक, तत्त्वज्ञ, विचारवंत नसतात, तो समाज मृतवत् असतो, असं एक प्रसिद्ध वचन आहे. आपल्या समाजातील, आपल्या ‘पुरोगामी’ राज्यातील, आपल्या भाषेतील एक जागल्या संपवल्यावर, आपण त्याला न्यायदेखील मिळवून देण्यात अपयशी ठरलो, या विचारानं खचायला होतं.
अनेक प्रश्न मनात घोंघावत रहातात. भिरभिरायला होतं. आपण कुठल्या दिशेकडे वाटचाल करतो आहोत? हत्या केलेल्या एका नि:शस्त्र माणसाला कुठली व्यवस्था एवढी वचकून होती? त्या हत्येबाबत तब्बल अकरा वर्षांनंतर असा असमाधानकारक निर्णय कसा आला? हा ‘न्याय’ कसा म्हणता येईल? उशिरा मिळालेला ‘न्याय’ कुणाचं जगणं सावरतो?
डॉ. दाभोलकर गेल्यानंतर केवळ दाभोलकर कुटुंबाचंच नव्हे, तर सजग असणार्या सार्यांचंच वैयक्तिक नुकसान झालं, ते कसं भरून निघेल? हा निर्णय म्हणजे त्यांची क्रूर चेष्टाच नव्हे का? इतिहास क्रूरपणे आपलं मूल्यमापन करेल, याची धास्ती सोडा, पण लाज का वाटत नसावी? लागलेला बट्टा आपण आभूषण म्हणून कसे मिरवू शकतो? आपण खरोखरच एक प्रगत सामाजिक प्राणी आहोत काय? उद्या अशा किती जागल्यांना संपवलं जाणार आहे? लेखक, तत्त्वज्ञ, विचारवंत हे अल्पसंख्याकच असतात. बलाढ्य सामाजिक व्यवस्थेला हेच अल्पसंख्याक योग्य दिशेकडे नेत असतात. ते जिवावर उदार होऊनच काम करत असले, तरी त्यांनी निर्धास्तपणे काम करावं, अशी व्यवस्था आपण केव्हा आणू शकणार आहोत…?
एक ना अनेक प्रश्न..! पण प्रश्न पडत असतील, तरच उत्तरं मिळवता येतात, एवढंच मला ठाऊक आहे. डॉक्टरांच्याच लेखनातून हे समजलं आहे. ‘रिस्क’ घेऊनच जगण्याचा हा काळ आहे.
इतरांचं मी काय सांगू? मी माझ्यापुरतंच बोलेन. मी प्रश्न विचारत राहीन. आवाज लावत राहीन, अस्वस्थ करत राहीन. मी एकटा आहे. मी दाभोलकर आहे. और… स़िर्फ एक बंदा काफ़ी है|
– अक्षय शिंपी अभिनेता, कवी, दास्तानगो