डॉ.दाभोलकर यांच्या खूनकटातील सुत्रधाराला पकडा! – महाराष्ट्र अंनिसचे राज्यभर आंदोलन

-

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर शासनासनिवेदनाद्वारे तीन मागण्या केल्या. राज्यभरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखांनी केलेल्या आंदोलनाचे हे एकत्रित रिपोर्टींग…

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पुरोगामी विचारांच्या संघटनेचे आम्ही सर्व कार्यकर्ते या निवेदनाद्वारे शासनाकडे खालील तीन मागण्या करीत आहे.

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत.

            डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआय करत होती. सीबीआयने तपास करून त्याविषयी खटला पुणे विशेष न्यायालयात दाखल केला होता. त्यामध्ये पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिलेली आहे. असे असले, तरीही या खुनामागचे सूत्रधार अजूनही मोकाटच आहेत. त्यांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरु नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून या सूत्रधारांना कधी पकडणार असा संतप्त सवाल या निवेदनाद्वारे सरकारला विचारत आहे.

१.  ‘डॉ. दाभोलकरांचा खून हा त्यांचे विचार संपविण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता’, असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदविले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. या सूत्रधारांना त्वरित पकडावे. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून खटले देखील अजून सुरू असल्याने या चारही खुनांमागील सूत्रधारावर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे, असे आम्हाला वाटते.

२.  डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे, त्याविषयी सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही, ही अक्षम्य दिरंगाई आहे. सीबीआय ने तातडीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी अशी मागणी देखील आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत.

            सर्व अडचणींना तोंड देत गेली बारा वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम निर्धाराने सुरू आहे. संघटनेच्या पुढाकाराने महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा असे दोन सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे कायदे पारित करण्यात आले आहेत. त्यामधील जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत १५०० पेक्षा जास्त भोंदू बाबा-बुवांवर कारवाई करण्यात आलेली आहे. अशाच स्वरूपाचा जादूटोणा विरोधी कायदा कर्नाटक व गुजरात या राज्यांमध्येदेखील करण्यात आला आहे. 

३. देशभरातल्या वाढत्या बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायदा देशभरात लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत आम्ही कार्यकर्ते करत आहोत.

            आमच्या या ३ मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी आपणास विनंती आहे.

कोल्हापूर शहर

कोल्हापूर येथे शहीद  डॉ. नरेंद्र दाभोलकर, शहीद कॉ. गोविंद पानसरे, शहीद प्रा. कलबुर्गी आणि शहीद पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनामागील मास्टरमाईंडला पकडा, अशी मागणी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूरच्या वतीने शिवाजी पेठेत काढण्यात आलेल्या मॉर्निंग वॉक मध्ये करण्यात आली.

सुरुवातीला राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल  चव्हाण यांनी  भूमिका स्पष्ट केली. “पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिली. पण या खुनामागील मास्टर माईंडपर्यंत पोलीस पोहचायला तयार नाहीत. तसेच खून खटल्यातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांची न्यायालयाने सुटका केली असली, तरी सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली पाहिजे.”

कॉ. चंद्रकांत यादव यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की “शिक्षा झालेले आरोपी कोल्हापूरमध्ये काही काळ वास्तव्यास होते. ही साधक मंडळी लॉजमध्ये राहात नाहीत, ते दुसर्‍या साधकाच्या घरीच राहतात. तेव्हा या खुनी साधकांना कोल्हापुरातल्या ज्या साधकांनी आश्रय दिला आणि मदत केली त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.”

जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव पोवार यांनी  समाजद्रोही ब्राह्मण्यवादी विचारांचा आढावा घेतला, “वारकरी संतांचा छळ करणारे, संत तुकारामांना वैकुंठाला पोहोचवणारे, संत ज्ञानेश्वर, एकनाथ यांचा छळ करणारे सनातनी विचाराचे होते. त्यांनीच फुले, शाहू, आंबेडकरांना सुद्धा विरोध केलेला आहे. बहुजन समाजाला अज्ञानात, अंधश्रद्धेमध्ये खितपत ठेवण्याचे ब्राह्मण्यवाद्यांचे षड्यंत्र आपण ओळखले पाहिजे!”

“२६- ११ च्या हल्ल्यात ब्राह्मण्यवाद्यांनी हेमंत करकरे यांचा गेम केला हे पुराव्यानिशी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी पुस्तक लिहून प्रसिद्ध केले आहे. यासंबंधी शंभर व्याख्याने घेणार असे जाहीर केल्यामुळे कॉ. गोविंद पानसरे यांचा खून झाला”, असे प्रतिपादन विकास जाधव यांनी केले. खंडोबा तालमीचे अध्यक्ष अजित  हरुगले यांनी,” खुन्याच्या मास्टरमाइंडला पकडा आणि आरोपीला मदत करणार्‍या कोल्हापुरातील साधकावर कारवाई करा” अशी मागणी केली. अ‍ॅडव्होकेट अजित चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.

            मॉर्निंग वॉकमध्ये अनिल चव्हाण, कॉ. चंद्रकांत यादव, स्वप्नील मुळे, पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयंत मिठारी आणि शहराध्यक्ष राजेंद्र खद्रे, प्रहार संस्था, शिवाजी पेठचे अध्यक्ष अमर जाधव, ‘आम्ही मांसाहारी’चे अध्यक्ष आनंदराव चौगुले, अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. विलास पोवार, खंडोबा तालीम माजी अध्यक्ष पंडित पवार, खंडोबा तालीम अध्यक्ष अजित हारूगले, पद्माराजे संवर्धन समिती अध्यक्ष नंदकुमार पाटील-करवते, अ‍ॅड. अजित चव्हाण दत्तात्रय पांचाळ, विकास जाधव, नांद्रेकर सर, सुरेश पाटील, मुकुंद मोरे, कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटना अध्यक्ष संभाजी पाटील, मीना चव्हाण, सुधा सरनाईक (जिजाऊ ब्रिगेड) शीला सरनाईक , रजपूत काकी, योगातज्ज्ञ शोभा पाटील, छाया  पोवार, अकाताई सरनाईक, उगळे मॅडम, विकास जंगम इ. कार्यकर्ते सहभागी झाले.

गडहिंग्लज

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडहिंग्लज शहर तर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे सूत्रधार  शोधून काढून त्यांना शिक्षा करावी, यासाठी मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले जे अव्वल कारकून दीपक जाधव यांनी स्वीकारले. या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे, प्रा. प्रकाश कांबळे, सीताराम कांबळे, अशोकराव मोहिते, प्रज्ञा भोईटे, गीता पाटील, प्रा. आशपाक मकानदार, शशिकांत संघराज, रमेश वांद्रे इ. कार्यकर्ते हजर होते.

निर्भय मॉर्निंग वॉक

            डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडहिंग्लज शहरातून एम.आर. हायस्कूलपासून बाजारपेठेतून ‘निर्भय मॉर्निंग वॉक जागर फेरी’ काढण्यात आली. फेरीमध्ये घोषणा, गाणी यांचा समावेश होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडहिंग्लज, राष्ट्रसेवा दल आणि समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या फेरीमध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला, तालुकाध्यक्ष प्राध्यापक पी. डी. गल्ली, कार्याध्यक्ष आप्पासाहेब कमलाकर, जिल्हा महिला विभाग प्रमुख उज्ज्वला दळवी, ऊर्मिला कदम, माजी नगरसेविका अरुणा शिंदे, प्राचार्य साताप्पा कांबळे, जनता दल अंनिस अध्यक्ष बाळेश नाईक, माजी अध्यक्ष अ‍ॅड. सयाजी पाटील, प्रा. शिवाजी होडगे, अशोक मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. पी. डी. पाटील व बाळासाहेब मुल्ला यांच्या मार्गदर्शनानंतर जागर फेरीची सांगता करण्यात आली.

