प्रभाकर नानावटी -

स्वतःला परमेश्वरी कृपा झालेली आहे, असे समजून वागणार्या बाबा भोलेनाथला रंगांची उधळण करणे व जास्तीत जास्त कर्कश आवाज ऐकवणे (आणि ऐकणे) फारच आवडत असावे. उंचावर बांधलेल्या स्टेजच्या मध्यभागी असलेल्या सोनेरी सिंहासनावर बसून पांढर्या शुभ्र कपड्यात (व डोळ्यावर काळा गॉगल घालून) तो सत्संगाची प्रवचनं झोडत असतो. त्याच्या भक्तांचा नव्हे, ‘सेवादारां’चा समुद्र त्या स्टेजच्या समोर रंगीबेरंगी फुलांच्या हारांची वर्तुळाकार मांडणी केल्यासारखा बसलेला असतो.
सगळ्यात बाहेरच्या वर्तुळात लाखो भक्त, त्यातही विशेष करून महिला बसलेल्या असतात. सत्संगाला येणार्या या महिलांना रंगीत साडी नेसून येण्याचा आदेश दिलेला असतो. नववधूच्या वेशातील तरुण मुली पहिल्या रांगेत बसवलेल्या असतात. त्या स्वतःला ‘बाबांच्या गोपिका’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. त्यांच्यानंतरच्या तीन ओळी रंगीत कपडे घातलेल्या महिला सुरक्षारक्षकांची असते. त्यातील पहिली ओळ गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या व टोपी घातलेल्या ‘नारायणी सेने’ची असते. दुसरी ओळ तपकिरी रंगाचे कपडे घातलेल्या ‘हरी वाहकां’ची असते. बाबांच्या जवळच्या ओळीमध्ये काळ्या रंगाचे गणवेश घातलेली शस्त्रधारी गरुड सेना असते. त्याच्या भक्तगणात महिलांचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे बाबाच्या सुरक्षादलातसुद्धा महिलाच मोठ्या प्रमाणात असतात.
“मी सत्संगाला आलेल्या भक्तांना पाणी देण्याचे काम करते.” बुलंदशहरची प्रेमावती मोबाइलवरील फोटो दाखवत सांगत होती. नारायणी सेनेची सदस्य म्हणून गेली २० वर्षे सेवा करत होती. बाबांचे जादुई तीर्थ प्यायल्यानंतर तिची व तिच्या कुटुंबाची समृद्धी होत गेली. “माझा पती प्रधान (सरपंच) झाला. माझ्या तिन्ही मुलांना नोकर्या मिळाल्या. हे सर्व या प्रभुजीच्या आशीर्वादामुळे शक्य झाले,” ती भरभरून बोलत होती.
२ जुलै २०२४ रोजी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या दिवशी हाथरस जिल्ह्यातील फुलराई येथील बाबाच्या सत्संगाला प्रेमावती हजर होती. या दुर्घटनेत १२१ भक्त मृत्यू पावले. संयोजकांनी ८० हजार भक्तांच्यासाठी परवानगी घेतली होती; परंतु सुमारे अडीच लाख भक्त सत्संगाला होते. चेंगराचेंगरीचे कारण शोधताना सत्संग संपल्यानंतर गर्दीतील भक्तांना बाहेर पडत असलेल्या बाबांच्या पायधुळीला माथे टेकवायचे होते. विशेष तपासणी पथकांनी ‘बाबाची यात काही चूक नाही.’ म्हणून त्याला निर्दोष सोडून दिले. जी काही चूक होती ती स्थानिक संयोजकांची होती व त्यांना दुर्घटनेबाबत जबाबदार ठरवण्यात आले. पोलिसांनी ११ जणांना अटक करून खटले भरले; परंतु या दुर्घटनेमुळे बाबा भोलेनाथवरची श्रद्धा कमी होण्याऐवजी आणखी दृढ झाली. त्याच्या अनेक आश्रमांसमोर लोक गर्दी करू लागले. त्याच्या पूर्वीच्या राहत्या घराला तीर्थस्थानाचे स्वरूप आले. या सर्व भक्तांना जादुई तीर्थ हवे होते. जिथे जिथे ते जातील तिथे तिथे ‘नारायण साकार हरी’च्या घोषणा ऐकू येत होत्या.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील बिचुवा या खेड्यातील सोनेरी रंगाने रंगविलेले गेट असलेल्या आश्रमात हाथरसच्या दुर्घटनेनंतर हा बाबा काही दिवस लपून बसला होता. बाहेर पाळतीला असलेले पोलीस मात्र ‘आत कुणीही नाही’ यावर ठाम होते. बिचुवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राकेश शर्मा यांनीसुद्धा या आश्रमात चोवीस तास कडक पहारा असून आत-बाहेर येणार्या-जाणार्यांची नोंद ठेवली जाते, असे सांगितले; परंतु गावकरी व मोलमजुरी करणारे मात्र यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
“बाबा आतच आहे. मला माहीत आहे. मला माझ्या मुलासाठी त्याचा आशीर्वाद हवा आहे,” आश्रमाच्या तीस फुटी उंच असलेल्या गेटच्या बाहेर डोके टेकून बसलेली पन्नाशीतील एक बाई सांगत होती. बाबा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो व त्यासाठी एक रुपयाही घेत नाही. आणखी काय हवे? हा तिचा सवाल होता.
