डॉ. दीपक माने -
आदिम काळापासून माणसाने निसर्गाचे अवलोकन, तर्क, निष्कर्ष याद्वारे त्याला उपयुक्त असणार्या प्राणी, वनस्पती सभोवतालचा परिसर याचा उपयोग नेमकेपणाने केलेला दिसतो. काही प्राणी उपयोगी म्हणून त्यांना आपल्या सोबत ठेवण्याचे, संगोपनाचे काम केले. हजारो वर्षांच्या सहवासातून, संगतीतून अनेक प्राण्यांची काही गुणदोष समजून घेत त्याचा व्यापारीकरणसाठी वापर केला. उदा. मदारी – माकडखेळ,गारुडी – साप, सर्कस – हत्ती, वाघ इ. प्राणी ,पक्षी. काही भूतदया, प्राणी कल्याण संघटना यांनी विरोध करून याबाबत पशु/पक्षी क्रूरता कायदा केला. पण अद्याप दूरस्थ संवादक यांचे विरोधी खास कायदा नाही.
प्राणी मानवीकरण (अँट्रोपोमॉर्फिसम) म्हणजे मानवाच्या भावना, गुण, वर्तणूक इ. प्राणी, पक्षी, निर्जीव वस्तू यांना जोडणे; जसे इसापनीती मध्ये कोल्हा असे बोलला किंवा वागला किंवा ग्रह रागावतात, रुसतात तसे दुःख, आनंदसारखे गुण पाळीव प्राणी यांना जोडले. पशुपक्षांचा मेंदू तुलनात्मकदृष्ट्या मानवापेक्षा अविकसित आहे. काहीजण त्याचा उपयोग स्वतःचे स्वार्थासाठी करत, संत तुकाराम महाराज अभंगातून सांगतात तसे…”कपट काही एक नेणें भुलवायचे लोक”
अर्थ-मनात वाईट विचार, हेतू ठेवून लोकांना फसवणे, तद्वत सध्या समाज माध्यमावर अफलातून लुटीचे/शोषणाचे प्राण्याबाबत उद्योग सुरू आहेत. त्यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांत उच्चभ्रू , गर्भश्रीमंत लोक त्याचे वाहक आहेत कारण त्यांचे अनुकरण मध्यमवर्ग करत असतो.या भूलभुलैया उद्योगाचे नाव आहे प्राणी संवादक, जे दावा करतात, की प्राण्यांचे/वस्तूंचे विचार, भावना, वेदना, आठवणी अतिंद्रिय ज्ञानाने म्हणजे पाच ज्ञानेंद्रियांनी जे कळते त्या व्यतिरिक्त विशेष कृतीने दूरसंवाद (टेलिपॅथी) द्वारे प्राणी हरवला असेल तर शोधून देणे, वयस्क प्राणी असेल तर त्याच्या शेवटच्या भावना, प्राणी वर्तन चिडणे, रुसणे, दुःखी असणे, हे आम्हाला कळते. ते सांगतात की एकाग्र होऊन रेडिओ लहरी प्रमाणे विचारांचे प्रक्षेपण चुंबकीय लहरी/निसर्ग ऊर्जा मार्फत दूरस्थ प्राणी/पक्षी यांचेशी ट्युनिंग करून हे ते करतात.
अशा प्रकारेचेच २०० वर्षांपूर्वी १७७०-१७८५ सुमारास इंग्लंडमध्ये प्राणीज चुंबकत्व हा उद्योग डॉ. मेस्मार यांनी “कायनेशीलॉजी” अर्थात मानवी रोग बरे करण्याची पद्धत ‘चुंबकीय द्रव पद्धतीने’ इंग्लंडमध्ये सुरू केली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला; कारण स्वयं सूचना वर्तन याचा तेव्हा अर्थ/परिणाम माहिती नव्हता. बडे उमराव, बडे व्यापारी राजघराण्यातील लोक त्याचे पेशंट होते. पण तत्कालीन राजा सोळावा लुई यांनी ९ लोकांचे कमिशन नेमून सत्य संशोधन केले असता त्यात हे सर्व काल्पनिक असल्याचे दिसले. त्यानंतर हे करणार्यांना देशोदेशी पलायन करावे लागले.