सातारा शाखा

            डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिना निमित्त महा. अं.नि.स.चे कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर तसेच कार्यकर्ते प्रमोदिनी मंडपे, कुमार मंडपे, उदय चव्हाण, वंदना माने, डॉ. दीपक माने, डॉ. प्रदीप झनकर, प्रकाश खटावकर, सुधीर साळेकर, दशरथ रणदिवे, उमेश खंडाइत, राजेश पुराणिक यांच्या सह्या असलेले १) खुनाचा सूत्रधार शोधावा, २) खुनात सुटलेल्यांच्या विरोधात सीबीआयने हायकोर्टात अपील करावे आणि ३) देशभरात जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा अशा तीन मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा सातारा  यांच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी मा. नागेश पाटील यांना देण्यात आले. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. शेख काका यांचा संयुक्त स्मृतिदिन महा.अं.नि.स. आणि सर्व परिवर्तनवादी संघटना, सातारा यांनी सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर सर यांचे ‘सामाजिक चळवळीपुढील आव्हाने’ हे व्याख्यान आयोजित करून साजरा केला. सुरुवातीस डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन गीत डॉ. दीपक माने, प्रशांत पोतदार, अ‍ॅड. धुमाळ, उदय चव्हाण यांनी गायिले.  शिवाजी कॉलेजचे प्राचार्य पाटील सर अध्यक्षस्थानी होते.

या वेळी शहीद डॉ. दाभोलकर यांचे सुरुवातीचे काळातील परममित्र ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके सर यांनी शेख काका व डॉ. दाभोलकरांचे वेळेबाबत काटेकोरपणा, तसेच संघटन कौशल्य, खिलाडू वृत्ती याबाबत विवेचन केले. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर सर यांनी सविस्तर चळवळी कशा प्रकारे येत्या काळात काम करतील या बाबत अचूक मार्गदर्शन केले. मिनाज सय्यद यांनी आभार मांडले.

कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत मा. बेडकिहाळ सर, जगन्नाथ घाडगे सर, वसंतराव नलावडे इ. मान्यवर तसेच बहुसंख्य अंनिस कार्यकर्ते, परिवर्तन चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. दाभोलकरांच्या पाच पुस्तकांच्या ग्रंथमालेचा लोकार्पण सोहळा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर प्रकाशित झालेल्या पाच पुस्तकांच्या ग्रंथमालेचा लोकार्पण सोहळा राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सभागृहात झाला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी.जाधव, प्राचार्या प्रमोदिनी मंडपे, अंनिसचे तथा बंधुत्व पुरस्कार विजेते उदय चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी एन. बी. माने, प्रा. निलेश गोसावी, प्रा. स्मितेश नलगे आदींची उपस्थिती होती.

राजेंद्र चोरगे म्हणाले, “जसे डोळ्याला दिसेना झाले की, आपण चष्मा लावतो. तशा पद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लोकांना वैज्ञानिक दृष्टीचे चष्मे दिले तरीही अजून लोक आंधळेपणानेच वागत आहेत. डॉ. दाभोलकरांचे विचार आधुनिक व विज्ञानवादी असल्याने चांगला समाज निर्माण होण्यासाठी त्याची मदत होईल. यासाठी तरुणांनी त्यांची पुस्तके वाचावीत. आज आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे आणि ते तरुण जर चांगल्या सामाजिक कामात आले तर निश्चितपणे समाजाची, पर्यायाने देशाची प्रगती व्हायला मदत होईल. पुढील पिढी संस्कारित होईल. डॉ. दाभोलकर आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून दिलेल्या विचाराचे धन आपल्याला संपन्न करून जाईल.”

प्रमुख पाहुण्या प्राचार्या प्रमोदिनी मंडपे म्हणाल्या, “आपण प्रत्येक गोष्टीत विचार केला पाहिजे. एखादी गोष्ट घडते त्याच्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेतला पाहिजे, म्हणजेच आपल्यात शोधक वृत्ती यायला हवी. प्रयोग, तर्क, अनुमान प्रचिती या माध्यमातूनच विज्ञान पुढे जात आहे. आपण दैववादी न बनता विज्ञानवादी बनलो तरच पुढच्या दिशा आपल्याला व प्रकाशाकडे घेऊन जाणार्‍या ठरतील. त्यांनी अनेक छोट्या छोट्या उदाहरणांतून विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांना सोप्या पद्धतीत समजावून सांगितला.

डॉ. दाभोलकरांविषयी बोलताना सहनशील जाधव, अभिमन्यू सुतार, गणेश मिसाळ, रितेश भोसले व पारस सोलापुरे या तरुणांनी त्यांचे विचार आम्ही पुढे येण्यासाठी प्रयत्न करू, असा मनोदय व्यक्त केला. तसेच गणेशोत्सव इतर कोणत्याही कार्यक्रमात उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी आम्हा तरुणांना डॉल्बी, डी. जे. नको असल्याचे ठामपणे त्यांनी सांगितले. ऐश्वर्या दाबके यांनी सूत्रसंचालन, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी एन. बी. माने यांनी प्रास्ताविक, उदय चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. स्मितेश नलगे यांनी आभार मानले.

फलटण

मंगळवार दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. माणूस मारता येतो, विचार मारता येत नाही. डॉक्टर गेले तरी त्यांच्या पश्चात महाराष्ट्र अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही चळवळ जोमाने पुढे चालवली आहे. डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त फलटण शाखेच्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.  डॉ. दाभोलकर यांचे खुनी सापडले, परंतु सूत्रधार कोण? असा शासनाला प्रश्न विचारावा, असे निवेदन फलटण तालुक्यातील तहसीलदार यांना देण्यात आले. भर पावसात  कार्यकर्ते ‘जवाब दो’, म्हणून कार्यालयात धडकले. यामध्ये कार्याध्यक्ष अयाज अतार, प्रशांत शिंगाडे, आनंद देशमुख सर, सीताराम कारंडे, सचिन शिंदे, सुनील जाधव, निलेश अहिवळे हजर होते.

मल्हारपेठ

            विवेकवाद व समाजप्रबोधनात्मक विचारातूनच शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी आदरांजली अर्पण होईल, असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मल्हारपेठचे शाखा प्रबंधक संदेश वाघमारे यांनी केले.  मल्हारपेठचे सह्याद्री वाचनालय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा मल्हारपेठ व ज्ञानचेतना ग्रंथालय मल्हारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर विनम्र अभिवादन कार्यक्रमात संदेश वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी प्राध्यापक एस. बी. पानस्कर, डॉ. उदय वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. डी. के. पवार व दादासाहेब पवार यांच्या हस्ते डॉ. दाभोलकर यांच्या संघर्षमय कार्याविषयीच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.  या वेळी ग्रंथपाल शुभांगी पवार व धनश्री भागवत यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी कार्य या विषयावर सविस्तर माहिती मनोगतात मांडली.  महाराष्ट्र अं. नि. स. शाखा मल्हारपेठचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार यांनी गाणी प्रबोधनाची हा कार्यक्रम सादर केला तसेच विचार तर कराल का?  हा माहितीपर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम केला. सहयाद्री वाचनालयात विविध उपक्रमांतून डॉ. दाभोलकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कराड

डॉ. दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन सप्ताहाच्या निमित्ताने कराड जिल्हा सातारा येथील श्री. छ. शिवाजी महाराज शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणुताई चव्हाण कॉलेज समाजशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज या विषयावर प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून सातारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार, कराडचे बाळ देवधर, धनंजय जोशी, सीताराम चाळके, राजेश पुराणिक, बोत्रे, सुतार मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी सुरुवातीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमालेतील पाच पुस्तकांचे प्रकाशन वेणुताई चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. श्रीमती एस. एस. सरोदे यांच्या हस्ते प्राध्यापक वर्ग व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती या महत्त्वपूर्ण टप्प्यांद्वारे प्रात्यक्षिकांसह अत्यंत सोप्या भाषेत प्रशांत पोतदार यांनी सविस्तर अधोरेखित केली. श्रीमती एस. एम. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा. आर. पी. पवार व बाळ देवधर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. ए. पाटील यांनी परिचय करून दिला, तर श्रीमती एस. पी. पवार यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी अत्यंत महत्त्वपूर्ण असे पाच संकल्प घेण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी प्राध्यापक वर्ग यांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तसेच कराड शाखेतर्फे तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. या वेळी बाळ देवधर, चंद्रकांत जाधव, एस. ए. मोमीन, ए. आर. पोवार, धनंजय जोशी, मधुकर शिंदे आदी कार्यकर्ते हजर होते.

