वंदना माने -
माने दांपत्याचा समाजाला नवा वस्तुपाठ!
पारंपरिक रूढी-परंपरा आणि थाटामाटाच्या खर्चाला फाटा देत सातारा येथील विवेकवादी दांपत्याने समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते वंदना माने व डॉ. दीपक माने यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत सोहळ्यात उपस्थितांना महागड्या भेटवस्तूंऐवजी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ रुजवणारी पुस्तके भेट देऊन हा सोहळा खर्या अर्थाने ‘विज्ञान प्रसार सोहळा’ म्हणून साजरा करण्यात आला.
नोंदणी पद्धतीने विवाह आणि बिना मुहूर्ताचे स्वागत – शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे मुलीचा विवाह अत्यंत साधेपणाने ‘नोंदणी’(रजिस्टर) पद्धतीने पार पडला. त्यानंतर दुसर्या दिवशी, म्हणजेच रविवारी (दि. १३ सप्टेंबर) सातार्यात कोणत्याही भ्रामक मुहूर्ताची वाट न पाहता बिना मुहूर्त लग्न स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता.
३०० हून अधिक पुस्तकांचे वाटप – या स्वागत समारंभाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या प्रत्येक पाहुण्याला शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांवर आधारित व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे पुस्तक भेट देण्यात आले. सोहळ्यात आलेल्या ३०० हून अधिक उपस्थितांच्या हाती भेट म्हणून दिलेले पुस्तक दिसत होते, ज्यामुळे विवाह सोहळ्याला एका प्रबोधन सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अनावश्यक खर्चाला फाटा आणि धान्याची बचत – लग्नामध्ये अक्षता म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी हजारो किलो तांदूळ/धान्य वाया जाते. याशिवाय वाजंत्री, घोडा, बँड बाजा आणि प्रदूषण करणारे फटाके यावर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. या अनावश्यक खर्चाला आणि पर्यावरणाच्या हानीला आळा घालण्याच्या उद्देशानेच माने दांपत्याने हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि वैचारिक अधिष्ठान देऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
“लग्नातील अनावश्यक खर्च आणि परंपरांच्या नावाखाली होणारी अन्नाची व पैशांची नासाडी थांबली पाहिजे. समाजात वैचारिक प्रगल्भता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे काळाची गरज आहे. याच विवेकी विचारांचा प्रसार समाजापर्यंत व्हावा, यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे.”
-वंदना माने व डॉ. दीपक माने (कार्यकर्ते, म.अं.नि.स.)