चौदा एकर शेतजमिनीत बांधलेल्या या आश्रमाच्या (फार्महाउसच्या) गच्चीवर पांढरे पताके फडफडत असतात. उंच कंपाउंडमुळे किल्ल्यासारख्या दिसणार्या या आश्रमाच्या भोवती सुरक्षा रक्षकांच्यासाठी लहान लहान घरं आहेत. सर्व माहोल एखाद्या भक्कम किल्ल्यासारखा दिसतो.
बाबांच्या संमतीने स्थापन केलेल्या राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टचा सदस्य असलेला संजीवकुमार सेंगर आश्रमाचा कारभार पाहतो. बाबाला खासगी आयुष्य आहे. त्यामुळे तो पत्रकार व माध्यमापासून दूर राहतो. सेंगर सांगत होता. हा आश्रम २०२० साली बांधला आहे. विनोदबाबू नावाच्या स्थानिक सेवादाराने ही जमीन दान म्हणून दिली. तेथील एका बोर्डवर देणगीदारांची नावे (हातानी) लिहिलेली होती. त्यात २ हजार रुपयांपासून अडीच लाख रुपयांपर्यंतची देणगी मिळालेले आकडे होते. हाथरसच्या चेंगराचेंगरीनंतर हा बाबा त्याच्या मैनपुरी आश्रमात पोलिसांपासून लपून बसला आहे, असा अंदाज दर्शविला जात होता. त्याचे सेवादार व त्याचा भानगडीखोर वकील एपी सिंग असे काही घडले नाही यावर भर देत होते. एपी सिंगच्या मते बाबाचे सेवादार हे स्वयंसेवक असून त्यांचा बाबांशी थेट संबंध नसतो. बाबा अशा क्षुल्लक-लौकिक व्यवहारात कधीच लक्ष घालत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हाथरसच्या पोलीस तपासणीत बाबा कुठे लपून बसला आहे हे कळले नसले तरीही त्याच्या साम्राज्याच्या मालमत्तेचे व उत्पन्नाचे आकडे कळू लागले. सुमारे १०० कोटींच्या जवळपास त्याचे उत्पन्न होते हे लक्षात आले. तपास यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकार्यांच्या मते या बाबाचे खरे उत्पन्न किती हे कधीच कळणार नाही. कारण तो कधीच प्रसिद्धीच्या झोतात नव्हता व त्याच्या सर्व व्यवहाराभोवती गुप्ततेचे वलय होते.
त्याच्या बहुतेक भक्तगणांमध्ये दलित वर्गाचा भरणा जास्त होता. बाबा हा अमर असून तो धर्म व जात या पलीकडचा आहे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल कुणाचाही विश्वास बसत नव्हता. सगळी मालमत्ता ट्रस्टच्या नावे आहे, बाबाचा यात काही हात नाही. ट्रस्टची रचना व व्यवस्थापन भक्तच करतात, बाबाचा यात काही संबंध नाही, याबद्दल ते सर्व ठाम होते. मैनपुरी आश्रमात राहणारा मिलिटरीतील एक निवृत्त जवान, बीर पाल सिंग, बाबानी त्याच्या बायकोच्या मूत्रकोशावर उपाय केला. तेही फुकट, सांगत होता. अजून एक सेवादार, अजय प्रतापच्या मते बाबा चांगले डॉक्टर आहेत. प्रभुजीवरील सर्व आरोप खोटे असून तो उच्च जातीचा बळी ठरत आहे.