कोरेगाव

“कृतिशील उपक्रम राबविण्यात मअंनिसची कोरेगाव शाखा अग्रेसर आहे. भावी काळातही यामध्ये सातत्य निश्चितच राखलं जाईल”, असे ठाम प्रतिपादन   म.अंनिसचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्गे यांनी केले.  कोरेगाव येथील हुतात्मा स्मारकात भाकरवाडी (ता. कोरेगाव) येथील संगीता चव्हाण या महिलेची जटामुक्ती म.अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार व राज्य कायदा विभाग सदस्य अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील लाजली ब्युटी पार्लरच्या संचालिका, ब्युटीशियन सौ. हर्षाली पोतदार यांनी केले. या वेळी म.अंनिसचे जिल्हा प्रसार माध्यम सचिव दशरथ रणदिवे, सातारा शहर प्रसार माध्यम सचिव तथा युवा कार्यकर्ते राजेश पुराणिक, कोरेगाव शाखेचे कार्यकर्ते हेमंत जाधव, सुधाकर बर्गे, जगुबाई फरांदे, मानस पोतदार इत्यादी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

या वेळी प्रशांत पोतदार यांनी मनोगतामध्ये शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना १२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून ‘आजची जटामुक्ती हे त्यांच्याप्रति अनोखे अभिवादन आहे’, असे निर्धारपूर्वक सांगितले. अ‍ॅड. हौसेराव  धुमाळ यांनी “दाभोलकर यांचे विचार कृतिशीलपणे पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असा निर्धार कार्यकर्त्यांसह व्यक्त केला. हर्षाली पोतदार व कार्यकर्त्यांनी चव्हाण ताईंना अलगदपणे जटामुक्त केले. त्यामुळे “गेल्या १० वर्षांचे ओझे कमी झाले. आता पूर्णत: हलकं हलकं वाटतंय. या माध्यमातून जटामुक्त होतानाही काहींनी विधिवत पूजा घालण्याचे सुचविले व तसे न केल्यास धोका निर्माण होईल अशी भीती घालण्याचा प्रयत्न केला. पण माझी समस्या आणि अंनिस कार्यकर्त्यांचे समुपदेशन यामुळे यामधून मुक्ती मिळवण्याच्या इच्छेनेच त्यावर मात केली”, असे भावपूर्ण मनोगत पीडित संगीता चव्हाण यांनी व्यक्त केले.

अंतिमतः प्रशांत पोतदार यांनी अशा प्रकारचे जटामुक्तीचे काम म.अंनिसचे कार्यकर्ते मोफत करतात. त्यामुळे असा त्रास असलेल्यांनी निर्भयपणे संपर्क साधून जटामुक्त व्हावे, असे आवाहन केले. सर्व उपस्थित सहकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले. विवेकाचा आवाज बुलंद करू या या घोषणेने उपक्रम संपन्न झाला.

सांगली शहर

डॉ. दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या खुनामागील सूत्रधार शोधावा, खुनातून सुटलेल्यांच्या विरोधात सीबीआयने हायकोर्टात अपील करावे आणि देशभरात जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा अशा तीन मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा सांगली यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिंचे यांना देण्यात आले. या निवेदनावर अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, डॉ. सविता अकोळे, आशा धनाले, त्रिशला शहा, चंद्रकांत वंजाळे, अपूर्व ठकार यांच्या सह्या आहेत.

पलूस

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन अंनिस व परिवर्तनवादी संघटनांनी राष्ट्रीय विज्ञान दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अंनिस व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे सूत्रधार शोधा, अशी मागणी पलूस तालुका परिवर्तनवादी संघटनांनी तहसीलदार यांच्याकडे केली.

या वेळी अंनिस सांगली जिल्हाध्यक्ष व्ही. वाय. पाटील म्हणाले, “२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉक्टरांचा दोन नराधमांनी गोळ्या घालून खून केला. या खुनाला बारा वर्षे झाली. या खुनाचा तत्काळ तपास होऊन सूत्रधाराला शिक्षा झाली असती तर कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, आणि गौरी लंकेश यांचे खून झाले नसते.”

डॉ. अमोल पवार म्हणाले, “डॉ. दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, खोट्या रूढी, परंपरा, भ्रामक श्रद्धधा, कर्मकांड, समाजाला लुबाडणारे बुवा, बाबा, ज्योतिषी, मांत्रिक, धर्मांध शती या मतलबी प्रवृत्तींना विरोध केला.

मारुती शिरतोडे म्हणाले, “डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर विज्ञाननिष्ठ विवेकी नागरिक घडविण्याला प्राधान्य दिले.”

या वेळी अंनिसचे तालुकाध्यक्ष हिंमतराव मलमे, रावसाहेब गोंदील, प्रा. उत्तमराव सदामते, एलान पठाण, हिंदुराव पवार, भाई मारुती सावंत, हंबीरराव मोरे, रावसाहेब गोंदील, पी. एस. माळी, संभाजी शिंदे, नंदकुमार निकम उपस्थित होते.

तासगाव

तासगाव येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा सूत्रधार शोधावा, खुनातील सुटलेल्यांच्याविरुद्ध सीबीआयने उच्च न्यायालयात अपील करावे आणि देशभरात जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा, अशा तीन मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले आहे की,‘डॉ. दाभोलकरांचा खून हा त्यांचे विचार संपविण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता’, असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदविले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. या सूत्रधारांना त्वरित पकडावे. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून खटले देखील अजून सुरू असल्याने या चारही खुनांमागील सूत्रधारावर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे, असे आम्हाला वाटते.

या निवेदनावर प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्रा. वासुदेव गुरव, प्रमोद म्हेत्रे, सुजाता म्हेत्रे, नूतन परीट, श्रमण गुरव, वैभव गुरव, ऋतुजा खोत व अमर खोत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

इस्लामपूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या खुनाचा सूत्रधार शोधावा, खुनात सुटलेल्यांच्या विरोधात सीबीआयने हायकोर्टात अपील करावे आणि देशभरात जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा अशा तीन मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा इस्लामपूरच्या वतीने नायब तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर कॉ. धनाजी गुरव आणि अंनिसच्या राज्य कार्याध्यक्ष सरोज पाटील (माई) व सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक कोठावळे,  इस्लामपूर शाखा कार्याध्यक्ष डॉ. शंकर माने, गजानन पाटील, उमेश शेवाळे, विशाल धस, प्रा. रणजीत चव्हाण, प्रा. घनश्याम कांबळे, शशिकांत बामणे, चंद्रकांत भारसकळे, डॉ. अलका पाटील यांच्या सह्या आहेत.

मणेराजुरी

ऑल इंडिया पीपल्स सायन्स काँग्रेस  या विज्ञान संघटनांच्या नेटवर्क कडून २० ऑगस्ट हा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील विविध विज्ञानवादी आणि विवेकवादी संघटनांच्या वतीने हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांसह साजरा केला जातो. महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल व जुनिअर कॉलेज, मणेराजुरी येथेही विविध उपक्रमांसह हा दिवस साजरा केला गेला. तासगाव अंनिसचे कार्याध्यक्ष अमर खोत आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. वासूकाका गुरव हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका सुजाता म्हेत्रे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयाच्या पीपीटी सह वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शालेय जीवनातील महत्त्व सांगितले. तसेच आपली विचारसरणी तर्कशुद्ध होण्यासाठी वैज्ञानिक विचारपद्धती किती महत्त्वाची असते हे विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुनिअर कॉलेज विभागातील सर्व प्राध्यापक, माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकही उपस्थित होते. प्रा. श्रीधर शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. अमर खोत यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाचे महत्त्व सांगितले. वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाची थीम Ask Why? अशी असते. त्या औचित्याने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेटी हा एक नवीन उपक्रम प्रशालेने हाती घेतला.

कार्यक्रमासाठी मा. प्राचार्य एस. आर. घाटगे यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. प्रा. श्रीधर शिंदे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रबद्ध व नेटके सूत्रसंचालन केले. ज्युनियर कॉलेज विभागाचे प्रमुख प्रा. जाधव सर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, तर प्रा. वावरे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

पेण

पेण तहसील येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार अजून न सापडल्यामुळे निषेधाचे पत्र आणि जादूटोणा विरोधी कायदा देशभर लागू करावा म्हणून तहसीलदार यांना निवेदन पेण शाखेचे अध्यक्ष नितीन निकम सर यांच्या हस्ते देण्यात आले. सोबत एन. जे. पाटील, एस. डी. मोरे, सावनी गोडबोले, मीना मोरे, गीता भानुशाली आणि संदेश गायकवाड हे कार्यकर्ते होते.

