धार्मिक ध्रुवीकरणाला रोखण्याचे आव्हान

-

या चार पुस्तिकांमधून प्रेरणा घेऊन नवी तरुणाई या चौघांचं अपूर्ण राहिलेलं काम नकीच पूर्ण करेल. त्यासाठी या पुस्तिकांचा प्रसार महाराष्ट्रातील गावागावांमध्ये आणि शाळा-शाळांमध्ये व्हायला पाहिजे.
– संग्राम गायकवाड

            कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?, कोण होते कॉ. गोविंद पानसरे?, कोण होते डॉ. एम. एम. कलबुर्गी? आणि कोण होत्या गौरी लंकेश? या चार पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन ज्येष्ठ सिने दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचे हस्ते पुणे येथे मराठवाडा मित्रमंडळाच्या ज्ञानेश्वर सभागृहात २१ ऑगस्ट रोजी झाले. त्याप्रसंगी निवृत्त सनदी अधिकारी संग्राम गायकवाड यांनी प्रमुख वक्ते म्हणून केलेल्या भाषणाचे संपादित शब्दांकन आम्ही देत आहोत.

२०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे एका पाठोपाठ एक खून करण्यात आले. या चारही जणांनी आपापल्या क्षेत्रात मोलाचं काम केलं होतं. आपल्या सगळ्यांना दीपस्तंभाप्रमाणे वाट दाखवणारी ही माणसं होती. आपल्या सगळ्यांना मुळापासून हादरवून टाकणार्‍या अशा या घटना होत्या. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमांशी आम्ही कॉलेजमध्ये असताना जोडलेलो होतो. त्यानंतर नोकरीच्या काळात कोल्हापुरात असताना पानसरे सरांचं काम मग ते साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातलं असो की वंचितांसाठीच्या चळवळींचे असो, ते मला जवळून बघायला मिळालं होतं. त्यामुळं मला स्वतःला सुद्धा या घटनांमुळे प्रचंड धका तर बसलाच होता; शिवाय मनाला अतिशय वेदना झाल्या होत्या. मी मूळचा सोलापूरचा असल्यामुळे बसवेश्वरांच्या सामाजिक क्रांतीबद्दल आणि वचन साहित्याबद्दल मला माहिती होती. सिद्धेश्वर प्रशाला या माझ्या शाळेचं बोधवाक्यच मुळी ‘कायकवे कैलास’, म्हणजेच कार्य हाच ईश्वर, हे वचन साहित्यातूनच घेतलेलं वाक्य होतं. त्यामुळे वचन साहित्याचे मोठे अभ्यासक असलेल्या प्रा. कलबुर्गींसारख्या विचारवंताच्या हत्येचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं होतं. त्यानंतर पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. त्यांनी पण धार्मिक द्वेष पसरवणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात निर्भीडपणे लढा दिला होता.

आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, या चारही हत्यांच्या मागे असलेल्या शक्ती एकाच विचारानं  प्रेरित झालेल्या होत्या. आतापर्यंतच्या तपासातून जे काही निष्कर्ष निघाले आहेत त्यानुसार या चारही हत्या घडवून आणणार्‍या व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांचा संबंध कडव्या हिंदुत्ववादी संघटनांशी आहे. CBI असेल, कर्नाटक SIT असेल किंवा महाराष्ट्र ATS असेल या सगळ्यांनी दाखल केलेल्या चार्जशीट्समध्ये एका कडव्या हिंदुत्ववादी संघटनेचं नाव आलेलं आहे. यापैकी फक्त दाभोलकरांच्याच केसमध्ये स्पेशल कोर्टाचा निकाल आला आहे. बाकी केसेसमध्ये आपण अजूनही निकालाची वाट बघत आहोत.

            या चारही केसेस मधली चार्जशीट्स बघितली तर आपल्याला काय लक्षात येतं? या चारही हत्यांच्या मुळाशी एकतर हिंदू असण्याबद्दलच्या, दुसरं म्हणजे भारतीय असण्याबद्दलच्या आणि गैरहिंदू धर्मीयांविषयीच्या टोकाच्या कर्मठ आणि पक्क्या भूमिका होत्या. वरवर पाहता आपल्याला काय वाटतं? की या कडव्या संघटना, ज्यांना इंग्रजीत आपण fringe elements म्हणतो तशा आहेत. पण ते तसं नाहीय over the period आपल्या सगळ्यांच्याच हे लक्षात येत गेलंय की, या सगळ्या संघटना या काळाच्या आणि अवकाशाच्या प्रदीर्घ अशा पटलावर अतिशय काळजीपूर्वक विणल्या गेलेल्या इकोसिस्टीमचा सुसंबद्ध अशा भाग होत्या.