मेटामॉर्फासिस (रूपबदल)
आग्र्याहून १३५ किलोमीटरवर बहादुरनगर हे गाव आहे. हे सुरजपाल सिंग जाटव उर्फ ‘बाबा भोलेनाथ’ उर्फ ‘नारायण साकार हरी’ याच्या पूर्वजाचे हे गाव आहे. त्याच्या जन्मस्थानाच्या प्रीत्यर्थ येथे बाबाचा एक आश्रम बांधलेला आहे. श्री नारायण साकार हरी चॅरिटेबल ट्रस्ट या आश्रमाची व्यवस्था बघते. त्यांच्या मते हे एक पवित्र स्थान आहे. तेथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. आश्रम बांधत असतानाच मिलिटरी टाइप औटपोस्ट व त्यात शस्त्रधारी सुरक्षा सैनिक अशी व्यवस्था केली असून २४ तास पाळी पाळीने सुरक्षा सैनिकांचा कडक पहारा ठेवला जातो.
१९६८साली एका दलित कुटुंबात जन्मलेला सुरजपाल तीन भावांमधील मोठा मुलगा. एका भावाचा मृत्यू झाला व लहान भावाने कुटुंबाशी संबंध तोडलेले होते. बहादुरनगरमधील घरात कुणीही राहात नाही; परंतु अधून मधून लहान भावाचा मुक्काम तेथे असतो. सुरजपालची वयस्कर बहीण, सोनकलीच्या मते सुरजपाल अगदी लहानपणापासून देव-धर्माच्या मागे लागलेला होता. खन्नाजीच्या मते सेवादारांच्या जिवाला धोका पोचू नये म्हणून एवढी कडक सुरक्षा व्यवस्था आहे.
बाबाच्या अनेक नावांप्रमाणे त्याच्या अनेक नोकर्या आहेत. १९८०च्या सुमारास त्याने घोटिया खेड्यातील प्रेमावती या मुलीशी लग्न केले. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशमध्ये पोलीस म्हणून नोकरी केली. १८ वर्षे त्याने कॉन्स्टेबल म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी काम केले. बहुतेक वर्षे तो आग्रा येथेच होता. आग्रा येथेच सूरजपाल सिंग जाटव याचा बाबा भोलेनाथ म्हणून रूपबदल (चशींरोीहिेीळी) झाला. त्याचा पूर्वीचा शेजारी, इर्फान खानला तो पोलिसाचा बाबा कसा झाला याचा साद्यंत इतिहास आठवत होता.
२००० साली त्याने पोलिसाची नोकरी सोडली व प्रवचनावर भर देऊ लागला. हेड कॉन्स्टेबल म्हणून नोकरी सोडल्याचा पुरावा अलीगड रेंजच्या आय.जी.च्या ऑफीसने दाखविले. आग्राच्या शहागंज पोलीसांच्या म्हणण्यानुसार सूरजपाल सिंग तेथे पोस्टिंगवर असताना लहान मोठ्या आजारांवर औषधं देऊन रुग्णांना बरे करत होता. नोकरी सोडायच्या अगोदर त्याने एक मृत म्हणून घोषित केलेल्या १६ वर्षे वयाच्या तरुणीला जिवंत केल्याची फुशारकी मारली. इतर काही पोलीस त्याने महिलांचा मानभंग केल्यामुळे नोकरीवरून काढले असेही सांगतात. काही का असेना, या फ्लॅटमध्ये त्याला दैवी साक्षात्कार झाला हे नाकारता येत नाही व येथेच त्याने मृत व्यक्तीला जिवंत केले होते, खान सांगत होता.
२००० साली १६ वर्षांच्या मुलीला जिवंत केल्याच्या तथाकथित दाव्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. खरे पाहता तिचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला होता. आग्रा येथील किशनलाल या वकील भक्ताने तो चमत्कार प्रत्यक्ष बघितला आहे असे सांगत होता. ही मुलगी बाबाच्या बायकोच्या मेवा राम या भावाची मुलगी होती. या पती-पत्नींना मुलं नसल्यामुळे ती त्यांच्या घरातच राहात होती. ती मेल्यानंतर बाबाने तिचे प्रेत घरातच दोन दिवस ठेवले होते म्हणे. मेवा राम इटाह या गावात राहात होता. तसे काही घडले नाही ही सगळी जुनी गोष्ट आहे. बाबाची त्यात चूक नाही, असे तो म्हणत होता. जरी केस दाखल केली तरी त्याच वर्षी ती केस बंदही करून टाकली.
