राज्यभरात डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन कार्यक्रम

-

मानियले नाही बहुमता” वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यावरील कविता व वेच्यांचे अभिवाचन!

पुणे येथील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन हॉलमध्ये गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त ‘मानियले नाही बहुमता’ हा विशेष कार्यक्रम झाला. विविध संत, समाजसुधारक, कवी, लेखक व पुरोगामी बुद्धिजीवी यांच्या अभंग, कविता व निवडक लिखाणाचे विविध कलाकारांनी सादरीकरण केले. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यावरील कविता व वेच्यांचे अभिवाचन’ झाले. अक्षय शिंपी आणि मुकुंद कुळे यांची बांधणी होती.

प्रज्ञा दया पवार यांनी ‘आली सिंहस्थ पर्वणी’ हा तुकाराम महाराजांचा अभंग व कुसुमाग्रजांची ‘व्यर्थ गेला तुका’ ही कविता सादर केली. विवेकवादाची संकल्पना हा वेचा वाचून दाखवला. विंदा करंदीकर यांचे ‘आधुनिक गुरुस्तवन’ वाचून दाखवले. मुकुंद कुळे यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग व त्यांच्या पत्रकारितेतील प्रसंग सांगितला. केतकी थत्ते यांनी महात्मा फुलेंचा अखंड गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. सोनाली कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या ‘तयास मानव म्हणावे का?’ या अखंडाचे आणि सोयराबाईंचा ‘देहाची विटाळ’ या अभंगाचे अभिवाचन केले व विवेकवादाच्या विविध समाजसुधारकांच्या व्याख्या सांगितल्या. प्रदीप कोकरे यांनी ‘वेदा आधी तू होतास’ ही बाबुराव बागुलांची कविता सादर केली. पर्ण पेठे यांनी बहिणाबाई चौधरींच्या ‘लपे कर्माची रेखा’ ही रचना सादर केली. कवी यशवंत यांच्या ‘ग्रहांचे सहाय्य त्या शुरा, यशश्री पायाची दासी’ व नारायण सुर्वे यांची ‘मास्तर’ कविता सादर केली. या सादरीकरणाच्या मध्ये दाभोलकर यांच्या मूळ आवाजातील ध्वनिफिती प्रेक्षकांना ऐकवण्यात आल्या.

वैज्ञानिक दृष्टिकोन’ विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन करून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकरांना अभिवादन!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, त्या पुणे येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिस कार्यकर्ते आणि अनेक नागरिकांनी अभिवादन केले आणि विवेकाचा अहिंसक लढा, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलनसाठी पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन – मुलांमध्ये कसा विकसित करायचा?’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. MKCL चे मुख्य मार्गदर्शक असलेले डॉ. विवेक सावंत यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ वैज्ञानिक  अरविंद गुप्ता यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.

            आयुका विज्ञानप्रसार केंद्राचे माजी अधिकारी गुप्ता यांनी डॉ. दाभोलकर यांचे योगदान हे जगाच्या इतिहासातील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी अतुलनीय त्याग असल्याचे सांगितले. “प्रत्येक गोष्टीला तपासून पाहावे यासाठी डॉ. दाभोलकर नेहमी आग्रह धरायचे. त्यांनी सांगितलेल्या विवेकवादी विचाराची ही शाश्वत लढाई आहे आणि आपण त्यासाठी सज्ज रहायचे आहे,” अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

श्री. सपकाळ यांनी दाभोलकर यांच्यामुळे त्यांच्यामध्ये विवेकवाद कसा रुजला याबद्दल आठवणी सांगितल्या. पुढील वर्षभरात या दिशेने काही लिखाण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या वेळी अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ट्रस्टी दीपक गिरमे, गणेश चिंचोले, राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, श्रीपाल ललवाणी, राहुल थोरात, लेखक प्रभाकर नानावटी, ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे, ज्येष्ठ छायाचित्रकार मिलिंद जोशी यांच्यासह 

पुणे शहर – जिल्हा पदाधिकारी अनिल वेल्हाळ, सचिन सोनवणे, दत्तात्रय जाधव, भारत विठ्ठलदास, राहुल माने, सौरभ बागडे हे सुद्धा उपस्थित होते. या वेळी परिवर्तन संस्थेचे समुपदेशक राजू इनामदार आणि त्यांचे सहकारी रेश्मा कचरे व इतर साथीदारांनी चळवळीची आणि डॉ. दाभोलकर यांना अभिवादन करणारी गाणी सादर केली.

पुस्तिका प्रकाशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या वर्षभरात जवळजवळ ८५ पुस्तिका प्रकाशित केल्या. या सर्व पुस्तिका छोट्या आकाराच्या, अल्प किमतीच्या आणि अतिशय सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत. यात डॉ. नरेंद्र दाभोलकरानी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाशी थेट संबंध असणार्‍या श्रद्धा-अंधश्रद्धा, आध्यात्मिक बुवाबाजी, फलज्योतिष, धर्मचिकित्सा, बुवाबाजी, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विषयावरील पुस्तिका, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आणि ह. भ. प. देवदत्त परुळेकर यांनी लिहिलेली  वारकरी संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाविषयक विचारांवर आधारित चरित्रमाला, किशोरवयीन मुलांच्यासाठी कथा प्रकाशित केल्या. आता विवेकदीप मालिकेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉ. नरेंद्र दाभोलकर कोण होते? कॉम्रेड गोविंद पानसरे कोण होते? प्राध्यापक कलबुर्गी कोण होते? आणि पत्रकार गौरी लंकेश कोण होत्या? या शीर्षकाखालील अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी लिहिलेल्या पुस्तिका डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनी प्रकाशित करत आहेत. हा प्रकाशन सोहळा पुणे येथे मराठवाडा मित्रमंडळाच्या ज्ञानेश्वर सभागृहात मराठवाडा मित्र मंडळचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ सिने दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचे हस्ते पार पडला. ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी संग्राम गायकवाड स्मारंभाचे प्रमुख पाहुणे  होते.(त्यांच्या भाषणाचे शब्दांकन आम्ही याच अंकात इतरत्र देत आहोत.)

पुस्तिकांच्या प्रकाशनानंतर केलेल्या भाषणात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांना सुनील सुकथनकर म्हणाले, “समाज माध्यमांवरून आज आपल्यावर माहितीचा भडिमार होत आहे. जो कोणी पुरोगामी, विवेकी  विचार मांडतो, त्यावर गरळ ओकणारी मोठी यंत्रणा उभी आहे. तुम्ही दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश ही नावे जरी नुसती सर्च केलीत तर त्यांच्यावर गरळ ओकणारी ढीगभर माहिती मिळेल. त्यामुळे या पुस्तिकांची आज गरज आहे. त्यात तुम्हाला या चार विचारवंतांची खरी माहिती मिळेल. या पुस्तिका तुम्ही वाचा आणि पुढे अजून या विचारांचा अभ्यास करा ते तुम्हाला चिकित्सक, मानवतावादी दृष्टी देतील.”    

“सध्या कडवा विचार प्रवाह मुख्य प्रवाहात आला आहे. त्यांची ‘देश के गद्दारों को गोली मारो सालोंको’ ही  घोषणा नॉर्मल झाली आहे. बलात्कार करणार्‍यांचे सत्कार केले जात आहेत. अशा वातावरणात जेन झीचे आंदोलन दिलासादायक वाटतं. ते निर्भय आहेत. ते धर्मांध राजकारणाला नाकारत आहेत. ते मुद्याचे बोलत आहेत. या पिढीस दाभोलकरांच्या विचारांचा नकीच उपयोग होईल,” असे विचार ज्येष्ठ सनदी अधिकारी संग्राम गायकवाड यांनी मांडले. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असणार्‍या मराठवाडा मित्रमंडळाच्या महाविद्यालयातील या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हमीद दाभोलकर यांनी केले, राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीपाल ललवाणी यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतीव्याख्यान

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागण्यास अनेक मर्यादा – अ‍ॅड. प्रशांत भूषण

“आधुनिक तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनात क्रांती जरी करत असली तरी मानवी मूल्य असलेले कुतूहल, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किकता यांचे महत्त्व पुढील काळात अनन्यसाधारण राहणार आहे. या तंत्रज्ञानावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञ आणि संशोधक यांच्यामध्ये सुद्धा याबद्दल जाणीव आणि आत्मपरीक्षण वाढत आहे. आपण आपली तार्किकता आणि संवेदनशीलता तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ देऊ शकत नाही. यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि जाहिरात तंत्राचा लोकांच्या मनात अवैज्ञानिक गोष्टींचा अपप्रचार करण्यासाठी वापर करतात. त्यापासून सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित वार्षिक स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. (त्यांचे संपूर्ण व्याख्यान याच अंकात इतरत्र दिले आहे.) यावेळी अंनिस ट्रस्टचे दीपक गिरमे, गणेश चिंचोले, अंनिस वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात, मुक्ता दाभोलकर, प्रभाकर नानावटी, प्रवीण देशमुख, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, दत्तात्रय जाधव हे उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी

श्री. भूषण पुढे म्हणाले, “तार्किक विचारसरणीला तिलांजली देऊन सत्ताधारी वर्गाचा अंधभक्त निर्माण करण्यावर जोर आहे. सत्तेच्या सर्वोच्च स्थानावरील व्यक्ती अवैज्ञानिक, खोट्या गोष्टी पसरवत आहेत. थाळी वाजवल्याने, पापड खाल्याने कोरोना जातो यासारख्या अवैज्ञानिक गोष्टी सत्ताधारी पक्ष कोरोना काळात पसरवत होता. यासारख्या अनेक छद्मविज्ञान सारख्या गोष्टी पसरवत आहे. त्याचा परिणाम आमच्या शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वातावरणावर होत आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मंडीचे संचालक हे भूत-प्रेत आहेत तसेच मांस खाल्याने भूस्खलन होत आहे,” अशी अवैज्ञानिक विधाने करत आहेत. अशी अनेक उदाहरणे देऊन श्री. भूषण भारतातील अनेक मान्यवर संस्थांचे जबाबदार पदावरील व्यक्ती बेजबाबदार, अवैज्ञानिक विधाने करत असल्याबद्दल श्री. भूषण यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले, “अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत हटवला जात आहे, पिरिओडीक टेबल अभ्यासक्रमातून हटवले जात आहे आणि त्या जागी फलज्योतिष सारख्या अवैज्ञानिक गोष्टीचा समावेश केला जात आहे,” यावर त्यांनी घणाघाती टीका केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. त्यांनी डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी, कॉम्रेड पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही खून प्रकरणातील सर्व आरोपी व गुन्हेगार जामिनावर मुक्त असल्याबाबत चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले, तर आभार मिलिंद देशमुख यांनी मानले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अनुवादित दहा पुस्तिकांचे प्रकाशन केले. प्रा. राही डहाके यांनी या मराठी पुस्तिकांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे.

मानसिक आरोग्यावर काम करणार्‍या आणि डॉ. दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन संस्थेचे राजू इनामदार, रेश्मा कचरे आणि त्यांच्या साथीदारांनी डॉ. दाभोलकर यांना अभिवादन करणारी गीते सादर केली.

दक्षिण कोल्हापूर शाखा

– निर्भय मॉर्निंग वॉक

दक्षिण कोल्हापूर शाखा आणि इतर पुरोगामी संघटना यांनी  २० ऑगस्टला शिवाजी पेठेतील पद्माराजे पार्क येथे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन केले होते. यात अंनिस कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विलासराव पोवार, अनिल चव्हाण, कॉ. चंद्रकांत यादव, अ‍ॅड. अजित चव्हाण, सुधा सरनाईक, सुनील मेटील यांच्यासह अनेक नागरिक सामील झाले होते. जोपर्यंत डॉ. दाभोलकरांच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका कायम आहे, असे मत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’च्या प्रसंगी सर्वच वक्त्यांनी व्यक्त केले.

चार शहिदांच्या पुस्तिकांचा लोकार्पण सोहळा 

अनिल चव्हाण लिखित, कोण होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कोण होते कॉम्रेड गोविंद पानसरे, कोण होते प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी आणि कोण होत्या पत्रकार गौरी लंकेश अशा चार पुस्तकांचे प्रकाशन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांच्या हस्ते २३ ऑगस्ट रोजी झाले. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव पोवार होते.

प्राध्यापिका तेजस्विनी देसाई यांनी पुस्तके देऊन पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकामध्ये मीना चव्हाण यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. अ‍ॅड. अजित चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते पुस्तिकांचे लोकार्पण झाले.

लेखक अनिल चव्हाण आपल्या मनोगतात म्हणाले, “अंनिसने प्रबोधनासाठी सोप्या भाषेत अल्प किमतीत छोटी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित श्रद्धा-अंधश्रद्धा, आध्यात्मिक बुवाबाजी, फलज्योतिष, धर्म चिकित्सा इत्यादी विषयांवरील पुस्तके, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा  तारा भवाळकर आणि ह. भ. प. देवदत्त परुळेकर लिखित वारकरी संतांची चरित्रे, किशोरवयीन मुलांसाठी कथा, आणि आता चार शहिदांची चरित्रे प्रसिद्ध केली आहेत. या चारही महान व्यक्तींनी संतांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची, अंधश्रद्धा निर्मूलनाची परंपरा चालू ठेवली होती. सर्वसामान्यांना लुबाडणार्‍या धार्मिक आणि राजकीय बुवाबाजी विरोधात त्यांनी मोहीम उघडली. त्यामुळेच त्यांचे सनातन्यानी खून पाडले.”

प्राध्यापक कलबुर्गी यांचे चरित्र लिहिण्यासाठी बसव पंथचे संपादक बी. एम. पाटील, तर पत्रकार गौरी लंकेश यांचे चरित्र लिहिण्यासाठी बेळगाव शाखेचे कार्याध्यक्ष जोतिबा आगसमनी यांचे मोठे सहकार्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कॉम्रेड दिलीप पवार यांनी आपल्या भाषणात  पानसरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी आपल्या भाषणात जेन झीचा दाखला देत म्हणाले, “जंतरमंतर वर आलेले जेन झी आंदोलक अभ्यासू होते, त्यांनी सोबत पुस्तके आणली होती, आणि त्यांची घोषणा होती, “पढेगा जेन झी तो, लडेगा जेन झी, तो जितेगा जेन झी.” वाचनाला एवढे महत्त्व आहे. अनेक क्रांतीच्या मुळाशी ग्रंथ होते. अंनिसच्या या वाचक चळवळीला सर्वांनी पुढे नेले पाहिजे.”

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी चारही पुस्तकांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. कार्यकर्त्यांनी योग्य शब्दच वापरले पाहिजेत. या चारही विचारवंतांचे खून झाले आहेत, हत्या किंवा वध नव्हे. दाभोलकरांनी सतत अठरा वर्षे सातत्याने आणि चिकाटीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होण्यासाठी प्रयत्न केले. स्वार्थासाठी रोज पक्षांतर करणार्‍या पुढार्‍यांच्या पार्श्वभूमीवर पानसरे सतत ६३ वर्षे लालबावटा खांद्यावर घेऊन लढत राहिले, ही निष्ठा कौतुकास्पद आहे. प्राध्यापक कलबुर्गी यांनी १०० च्या वर ग्रंथांचे संपादन केले असून वचन साहित्यावर संशोधन केले आहे.  त्यांच्या कामाची तुलना महात्मा फुलेंच्या कामाशी करता येईल. पत्रकार गौरी लंकेश या अन्यायग्रस्त दुर्बलांच्या आवाज  बनल्या. धर्मांधांशी लढताना त्यांनी पुरोगाम्याना एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव पोवार म्हणाले, “अंनिसने तयार केलेले वाङ्मय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.”

यावेळी जनता दलाचे वसंतराव पाटील, शिवाजीराव परूळेकर, चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही आपली मते मांडली. त्यानंतर पुस्तकांचे जास्तीत जास्त संच समाजापर्यंत पोहोचवणार्‍या शिवाजीराव कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. सुनंदा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. विकास जाधव यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, अमर जाधव, रवी चव्हाण, आनंदराव चौगुले, प्रभंजन चव्हाण, विरा चव्हाण, आदित्य चव्हाण, शरद नागवेकर, शोभा पाटील, छाया पोवार इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जयसिंगपूर

कँडल मार्चचे आयोजन 

शिरोळ तालुका अंनिस शाखा आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जयसिंगपूर येथे २० ऑगस्ट रोजी अंनिस, समाजवादी प्रबोधिनी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लाल बावटा आणि समविचारी पक्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर शहरात कँडल मार्च काढून डॉ. दाभोलकर यांच्या  स्मृतींना अभिवादन करण्यात आले, तसेच विवेकदीप मालेतील चार पुस्तिकांचे प्रकाशन शांताराम कांबळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. महावीर अकोळे, डॉ. चिदानंद आवळेकर, एफ. वाय. कुंभोजकर, अशोक शिरगुप्पे, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, रावसाहेब आलासे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेवटी बाबासाहेब नदाफ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रति मनोगत व्यक्त केले. नंतर कँडल मार्च विसर्जित करण्यात आला.

कोल्हापूर शहर

समविचारी संघटनासह ‘निर्भय मॉर्निंग वॉक’

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला १३ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा सुनावली गेली, पण खुनाचा सूत्रधार मात्र अजूनही मोकाट आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व खुनाचा सूत्रधार लवकर पकडला जावा . या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर वतीने ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर … अमर रहे,’ ‘कॉ. गोविंद पानसरे अमर रहे,’ ‘खुन्यांना पाठीशी घालणार्‍या महाराष्ट्र सरकारचा निषेध असो,’ ‘खुनी सनातनी चले जाव’ अशा घोषणा देत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ संपन्न झाला. सदरचा वॉक बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा ते दसरा चौक या मार्गावर काढण्यात आला. 