सध्या सुरू असलेल्या दूरस्थ संवाद (टेलीपॅथी) या उद्योगाचे जगभर संशोधन झालेले आहे.त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. विज्ञानाचे काही शब्द वापरून/झुल पांघरुण हे उद्योग केले जात आहेत. लोक फसतात कारण जसे ज्योतिषी, मन कवडे, पानाडे, युक्ती वापरतात तशीच युक्ती हे संवादक वापरतात. ‘गिर्हाईकास दिलासा देणारे शब्द वापर, मोघम वाक्य,काही प्रश्न विचारत माहिती काढून घेणे, तिचा वापर करत गिर्हाईकाचा विश्वास संपादन करणे, आसपासचे निरीक्षण करून अंदाज बांधून, भविष्य वर्तवणारे वापरतात तशीच दहा वीस वाक्ये उदा. तुमचा प्राणी दुःखी आहे, हरवलेल्या प्राण्याबाबत “तो नदी काठी आहे,तो झाडाजवळ आहे” व न सापडल्यास “त्याने जागा बदलली” अशी सारवासारव करतात. यांचे दर पाहता अचंबित व्हावे लागते. एका ३०मिनिट सिटिंगसाठी तीन हजार ते दहा हजार घेतात. याबाबतचा कोर्स ऑनलाईनही देतात. त्याची फी चाळीस/पन्नास हजार आहे. आपल्याकडे पुणे, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे.
याबाबत कायदा नसल्यामुळे कोणीही उठते व प्राणी संवादक बनते.फक्त बनवाबनवी भाषा, चेहरा हावभाव व थोडे विज्ञान शब्द हेच यांचे भांडवल असते.
जसे ज्योतिषी ग्रह कोपाची घालतात तसे पशु मालकास भीती घालतात. घरात नकारात्मक ऊर्जा (जी दिसत नाही, मोजता येत नाही, तिचे अस्तित्व अज्ञात आहे) खूप आहे ती प्राण्यास व मालकाचे जीवितास धोका आहे असे सांगतात. प्राणी प्रेमी लोकांच्या भावनेशी खेळतात कधी अगतिक, तर कधी भाबडेपणाने पशुपालक यांना फसवतात.
एखादा प्राणी आजारी असेल तर हे सांगतात “ऊर्जा उपचार” घ्या. विधी करा. वास्तविक प्राणी रोग निदानासाठी ऑस्कल टेशन (स्टेथोस्कोपद्वारे ठोके मोजणे), श्वास मोजणे, ताप पाहणे, पर्कशन, पाल्पेशन इ. तसेच गरजेनुसार रक्त, मल, मूत्र इ. प्रयोगशाळा तपासणी कराव्या लागतात.
फक्त फोटो बघून, फक्त नाव ऐकून, न पाहता प्राण्याची प्रकृती बाबतचे दावे निरर्थक ठरले आहेत. याबाबत जगभरातील अनेक संघटना यांनी या “प्राणी संवादक” गोष्टीस विरोध केला आहे. उदा. जेम्स रँडी यांची संस्था यांनी मागील पन्नास वर्षांपासून टेलीपॅथी/दूर संवादक यांनी चाचणी देऊन सिद्ध केल्यास दहा लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे अद्याप कोणीही चाचणी साठी पुढे आलेला नाही. अमेरिकन पशुवैद्यक संस्था, ब्रिटिश पशुवैद्यक संघटना, भारतीय प्राणी कल्याण बोर्ड यांनी या ऊर्जा उपचारास विरोध करत योग्य विज्ञान मान्य पशुवैद्यकाचेच उपचार घेण्याबाबत ठाम भूमिका घेतली आहे.
अंतिमतः पशुपालकांनी स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून अशा भूलभुलैयापासून दूर राहावे. आता काय दक्षता घ्याल तर खात्रीने प्राणी शोधून देतो, नक्की आजार बरा करतो, तुमच्या प्राण्यास ऊर्जा उपचार करूया, तुमच्या दुःखी प्राण्याचे आनंदी, सुखमय जीवन करूया, अशी वाक्ये ऐकताच या छद्मी लोकांपासून दूरच राहणे बरे.
– डॉ. दीपक माने
(सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी)
महा. अं. नि. स. कार्यकर्ता