सांगोपांगी गोष्टी
बाबा जिथे यापूर्वी राहात होता त्या घराच्या तीन मजली फ्लॅटमध्ये संपूर्ण कायापालट त्याच्या सेवादारांनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून केला आहे. संपूर्ण फ्लॅट लोखंडी सळयांनी बंदिस्त केला आहे. खानच्या घराच्या व त्याच्या चप्पल-बूटच्या गोडाऊनची आणि बाबाच्या नवीन फ्लॅटची भिंत सामायिक आहे. फ्लॅटची डागडुजी करताना खानच्या घराच्या भिंतीला तडा गेला.
अगोदर तो एका छोट्या घरात राहत होता. २०२०ला त्याचे भक्त बाबाच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी देणगी गोळा करू लागले. आमच्या दोन्ही घराच्या भिंती सामायिक आहेत. घराची तीन मजली इमारत बांधताना कुठलेही प्लॅन नाही, कायदेशीर परवाना नाही व माझ्या घराचे जे नुकसान झाले त्याची सेवादाराकडून भरपाई नाही, खान सांगत होता.
हे आग्र्यातील तथाकथित सेवादार ट्रस्टशी संबंधित नव्हते. सितारा या अजून एक शेजारणीने या फ्लॅटमध्ये बाबा कधीच राहायला येत नाहीत. त्याच्या सेवादाराकडे चाव्या असून ते या फ्लॅटचा गैरकृत्यासाठी वापर करतात, कित्येक वेळा तरुण बायका येथे गर्दी करतात. अशी तक्रार केली. बाबा निपुत्रिक वधूला तू गर्भिणी होशील असा आशीर्वादही देत असतो. तिची टिप्पणी.
गेली काही वर्षे बाबांचा ठावठिकाणा घेणार्या इटाह येथील एका वरिष्ठ पत्रकारांच्या माहितीप्रमाणे बाबांच्या आश्रमात अनेक महिला सेवादार म्हणून राहतात; परंतु बाबांचे भक्त मात्र या सर्व आरोपांना खोडून काढतात. दैवी शक्ती प्राप्त केलेले बाबा नेहमीच दलित व वंचित यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतात. त्यांना नैतिकता शिकवितात व चांगले जीवन कसे जगावे या संबंधी पाठ देतात.
तो भक्तांना दारू पिऊ नका, मांसाहार करू नका. नारायण हरीचा मार्ग चोखाळल्यास, त्याच्या वचनाप्रमाणे वागल्यास आपले जीवन सुखमय होते, आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. बहादुरनगर येथील पतियाळी आश्रमापासूनच्या काही अंतरावरील शेतात काम करणारी रेष्मादेवी सांगत होती. ट्रस्टचा स्थानिक सदस्य असलेला खन्नाजीसुद्धा रेष्मादेवीच्या विधानांची पुष्टी करत होता. बाबा नेहमीच त्यांच्या शिष्यांना कामिनी व कांचनापासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. व्यसनांच्या आहारी जाऊ नका, असा उपदेश करत असतात.
बहादुरपूर येथील किल्लेवजा आश्रमासमोर ओळीने हँड-पंप्स आहेत. स्थानिकांची व भक्तांची या पाण्यात जादुई शक्ती असून ते अमृतजल आहे यावर श्रद्धा आहे. बुलंदशहरहून स्वतःच्या नवीन कारमधून कमल सिंग पतियाळीला दर्शनासाठी आला होता व परत जाताना मोठ्या बाटलीत येथील पाणी घेऊन ते कारवर शिंपडत होता. कारला अपघातापासून हे पवित्र जल वाचवते. त्याचा बचाव. दर पंधरा दिवसांनी वा महिन्यांनी आश्रमातील सेवादार बदललेले असतात. नवीन स्वयंसेवक येतात. जे परत जातात ते प्रभुजींच्या दैवीशक्तीविषयी लोकांमध्ये प्रचार करतात. कारण त्यांना पुन्हा एकदा तेथे कामाला यायचे असते. आश्रमातील सेवादारांसाठी लागणारी भाजी पुरविणारा मोहित सांगत होता.