चळवळीचे गीत यश आंबोळे यांनी सादर  केले. या वेळी अंनिस, विविध पक्ष, सभासद उपस्थित होते. त्यामध्ये शहर कार्याध्यक्ष राजेश वरक, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, गीता हसूरकर, युवा कार्यवाह बाळू माळी, मेघा पानसरे, भा.क.प. दिलदार मुजावर, सुचित्रा वरक, प्रशांत आंबी, धीरज कटारे, सुधाकर सावंत, उदय नारकर, सुनील जाधव, सुनीता जाधव, भरत धोंगडे, शीतल पाटील, संभाजी जगदाळे, प्रशांत गोंधळी, तेजस्वीनी देसाई, सागर कांबळे, ईश्वर गायकवाड आदी उपस्थित होते. निर्भय मॉर्निंग वॉक समारोप कॉ. दिलीप पोवार यांनी केला. अंनिस शहर मीटिंगमध्ये अंनिस विचार सांगण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

ईश्वरपूर

ईश्वरपुरात निर्भय मॉर्निंग वॉक

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला गुरुवार २० ऑगस्ट २०२६ रोजी १३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खुनामागील सूत्रधारांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच देशभर अंधश्रद्धाविरोधी कायदा लागू करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन वाळवा तहसीलदार मा. सरिता रासकर यांना देण्यात आले. यावेळी निर्भय मॉर्निंग वॉकही काढण्यात आला. या वेळी अंनिसचे राज्य कार्यवाह डॉ. एस. के. माने, ईश्वरपूर शाखेचे कार्याध्यक्ष शशिकांत बामणे, दीपक कोठावळे, डॉ. राजेश दांडगे, अरफान शेख, सुहास पाटील, जावेद शेख, स्वप्निल पाटील, विक्रम सावंत, राजेंद्र साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर दीडशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या सह्या करण्यात आल्या होत्या.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विवेकवादी विचारांचा वारसा पुढे नेत अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान

कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा-ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २० ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन प्रबोधन सप्ताहानिमित्त एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर मुख्य वक्ते म्हणून बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य कार्यवाह मा. डॉ. एस. के. माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात, विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी चिकित्सक दृष्टीचा अवलंब करावा, जेणेकरून वैयक्तिक प्रगतीसोबतच निकोप समाज विकास साधता येईल, असे आवाहन केले. त्यांनी दैनंदिन जीवनातील अंधविश्वासाची अनेक उदाहरणे देऊन विचार कसा करावा याचे, सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील लाभले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून समाजात धर्मांधता आणि भेदभाव निर्माण करणारे विचार पूर्णपणे नाकारून सर्वांनी वैज्ञानिक कास धरण्याची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमादरम्यान डॉ. संतोष खडसे आणि डॉ. राजेश दांडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत डॉ. दाभोलकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. संभाजी नावाडकर यांनी केलेल्या प्रास्ताविक व सूत्रसंचालनाने झाली, तर उपस्थितांचे आभार अंनिसचे सक्रिय कार्यकर्ते शशिकांत बामणे यांनी मानले. प्रा. सुजाता चोपडे, प्रा. मनीषा पाटील, प्रा. एस. आर. नांगरे,  डॉ. जी. बी. कांबळे,  डॉ. सी. जे. भारसकळे, डॉ. प्रकाश आठवले, डॉ. प्रीती खराडे, प्रा. माळी कार्यक्रमाला प्राध्यापक, अंनिसचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तासगाव

तासगाव अंनिस शाखेकडून वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? या विषयावर व्याख्याने आणि चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम खंडोबाची वाडी, चिंचणी, आरवडे, मणेराजुरी, कवठे एकंद येथील माध्यमिक शाळांमध्ये करण्यात आले. या वेळी माजी प्राचार्य मस्के, एच. बी. पाटील, प्रा. वासुदेव गुरव सर, राज्य कार्यकारणी सदस्या सुजाता म्हेत्रे, सौ. नूतन परीट, जिल्हा कार्याध्यक्ष अमर खोत, तालुका सचिव प्रा. संजय वावरे हे सहभागी झाले. या सर्व कार्यक्रमासाठी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थिनींचे विशेष सहकार्य लाभले.

तहसीलदार, तासगाव यांना डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या खुनापाठीमागील मुख्य सूत्रधारांना पकडून शिक्षा होणेबाबत तासगाव अंनिसच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष अमर खोत, भरत थोरात, रवी जाधव, प्रा. वासुदेव गुरव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगली शहर

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला २० ऑगस्ट रोजी १३ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करून हत्येमागील मुख्य सूत्रधारांना तत्काळ अटक करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली. या निवेदनावर राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, सविता अकोळे, जगदीश काबरे, शोभा मधाळे यांच्या सह्या आहेत. या वेळी अमित ठाकर, गीता ठाकर, अविनाश कांबळे, विजय बंकनाळ, शोभा मधाळे उपस्थित होते.

अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शासनाकडे या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली असून, पुरोगामी विचारांचा लढा असाच सुरू राहील असा निर्धारही व्यक्त केला आहे.

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्प आणि त्याबाबतच्या अंधश्रद्धा यावर स्लाईड शोच्या माध्यमातून शाखेचे कार्यकर्ते मालोजीराव माने यांनी अभिनव विद्यालय, शामरावनगर येथे प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला.

वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त मिरज येथील आर. एम. हायस्कूलमध्ये आशा धनाले आणि त्रिशला शहा यांचा ‘हसत खेळत विज्ञान’ कार्यक्रम झाला. शाळेतील १५० विद्यार्थी आणि शिक्षक यांचा अतिशय उस्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. या वेळी  धनश्री साळुंखे यांचीही उपस्थिती होती.

राहुल थोरात, सविता अक्कोळे, अभिषेक कांबळे, डॉ. संजय निटवे, जगदीश काबरे, सुहास पवार, सुहास येरोडकर, संजय गलगले यांनी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.

आटपाडी

विवेकवादाचा लढा तीव्र करणे हीच डॉ. दाभोलकरांना आदरांजली!

डॉ. दाभोलकर यांच्या खून कटातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी व जादूटोणा विरोधी कायदा देशभर लागू करावा या मागणीचे निवेदन शाखेतर्फे शासनाला देण्यात आले. निवेदन देताना कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा खून होऊ शकत नाही. विवेकवादाचा लढा तीव्र करणे हेच डॉ. दाभोलकरांना खरे अभिवादन आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

अनिल चव्हाण यांनी लिहिलेल्या चार पुस्तिकांचे लोकार्पण आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब पाटील, डॉ. एम. वाय. पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पिसे, सुनील भिंगे यांचे उपस्थितीत करण्यात आले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी अशी पुस्तके उपयोगी ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पलूस

वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा

            जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत (ता. पलूस, जि. सांगली) येथे २० ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सल्लागार मंडळ सदस्य मारुती शिरतोडे यांच्या हस्ते नरेंद्र दाभोलकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगल लाड यांच्या हस्ते प्रमुख वक्ते, महाराष्ट्रातील नामांकित लोककलावंत, विनोदसम्राट, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रचारक भास्कर सदाकळे यांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात भास्कर सदाकळे यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानात हसत खेळत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल माहिती दिली, तसेच नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक कामे सांगून प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. अजित सावंत होते. आशाताई जाधव यांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर अश्विनी जाधव यांनी आभार मानले. मारुती शिरतोडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर  नीता चौगुले, प्रीती बुर्ले, धनंजय साळुंखे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अंधश्रद्धा निर्मूलनविषयक प्रात्यक्षिके पाहून सर्व विद्यार्थी भारावून गेले.

सातारा शहर

विवेकदीप पुस्तक मालेचे प्रकाशन व जेन झी बरोबर संवाद

सातार्‍याचे सुपुत्र शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर १३ वा स्मृतिदिन अर्थात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’  म्हणून २० ऑगस्टला भारतभर व्याख्याने, निर्भय मॉर्निंग वॉक फेरी, शासनास निवेदने देऊन साजरा करण्यात आला.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मा. नागेश पाटील यांना खूनकटाच्या सूत्रधारास अटक व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य अध्यक्षा प्रा. प्रमोदिनी मंडपे, वंदना माने, उदय चव्हाण, संतोष भिलारकर, प्रकाश खटावकर, डॉ. प्रदीप झनकर, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, रोहित घाडगे हे  अं.नि.स.कार्यकर्ते उपस्थित होते. 

युवकांनी विचारांचे शस्त्र वापरायला हवे. हे शस्त्र विवेकाच्या विचारांची धार असलेले असावे. वैज्ञानिक दृष्टिकोनावर तपासल्यावर जो सिद्ध होतो तो विचार विवेकी असतो. विज्ञान तंत्रज्ञान याचा वापर करून मानवी कल्याण  करायला हवे, असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले. ते विवेकदीप पुस्तक मालेच्या प्रकाशनाप्रसंगी बोलत होते.

अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र मोरे म्हणाले की, प्रबोधनाची परंपरा डॉ. दाभोलकर त्यांच्यासारख्या समाजसेवकांनी चालू ठेवली आहे. ती आता पुढे घेण्याची जबाबदारी आपली आहे.

राज्य अध्यक्ष प्रमोदिनी मंडपे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. उदय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. दीपक माने यांनी आभार मानले.

सायंकाळी समविचारी संघटनांच्या वतीने जेन झी ची आंदोलनाची नवी राजकीय भाषा आणि नवी दिशा यावर वैभव चोपकर आणि श्रावणी बुवा या जंतर-मंतर वरील आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी मनोगते व्यक्त केली. आपण प्रश्नांना भिडले पाहिजे, आपल्याकडची युवाशक्ती क्रयशक्ती मध्ये रूपांतरित होण्यासाठी दाभोलकर, पानसरे यांचे विचार आणि आचार आपण अमलात आणले पाहिजे, असे मत या दोघांनी मांडले. त्यासोबत आंदोलनात एका बाजूला समाजातील लोकांनी दिलेल्या माणुसकीचे व दुसर्‍या बाजूला सरकारने दिलेल्या व अमानवी त्रासाचे अनुभव सांगितले.

मल्हारपेठ

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून पाटणच्या माने-देशमुख ज्युनिअर कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मल्हारपेठचे कार्यकर्ते प्रतीक पवार यांनी चमत्कार सादरीकरण कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केला. वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाचे महत्त्व प्राध्यापिका सौ. शिर्के यांनी सांगितले. प्रा. चव्हाण यांनी स्वागत केले, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी प्रा. पाटील प्रा. देवकांत यांनी माहिती दिली. 

मल्हारपेठच्या सह्याद्री वाचनालयातही शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अभिवादन निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोन जनजागृती ग्रंथ प्रदर्शन उपक्रम घेण्यात आला.  ज्येष्ठ वाचक रमेश शिंदे, ग्रंथपाल सौ. शुभांगी पवार यांनी ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन केले.

मंद्रूळ हवेलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही मल्हारपेठ अंनिसचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार यांचा बुवाबाजी हल्लाबोल व गाणी समाज प्रबोधनाची हा उपक्रम उत्कृष्टपणे घेण्यात आला. या वेळी मल्हारपेठचे केंद्रप्रमुख राकेश चव्हाण, मुख्याध्यापक रुपेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

रहिमतपूर

विज्ञान आणि विवेकी विचारांचा जागर!

वसंतदादा पाटील विद्यालय, रहिमतपूर येथे अंनिस तर्फे प्रकाशित झालेल्या कोण होते दाभोलकर?, कोण होते कलबुर्गी? कोण होत्या गौरी लंकेश? कोण होते गोविंद पानसरे? या चार पुस्तिकांचे लोकार्पण १८ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

२२ ऑगस्ट २०२६ रोजी आदर्श विद्यालय रहिमतपूर येथे विनय र. र. मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी ‘तुम्हीही वैज्ञानिक होऊ शकता..!’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ व्याख्यान न देता त्यांनी विद्यार्थ्यांकडूनच विविध छोटे-छोटे प्रयोग करून घेतले. प्रयोगांच्या माध्यमातून प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, तर्क लावणे आणि कार्यकारणभाव समजून घेणे याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. छोट्या-छोट्या प्रश्नांमधून आणि प्रयोगांमधून संशोधनाची सुरुवात कशी होते, तसेच आजची जिज्ञासू मुले उद्याची संशोधक कशी बनू शकतात, हे त्यांनी अत्यंत रंजक पद्धतीने स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधनाविषयी उत्सुकता निर्माण झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोकराव माने (उपाध्यक्ष-आदर्श शिक्षण संस्था, रहिमतपूर) हजर होते. शाळेचे प्राचार्य अनिल बोधे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, अवनीश माने यांनी आभार मानले. या वेळी गावातील नागरिक आणि शाळेचे विद्यार्थी तसेच म. अंनिसचे जयश्री माने, आशालता माने, पूजा माने, शिवाजी शिंदे, मधुकर माने, शंकर कणसे, प्रवीण माने, मोहसिन शेख इत्यादी उपस्थित होते.

फलटण

डॉ. दाभोलकरांच्या खुनामागच्या मुख्य सूत्रधाराला अटक करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलटण शाखेच्या वतीने प्रांताधिकारी, प्रियांका आंबेकर यांच्याकडे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्यावरील पुस्तिकांचे लोकार्पण प्रांताधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले.

या कार्यक्रमात अयाज अत्तार, आरती कांबळे, मोहिनी भोंगळे, बोराटे सर, जयवंत काकडे, मंदाकिनी गायकवाड, भुजबळ सर, डॉ. शेंडे सर, बनसोडे सर, सचिन शिंदे, निलेश अहिवळे, देशमुख सर, देशमुख मॅडम, वृषाली भुजबळ उपस्थित होते.

कराड

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना मानवंदना देणारे चर्चासत्र 

“महिला वर्गाने आणि युवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा म्हणजे समाज विवेकी आणि निरामय होईल”, असे प्रतिपादन प्राचार्य श्री. सतीश माने सर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा – कराड आणि यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, भारतीय विद्यापीठ, मलकापूर, कराड यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये उद्घाटक या नात्याने बोलताना केले.

२० ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा तेरावा स्मृतिदिन. याप्रसंगी डॉक्टरांना अभिवादन करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना डॉ. सुधीर कुंभार यांनी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन आणि ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कने तयार केलेल्या “आस्क व्हाय?” म्हणजेच “विचारा का म्हणून?” याची नेमकी सांगड घातली व पर्यावरण, सर्प विज्ञान, छद्मविज्ञान, विविध प्रकारच्या अंधश्रद्धा, चुकीची कर्मकांडे यावरती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने अत्यंत उद्बोधक आणि मनोरंजनात्मक पद्धतीने नर्मविनोद करीत आपल्या जीवनातील रोज घडणार्‍या उदाहरणांचे दाखले देत डॉ. सुनील कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे  जेन झींच्या भाषेत खुसखुशीतपणे प्रबोधन केले.

सदर कार्यक्रमामध्ये विवेकदीप मालिकेतील चार पुस्तकांचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या पुस्तकाचे लोकार्पण प्राचार्य सतीश माने सर, तसेच विचारपीठावरील उपस्थित मान्यवर, अंनिसचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राध्यापक अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी एकूणच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आतापर्यंत केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थी -विद्यार्थिनींना केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद लाभला. या वेळी जवळपास २० जणांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करीत असलेल्या कार्याशी जोडून घेण्याचे ठरवले. ही या एकूणच चर्चासत्राची सकारात्मक फलश्रुती ठरली.

श्री. बाळ देवधर यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. तसेच श्री. अशोकराव पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला अंनिसचे सर्वस्वी अल्केश ओहोळ, धनंजय जोशी, प्राध्यापक बी. एस. खोत, अविनाश भिसे, डॉ. व्ही. डी. साळुंखे, बोत्रे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

एकूणच हे चर्चासत्र डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना मानवंदना देणारे ठरले.

२० ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

            सोलापूर शहर शाखा शाखेतर्फे २० ऑगस्ट रोजी  शहरात विविध ठिकाणी पुस्तिका लोकार्पण कार्यक्रम, व्याख्यान, वतृत्व, चित्रकला स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, पार्क चौक, सोलापूर येथे शहर शाखेच्या वतीने आदरांजली व अभिवादन समारंभ पार पडला. लेखक मा. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार शहिदांच्या चरित्र पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले आणि अभिवादन गीत गायले गेले.

रावजी सखाराम हायस्कूल, सम्राट चौक येथे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व छद्मविज्ञान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्याच वेळेस प्राचार्य भारत केतसर यांच्या हस्ते संबंधित पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले. आदर्श बालक मंदिर येथेही राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आला.  

सौ.गोपीबाई रामकिशन (पापा सेठ) बलदवा हायस्कूल, देगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांचा उद्देश लोकांमध्ये वैज्ञानिक विचार रुजवणे, अंधश्रद्धांविरुद्ध जनजागृती वाढवणे आणि समाजातील समतेचे मूल्य पसरवणे असा होता. कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि नागरिकांनी चांगली उपस्थिती दाखवून समर्थन केले.

त्याचबरोबर शाखेच्या कार्यकर्त्यांनी दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही दिले.

बार्शी

बार्शी येथील तहसीलदार यांना डॉ. दाभोलकरांच्या खून कटामागील मुख्य सूत्रधाराच्या अटकेची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, जिल्हा परिषद शाळा, मिरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथेही राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आले.

अकलकोट

कल्याणशेट्टी महाविद्यालय, अकलकोट येथे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करण्यात आला

संचार वर्तमानपत्रात ‘विवेकवादी दीपस्तंभ : डॉ. नरेंद्र दाभोलकर’ हा लेख डॉ. अस्मिता बालगावकर यांनी प्रसिद्ध केला. अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यात प्रत्यक्ष कार्यक्रमांमधून हजारपेक्षा जास्त लोकांपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. तर वर्तमानपत्रातील लेख आणि सोशल मीडियावर अभिवादन गीत, संदेश प्रसिद्ध करून हजारो लोकांपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला.