रोहा

रोहा शाखेच्या वतीने रोहा तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. त्या वेळेस दत्तात्रेय शेडगे सर (रोहा शाखा उपाध्यक्ष), प्रमोद खांडेकर (बुवाबाजी विभाग प्रमुख), दिनेश शिर्के (सचिव), मुमताज मुलाणी मॅडम (संस्कृती विभाग प्रमुख) तसेच रहमान मुलाणी सर उपस्थित होते.

पाली

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे निवेदन अमित गवळी व इतर कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिले.

रत्नागिरी

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना जाऊन १२ वर्षे झाली तरी अजून मारेकर्‍यांचा सूत्रधार  मोकाटच असल्याने या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन निवासी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. रत्नागिरी शाखेतर्फे देण्यात आले. या वेळेस विनोद वायंगणकर, वल्लभ वळंजू, राधा वळंजू, मधुसूदन तावडे हे कार्यकर्ते हजर होते.

चाळीसगाव

डॉक्टरांचा बारावा स्मृतिदिन हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम घेऊन डॉ. दाभोलकरांच्या स्मृती जागवत असतो. शोषण करणार्‍या फसवणूक करणार्‍या दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणार्‍या सच्च्या देशभक्ताची, सुधारकाची हत्या या दिवशी झाली.

पण म्हणतात ना, माणूस मेला तरी विचार मरत नाहीत. महाराष्ट्र अंनिसच्या राज्यभर पसरलेल्या कार्यकर्त्यांनी ही चळवळ अखंड चालू ठेवली आहे. चाळीसगाव शाखेच्या कार्यकर्त्या नीता सामंत आणि तालुकाध्यक्ष वैशाली निकम यांनी आज महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग संचलित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे वैज्ञानिक दृष्टिकोनासंबंधी माहिती देऊन मुलांशी संवाद साधला. जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी माहिती देऊन त्या विषयाचे चित्रमय पोस्टर प्रदर्शन या शाळेत मांडले. मुलांनी सुद्धा प्रश्न विचारून खूप छान प्रतिसाद दिला. शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम आयोजित केला होता.

बुवाबाजीच्या जोखडात होरपळून निघालेल्या समाजाला न्याय देणारा आणि श्रद्धांचा बाजार मांडणार्‍या वाईट प्रथांवर कायद्याचा धाक बसवणारा जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. अघोरी अंधश्रद्धांविरोधात लढणार्‍या आणि विवेकवादी समाज निर्मितीसाठी झटणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

जालना

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडा या संदर्भात जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, शंकर बोर्डे, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय हेरकर, मनोहर सरोदे, जिल्हा महिला कार्यवाह माया गायकवाड, सांस्कृतिक विभाग कार्यवाह सुरेखा भालेराव, जिल्हा पदाधिकारी गौतम भालेराव, अ‍ॅड. सुभाष कांबळे, बंडू नन्नवरे यांची उपस्थिती होती.

अंबड

तहसीलदार अंबड यांना अंबड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद त्तौर, प्रधान सचिव राहुल साळवे यांनी निवेदन दिले.

लातूर शहर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा लातूरच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा बारावा स्मृतीदिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.  क्रीडा संकुल ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष कॅ. प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले यांच्या हस्ते डॉ. दाभोलकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी अभिवादन करून दाभोलकरांच्या कार्यावर व आठवणीवर प्रकाश टाकला. प्रत्येक कार्यकर्ता आम्ही दाभोलकर याच भावनेतून मनोगत व्यक्त करीत होता. प्रकाश घादगिने, वसंत टेकाळे, प्रा. रामकिशन समुखराव, प्रा. एम. बी. पठाण, पंकज जयस्वाल, नरसिंग इंगळे, प्रदीप कांबळे व अध्यक्षीय समारोपात कॅ. प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी लातुरात व इतरत्र डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा एकही कार्यक्रम सोडला नसल्याचे व त्यांच्या सहवासाने आम्ही अंधश्रद्धामुक्त झालो आणि समाजामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झटत राहिलो. दाभोलकरांनी माणूस म्हणून व माणूसकेंद्रित शिकवण आम्हाला दिली. पृथ्वीमोलाचा माणूस होऊन गेला त्यांना मनापासून अभिवादन करतो. पृथ्वीमोलाचा माणूस भेटला आणि आम्ही घडलो असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमास प्रकाश नीला, रमेश भोयरेकर, वसंत भेंडे, माधवराव सोमवंशी, नाईक आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी लातूर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्याबाबतचे देण्यात येणारे निवेदन राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रकाश घादगिने यांनी सर्वांना वाचून दाखविले व कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल असे सांगितले. प्रकाश घादगिने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कार्याध्यक्ष पंकज जयस्वाल यांनी आभार मानले.

अहमदपूर

या जगाची प्रगती विज्ञानाने केली असून बहुतांश लोक विज्ञानाची सृष्टी घेतात. अर्थात, विज्ञानामुळे निर्माण झालेल्या सुखसुविधेचा फायदा घेतात, पण विज्ञान, विज्ञानाची दृष्टी अर्थात विचार स्वीकारत नसून जीवनात  निर्भय व यशस्वी व्हायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा. गोविंद शेळके यांनी केले. ते अहमदपूर येथील म. गांधी महाविद्यालयात महा. अंनिसच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी ‘दाभोलकर व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशनराव बेडकुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, डॉ. चंद्रकांत उगीले, सहा. पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, उद्धव इप्पर, डॉ. अतुल खडके, महेंद्र खंडागळे, ज्ञानोबा भोसले, सुप्रिय बनसोडे, सय्यद तौफिक सर आदींची उपस्थिती होती.

पुढे प्रा. गोविंद शेळके म्हणाले की, इतिहासामध्ये चार्वाकपासून ते दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीपर्यंत इतिहासामध्ये अनेक महापुरुषांची हत्या झाली. हितशत्रूंनी आपल्या स्वार्थाआड येणार्‍या सर्व महापुरुषांचा छळ केला तर काहींची हत्या केली. परंतु त्या नादान प्रतिगाम्यांना हे समजत नाही की, बंदुकीच्या गोळीने विचार मरत नसतात, तर त्यांनी सांडलेल्या रताच्या एका एका थेंबामधून अनेक वैचारिक कार्यकर्ते जन्माला येतात. महापुरुषांनी दिलेला विचार समाजामध्ये पोहचवण्याचे काम करतात. ज्ञान- विज्ञानासाठी हुतात्मा होणारे पहिले भारतीय ठरलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आदर्श समोर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार प्रचार करेल. असे झाले तर खर्‍या अर्थाने सर्व हुतात्मा महापुरुषांना श्रद्धांजली ठरेल. देव मान्य अथवा अमान्य हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न जरी असला, तरी देवाच्या नावाने होणारे कर्मकांड, अनिष्ट रूढी, परंपरा ही माणसाने विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतली पाहिजेत. ती कसोटी म्हणजे ऐतिहासिक, वैज्ञानिक, तार्किक किंवा तर्कावर आधारित असली पाहिजेत. थोडक्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन ज्या गोष्टी पुराव्याच्या कसोटीवर टिकत नाहीत ती अंधश्रद्धा. या अंधश्रद्धेमुळे पुजार्‍याशिवाय इतर कोणाचे भले झाले नसल्याचे या वेळी प्रा. शेळके यांनी सांगितले.            