दिल्लीस्थित मनोविकारतज्ज्ञ डॉ. निमेश देसाई स्पष्ट करतात की, भ्रामक विश्वास वा (अंध)श्रद्धेमुळे धार्मिक गुरूंचे, आध्यात्मिक गुरूंचे गट आणि पंथ व त्यांना बळी पडणारे अनुयायी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी आहेत. धार्मिक किंवा आध्यात्मिक-आधारित गटांच्या ढिली, सोपी व सुलभ रचना आणि नियमामुळे अनुयायींचे दैनंदिन क्रियाकलापांमध्ये भाग घेणेदेखील फायदेशीर असू शकते. सत्संगासारख्या सामूहिक कार्यक्रमात भाग घेतल्यावर अनेकांना, विशेषत: स्त्रियांना, मानसिक समाधान आणि तणावातून मुक्तीचा अनुभव मिळाल्यासारखे वाटते. या सत्संगांच्या गटांमध्ये सामान्यतः अधिक प्रमाणात ‘उच्चभ्रू’ फॉलोअर्स असतात व अनुयायांना अशा गटामध्ये असणे अभिमानास्पद वाटते. तेथे ‘आध्यात्मिक कल्याण’ या कल्पनेवर जोर देतात. देसाई म्हणतात, “सत्संगाचे आयोजन व भलावण करणारे व त्यात हिरिरीने भाग घेणारे निदान केलेले वा निदान न केलेले मनोरुग्ण वा मानसिक समस्या असलेल्या व्यक्ती असू शकतात. हेच लोक फसव्या पंथांचे किंवा गटांना बळी पडण्याची अधिक शक्यता असते.”
या संदर्भात अनुयायांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती यावरून त्या व्यक्तीची पत मोजली जाते. कटक येथील रेवेनशॉ विद्यापीठातील समाजशास्त्र संशोधक, स्वाती रथ, यांनी नमूद केले आहे की, ‘अनेकांसाठी, विशेषत: उपेक्षित जातींमधील लोकांसाठी, ‘देवमाणूस’ चे अनुसरण केल्याने ‘पारंपारिक धर्मा’मध्ये भाग न घेता अध्यात्म प्राप्त करण्याचा आणि धार्मिक समावेशकता अनुभवण्याचा मार्ग मिळू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या या दलित, वंचित व दारिद्य्रातील समुदायांना सामाजिक उपक्रमात वगळलेले असते, त्यांच्याबाबत भेदभाव केलेेला असतो. गॉडमन, गुरू किंवा ‘देवाचा संदेशवाहक’ यांचे अनुसरण केल्याने लोक, विशेषत: अत्याचारित आणि उपेक्षित वर्गातील स्त्रिया, त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण शोधतात. खरे पाहता त्या अशा तातडीने सोडविल्या जाणार्या समस्या नसतात आणि वास्तवात सोडवल्याही जाऊ शकत नाहीत.
हाथरसच्या चेंगराचेंगरीमध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबीयामध्ये आपली प्रिय व्यक्ती हकनाक गेली याचे काहींना अपार दुःख झाले असेल; परंतु चेंगाराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी उपायही संबंधितांकडे नसतील. मात्र या दुर्घटनेमुळे आसपासच्या गावात असलेल्यांच्यामध्ये दोन तट पडले आहेत. फुलराईपासून ७० किलोमीटर्स दूरवरील दौकेली गावातील ५७ वर्षांच्या सावित्रीदेवीने चेंगराचेंगरीत जीव गमावला. तिचे पती, बिर्पाल सिंग यांच्या मते या बाबाला इतक्या घाईघाईने क्लीन चिट द्यायला नको होती. येथे राजकारण खेळले जात आहे. दलितांच्या व्होटबँकेला धक्का लागू नये म्हणून बाबाला कुणीही धक्का लावू शकत नाहीत. बाबा खरोखरच निर्दोष असेल तर तो असे लपून का बसतो? तो बाहेर येऊन आपल्या भक्तांचे सांत्वन का करत नाही?
नया नांगला या हाथरसच्या जवळच्या गावातील दोन वृद्ध महिलांचा या चेंगराचेंगरीत जीव गेला. तेथील त्यांचे शेजारी व कुटुंबीय बाबांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचा आग्रह धरत आहेत. बाबाला पकडून शिक्षा द्यायला हवी, निदान त्याची उलटतपासणी तरी करायला हवी.
हाथरसच्या दुर्घटनेत मरण पावलेल्या आशादेवीची मुलगी मोहिनीने तिच्या आईने देव्हार्यात ठेवलेल्या बाबा भोलेनाथचा फोटो बाहेर फेकून दिला. माझी आई एक साधी भोळी बाई होती व तिचा बाबाच्या चमत्कारावर अढळ विश्वास होता. ती सांगत होती.
चेंगराचेंगरीत कितीही लोक मरू दे, तथाकथित बुवा बाबा कितीही लूटमार करू दे, बाबा-बुवावरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.
(संदर्भ : आऊटलूक)