यामध्ये प्रामुख्याने डॉ. अशोक कदम, डॉ. अस्मिता बालगावकर, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, आर. डी. गायकवाड, व्ही. डी. गायकवाड, हेमंत शिंदे, मधुकर शेळके, निशा भोसले, सुनीता गायकवाड, अरुण गायकवाड, शकुंतला सूर्यवंशी, सुजित हवळे, अण्णा दीक्षित, दीपक पांडगळे, ब्रह्मानंद धडके, छाया मोरे, मिलिंद ताकपेरे, सुनील डांगे, आशा पवार इ. कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.

            २० ऑगस्ट… शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता, राहुरी, अकोले, कोपरगाव, नगर शहर या शाखांच्या वतीने राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील व कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली साजरा करून अभिवादन करण्यात आले.

शहर शाखेच्या वतीने पुस्तिका प्रकाशन

अहिल्यानगर येथे शहर शाखेच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चार शहिदांच्या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन नगर कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा. आनंद निकम सर, डॉ. सोमनाथ देवा जंगम, नलिनीताई गायकवाड, रजनीताई ताठे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक, लाल टाकी, अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाले. या वेळी प्रा. रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, शिवसैनिक गिरीश हांडे, साहित्यिक शब्बीर शेख उपस्थित होते. अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले यांचे समवेत अ‍ॅड. विद्या शिंदे, रवी सातपुते, विक्रम क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

राहाता

शारदा शैक्षणिक संकुल राहाता, तालुका राहाता येथे पुस्तक प्रकाशन, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित सप्रयोग व्याख्यान, संकल्प शपथ, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप, राहाता तालुका कार्याध्यक्ष कैलास शेळके, कार्यकर्त्यांसह प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सात्रळ (ता. राहाता) 

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राहाता तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ भेट, ग्रंथ प्रकाशन, निबंध वतृत्व स्पर्धा, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाचे महत्त्व असे विविध कार्यक्रम घेतले.

मिरी (ता. पाथर्डी) 

नगर शहराध्यक्ष संतोष कदम व सहकार्‍यांनी विद्यालयात पुस्तक प्रकाशन व राष्ट्रीय वैज्ञानिक दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले.

कोपरगाव

ना. तहसीलदार यांना तालुका कार्याध्यक्ष वसंत जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत निवेदन दिले.

विंचूर (ता. सिन्नर)

कोपरगाव तालुकाध्यक्ष सुरेश वाबळे व सहकारी यांनी व्याख्यान व विविध स्पर्धांचे आयोजन केले.

अकोले

तालुका शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. गुलाबराव मंडलिक यांनी सहकार्‍यांसमवेत तहसीलदारांना निवेदन देऊन चार शहिदांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले.

 शहीद दाभोलकरांना अभिवादन म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे रक्तदान शिबिर संपन्न..!

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात निर्घृण हत्या झाली. पुण्याच्या रस्त्यावर सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून आज हजारो नव्हे, लाखो विवेकवादी दाभोलकर निर्माण झालेले आहेत. आपण दाभोलकरांना मारू शकता, परंतु आम्ही हिंसेला हिंसेने उत्तर न देता आजच्या दिवशी रक्तदान करून कित्येक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचे कार्य करण्यास्तव आम्ही रक्तदान करून संदेश देऊ इच्छितो की, आपण हिंसा करून रक्त जरी आमचे सांडले, तरी विवेकासाठी… विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी विज्ञानाची चळवळ..अंधश्रद्धा विरोधी चळवळ… सुरू ठेवण्यासाठी आम्ही रक्तदान करू आणि हिंसेला अहिंसेने उत्तर देऊ..!

२० ऑगस्टला ठरल्याप्रमाणे घाटी येथे अकरा वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी जमा झाले आणि त्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणार्‍यांमध्ये डॉ. संध्या करमनकर, अशोक पवार, अ‍ॅड. सतीश धुतडमाल, शंकर थळकर, गणेश पाटील, आयुब खान, जगदीश परदेशी, दांडगे इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते. रक्तदान करण्याकरिता मदत म्हणून बळीराम किनाळकर आणि वेंकट भोसले हे उपस्थित होते. त्यांचे वय ६० पेक्षा जास्त असल्यामुळे ते रक्तदान करू शकले नाहीत. परंतु त्यांनी सर्वांचे मनोबल वाढवले. रक्तदानानंतर डॉ. संध्या करमनकर यांनी ऑगस्ट महिन्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या प्रती सर्व डॉक्टर तसेच टेक्निशियन यांना देऊन आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. कॉफी, चहा, बिस्किट झाल्यानंतर रक्तदान शिबिर संपले. आजचा दिवस हा डॉ. दाभोलकर यांच्या स्मरणात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात पार पडला.

जालना

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विवेकी पुस्तकांचे लोकार्पण

२० ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तेरा वर्षे पूर्ण होत आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित विवेकी पुस्तकांचे इंग्रजी आवृत्तीच्या दहा पुस्तकांचे लोकार्पण डॉ. दाभोलकर यांचा स्मृतिदिनी करण्यात आले.

याप्रसंगी राज्य कार्यकारी समिती सदस्य मधुकर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, शंकर बोर्डे, मनोहर सरोदे, संतोष मोरे, संजय हेरकर, नामदेव गव्हाणे, राजेंद्र साबळे, अ‍ॅड. सुभाष कांबळे, अ‍ॅड. सुबोध बुक्तरे, अ‍ॅड. अमोल वाकळे, माया गायकवाड, सुरेखा भालेराव, मनिषा गिराम, इंदुताई गायकवाड, द्रोपदाबाई बोर्डे, रेखा गिराम, स्मितेश गायकवाड यांची उपस्थिती होती.

परभणी

वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्काराचे सादरीकरण या कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३ व्या स्मृति दिनानिमित शासकीय आयटीआय, परभणी येथे वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्काराचे सादरीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी एम. के. ब्राह्मणे, एस. जी. टिपरसे, प्रा. रफिक शेख व प्रा. डॉ. चंद्रकांत गांगुर्डे यांची उपस्थिती होती. या वेळी मुंजाजी कांबळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन हा राष्ट्रीय ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो, असे सांगून अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी शोषण करणार्‍या अंधश्रद्धांचा कडाडून विरोध केला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार केला, विद्यार्थ्यांमध्ये विवेक वाहिनीच्या माध्यमातून विवेकी विचार पोहचवले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे कार्यकारण भाव शोधला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जीवनाकडे बघण्याचा यशस्वी होण्याचा अधिक चांगला माणूस होण्याचा दृष्टिकोन होय. आपण हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला तर आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन शब्द प्रामाण्य नाकारतो, वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रंथप्रामाण्य देखील नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करा, यामध्येच आपल्या देशाचे भवितव्य आहे, असे विद्यार्थ्यांना सूचित केले. यानंतर प्रा. माणिक लिंगायत यांनी चमत्काराचे सादरीकरण करून त्यामागील कार्यकारण भाव सांगितला व शोधक बुद्धी वापरली पाहिजे, हे सांगितले. शेवटी प्रा. रफिक शेख सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना  विवेकी विचार आत्मसात करूनच जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला दिला.

विवेकदीप मालिकेतील चार पुस्तिकांचे प्रकाशन संपन्न

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त परभणी अंनिसच्या वतीने विवेक ग्रंथमालेतील अंनिस वार्तापत्र सहसंपादक अनिल चव्हाण लिखित चार शहिदांच्या पुस्तिकांचे प्रकाशन शारदा महाविद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य डॉ. बबन पवार यांच्या अध्यक्षतेखाली मानवमुक्ती मिशनचे प्रमुख नितीन सावंत व साहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका भावसार (अझख) यांच्या हस्ते झाले. या वेळी विचारपीठावर डॉ. सुनील जाधव, स्वामी, मुंजाजी कांबळे, उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती. या वेळी नितीन सावंत म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांचे विवेकवादी व परिवर्तनवादी चळवळीसाठी मोलाचे योगदान राहिले. प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे, प्रश्न केला पाहिजे हा आग्रह धरला. दुबळ्यांची बाजू घेतली, सत्याचा मार्ग सांगितला, विवेकाचा विचार रुजविण्यासाठी बलिदान दिले. हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी राधिका भावसार यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे कार्य कसे प्रेरणादायी होते, हे सांगताना म्हणाल्या, “भीतीतून अंधश्रद्धेचा जन्म होतो, त्यामुळे भयमुक्त होणे आवश्यक आहे. भगवद्गीतेत काय सांगितले तर चांगले कर्म करा, वाईट काम करू नका, जे कर्म कराल तेच फळ मिळेल चांगले कर्म केल्यास कुठलेही कर्मकांड करण्याची आवश्यकता भासणार नाही. सतत प्रयत्नवादी राहा, निराश होऊ नका, कष्टाचा मार्ग हाच खरा मार्ग असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बबन पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती जोपासून आपला मार्ग सुखकर करावा. हा मार्गच विवेकाकडे घेऊन जाणारा आहे.”

कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘डॉ. दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ’ हे अभिवादन गीत मुंजाजी कांबळे यांनी गायले. डॉ. सुनील जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,   प्रा. डॉ. सचिन खडके यांनी सूत्रसंचालन, प्रा. डॉ. अविनाश पांचाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमात प्रा. रफिक शेख, प्रा. डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, प्रा. माणिक लिंगायत यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

अहमदपूर

मॉर्निंग वॉकला वृक्ष लावून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन!

विद्यावर्धिनी विद्यालयात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोल म्हणाले की, येणारा काळ हा वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन चालणारा असून तरुण पिढीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे काळाची गरज आहे. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, महात्मा गांधी महाविद्यालय, डॉ. चंद्रकांत उगिले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल खडसे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, मेघराज गायकवाड, पूजा गायकवाड, संस्थाध्यक्ष शिवाजी पाटील, मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘अंधश्रद्धा विनाशाय’ या विषयावर उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या घटनेमध्ये का? कशामुळे? कधी? असा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत आपणाला त्या घटनेतील सत्यता समजत नाही. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही तोपर्यंत विद्यार्थी अंधश्रद्धेपासून दूर जाणार. नरबळी, प्राणीबळी, जादूटोणा, भानामती, करणी, अघोरी पूजा, चुकीच्या पारंपरिक प्रथा अशा सर्व थोतांड बाबी आहेत. यश मिळवण्यासाठी जगामध्ये अशी कुठलीच चमत्कारिक गोष्ट नाही. यश हे स्वतःच्या कष्टाने, जिद्दीने, मेहनतीने मिळते. अंधश्रद्धा ही आपल्याला सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक विनाशाकडे घेऊन जाते. यापासून विद्यार्थ्यांनी स्वतः दूर राहावेच, त्याबरोबर आपल्या जवळच्या सर्वांना दूर ठेवण्याचे काम करावे. डॉ. दाभोलकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम देशात आणि परदेशात पण केलेले आहे. त्यांच्यानंतरही हे काम मोठ्या जोमाने चालू आहे.”

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल खडके म्हणाले, “अंधश्रद्धा ही बर्‍याच वेळा मानसिक आजाराशी संबंधित असते. बर्‍याच मानसिक आजारांना हे भोंदूबाबा करणी, भानामती आहेत असे म्हणतात व याचा फायदा घेत भोंदू बाबा आर्थिक फसवणूक करतात. ग्रामीण भागामध्ये सर्पदंश झाल्यावर मांत्रिकाकडे घेऊन जातात, परंतु हे चुकीचे आहे. यामुळे माणसाला जीव गमवावा लागतो, म्हणून सर्पदंश झाल्यावर किंवा कोणताही शारीरिक आजार झाल्यावर कोणत्याही बुवा-बाबाकडे न जाता जवळच्या डॉटरांचा सल्ला घ्यावा.”

महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार म्हणाले की, डॉ. दाभोलकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विवेक वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेले आहे. फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, तर ज्ञान हे आपल्या तार्किक बुद्धीने घेणे होय. युवा पिढीने येणार्‍या काळामध्ये सतर्क राहावे. विविध माध्यमातून फसवणूक होत आहे, त्याला बळी न पडता आपल्या तर्कबुद्धीने विचार करणे गरजेचे आहे.

सकाळी जिल्हा परिषद मैदानावर वृक्ष लावून अभिवादन करण्यात आले. प्रा. रत्नाकर नळेगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संस्थाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड शहर

समविचारी संघटनांसह जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन

‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून हा त्यांचे विचार संपविण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता’, असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदविले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही. या खुनामागचे सूत्रधार अजूनही मोकाटच आहेत. त्यांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरू नाहीत. दुसरी बाब म्हणजे, या विषयी सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही, ही अक्षम्य दिरंगाई आहे. सीबीआयने तातडीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी. तसेच देशभरातल्या वाढत्या बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायदा देशभरात लागू करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

सदरील निवेदनावर अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य इंजि. सम्राट हटकर, डॉ. एस. बी. राठोड, डॉ. सारिका, प्रा. डॉ. संग्राम पंडित, दत्ताभाऊ तुमवाड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, विठ्ठल भंडारे, प्रा. नागनाथ गिरगावकर, अब्दुल कादिर, इंजि. नागराज मक्किताय, आर. एम. मुंगल, जी. एम. पवार आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

विवेकदीप मालिकेतील पुस्तिकांचे लोकार्पण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कोण होते कॉ. गोविंद पानसरे, कोण होते एम. एम. कलबुर्गी व कोण होत्या गौरी लंकेश या पुस्तिकांचे लोकार्पण कवयित्री सारिका उबाळे यांच्या हस्ते एसपीएस क्लासेस, श्यामनगर येथे करण्यात आले. त्या वेळी त्या म्हणाल्या की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक अंधूकशी रेषा असते. ती रेषा तर्क, अनुभव व निरीक्षणाद्वारे ओळखता आली पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून देशात अहिष्णुतेचं प्रमाण वाढलेलं आहे. विचारांचा प्रतिवाद विचाराने करू शकत नसणारे लोक हिंसेचा मार्ग अवलंबत असतात. अशाच प्रवृत्तींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केली आहे. प्रत्यक्ष हत्या करणार्‍या आरोपींना, ज्याची आपण हत्या करतोय ते कोण होते याची पूर्णतः माहिती असण्याची शक्यता नसणार. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सामान्य लोकांना या विचारवंतांची ओळख व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकल्प हाती घेतला. अनिल चव्हाण लिखित या पुस्तिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अंनिसने केला आहे.

वरील कार्यक्रमात अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य सम्राट हटकर यांनी विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयाची मांडणी व प्रास्ताविक केले.

प्रा. साई किरण सलगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर अंनिसचे कार्याध्यक्ष भगवान चंद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास भगवान पवार, नागराज आदी कार्यकर्ते तसेच १२५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बिलोली

चमत्काराला विज्ञानाचा आरसाअंधश्रद्धेला अंनिसचा सवाल

अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारी फसवणूक, चमत्कारांच्या नावाने केली जाणारी दिशाभूल आणि व्यसनांच्या विळख्यात अडकणार्‍या तरुण पिढीला विवेकाची दिशा देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बिलोली शाखेने जनजागृतीचा जागर केला. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दगडापूर येथील माध्यमिक आश्रमशाळेत वैज्ञानिक प्रयोग, प्रबोधन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दाभोलकर हत्या प्रकरणातील कथित सूत्रधारांवर कारवाईसह तीन प्रमुख मागण्यांचे निवेदन बिलोली तहसीलदारांना देण्यात आले.

इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करून तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे उलगडण्यात आली. प्रयोग दाखवून थांबण्याऐवजी त्यामागील कार्यकारणभाव आणि वैज्ञानिक तत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. डोळ्यांना दिसते म्हणून प्रत्येक गोष्ट खरी मानू नका; प्रश्न विचारा, कारण शोधा, पुरावा तपासा आणि मगच निष्कर्ष काढा, असा संदेश महाराष्ट्र अंनिसचे राज्य सहकार्यवाह कमलाकर जमदडे यांनी दिला.

आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, अपप्रचार आणि अंधविश्वास क्षणार्धात पसरत असताना विद्यार्थ्यांच्या मनात चिकित्सक विचारांची बिजे रुजविणे ही काळाची गरज आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक, आर्थिक लूट, भीती किंवा शोषण होत असेल, तर त्याविरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठविण्याचे आवाहनही करण्यात आले.

व्यसनांपासून मोबाईलपर्यंत जागृती

कार्यक्रमात व्यसनमुक्तीवरही मार्गदर्शन करण्यात आले. दारू, तंबाखू, गुटखा आणि सिगारेटपासून दूर राहण्याचे आवाहन करताना मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापराचे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारे परिणाम स्पष्ट करण्यात आले. मित्रांच्या आग्रहापोटी एकदा करून पाहतो हीच अनेक व्यसनांची सुरुवात ठरू शकते, असा इशारा देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात अशोक वाघमारे यांच्या चळवळीच्या गीताने झाली. अंनिसचे बिलोली तालुकाध्यक्ष मारुती भदरगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारसरणीवर मार्गदर्शन केले. माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शेख सर अध्यक्षस्थानी होते. रमेश मुरशेटवार, उमाकांत वकशट्टे, धुळेकर सर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

१३ वर्षांनंतरही ‘सूत्रधार कुठे?’