त्यानंतरच्या दहा वर्षांच्या काळात आपल्याला काय बदल झालेला दिसतो? तर…. या ज्या कडव्या  संघटना आहेत त्यांची कामाची पद्धत तर बदललीच पण त्यांचे हिंदुत्ववादी इकोसिस्टीमच्या मुख्य प्रवाहात असलेल्या संघटनांशी असलेले संबंध सुद्धा बदलले. आता काय झालंय? या सगळ्या so called fringe elements म्हटल्या जाणार्‍या लोकांच्या ज्या काही कृती आहेत, व्यक्त केले जाणारे विचार आहेत किंवा घोषणा आहेत या सगळ्यांचं मुख्य प्रवाहीकरण किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉर्मलायझेशन म्हणतो, तसं झालेलं दिसतंय. मग त्या  नथुराम गोडसेचं गौरवीकरण करणार्‍या कृती असोत किंवा ‘देश के गद्दारों को गोली मारो सालों को’ सारख्या घोषणा असोत किंवा बलात्कारासारख्या गंभीर अपराधासाठी शिक्षा भोगून आलेल्या लोकांचा सत्कार करणं असो.

या अत्यंत निराश करणार्‍या पार्श्वभूमीवर नुकतंच जेन झी तरुणाईनं जे आंदोलन केलं ते अतिशय दिलासा देणारं आहे. आज ज्या चार व्यक्तींविषयीच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं, त्या व्यक्ती आणि आंदोलन करणारी तरुणाई यांच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टींचं साधर्म्य मला दिसतं. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्भय असणे. सत्तेचा दुरुपयोग करून आपलं जगणं कठीण केलं जाऊ शकतं याची कल्पना असताना सुद्धा या तरुण मंडळींनी अतिशय सहजपणे आणि बिनधास्त पद्धतीनं भीतीचं हे सावट धुडकावून लावलं. दुसरं साम्य म्हणजे,  व्यक्तिगत कोशातून बाहेर पडून सामाजिक प्रश्नासाठी पदराला खार लावून घेण्याची तयारी ठेवून केलेली कृती. नीटच्या आंदोलनानंतर या मंडळींनी आता शालेय शिक्षणाचा प्रश्न हातात घेतलाय. यावरून हे लक्षात येतंय की, या तरुणांचा सामाजिक प्रश्नांबद्दल असलेल्या आस्थेचा परीघ किती मोठा आहे. तिसरं साम्य म्हणजे, धार्मिक मुद्यांवरून केल्या जाणार्‍या ध्रुवीकरणाचा निषेध. महत्त्वाच्या गोष्टींवरती बोलायचं सोडून तुम्ही हे हिंदू-मुसलमान, हिंदू-मुसलमान करणं बंद करा, असं या तरुणांनी स्पष्ट शब्दात बजावलं. मुस्लीम द्वेषाच्या भावनेचा उपयोग इंधन म्हणून करण्याच्या रणनीतीला दिलेला हा ठाम नकार महत्त्वाचा होता. या तीनही बाबतीत एका प्रकारे तरुणाईने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचाच वारसा कळत-नकळत पुढे चालवलेला आहे. त्यामुळे या तरुण मंडळींना त्यांच्या समृद्ध वारशाची जाणीव करून देण्यासाठी या चारही व्यक्तींची चरित्रं त्यांच्यासमोर आणली जाणं आवश्यक होतं. ते काम आज करण्यात आलं आणि मला त्यामध्ये सहभागी होता आलं, याचा मला आनंद आहे.