    या कार्यक्रमास ज्ञानोबा भोसले, शेषेराव ससाने, गणेश सूर्यवंशी, आशा रोडगे, वर्षाताई शेळके, कलावती भातंबरे, अंजली वाघंबरे, पूजा गायकवाड, संध्या लामतुरे यांची उपस्थिती होती. प्रा. रत्नाकर नळेगावकर यांनी कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा परिचय व ठळक कार्य, प्रा. राजेंद्र गवळे यांनी सूत्रसंचालन, मेघराज गायकवाड  यांनी आभार मानले. या वेळी  डॉ. आर. डी. भामरे, डॉ. राजश्री जाधव, प्रा. विद्या ढोबळे, डॉ. भास्कर नरवडे, प्रा. बालाजी वळसे, डॉ. आर. एम. कदम, प्रा. एस. के. माने, प्रा. एस. बी. रेड्डी, प्रा. डॉ. ए. पी. कांबळे, डॉ. विनोद माने, डॉ. एल. पी. देशमुख, डॉ. व्ही. एम. लावणे, सुनील राठोड, हनुमंत पवार, नागेश परीट, महिला, पुरुष व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

धाराशिव जिल्हा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सूत्रधारास पकडावे, देशभर जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा या मागणीचे निवेदन धाराशिव जिल्हाधिकार्‍यांना अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. देविदास वडगावकर, रवींद्र केसकर, शितल वाघमारे यांनी दिले.

नांदेड शहर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे सूत्रधार शोधण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना अंनिस, नांदेडचे कार्यकर्ते सुलोचना मुखेडकर, विजया मुखेडकर, डॉ. सारिका शिंदे, दत्ता तुमवाड, तुकाराम टोम्पे, शंकरराव खरात, नितीन ऐंगडे व सम्राट हाटकर यांनी निवेदन दिले. किनवट शाखा, जिल्हा नांदेड यांचेतर्फे नायब तहसीलदार महंमद रफिक यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अ‍ॅड. मिलिंद सर्पे, प्राचार्य डॉ.आनंद भालेराव, पंडित घुले, सुभाष ताजने, सुनील सिरपुरे, सम्यक सर्पे, टी. आर. चव्हाण, सुरेश शेंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

धर्माबाद

धर्माबाद शाखेतर्फे संतोष ठाकरे,  माणिक कदम, किरणभाऊ सोनकांबळे, राजण्णा, नवीदभाई, मोहन पांचाळ इत्यादींनी डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना दिले.

हदगाव

हदगाव शाखेतर्फे प्रा. डॉ. तुकाराम बोकारे, प्रदीप देशमुख, विद्याधर देशमुख, प्रा. डॉ. बी. एम. नरवाडे, प्रा. एच. डी. बोडखे, डॉ. नितीन आनभुले, प्रा. डॉ. वीरेश देशमुख, प्रा. जी. आर. शेळके, संदीप पावडे, एल. एस. सुरवसे, शेख शोदाव, अजीम शेख, शोहेब रफिक आदींच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले.

भोकर

निवेदनावर अंनिसचे भोकर तालुकाध्यक्ष एल.ए. हिरे, कार्याध्यक्ष कॉ. दिलीप पोतरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गौड, माजी सरपंच शिवाजी पांचाळ, महंमद रफी, गोविंद भालेराव, संजय जळपतराव, गोविंद देशमुख, चंद्रकांत मुस्तापुरे, अ‍ॅड. के, सिद्धार्थ जाधव, दत्तात्रय डोंगरे, लतीफ शेख, सुरेखा माळे, शमिम बेगम, अनिता साबळे आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.

नायगाव

मा.तहसीलदार नायगाव यांना नायगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शंकर गड्डमवार आणि सचिव भा. ग. मोरे यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

नांदेड येथे ग्रंथमालेचे लोकार्पण

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नांदेड व सलगरे कोचिंग क्लासेस, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने  २० ऑगस्ट रोजी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ तथा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिना’निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रकाशित डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथमाला या अंतर्गत ‘अपराजित योद्धा’, ‘निर्मळ आणि निर्भीड’, ‘आम्ही सारे दाभोलकर’, ‘नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्याने’ व ‘नरेंद्र दाभोलकर खून तपास आणि खटला’ या पाच पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास दीडशे विद्यार्थी उपस्थित होते व त्यांच्या ग्राहकावर चमत्कार मागील विज्ञान हाही कार्यक्रम घेण्यात आला.

सलगरे कोचिंग क्लासेसचे संचालक सलगरे सर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. भाग्यनगर पोलीस स्टेशन, नांदेडचे ए.पी.आय. कोंडिबा केजगीर यांच्या हस्ते सदर ग्रंथांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी यशवंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अजय गव्हाणे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ग्रंथांचे लोकार्पण करताना कजगिरे म्हणाले की, जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अंनिसचे कार्यकर्ते पाठपुरावा करतात. अनेक वेळा आम्ही अंनिसच्या कार्यकर्त्यांची मदत घेतो. हा कायदा डॉ.दाभोलकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याने झाला एवढेच काही लोकांना माहीत आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून डॉ. दाभोलकर यांचे संपूर्ण जीवन व कार्याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे शिक्षण घेतले म्हणजे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होतोच असे नाही. विज्ञानाच्या अनेक पदव्या घेतलेल्या अनेक लोकांचे व्यवहार अविवेकी असतात, ते लोक अनेक प्रकारे अंधश्रद्धा बाळगतात. क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णा भाऊ साठे हे औपचारिक दृष्ट्या शिकलेले नव्हते. पण त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक होता. नाना पाटील गळ्यात माळ घालायचे व ते असे म्हणायचे, ‘आमची पंढरी म्हणजे येरवडा.’ त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या शिक्षणासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना केली पाहिजे. आपणास व्यवहारी ज्ञान असतं. आपण आपले दैनंदिन व्यवहार तपासून निर्णय घेत असतो. त्याचप्रमाणे आपण समाजात राहतो. समाजातल्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत. पुरोगामी चळवळीशी जोडून घेतलं पाहिजे. चळवळीतूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी होत असते.

मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे डॉ. अजय गव्हाणे म्हणाले की, कोणतीही दिशा, कोणतीही तारीख, कोणताही वार, कोणताही प्रदेश, जागा ही शुभ किंवा अशुभ नसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना उपासना स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्माला अनुसरून असणार्‍या श्रद्धा जोपासू शकते; मात्र अंधश्रद्धा नाही. आपल्या दैनंदिन जीवनात घडत असलेल्या अंधश्रद्धेचा त्याग केला पाहिजे. आजूबाजूला अंधश्रद्धा घडत असल्यास त्याचा विरोध केला पाहिजे तरच आपण विज्ञाननिष्ठ मार्गावर जाऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावरचे कार्यक्रम वारंवार घेतले पाहिजे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात सलगरे सर यांनी व्यक्त केले.

सम्राट हटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व चमत्कारामागील विज्ञान याविषयी मांडणी केली. प्रा. सुलोचना मुखेडकर व मा. मुख्याध्यापिका उषा गैनवाड यांनी चळवळीची गीते गायिली. डॉ. सारिका जावळीकर-शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा १२ वा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन  दिन’ म्हणून महाअंनिस नागपूर जिल्ह्याच्या वतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी  जाईबाई चौधरी कॉलेज, सदर नागपूर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या प्राचार्या प्रा. अर्शिया पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे होते रामभाऊ डोंगरे, राज्य कार्यकारिणी सदस्य. मंचकावर जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, जिल्हा प्रधान सचिव प्रा. डॉ. सुनील भगत तसेच समितीचे मान्यवर चंद्रशेखर मेश्राम व आनंद मेश्राम, भय्यालाल भैसारे, भद्रावती प्रामुख्याने उपस्थित होते. इंदू उमरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. प्राचार्या पठाण मॅडम यांचे हस्ते पाण्याचा दिवा पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व सर्व विद्यार्थी अचंबितच झाले. त्यानंतर देवयानी भगत, मंगला गाणार, वर्षा टेंभेकर, गंगा खांडेकर यांनी संयुक्तपणे अभिवादन गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. रामभाऊ डोंगरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी देवयानी भगत यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणतीही संकल्पनेची अगर घटनेची सत्यता त्यांचे कार्यकारण भाव विवेकाने व चिकित्सक बुद्धीने तपासून, कारणमीमांसा समजून अंगीकार करणे होय, असे त्यांनी सांगितले. त्यांनी निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग व प्रचिती या महत्त्वपूर्ण टप्प्याद्वारे अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रा. पुष्पा घोडके यांनी महाअंनिसच्या कार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी रामभाऊ डोंगरे, मंगला गाणार तसेच प्रा. डॉ. सुनील भगत यांनी चमत्काराचे विविध  प्रयोग सादर केले. तद्नंतर प्राचार्या पठाण मॅडम यांचे हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. प्रा. पुष्पा घोडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर प्रा. राजू एस. धानोरे यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर जिल्हाधिकारी नागपूर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मुख्य मारेकर्‍यांना त्वरित अटक करणेचे निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. जे. पी. धोंगडे, प्रा. माणिक लोणारे, रमेश ढवळे, आशा शिंगोडे, वर्षा टेंभेकर, शोभा तिरपुडे, चंदा मोटघरे, गीता विजय सुरडकर, बबिता भातकुलकर, अश्विनी गणवीर, अनिता रोडगे, ज्योत्स्ना मेश्राम, सुमंगल मेश्राम, वंदना गायकवाड, पराग बनकर, पवन चव्हाण, प्रमोद शृंगारे, आश्लेषा गमे व आयु. भिवगडे उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