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १३ वर्षे पूर्ण होत असतानाही हत्येमागील कथित सूत्रधारांपर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेली नसल्याबद्दल अंनिस आणि पुरोगामी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मारेकरी सापडले, मग सूत्रधार कुठे? असा सवाल उपस्थित करीत बिलोली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर कमलाकर जमदडे, सायलू कारमोड, प्रा. शंकर पवार, अशोक वाघमारे, बालाजी यलगंदरे, नामदेव कल्याणकर आणि गोविंद बिरकुरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

अंधश्रद्धेला प्रश्न, चमत्काराला विज्ञान आणि अफवेला पुराव्याची कसोटी यातूनच विवेकशील समाजाची पायाभरणी होऊ शकते. दाभोलकरांनी पेटवलेली वैज्ञानिक विचारांची ज्योत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

वर्धा

निर्भय मॉर्निंग वॉक

आजही असंख्य कार्यकर्ते डॉ. दाभोलकरांनी  निर्माण केलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अधिक जोमाने करत आहेत, म्हणून विचारवंतांची हत्या केल्याने त्यांचे विचार कधीही संपविता येत नाही, असे विचार डॉ. प्रवीण धाकटे यांनी निर्भय मॉर्निंग वॉकच्या प्रसंगी मांडले. दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करून सदर रॅली म. गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत गेली व म. गांधी यांना अभिवादन करून मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला.  या प्रसंगी डॉ. प्रवीण धाकटे, अ‍ॅड. पूजा जाधव, डॉ. नरेंद्रकुमार कांबळे, महेश दुबे, जानरावजी नागमोते, उषाताई कांबळे, प्रियदर्शन भेले, शीतल बनसोड, राजेश वाघमारे, सुरेश रंगारी व अनिल भोंगाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ज्योत्स्ना वासनिक (जिल्हा प्रधान सचिव-महाराष्ट्र अंनिस वर्धा), अनिल भिंगाडे, दिनेश भेले, चंद्रप्रकाश बनसोड, बाबाराव शंभरकर, राजेंद्र नाईक, सुधाकर दडमल, माया दडमल यांनी सहकार्य केले.

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

दिनांक २० ऑगस्ट रोजी  सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. प्रवीण धाकटे (वर्धा जिल्हाध्यक्ष, अंनिस), अ‍ॅड. पूजा जाधव (राज्य कार्यकारिणी सदस्य), डॉ. नरेंद्रकुमार कांबळे (राज्य कार्यकारिणी सदस्य-अंनिस), महेश दुबे, जानरावजी नागमोते, उषाताई कांबळे, प्रियदर्शन भेले, शीतल बनसोड, राजेश वाघमारे (जिल्हा उपाध्यक्ष), सुरेश रंगारी (जिल्हा कार्याध्यक्ष) व अनिल भोंगाडे, ज्योत्स्ना वासनिक (जिल्हा प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस वर्धा), दिनेश भेले, चंद्रप्रकाश बनसोड, बाबाराव शंभरकर, राजेंद्र नाईक, सुधाकर दडमल, माया दडमल यांनी सहकार्य केले.

नागपूर शहर

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा तसेच विविध शाखा एकत्र येऊन कार्यकर्त्यांची संविधान चौक ते ओल्ड मॉरिस कॉलेजपर्यंत जनजागृती

दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता संविधान चौक येथून जनजागृती पदयात्रेला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गावरून रिझर्व्ह बँक, नागपूर संविधान चौकापासून मॉरिस कॉलेजपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत दहा शाखांचे १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली.

प्रमुख घोषणा अशा होत्या, “अंधश्रद्धा हटवा, माणुसकी जगवा,” “विज्ञानाची कास धरू, पुरोगामी महाराष्ट्र घडवू,” “चमत्कार नाही विज्ञान आहे, हाच खरा धर्म आहे,” “विचार करा, विवेक जागवा.”

संविधान चौकात पोहोचल्यानंतर डॉ. दाभोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी आदरांजलीनिमित्त दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सुनील भगत म्हणाले, “डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी काम केले.” जिल्हाध्यक्ष संध्या राजूरकर म्हणाल्या, “त्यांच्या हत्येला आज १३ वर्षे झाली, तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत.” ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, “माणूस मारता येतो, पण  माणसाचे पेरलेले विचार मारता येऊ शकत नाहीत.” चित्तरंजन चौरे म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आजीवन संघर्षाचेच फळ आहे.”

संविधान चौकात उपाध्यक्ष शोभा पाटील यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. तसेच ‘विज्ञान आणि संविधान’ या विषयावर रामभाऊ डोंगरे यांनी व्याख्यान दिले. देवानंद बडगे सांस्कृतिक विभाग यांनी अभिवादन गीत ‘डॉ. दाभोलकर, जोमाने नेऊ पुढे चळवळ..’ सामूहिकरित्या सादर केले.

कार्यक्रमाचे शेवटी रामभाऊ डोंगरे(राज्य कार्यकारिणी सदस्य), डॉ. सुनील भगत, देवयानी भगत, मंगला गाणार, सुषमा शेवाळे, शीला डोंगरे, दीप्ती नाईक, विजया ठाकरे, शोभा पाटील, निशा मेश्राम, प्रिया गजभिये व अनेक कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन डॉ. दाभोलकर यांचा खून करणारे मारेकरी यांना अटक करा या मागणीचे निवेदन दिले. संध्याकाळी प्रत्येक शाखेत मेणबत्त्या लावून आदरांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रम शांततेत आणि संवैधानिक मार्गाने पार पडला.

रामटेक

रामटेक तालुका शाखा जिल्हा नागपूर यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देताना कांचनमाला मोरेश्वर माकडे, नानाभाऊ उराडे, बबीता कोठेकर, रंजना मस्के, श्रीधर पुंड, विमल नागपुरे, प्रा. समर मोटघरे, ज्योती वानखेडे, अलका सेलोकर, नरेश महाजन व इतर उपस्थित होते.

भिवापूर

तहसिलदारांना निवदेन

२० ऑगस्ट रोजी समिती व पुरोगामी विचारसरणीच्या संघटनांनी डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार तातडीने शोधून अटक करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन भिवापूर तहसीलदारांना दिले.

या निवेदनात  वीरेंद्रसिंग तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांच्या सुटकेविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणीही करण्यात आली. हे निवेदन देताना सचिन काळे, लव जनबंधू, सुगत वाघमारे, सुनील जांभूळकर, प्रेमदास सोरदे, जयंत जनबंधू, बिरंजीलाल भागवतकर, नीरज तांबे व सचिन आंबोने उपस्थित होते.

तहसिलदारांना निवेदन

शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या स्मृती प्रित्यर्थ सिध्दार्थ बुद्ध विहार, सिध्दार्थनगर, तुकूम, चंद्रपूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा चंद्रपूरच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान मारोतराव रायपुरे (जिल्हा अध्यक्ष), आयुष्यमती शारदा खोब्रागडे (राज्य विभागीय सदस्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत व विशेष अतिथी म्हणून सतिश रामटेके (सचिव, सिध्दार्थ बुद्ध विहार सिध्दार्थनगर, तुकूम, चंद्रपूर) हे उपस्थित होते. याप्रसंगी मंचावरील मान्यवरांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून संघटनेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. संघटनेच्या पदाधिकारी आयुष्यमती लताताई टिपले व आयुष्यमती सुरेखा रामटेके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा उजाळा करून त्यांना अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाला श्रीमती गंगा हस्ते मॅडम, आयुष्यमती जयंती वनकर, मुक्ता पेटकर, रीना रायपुरे, आयु. देवीदास दुर्गे, आयु. मुकेश मेश्राम साहेब, आयु. रामटेके सर, आयुष्यमती करूणा गेडकर मॅडम, आयु. सुनील साव, आयु. श्रीधर भगत तसेच संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष आयु. भीमलाल साव व सूत्रसंचालन आयु. नागेश पेटकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती गंगा हस्ते मॅडम आणि इतर पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर मान. जिल्हाधिकारी, जिल्हा चंद्रपूर यांना संघटनेचे निवेदन देण्यात आले.

खेड (जि. रत्नागिरी)

तहसिलदारांना निवेदन

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील काही संशयितांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. खुनातील फरार संशयितांना तातडीने पकडावे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन खेड तहसिलदार यांना देण्यात आले.

याप्रसंगी समितीचे शाखाध्यक्ष मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष प्रशांत पावसकर, प्रधान सचिव समीर पाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई

दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांचा कार्यक्रम तसेच  मअंनिसद्वारा प्रकाशित ४ पुस्तकांचे लोकार्पण या कार्यक्रमांचे आयोजन केशव गोरे स्मारक , गोरेगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला पत्रकार युवराज मोहिते, अ‍ॅड. सौम्या कोरडे, तरुण व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव आणि मंगला मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते चार पुस्तिकांचे प्रकाशन झाले.