या चारही पुस्तिका अतिशय सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहिलेल्या आहेत. यामध्ये या चारही व्यक्तींच्या चरित्राचे महत्त्वाचे तपशील उत्तम पद्धतीने दिलेले आहेत. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या पुस्तकांमध्ये या प्रत्येक व्यक्तीने केलेल्या सामाजिक कार्याची आणि त्यांच्या योगदानाची माहिती नेमकेपणाने दिलेली आहे. दाभोलकर सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशिवाय किती वेगवेगळ्या चळवळींमध्ये आणि मोहिमांमध्ये भाग घेतला होता हे या पुस्तिकेमधून मला सुद्धा पहिल्यांदाच समजलं. डॉक्टर कलबुर्गी या ऋषितुल्य संशोधकानं वचन साहित्याच्या संग्रहाचं, कन्नड शिलालेखांच्या संशोधनांचं आणि संत साहित्यिकांच्या ग्रंथांच्या संपादनाचं डोंगराएवढं काम तपश्चर्या करावी अशा निष्ठेनं करून ठेवलं आहे, हे मला या पुस्तिकेमधूनच समजलं. या चारही अलौकिक व्यक्तींनी हौतात्म्य पत्करलं त्या घटनांना दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यामुळे नव्या पिढीतील तरुणांना, ज्यांना हल्ली जेन झी आणि जेन अल्फा असे म्हणतात, या पुस्तिकांमधून या चारही व्यक्तींचा परिचय उत्कृष्ट पद्धतीने होईल याची मला खात्री वाटते. म्हणूनच या पुस्तकांचा प्रसार महाराष्ट्रातील गावागावांमध्ये आणि शाळा-शाळांमध्ये व्हायला पाहिजे.

आज यानिमित्ताने मला एक जागरूक नागरिक म्हणून, लिहिणारा माणूस म्हणून आणि प्रशासनात तीन दशकं काम केलेला अधिकारी म्हणून तीव्रतेने जाणवणार्‍या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर बोलायचं आहे.

पहिला मुद्दा हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा आहे किंवा अधिक नेमकेपणानं सांगायचं तर मुस्लीम द्वेषाबद्दलचा आहे. या मुद्याचा संबंध हिंदुत्वाच्या, भारतीयत्वाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या संकुचित संकल्पनेशी सुद्धा आहे. मुळात हिंदू ही संकल्पना आस्थांचा, श्रद्धांचा, परंपरांचा आणि मूल्यांचा वैविध्यपूर्ण असा खूप मोठा पट सामावून घेणारी आहे. यामध्ये नास्तिकांपासून, निसर्गपूजकांपासून, शैवांपासून, वैष्णवांपासून, वारकर्‍यांपासून, महानुभावांपासून ते वैदिकांपर्यंत सगळेच येतात. खर्‍या हिंदू धर्माचं स्वरूप ओपन सोर्स पद्धतीचे, वेगवेगळ्या बंडखोर पंथांना आणि विचारांना अवकाश देणारं आणि अतिशय खुलं असं आहे. यामध्ये “यज्ञ करणे, तीन वेद रचणे, त्रिदंड धारण करणे आणि अंगाला राख फासणे; या सर्व गोष्टी बुद्धी आणि पुरुषार्थ नसलेल्या लोकांनी स्वतःच्या उपजीविकेसाठी बनवलेल्या युक्त्या आहेत”, असं म्हणणारा चार्वाक आहे. तसेच ब्राह्मणांना मर्म/खरे तत्त्व कळत नाही; ते केवळ चार वेदांचे पठण करीत राहतात. माती, पाणी आणि कुश घेऊन ते मंत्रोच्चार करतात; घरात बसून अग्नीत आहुती देतात, असं म्हणणारे आठव्या शतकातले सरहपा आहेत. मंदिराचे खांब माझे पाय आणि डोके सोन्याचा कळस आहे, कूडल संगमेश्वरा माझे ऐक, जे स्थिर आहे त्याचा नाश ओढवतो, परंतु जे चल आहे ते चिरंजीव, असं म्हणणारे बसवेश्वर आहेत.

संस्कृत वाणी देवे केली|
तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली|
असं म्हणणारे एकनाथ आहेत.

आणि

महारासी शिवे| कोपे ब्राह्मण तो नव्हे॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं| देहत्याग करितां नाही॥२॥
नातळे चांडाळ | त्याचा अंतरीं विटाळ ॥३॥
ज्याचा संग चित्तीं| तुका म्हणे तो ते याती॥४॥

असं म्हणणारे तुकारामसुद्धा आहेत. असं असताना अब्राह्मणी धर्मांची भ्रष्ट नकल करणारे, हिंदू धर्मात मुळातच असलेलं औदार्य टाळून अतिशय एकजिनसी, आक्रमक आणि ओसाड असं चित्र रंगवणारे कडवे हिंदुत्ववादी हेच खरे हिंदू धर्माचे शत्रू आहेत.