त्यांनतर जिल्हाधिकारी श्री. खोडे यांना डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी करणारे, देशभर जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

सोलापूर शहर

२० ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला १२ वर्षे झाली. तरीही या खुनामागचे  सूत्रधार अद्यापही मोकाटच आहेत. तरी त्याबाबत सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी असे निवेदन सोलापूर जिल्हा कलेक्टर यांना दिले. या प्रसंगी शाखेचे खळसोडे सर, लालनाथ चव्हाण, उषा शहा, निशा भोसले, मधुरा सलवारू, सरिता मोकाशी, व्ही. डी. गायकवाड, आर. डी. गायकवाड, निनाद शहा सर, शकुंतला सूर्यवंशी, लता ढेरे, प्रसाद अतनूरकर, सुनीता गायकवाड, अरुण मिलिंद गायकवाड, पंडागळे हे कार्यकर्ते उपस्थित होते.

बार्शी

दिनांक २० ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास बारा वर्षे झाली तरीही या खुनामागील सूत्रधार  मोकाट  आहेत. खुनामागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी अशा मागणीचे निवेदन मा. तहसीलदार, बार्शी यांना शाखेच्या वतीने देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सदस्य मा. निपाणीकर सर, राज्य सल्लागार मा. प्रा. हेमंत शिंदे सर, राज्य सल्लागार मा. डॉ. अशोक कदम सर, अंनिस शाखा बार्शीचे कार्याध्यक्ष उन्मेश पोतदार सर, प्रधान सचिव सुरेश जगदाळे सर, सोलापूर जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष मधुकर शेळके सर, बार्शी शाखा सदस्य जयश्री पोतदार मॅडम, अनिता घोळवे मॅडम, पोपटराव कानगुडे सर, चव्हाण सर, रविकिरण कानगुडे सर, लोकरे मॅडम इ. सदस्य उपस्थित होते.

सांगोला

            डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा-सांगोला शाखेत विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शाखेच्या वतीने तहसीलदारसाहेब यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, राज्य शाखेचे डॉ. राजेंद्र सूर्यवंशी सर, प्राचार्य डॉ. एस. के. पाटील सर, डॉ. पाटील मॅडम, श्री. विजय माने सर, श्री. बापूसाहेब ठोकळे, श्री. किशोर बनसोडे सर, श्री. डोंबे सर, श्री. महाजन साहेब, श्री. बाळासाहेब बनसोडे, सिंहगड कॉलेजचे श्री. अशोक नवले सर, श्री. कैलास माळी सर, श्री. भीमाशंकर पैलवान सर, श्री. आनंद शिवगुंडे सर, श्री. सतीश खडतरे, श्री. भूषण पतंगे सर, श्री. सुरेश माळी, श्री. शरणाप्पा हळ्ळीसागर, सर्व कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त पुणे शाखेतर्फे, जेथे डॉक्टरांचा खून झाला त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांना अभिवादन करण्यात आले. मेळघाट येथे लहान बालकांना पोटावर गरम डागण्या देण्याच्या प्रथेविरुद्ध प्रबोधन करण्यासाठी पुण्याहून काही कार्यकर्ते एक टेम्पो घेऊन मेळघाटला जाणार आहेत. या गाडीला या वेळी विश्वस्त अध्यक्ष गणेश चिंचोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मेळघाटचा हा तिसरा दौरा असून आधीच्या दोन दौर्‍यांप्रमाणे हाही दौरा यशस्वी होईल असा विश्वास नंदिनी जाधव यांनी व्यक्त केला. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार पकडण्यात यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी अरविंद पाखले, नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, शंकर कणसे, प्रवीण देशमुख, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, भगवान रणदिवे, अरुण जाधव इ. कार्यकर्ते उपस्थित होते. परिवर्तन संस्थेच्या रेश्मा कचरे व त्यांचे सहकारी हेही उपस्थित होते. या वेळी ‘फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर,’ ‘विवेकाचा आवाज बुलंद करू’ इ. घोषणा देण्यात आल्या. डॉ. दाभोलकरांच्या खुनामागचे सूत्रधार पकडले जात नाही तोपर्यंत संघर्ष करत राहू असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

भोर

‘जेवढा मोठा दावा तेवढा मोठा पुरावा’ आणि जेवढा पुरावा तेवढाच विश्वास’ हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नितीन हांडे यांनी केले.

            भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जीवनावर आधारित पाच पुस्तकांचे प्रकाशन डॉ. हांडे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. भोर एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, भोर यांच्या वतीने हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या वेळी डॉ. हांडे म्हणाले, “विज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेल्या वस्तू किंवा यंत्रे वापरणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन समजू नये. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग व प्रचिती या कसोट्या लावून एखादा दावा तपासून घेणे. वैज्ञानिक दृष्टिकोन ही जीवनशैली म्हणून आचरणात आणल्यास कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे, कोणत्या अभ्यासक्रमाला जावे, कोणता व्यवसाय किंवा नोकरी निवडावी, जोडीदार अथवा जीवनसाथी कोणता निवडावा या गोष्टी ठरवणे सोपे होते.”

या प्रसंगी डॉ. सुरेश गोरेगावकर, सुरेश शाह, डॉ. अरुण बुरांडे, हसीना शेख, सविता कोठावळे, मेघना हांडे, डॉ. विद्या बुरांडे, वसंत गायकवाड, नीलिमा मोरे उपस्थित होत्या.

डॉ. अरुण बुरांडे यांनी प्रास्ताविकात पुस्तकांबद्दलची माहिती दिली. संतोष दळवी यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. सुरेश गोरेगावकर यांनी आभार मानले.

पिंपरी चिंचवड

साने गुरुजी स्मारक येथील कार्यक्रमात विश्वास पेंडसे व सुरेश बावनकर यांनी सलग दोन दिवस लावले होते. चळवळीचा नुसता पायाच नाही तर आत्मा असलेल्या ग्रंथदिंडीवर उपस्थितांनी गर्दी केली. मुख्य वक्ते, अध्यक्ष यांची भाषणं कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणारी ठरत होती. अंनिस वार्तापत्राने प्रकाशित केलेली पाचही पुस्तके म्हणजे अप्रतिम सादरीकरण!

त्या बरोबरच पिंपरी चिंचवड, निगडी, बाणेर, देहूगांव इत्यादी शाखांचे कार्यकर्ते साने गुरुजी स्मारक येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.

बारामती

डॉ. दाभोलकर यांचे स्मृतिदिनानिमित्त दिनांक २० ऑगस्ट रोजी अंनिस शाखा बारामतीच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली.  सकाळी साडेसात वाजता हुतात्मा स्तंभ येथे अभिवादन करण्यात आले. त्यात अ‍ॅड. विजयकुमार बर्गे, (आप्पा), हिंगसे आप्पा, प्रा. डॉ. सरवदे यांनी आपली मनोगते मांडली. त्यानंतर सह्याद्री पोलीस अ‍ॅकॅडमी येथे २५०, मुली, मुलांसमोर व्याख्यान. अ‍ॅड. विजयकुमार बर्गे, अ‍ॅड. विपुल पाटील, भालेराव सर, हिंगसे आप्पा यांनी भाषणे केली. प्रा. डॉ. सरवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माननीय  तहसीलदार यांना डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे सूत्रधार शोधण्याबाबतचे निवेदन देताना प्रा. डॉ. सरवदे, तुकाराम कांबळे, राहुल केदारी हे सहभागी झाले होते.