विवेकवादी चळवळीचे विचार आणि कार्य तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या माध्यमांचा वापर केला पाहिजे, असे मत पत्रकार युवराज मोहिते यांनी व्यक्त केले. अ‍ॅड. सौम्या कोरडे यांनी डिजिटल माध्यमातून डिजिटल बुवाबाजी तरुणांची कशी फसवणूक करते. तसेच त्याला आळा घालण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

तरुण व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून विवेकवादी विचारांच्या प्रसारावर भाष्य केले. व्यंगचित्र हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजातील अंधश्रद्धा आणि विसंगती टिपून विवेकवादी विचारांची रेषा दूरवर नेण्याचे प्रभावी साधन आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौरव सर्जेराव हे व्यंगचित्रकारासोबतच नकलाकार म्हणूनही परिचित झाले. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, रामदास आठवले यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक  कलाकारांच्या आवाजाची  त्यांनी हुबेहूब नकल सादर केली. त्याला उपस्थितांनी खळखळून हसत टाळ्या वाजवून दाद दिली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रभा पुरोहित, शुभदा निखार्गे, सुनीता देवलवार, ज्योती मालंडकर, आशा हुंबे-पडळकर, समीर, प्रथमेश यांनी विशेष परिश्रम घेतले.

तहसिलदारांना निवदेन

डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधारांना पकडण्यासाठी सरकारने काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्याबाबत पालघर जिल्हा अंनिसच्या वतीने २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त मा. दीपक गायकवाड, तहसीलदार वसई यांना निवेदन दिले. तसेच विवेकदीप चरित्रमालेच्या  चार पुस्तिकांचे लोकार्पण तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पालघर जिल्हा अंनिसतर्फे अण्णा कडलासकर, जॉन परेरा, गौतम कांबळे, अंजना देवकाते, अ‍ॅलेक्स डाबरे व संदेश घोलप हे अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते.

पेण

जिल्हास्तरीय स्पर्धांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण शाखेतर्फे २० ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त भव्य जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वतृत्व, रील आणि पोस्टर या तीनही प्रकारच्या स्पर्धांना संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचा आणि युवा वर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट गीतकार, कवी व अभिनेते डॉ. विनायक पवार सर उपस्थित होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर प्रा. डॉ. शेख सर आणि मीना मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गुणवंत स्पर्धकांची निवड करण्यासाठी सावनी गोडबोले, एन. जे. पाटील (पोस्टर स्पर्धा), जगदीश डंगर, विशाल चांदोरकर(रील स्पर्धा) आणि अजय भोईर व नंदकिशोर परब (वतृत्व स्पर्धा) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :

रील स्पर्धा :

प्रथम : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, पेण
द्वितीय : जयेश जगन्नाथ मोरे (अलिबाग)
तृतीय : रा. जि. प. शाळा, वादमाळवाडी (पेण)
उत्तेजनार्थ : अमित निंबाळकर (पाली)

पोस्टर स्पर्धा :

प्रथम : आरोही स्वप्नील पिंगळे (सौ. म. ना. नेने कन्या विद्यालय)
द्वितीय : सिद्धी विजय पाटील (ब. ग. ठाकूर विद्यालय)
तृतीय : ध्रुविका देवानंद कुडमेथे

वतृत्व स्पर्धा :

प्रथम : प्राजक्ता सागवेकर
द्वितीय : आर्या दिलीप जोजे
तृतीय : ईश्वरी विवेक सावंत

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाकांत घरत, योगिता डंगर, नंदकिशोर परब आणि जगदीश डंगर यांनी विशेष परिश्रम घेतले. संदेश गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

बेलापूर

            डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही या खुनाच्या कटाचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. यापुढे शासनाने तपासाची प्रक्रिया जलदगतीने करून मुख्य सूत्रधार पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व देशभरातील वाढत्या बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभरात लागू करावा, या मागण्यांसाठी नवी मुंबईतील कोकण भवन येथील तहसीलदार यांच्यामार्फत बेलापूर नेरूळ शाखेतर्फे शासनाला निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर बेलापूर सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत बेलापूर-नेरूळ शाखेतर्फे आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारामागील विज्ञान हा कार्यक्रम सादर करण्यात आला. बेलापूर-नेरूळ शाखेचे कार्याध्यक्ष रमेश साळुंखे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर मार्गदर्शन करत बुवा-बाबांच्या विविध चमत्कारांची भांडाफोड करणारी प्रात्यक्षिके सादर केली, ज्यात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नंतर झालेल्या प्रश्नोत्तरात विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्याची समर्पक उत्तरे रमेश साळुंखे व रेखा देशपांडे यांनी दिली.

वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार कार्यक्रमांचे येथील  विविध ठिकाणी आयोजन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, मोहने, आंबिवली व अंबरनाथ येथील विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांमध्ये विविध चमत्कारांचे वैज्ञानिक विश्लेषण, अंधश्रद्धांमागील गैरसमज, बुवाबाजी व फसवणुकीचे प्रकार याबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. चमत्कारांवर अंधविश्वास न ठेवता प्रत्येक गोष्टीमागील कारणमीमांसा, निरीक्षण, प्रयोग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा, असा संदेश या वेळी देण्यात आला.

विविध ठिकाणी उपक्रम

डोंबिवली परिसरात पेंढारकर महाविद्यालय, साउथ इंडियन हायस्कूल आणि जोंधळे हायस्कूल येथे कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

कल्याण येथे कल्याण पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधारांना अटक करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

उल्हासनगर येथे विजयाताई हायस्कूल तसेच तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन येथे जनजागृतीपर उपक्रम व निवेदन देण्यात आले.

अंबरनाथ येथे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि ज्ञान अमृत हायस्कूल येथे कार्यक्रम व निवेदनाचा उपक्रम राबविण्यात आला. अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे याप्रसंगी साहाय्यक पी.एस.आय. श्री. गमे व श्री. हसगुले यांनी अंनिसच्या कामाप्रति संवेदना व अंनिसच्या कामाची समाजात वाढती गरज असल्याचे मत व्यक्त करून सोबत संयुक्त कार्यक्रम करण्यासाठी सहकार्य करू असेही सांगितले. तसेच परिवर्तन संस्था अंबरनाथमधील ज्ञानामृत विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी किरण जाधव यांनी डॉ. दाभोलकरांचे कार्य समाजाला कसे दिशादर्शक होते, हे सांगितले. तसेच विज्ञान आपल्या रोजच्या जगण्यात आहे असे स्पष्ट केले. डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता काय आहे, हे स्पष्ट करून काही  सप्रयोग चमत्कारांचे सादरीकरण केले. तसेच श्री. वराडे सर यांनी नेमकी श्रद्धा आणि अंधश्रद्धा कोणती आणि विद्यार्थ्यांनी त्याचा डोळसपणे विचार करून आपल्या शिक्षणातून विकास कसा करता येईल, हे स्पष्ट केले. या प्रसंगी अंनिसचे कार्यकर्ते श्री. बबन सोनवणे, शाळेतील शिक्षक यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला.

आंबिवली-मोहने परिसरातील सिद्धार्थ हायस्कूल येथेही वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आला.

पुस्तक प्रकाशन व लोकार्पण

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले. समाजामध्ये विवेक, प्रश्न विचारण्याची वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

या संपूर्ण उपक्रमामध्ये श्री. बबन नागले, श्री. बबन सोनवणे, श्री. राजेंद्र कोळी, श्री. अशोक वानखडे, श्री. डी. जे. वाघमारे, शाहीर आकाश पवार, श्री. प्रसाद खुळे, डॉ. श्यामकांत जाधव, सौ. किरणताई जाधव, श्री. किसान वराडे, श्री. बबन सोनवणे (अंबरनाथ), सौ. विंदाताई वाघमारे, सौ. अश्विनी माने, श्री. गौतम मोरे, श्री. अशोक वाघरे, बाळू नेटके आदी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी सक्रिय सहभाग घेतला.

अंधश्रद्धेपेक्षा शिक्षण मोठे, भीतीपेक्षा विज्ञान मोठे आणि चमत्कारापेक्षा सत्य मोठे हा विचार समाजात रुजविणे, हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

चाळीसगाव

जादूटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम

शाखेच्या वतीने २० ऑगस्ट डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर विज्ञान प्रश्नोत्तरे, जादूटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  

चाळीसगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी चाळीसगावच्या तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांच्यामार्फत शासनाकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणातील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगाव आणि  प्रगतीशील लेखक संघ बेळगाव शाखेच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा १३ वा स्मृतिदिन पाळून त्यांना अभिवादन करण्यात आले.

बेळगाव येथील गिरीश संकुलनमधील भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम झाला. अंनिस बेळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

सुरुवातीला प्रमुख वक्ते यश आंबोळे यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी अंनिस बेळगाव शाखेचे सचिव जोतिबा अगसीमनी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. अंनिस बेळगाव शाखेचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले यांनी पाहुण्यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

प्रमुख वक्ते यश आंबोळे यांनी ‘बसव तत्त्वज्ञान आणि आजचा समाज’ या विषयावर विवेचन केले. डॉ. दाभोलकर यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बसवण्णांच्या समता, बंधुता, वैज्ञानिकतेच्या विचारांचा आजही समाजाला किती उपयोग आहे, हे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी सुभाष होळकर, एस. जी. पाटील, अनिल आजगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर अर्जुन चौगुले यांनी आभार मानले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]