हिंदू धर्माचं एकजिनसी स्वरूप रंगवण्याची ही सगळी प्रक्रिया आधुनिक काळातली आहे. भारताचा एक आधुनिक राष्ट्र म्हणून विचार करताना पाश्चात्त्य पद्धतीच्या नेशन या संकल्पनेचं हुबेहूब अनुकरण करण्याच्या प्रयत्नातून हे एकजिनसीकरण घडवलं जात आहे. सतराव्या शतकाच्या आसपास  युरोपात उदयाला आलेल्या ‘नेशन’ या संकल्पनेनं प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसेला उत्तेजन दिलं. त्याचा परिणाम म्हणून नेशन या संकल्पनेच्या उदरात असलेली ही सगळी विपरीतता जगाच्या इतर भागातसुद्धा पसरत गेली. एक आधुनिक राष्ट्र म्हणून भारत देशाची उभारणी करताना हिंदुत्ववाद्यांना एका बाजूला हिंदूंचं आधुनिक मूल्यांच्या आधारावर केलं जाणार एकजिनसीकरण आवश्यक वाटतं, तर दुसर्‍या बाजूला मुस्लीम लोक या राष्ट्राचा भाग बनू शकतील याबद्दल त्यांना शंका वाटते. हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये अध्याहृत असलेल्या त्यांच्या पितृभूमी आणि पुण्यभूमी या अटींमध्ये सुद्धा ही शंका स्पष्ट दिसते. कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या विचारांमध्ये आलेली ही हिंसक विपरीतता मुळातच नेशनच्या शुद्ध पाश्चात्त्य संकल्पनेत अनुस्यूत असलेल्या कुटिलपणामधून उत्पन्न झालेली आहे. या विपरीततेचा तसा खर्‍या हिंदू धर्माशी अर्धाअर्थी संबंध नाही. शुद्ध पाश्चात्त्य पद्धतीचे यशस्वी नेशन म्हणून उभे राहण्यासाठीची एक उपयुक्त अशी category या अर्थानेच केवळ ते हिंदू धर्माकडं बघतात आणि हिंदू धर्माचं एकजिनसी, एकरंगी स्वरूप कल्पितात.

त्यामानानं हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाची प्रक्रिया मात्र खूपच जुनी आहे. इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये या ध्रुवीकरणाला वेगवेगळ्या प्रकारचे आधार होते. ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक भारतातील मध्ययुगाचा काळ हा मुस्लिम पिरियड म्हणून नकारात्मक पद्धतीनं रंगवला. हे त्यांनी स्वतःच्या राजकीय सत्तेचं समर्थन करण्यासाठी आणि इस्लाम बद्दलच्या ख्रिश्चन धर्मियांच्या क्रुसेड्सच्या काळापासूनच्या कटू भावनेचा परिणाम म्हणून केलं. त्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात द्विराष्ट्रवादाची संकल्पना पुढं आली आणि देशाची फाळणी झाली. धर्मनिरपेक्ष राजसत्तेच्या पायावर उभ्या असलेल्या भारतीय प्रजासत्ताकामध्ये मुस्लीम समुदायाचं अखिल भारतीय पातळीवर एकजिनसीकरण केलं गेलं आणि त्याचा मतपेटीसाठी वापर केला गेला. बहुतांश मुस्लीम हे मुळातूनच अस्सल भारतीय आहेत आणि ते इतर कुठल्याही भारतीयांप्रमाणेच नानाविध जाती, भाषा, पेहराव आणि खाण्यापिण्याच्या सवयी बाळगून आहेत याकडे हिंदू आणि मुस्लीम समुदायातील कट्टरपंथीय लोकांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केलेला आहे.