बाणेर

‘२० ऑगस्ट नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन : राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन प्रबोधन सप्ताह’ या अंतर्गत दिनांक १८ ऑगस्ट रोजी सातारा येथील गुरुकुल शाळेला नरेंद्र दाभोलकरांचे तसेच पुरोगामी विचारांची, वैज्ञानिक दृष्टिकोनावरील १५० पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाणेर शाखेच्या अलकाताई जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी संस्कारक्षम वयातच शालेय अभ्यासक्रमामध्येच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे धडे देण्याची आवश्यकता असल्याचे  नमूद केले. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची ही पुस्तके विज्ञाननिष्ठ पिढी घडवायला निश्चित उपयोगी पडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अंनिस महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले यांनी संस्कारक्षम पिढी घडवण्याकरिता शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे  भरभरून कौतुक केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक भान, वाचन संस्कृती, योग्य सवयी-शिस्त, या संबंधित शाळेमध्ये राबवल्या जात असलेल्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली व संस्थाचालक राजेश चोरगे व सर्व शिक्षक यांचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाणेर शाखेचे श्रीनिवास गडकरी, संस्थेचे अध्यक्ष राजेश चोरगे, एसीपी अजय कदम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

मोहने शाखा

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा १२ वा स्मृतिदिन प्रज्ञा बुद्धविहार, मोहने, ता. कल्याण जि. ठाणे येथे संपन्न झाला. या प्रसंगी बी. एच. गायकवाड (रा.सचिव भा.बौ.महासभा) यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे कार्य व अंधश्रद्धा निर्मूलन समितीची व्यापक भूमिका विषद करून आदरांजली वाहिली. या वेळी डी. जे. वाघमारे (अंनिस ठाणे जिल्हाध्यक्ष), छगन सुरवाडे, के. पी. गायकवाड, डी. के. भादवे, गौतम मोरे (मोहने शाखा सरचिटणीस), मधुकर पवार, अ‍ॅड. विजय पायाळ (ठाणे जिल्हा कायदा विभाग सल्लागार, सरवदे, विजय शिरगावे, प्रभू पगारे, निर्मला बोखारे, सावंत ताई व इतर अंनिस व भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी उपस्थित होते. अविंदाताई वाघमारे (अंनिस ठाणे जिल्हा महिला विभाग प्रमुख) यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

परभणी शहर

डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा उभारला. या लढ्यातून जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हे दोन कायदे पुरोगामी महाराष्ट्राला त्यांच्या बलिदानातून मिळाले. पुरोगामी चळवळीसाठी व नीतिमान समाज निर्मितीसाठी मोलाचे कार्य राहिले आहे, तेव्हा दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ होणार नाही यासाठी तरुणांनी या चळवळीत काम करावे, असे आवाहन प्रा. प्रल्हाद मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

२० ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परभणी आयोजित जीवनसेवा नर्सिंग कॉलेज या ठिकाणी. ‘प्रबोधन सप्ताह अंतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला डॉ. दाभोलकरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले. या प्रसंगी मुंजाजी कांबळे, डॉ. जगदीश नाईक यांची भाषणं झाली.

या प्रसंगी वैज्ञानिक दृष्टिकोनावरची मांडणी मुंजाजी कांबळे यांनी केली. ते म्हणाले, “डॉ. दाभोलकरांचा स्मृतिदिन हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून देशभर पाळला जातो. डॉ. दाभोलकर यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, समाज बुद्धिवादी व्हावा, विवेकवादी व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अविरत काम केले, संघटनेला समाजमान्यता मिळवून दिली. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार व अंगीकार याचा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात समावेश करण्यात आले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा कार्यकारण भाव शोधतो, एखाद्या गोष्टीची सत्य-असत्याची पडताळणी, निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती व प्रयोग या मार्गांनी केली जाते. जीवनाकडे बघण्याचा, यशस्वी होण्याचा, अधिक चांगला माणूस होण्याचा दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय. आपण हा दृष्टिकोन बाळगला तर आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्दप्रामाण्य नाकारतो, ग्रंथप्रामाण्य नाकारतो. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला तर स्वतःच्या जीवनाची सूत्रं दुसर्‍याच्या हातात न देता स्वतःच्या हातात घेतो. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार व अंगीकार करावा असे आवाहन करून ‘ज्योतिष्याला नाही कळले कुणाचे भविष्य’ हे गीत सादर करून ज्योतिष्याचे भविष्य नाकारावे असे सुचविले.

या प्रसंगी डॉ. जगदीश नाईक यांनी सत्य-असत्याची पडताळणी करून सत्य स्वीकारून आपले जीवन सुकर करावे असे सांगितले. प्रा. डॉ. माणिक लिंगायत यांनी चमत्काराचे सादरीकरण करून त्या मागचे विज्ञान समजून घ्या, चमत्काराला फसू नका, विद्यार्थ्यांनी चिकित्सक बनावे असे सांगितले. डॉ. सुनील जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा. डॉ. चंद्रकांत गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन, तर मुखेत खान यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दुपारच्या सत्रात महाराष्ट्र अंनिसच्या शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी यांना भेटून डॉ. दाभोलकरांचे सूत्रधार शोधण्याबाबतचे निवेदन दिले. संध्याकाळच्या सत्रात कार्यकर्ते मुंजाजी कांबळे यांनी नवरचना प्रतिष्ठान येथे प्रबोधन सप्ताह अंतर्गत प्रबोधन व चमत्काराचे सादरीकरण केले.

गोरेगाव

२० ऑगस्ट, २०२५ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गोरेगाव शाखेने डॉ. रखमाबाई राऊत या महिला डॉक्टरने आपल्या अनैच्छिक विवाहाविरोधात कोर्टात दिलेल्या लढ्याबद्दलच्या ‘एका लग्नाची कोर्टातील गोष्ट’ या नाट्य-अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला  होता.  स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांनी या अभिवाचनाची प्रस्तुती केली. केशव गोरे स्मारक ट्रस्ट संदर्भ ग्रंथालय, स्वाधार आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

मुंबईतील मुसळधार पावसाला न जुमानता सर्व कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी रसिकांची अशी जवळपास ५० ते ६० लोकांची गर्दी कार्यक्रमासाठी वेळेवर हजर होती. सई सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात  डॉ. दाभोलकरांचा स्मृतिदिन, डॉ. रखमाबाई राऊत आणि शिवाय तीन आयोजक संस्था यांची थोडक्यात माहिती त्यांनी प्रेक्षकांना दिली. त्यानंतर प्रा. ज्योती मालंडकर आणि साथींनी दमदार आवाजात ‘डॉ. दाभोलकर  अभिवादन गीत’ सादर केले. मोहिनी वर्दे या लेखिकेने लिहिलेेल्या  ‘डॉ. रखमाबाई : एक आर्त’ या पुस्तकामुळे रखमाबाईंचे कार्य उजेडात आले. मोहिनीताईंचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सभागृहातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

त्यानंतर डॉ. दाभोलकरांच्या ग्रंथमालेतील पाच पुस्तकांचे अनौपचारिक प्रकाशन प्रभा पुरोहित, भूषण ठाकूर, मंगला मराठे, ज्योती केळकर आणि अलका पावनगडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सई सावंत यांनी या पाचही पुस्तकांची थोडक्यात माहिती करून दिली आणि समितीच्या पुस्तक विक्रीला पुरोगामी वाचकांनी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. मंगला मराठे यांनी अलका ताईंचा आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला आणि नाट्य अभिवाचनास प्रारंभ झाला. अलकाताईंनी रखमाबाई यांच्या कार्याची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली. मधे मधे ओव्या गात, संदर्भ देत केलेल्या नाट्यपूर्ण  सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या हृदयाला साद घातली गेली. रखमाबाईंच्या घरचे वातावरण, आईचा पहिल्या पतीच्या मरणोत्तर पुनर्विवाहाचा निर्णय, वडिलांचा पुढारलेला वारसा, रखमाबाईंची शिकण्याची आवड, न शोभणार्‍या वैवाहिक जीवनाला आणि बालविवाहाला त्यांनी दिलेली टकर, त्याची कोर्टातील कहाणी आणि तेव्हाच्या वर्तमानपत्रातील सनातनी आणि स्त्रीवादी यांच्यातील वाद, त्यांना झालेला तुरुंगवास आणि सुटका, त्यांची डॉक्टर होण्याकडे वाटचाल आणि भारतातील यशस्वी डॉक्टरी कारकिर्द या सगळ्या रखमाबाईंच्या जीवनक्रमाची अतिशय मुद्देसूद, हृदयस्पर्शी आणि एकसंध मांडणी करून, एकीकडे पडद्यावर चित्र सादर करीत, अलकाताईंनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अर्थातच सर्वांचा अभिप्राय खूप चांगला होता आणि कार्यक्रमाची सांगताही वेळेत झाली.

