रक्तदान

डॉ. प्रसन्न दाभोलकर -

सर वर्गात आल्यावर राजेशने हात वर करून विचारले, “सर, आज आपण वर्गात रक्तदानाबद्दल चर्चा करू या का?”

सर उत्साहाने म्हणाले, “जरूर. राजेश तुला हे अचानक कसं सुचलं?”

त्यावर अभिमानाने राजेश म्हणाला, “गेल्या आठवड्यात माझ्या ताईला अठरा वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी तिनं रक्तदान केलं. मी, आई व बाबा तिच्याबरोबर गेलो होतो. मला खूप कूल वाटलं.”

“मला तर रक्ताची भीतीच वाटते.” अर्चना बोलून गेली.

“मलाही वाटत होती.” राजेश तिला समजावून सांगू लागला. “तिथं काळजीपूर्वक रक्त गोळा करतात. खूप माणसं मदतीला असतात. हे बघितलं आणि माझी भीती पळाली. मी पण अठरा वर्षांचा झाल्यावर रक्तदान करणार.”

“पण सर, रक्त तर प्रत्येकाच्या अंगात असतं. मग रक्तदान का करायचं?” कल्पेशने प्रश्न केला.

“कोण देतंय कल्पेशच्या प्रश्नाचं उत्तर?” देशमुख सरांनी विचारले.

“सर, अ‍ॅक्सीडेंट झाला आणि खूप रक्त गेलं तर रक्त देतात.” “मोठ्या ऑपरेशनच्या वेळी रक्त देतात.” “शरीरात रक्त कमी असलं तर.” “माझ्या मावशीच्या बाळंतपणात तिला दिलं होतं.” अनेक उत्तरे पुढे आली.

आनंदाने सर म्हणाले, “शाब्बास. प्रत्येकाच्या शरीरात रक्त असतेच; पण अनेक कारणांनी ते पुरेसे ठरत नाही किंवा त्यात काही दोष निर्माण होतात अशा वेळी आपल्याला ते बाहेरून द्यावे लागते. माणसाचं रक्त फक्त माणसातच तयार होतं. त्यामुळे कुणीतरी दिल्याशिवाय ज्याला गरज आहे त्याला रक्त कसं मिळणार?”

“रक्त विकत नाही मिळत?” कुणीतरी विचारले.

सर म्हणाले, “नाही. रक्त किंवा इतर कोणताही मानवी अवयव फक्त दानच करता येतो, विकता येत नाही. याबाबत मोठे कडक कायदे आहेत.”

“पण सर, ब्लड बँकेमध्ये रक्त घेताना आपल्याला पैसे द्यावे लागतात, हजारपेक्षा जास्त रुपये. ते का म्हणून?” नियमावर बोट ठेवून चालणार्‍या आमच्या मॉनिटर सर्वेशने विचारले.

“रक्तदाता त्याचे रक्त फुकट देतो; पण रक्त गोळा करणे, ते नीट साठवणे, त्याचे वेगवेगळे घटक अलग करणे, रक्तदानाबाबत जनजागृती करणे, रक्तदानाची शिबिरे आयोजित करणे या सर्व गोष्टींसाठी रक्तपेढ्यांना खूप खर्च येत असतो. तो खर्च भरून निघण्यासाठी सरकारने ठरवून दिलेले पैसे रक्तपेढ्या ग्राहकांकडून घेऊ शकतात; परंतु रक्तपेढ्या या फायदेशीर व्यवसाय म्हणून चालवता येत नाहीत.” सरांनी समजावून सांगितले.

“पण अठरा वर्षांच्या आधी रक्त का नाही देता येत?” चुणचुणीत मितवाने विचारलेच.

“अठराव्या वर्षी आपण सज्ञान होतो म्हणून असेल; पण अठराव्या वर्षाला काय एवढं सोनं लागलंय?” शकीलने विचारले.

सर सांगू लागले, “सज्ञान म्हणजे कायद्यानुसार आता आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ, बँकेत स्वतःचे स्वतंत्र खाते उघडणे, मतदानाचा अधिकार इत्यादी. आपली शारीरिक वाढही पुरेशी झाली असते. कायद्याने सज्ञान होण्यासाठी शिक्षणाची अट नसते. आपल्या भारत देशात वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की, सर्व माणसे कायद्यानुसार सज्ञान समजली जातात. याचा अर्थ असा की, आता आपण जे करू त्याला आपण जबाबदार असतो.”

“म्हणजे अठरा वर्षांची मर्यादा ही कायद्यामुळं आहे, शारीरिकदृष्ट्या नाही. असंच ना?” विचारी विचक्षणने विचारले.

“बरोबर.” सर म्हणाले. “शारीरिकदृष्ट्या एखादा माणूस रक्त देण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी रक्तपेढीमध्ये केली जाते. ज्या माणसाची शारीरिक क्षमता असेल त्याचेच रक्त घेतले जाते. ६५ वर्ष वयानंतरच्या माणसांचं रक्तदेखील भारतात घेत नाहीत.”

“सर, रक्त देताना खूप त्रास होत असेल नाही? दुखतं?” अर्चनाने हळूच विचारले.

“रक्त दिल्यामुळं अशक्तपणा येत नाही?” दुसरा एक प्रश्न आला.

