पिंपरी-चिंचवड अंनिसच्या प्रेरणा पुरस्काराचे वितरण

विजय सुर्वे -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ग्रंथदिंडी आणि पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित प्रेरणा पुरस्कार २०२६ वितरण सोहळा रविवारी, दि. १७ मे रोजी तक्षशिला बुद्धविहार, सेक्टर २८, निगडी प्राधिकरण येथे उत्साहपूर्ण आणि विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाला. विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धाविरोधी जनजागृती आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या वेळी गौरविण्यात आले.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि नाटककार मा. ज्ञानेश महाराव यांनी ‘भोंदूबाबांच्या विळख्यात महाराष्ट्र’ या विषयावर प्रभावी व्याख्यान देताना संत विचारांचा संदर्भ देत महाराष्ट्रातील अनेक बुवाबाबांच्या वाढीमागे राजकीय वरदहस्त असल्याची टीका केली. खरातसारखे अनेक भोंदूबाबा आजही समाजात सक्रिय आहेत. अंधश्रद्धा ही फक्त धार्मिक प्रश्न नसून सामाजिक आणि मानसिक गुलामी निर्माण करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे नव्या पिढीला या विळख्यात अडकू न देण्यासाठी अंनिसने अधिक प्रभावीपणे जनजागृती करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी समाजपरिवर्तनासाठी काम करताना स्वतःमधील अहंकाराचेही निर्मूलन करणे आवश्यक असल्याचा मोलाचा संदेश त्यांनी या वेळी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध पत्रकार मा. अरुण खोरे होते. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभव कथन करताना पुण्यातील एका दवाखान्याच्या जागेवर डोळा असणार्‍या काही लोकांनी त्या ठिकाणी भूत आहे अशा अफवा कशा पसरवल्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून तो कट कसा उधळून लावला, याचा थरारक अनुभव सांगितला. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी विज्ञाननिष्ठ चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले.

या वेळी अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रचारासाठी त्यांनी मे १९९३ मध्ये सलग एकवीस तास डोक्यावर अर्धा लिटर दुधाची बाटली तोलून १०४.२ किलोमीटरचा पायी प्रवास करून विश्वविक्रम केला होता. या विश्वविक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धाविरोधी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याच परिसरात आणि त्याच प्रेरणेने नव्या पिढीत काम करण्याची जिद्द तयार व्हावी, या उद्देशाने विश्वास पेंडसे ग्रंथदिंडीच्या माध्यमातून दरवर्षी विविध क्षेत्रांतील दहा जणांना प्रेरणा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सामाजिक कार्याला प्रेरणा देणार्‍या व्यक्तींचा सन्मान ही समाजपरिवर्तनाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात भारत विठ्ठलदास यांनी पाण्याचा दिवा प्रज्वलित करून त्यामागील वैज्ञानिक तत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. अंधश्रद्धा आणि चमत्कार यामागील विज्ञान समजून घेतल्यास समाजातील गैरसमज दूर होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रयोगाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या वेळी म. अंनिसच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या विनोद दळवी, राजू कदम, मनीषा चक्रे, लीनता ताथवडे, डॉ. जयकुमार ताम्हाणे, मोहिनी भोंगळे-खुने, स्वरांगी कदम-सफाळे, अरुण थोपटे, इंद्रजित देसाई आणि सुनीता देशमुख यांना प्रेरणा पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कारार्थींच्या समाजकार्य, विज्ञाननिष्ठ विचार, सांस्कृतिक क्षेत्र, आरोग्य सेवा आणि जनजागृती या क्षेत्रांत केलेल्या कार्याचा या वेळी गौरव करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड अंनिसचे अध्यक्ष संतोष रणदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अंधश्रद्धाविरोधी चळवळ ही केवळ आंदोलन नसून समाजमन घडविण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थींची नावे अंजली इंगळे आणि सरोज पेंडसे यांनी जाहीर केली. सुरेश बावणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावी शैलीत केले, तर राजू जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

या वेळी प्रभाकर ओव्हाळ व प्रा. सोपानराव खुडे हे ज्येष्ठ लोककला अभ्यासक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, ह.भ.प. देवराम कोठारे, संजय खानोलकर, रामभाऊ नलावडे, अनिल वेल्हाळ, नंदिनी जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विज्ञाननिष्ठ चळवळीतील कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

-विजय सुर्वे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]