ध्रुवीकरणाला जसे काळानुरूप वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत तसेच हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या आणि अतिशय समृद्ध अशा सामायिक जीवनाच्या वारशाला सुद्धा अनेक सुंदर पैलू आहेत. स्थानिक आणि खासकरून ग्रामीण पातळीवरच्या श्रद्धाजन्य परंपरांमधून विणल्या गेलेल्या आणि हिंदू आणि मुसलमानांना घट्टपणे जोडणार्‍या लोकजीवनाच्या आणि लोकधर्माच्या धाग्यांवरतीच हा सगळा वारसा पोसलेला आहे. खास भारतीय धार्मिकतेच्या वळणांमध्ये हिंदू आणि मुसलमानांना एकत्र जोडणार्‍या श्रद्धा बिंदूंचा शोध घेणार्‍या सुफी संत, नाथपंथी साधू, बैरागी, भक्ती चळवळीतले संत या सगळ्यांच्या अत्यंत सखोल आणि सहिष्णू अशा सुज्ञपणातून हा वारसा प्रकाशमान झालेला आहे. भारतीयत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांना त्याज्य समजून शुद्ध इस्लामचा घातक आग्रह धरणारे कट्टरपंथी मुसलमान आणि अब्राहमिक धर्मांच्या अनिष्ट बाबींचे अनुसरण करत मुस्लीम द्वेषावर आधारित हिंदुत्वाच्या भ्रामक कल्पना बाळगणारे हिंदुत्ववादी हे दोघेही या समृद्ध सलोख्याचे शत्रू आहेत.

हिंदू धर्माचं मूळचं उदार आणि ओपन सोर्स स्वरूप नाकारून, त्याचं एकजिनसी आणि एकरंगी चित्र डोळ्यासमोर ठेवणे, संविधानाच्या सर्व धर्मांच्या नागरिकांना समान वागणूक देण्याच्या मूलतत्त्वास हरताळ फासून मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देऊ करणार्‍या हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघणे, आपल्या समाजाचा अविभाज्य भाग असणार्‍या एका मोठ्या धार्मिक समूहाबद्दल सतत संशयग्रस्त मानसिकतेने विचार करणे या सगळ्या गोष्टी अतिशय काळजी वाटायला लावणार्‍या आहेत. एका प्राचीन सभ्यतेचा सदस्य म्हणून, तसेच आधुनिक मूल्यांचा आपल्या प्राचीन सभ्यतेतील मूलतत्त्वांशी मेळ घालून तयार केलेल्या संविधानाचं पालन करणारा नागरिक म्हणून, या सर्व प्रवृत्तींचा निकराने विरोध करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.

मला बोलायचा असलेला दुसरा मुद्दा प्रशासकीय आणि घटनात्मक संस्थांबाबतचा आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांना कायद्यानुसार दिलेल्या स्वायत्त स्वरूपाच्या अधिकारांचा वापर निर्भयपणे आणि संवैधानिक नीतीनुसार करता येणं हे एकंदर निरोगी लोकशाहीच्या दृष्टीनं आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासकीय आणि घटनात्मक संस्था बाबत जे बोललं जातंय ते काळजी वाटायला लावणारं आहे. या संस्थांचा वापर राजकीय कारणांसाठी केला जात असल्याचे आरोप होत आहेत.  

त्यामुळे याबाबत केवळ न्याय व्यवस्थेवर अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनी आणि या विषयावर काम करणार्‍या नागरी संस्था आणि संघटनांनी सजग राहून काम केलं पाहिजे असं मला वाटतं. इथं मला परत दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या प्रसंगी रस्त्यावरती उतरून जनजागृती करणार्‍या नेत्यांची आठवण येते आणि त्यांच्या कामापासून प्रेरणा घेण्याची गरज जाणवते.

समारोप करताना मी एवढंच म्हणेन की, धार्मिक ध्रुवीकरणाला रोखण्यापासून ते लोकशाहीच्या मजबुतीकरणापर्यंत अनेक विषयांवर भरपूर काम करण्याची गरज सध्या निर्माण झालेली आहे. यासाठी दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या विचारांपासून आणि कामापासून प्रेरणा घेऊन कंबर कसावी लागणार आहे. विशेष म्हणजे, जेन झी तरुणाईने यासाठीचा हुंकार भरल्याचं आशादायक चित्रसुद्धा सध्या निर्माण झालं आहे. आज प्रकाशित झालेल्या या चार पुस्तिकांमधून प्रेरणा घेऊन नवी तरुणाई नकीच या चौघांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करेल अशी आशा मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]