सर म्हणाले, “रक्तदानाची प्रक्रिया वेदनारहित आणि सुटसुटीत आहे. आपले रक्त काढण्याआधी त्या जागी आपल्याला छोटेसं वेदनाशामक इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे रक्तदान करताना काहीही वेदना होत नाही. एका वेळी माणसाच्या शरीरातून फक्त ३०० मिली रक्त काढलं जातं. धडधाकट माणसाच्या शरीरात जवळजवळ पाच लिटर रक्त असतं. त्यातले तीनशे मिली काढून घेतात म्हणजे किती टक्के रक्त काढून घेतात?”

“सर, दोन टक्क्यांपेक्षाही कमी.” आकडेमोडीत तरबेज असलेल्या भास्करने पटकन सांगितले.

“एवढंच घेतात होय. मग अशक्तपणा येण्याचा प्रश्नच नाही.” अनेक मुले एकदम म्हणाली.

“तरीही रक्तपेढीमध्ये योग्य काळजी घेतली जाते. सुदृढ आणि निरोगी व्यक्तीचेच रक्त घेतात. आपणही काही खाऊन, पिऊन जायचं असतं. रक्त दिल्यानंतर पंधरा मिनिटे तिथेच बसायचं. आपल्याला चहा, बिस्किटे खायला देतात. आपल्याला काहीही त्रास होत नाही याची खात्री करून घेतल्यावरच आपल्याला घरी सोडलं जातं.” सरांनी आम्हाला दिलासा दिला.

“दान केलेलं रक्त भरून यायला किती दिवस जातात?” मैत्रेयीने विचारले.

“४८ तासातच रक्ताचे आकारमान पूर्ववत होते. काही दिवसांत प्लेटलेट्स पूर्ववत होतात. रक्तातील लाल पेशी मात्र हळूहळू निर्माण होतात आणि त्यांना काही महिने जावे लागतात.” सर म्हणाले.

“आपलं रक्त लगेच गरजू माणसाला देतात का?” मिहीरने विचारले. सर्व मुलांच्या चेहर्‍यावर कुतूहल होते.

“नाही.” सर म्हणाले. “रक्तपेढीमध्ये प्रथम त्या रक्तात काही संसर्गजन्य रोग नाहीत ना याची चाचणी घेतली जाते. चांगल्या रक्तातील रक्तपेशी, प्लाझ्मा हा द्रवपदार्थ आणि प्लेटलेट्स वेगवेगळ्या केल्या जातात. ज्या माणसाला ज्या गोष्टीची गरज असेल ते त्याला रक्तपेढी पुरवते. अशा प्रकारे एका माणसाचं रक्त अनेक आजारी माणसांना उपयोगी पडतं. आपण दिलेल्या रक्ताचा एक थेंबही वाया जात नाही.”

“हो. माझ्या ताईला डेंग्यू झाला होता तेव्हा तिला प्लेटलेट दिल्या होत्या.” ईशा म्हणाली.

“आमच्याकडे कामावर येणार्‍या ताईंच्या रक्तातील लाली कमी होती. त्यांना फक्त लाल पेशी दिल्या असतील, हो ना?” मेधाने आपला अनुभव सांगितला.

“पण सर रक्त दिल्याचा आपल्याला काय फायदा?” राकेशला शंका आलीच.

सर हळुवारपणे समजावून सांगू लागले, “प्रत्येक गोष्ट काही स्वतःच्या फायद्यासाठी करायची नसते. रक्तदान हे दान आहे. त्यात काही परत मिळण्याची अपेक्षा नाही. तरीही रक्तदात्याला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला गरज पडली तर प्राधान्याने रक्त दिले जाते. रक्तदानाचे आपल्याला इतरही काही फायदे होतात. आपल्या शरीरातील रक्तघटक तयार होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. आपला रक्तगट आपल्याला मोफत काढून मिळतो.”

“सर, तुहाला सगळी एवढी माहिती कशी असते?” अभ्यासू सुबुद्धीने आश्चर्याने विचारले.

“आम्ही मित्रमंडळी दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रक्तदान करीत असतो. रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासही आम्ही मदत करतो. त्यातून ही सगळी माहिती गोळा होत गेली. पुस्तकाशिवाय जगात वावरूनही आपल्याला बरंच ज्ञान मिळतं बरं का.” सर हसून म्हणाले.

“दर वर्षी वर्षातून दोनदा रक्त देता येतं?” मनेशने उत्स्फूर्तपणे प्रश्न केला.

आपण दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो. सरांनी संगितले.

“सर, आमचं गणेश मंडळ रक्तदान शिबिर आयोजित करतं.” विशाखा म्हणाली.

“माझे अब्बा आणि चाचा पण ईदला रक्तदान करतात” शकीलने दुजोरा दिला.

“सर मी ऐकलंय, रक्ताचे गट असतात. एका गटाचं रक्त दुसर्‍या गटाला चालत नाही. खरं आहे का ते?” करणचे कुतूहल जागे झाले.

“हवा, पाणी, अन्न, कपडे सर्व माणसांना सारखेच चालतात. मग सगळ्यांचं रक्त सगळ्यांना का नाही चालत?” आज सर्व प्रश्न विचारायच्या मूडमध्ये आले होते.

“वेगळ्या गटाचं रक्त दिलं तर रिअ‍ॅक्शन येते म्हणे. माझी आई आणि मावशी बोलताना मी ऐकलंय.” चैत्रालीने आपले मत मांडले.

“मला वाटतं, आपण रक्तगट या विषयावर पुढच्या बुधवारी चर्चा करू. सर्व जण जास्तीतजास्त माहिती आणि प्रश्न गोळा करा.” असे म्हणून देशमुख सर वर्गाबाहेर पडले.


– डॉ. प्रसन्न दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]