बेलापूर-नेरूळ शाखा

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांच्या अभिवादनासाठी दरवर्षी नवी मुंबई शाखा २० ऑगस्ट रोजी सकाळी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन नवी मुंबईतील विविध ठिकाणी करते. या वर्षी प्रथमच नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन व त्यानंतर अभिवादन सभा खारघर येथे घेण्यात आली. प्रचंड पाऊस असूनही नवी मुंबईतील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद या मॉर्निंग वॉकला मिळाला. खारघर येथील उत्सव चौक ते महामार्गावरील थ्री मंकी चौक अशी रॅली डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर, विवेकाचा आवाज बुलंद करू या अशा घोषणा देत  प्रचंड पावसात काढण्यात आली. त्यानंतर थ्री मंकी चौक येथे अभिवादन सभा घेण्यात आली. त्या सभेला शिक्षक संघटनेचे शिवाजी कुलाल, भास्कर पवार, रमेश साळुंखे, राजीव देशपांडे, विजय खरात,  रेखा देशपांडे, अ‍ॅड. खारगे यांनी संबोधित केले. खारघर भागात प्रथमच होणार्‍या या निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन खारघरचे कार्यकर्ते अ‍ॅड. खारगे यांनी केले होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील कोकण भवन येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात डॉ. दाभोलकरांच्या खुनामागच्या सूत्रधारांना अटक करणे, खून खटल्यात निर्दोष सोडलेल्यांविरोधात सीबीआयने वरच्या कोर्टात जाणे आणि जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करणे या मागण्यांचे निवेदन दिले. या प्रसंगी राजीव देशपांडे, अ‍ॅड. खारगे, रमेश साळुंखे आणि रेखा देशपांडे होत्या. या वर्षी प्रथमच बेलापूर-नेरूळ शाखेने डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त एक दिवसाचे डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासही चांगला प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई परिसरातील ५० शिबिरार्थी होते. या शिबिरात अण्णा कडलास्कर, राजीव देशपांडे, रमेश साळुंखे, विजय खरात यांनी विषयांची मांडणी केली.

पालघर शहर

पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्याबाबत” मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे २० ऑगस्ट २०२५ रोजी निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. सुभाष भागडे साहेब यांनी स्वीकारले. या वेळी पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक भाते यांच्या मार्गदर्शनाने प्रधान सचिव श्री. जतिन कदम, सदस्य श्री. संजय भोईर, सदस्य श्री. लीलाधर रायसिंग व सदस्य कु. स्वरांगी कदम उपस्थित होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या खुनाचा सूत्रधार शोधावा, खुनात सुटलेल्यांच्या विरोधात सीबीआयने हायकोर्टात अपील करावे आणि देशभरात जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा अशा तीन मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रह विभागातील ना. तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश परदेशी, व्यंकट भोसले, डॉ. सुरी, माणिक गाळफाडे, रितेश होळकर यांच्या सह्या आहेत.

बेळगाव शहर

चिकित्सक बुद्धीद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला आहे, असे प्रतिपादन बेळगावचे जीएसटी अपर आयुक्त आकाश चौगुले यांनी केले. वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्टता करताना दृष्टिकोन व वैज्ञानिक दृष्टिकोन यामधील फरकही त्यांनी स्पष्ट केला.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगाव व प्रगतशील लेखक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २०) डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन कार्यक्रम झाला. त्या वेळी चौगुले बोलत होते. शिवराज चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुरुवातीला नीला आपटे यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर आधारित गीत सादर केले. श्री. चौगुले यांनी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे टप्पे स्पष्ट केले.  वैज्ञानिक गोष्टीचे संदर्भ हे शास्त्रज्ञ व युरोपियन साहित्यिकांची उदाहरणे दिली. भारतातील नऊ तत्त्वज्ञांविषयी मांडणी करताना आस्तिक व नास्तिक तत्त्व स्पष्ट केले. चार्वाक व गौतम बुद्ध यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची तत्त्वे स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आनंद मेणसे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या योगदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाला शंकर चौगुले, सुभाष ओऊळकर, अ‍ॅड. नागेश सातेरी, अनिल आजगावकर, कृष्णा शहापूरकर, जोतिबा अगसीमनी, इंद्रजीत मोरे, गजानन सावंत आदींसह बेळगाव परिसरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

गडचिरोली शहर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा १२ वा स्मृतिदिन विश्रामगृह येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर भोजराज कानेकर, तुळसिराम सहारे, विशाल दहिवले, मदन उराडे, लता रामटेके, संघमित्रा राजवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे खुनाचे सुत्रधार अजूनपर्यंत न सापडणे ही दु:खाची बाब आहे. या प्रसंगी भोजराज कान्हेकर यांचेही समयोचित भाषण झाले.

कार्यक्रमास विशाल दहिवले, तुळसिदास सहारे, मदन उराडे, प्रमोद राऊत, दामोधर शेंडे, जीवन मेश्राम, रोशन उके, डोमाजी गेडाम, लवकुश भैसारे, श्रीरंग उंदिरवाडे, लता भैसारे, वृषाली उंदिरवाडे, प्रेमदास रामटेके, तुरे चोखोबा ढवळे, प्रेमलता उंदिरवाडे, हेमलता कान्हेकर मेश्राम मॅडम सहीत बहुसंख्य अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबाजोगाई

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेस २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण झाली. अंबाजोगाई शहरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने व शांततापूर्ण पद्धतीने निर्भय मॉर्निंग वॉक फेरीच्या माध्यमातून विवेकीपणाने व संवैधानिक मार्गाने आपला आक्रोश व्यक्त केला. संविधान कट्टा येथून सकाळी मॉर्निंग वॉकची सुरुवात झाली. अण्णा भाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या फेरीचा समारोप झाला.

प्रा. शैलजा बरुरे, हेमंत धानोरकर यांनी माहिती सांगितली. प्रदीप चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सहसचिव भीमाशंकर शेटे, कॉ. अ‍ॅड. अजय बुरांडे, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. देशमुख यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, पुरोगामी चळवळ, कार्यकर्ते, बार्टीचे समतादूत, हितचिंतक, विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.

वर्धा शहर

डॉ. दाभोलकरांच्या सूत्रधारांना कधी पकडणार असा संतप्त सवाल करणारे निवेदन वर्धा जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिनांक २०/८/२०२५ रोजी मा. नरेंद्र फुलझेले (अप्पर जिल्हाधिकारी, वर्धा) यांना देण्यात आले.

या प्रसंगी डॉ. प्रवीण धाकटे (जिल्हाध्यक्ष), डॉ. नरेंद्रकुमार कांबळे (जिल्हा कार्यकारिणी समिती सदस्य), सुरेश रंगारी (जिल्हा कार्याध्यक्ष), राजू वाघमारे (जिल्हा उपाध्यक्ष), महेश दुबे (प्रधान सचिव-सेवाग्राम शाखा), जानरावजी नागमोते (कार्याध्यक्ष-सेवाग्राम शाखा), प्रियदर्शना भेले, उषा कांबळे (महिला विभाग प्रमुख), अनिल भोगडे (उपाध्यक्ष-वर्धा तालुका), ज्योस्त्ना वासनिक (जिल्हा प्रधान सचिव), सीतल बनसोड, चंद्रप्रकाश बनसोड, विलास नागदेवते उपस्थित होते.

वृत्तांत संकलन : राजीव देशपांडे, राहुल थोरात    


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]