प्रभाकर नानावटी -
‘वैज्ञानिक’ ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या खूप खूप आधी विज्ञान होते’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरे पाहता, ‘वैज्ञानिक’ हा शब्द एकोणिसाव्या शतकात रूढ झाला. त्यापूर्वी कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक घटनांच्या शोधकांना ‘नैसर्गिक तत्त्वज्ञ’ (Natural Philosopher) असे म्हटले जात होते. केवळ कुतूहलातून नव्हे, तर नमुन्यांचे तत्त्वांमध्ये आणि निरीक्षणाचे शोधात रूपांतर करण्याच्या इच्छेने जगभरातील प्रत्येक संस्कृतीने अनुभव, अमूर्तता आणि भाकिते यांवर आधारित ज्ञानप्रणाली विकसित केल्या. शेतकर्यांनी ऋतुबदलांचा मागोवा घेतला; खलाशांनी आकाशातील तार्यांचे निरीक्षण करून नोंदी ठेवल्या; कारागिरांनी धातुशास्त्रात विविधतेतून परिपूर्णता आणली आणि रोगोपचार करणार्यांनी वनस्पती उपचारांचे वेगवेगळे प्रयोग करत दस्तऐवजीकरण केले. आपल्या पूर्वजांनी दिवस मोजण्यासाठी दिनदर्शिका तयार केली; ऋतुचक्रांचा मागोवा घेतला आणि छोट्या छोट्या बदलांची चाचणी घेतली. आपले पूर्वज अनुभवजन्य अंतर्दृष्टीला विश्वसनीय ज्ञानात बदल करत गेले.
टोळी करून राहणार्या आफ्रिकेतील आदिमानवानेसुद्धा वनस्पतिशास्त्रीय, वैद्यकीय आणि पर्यावरणीय ज्ञानाचे मौखिकरित्या संकलन करून पिढ्यान्पिढ्या त्याचे जतन केले असेल. दक्षिण अमेरिकेतील माया संस्कृतीने खगोलशास्त्रीय ज्ञानात भर घातली असेल. युरोपमधील चर्चचे पाद्री आकाश निरीक्षणातून ग्रहांच्या गती, ग्रहण काल यांचा अचूकपणे मागोवा घेत नोंदी ठेवत असतील. बॅबिलॉनमधील काहींनी आकाशातील हालचालींवरून भविष्यसूचक मॉडेल्स तयार केली असतील. भारतातील वेदकाळातील अग्निपूजकांनी बांधलेल्या अग्निकुंडाच्या मागे स्थापत्यशास्त्राचे ज्ञान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामागील अंकगणित आणि भूमिती यांना धर्माच्या पावित्र्यात त्यांनी अंतर्भूत केले होते. जगभराच्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ‘शोध’ हा निव्वळ उपक्रम नव्हता… तर तो त्यांच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग होता. ‘सुरुवातीपासूनच हा मानव वंश केवळ अस्तित्वाचा विचार न करता अधिक काहीतरी करण्याच्या मागे होता’ असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
शोधाला विज्ञान म्हणण्याच्या अगोदर हे सर्व घडत होते. हा शोध कधीही कोणत्याही एका संस्कृतीचा किंवा युगाचा नव्हता. शोध म्हणजे केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर शोध बुद्धिमत्तेच्या अभिव्यक्तीचा एक महत्त्वाचा भाग होता व आहे; संवेदनशील अभिव्यक्तींपैकी तो एक होता (व आहे). ही एक कृती एखाद्याच्या मनातील संकल्पनेत उद्भवते व झेप घेत घेत सैद्धान्तिक तत्त्वात बदलते. ही शोधक बुद्धिमत्ता जैविक, सांस्कृतिक आणि अगदी यांत्रिक अशा विविध स्वरूपांत असली, तरी ती गृहीतके, अनुमाने आणि निरीक्षणे यांच्यावर आधारलेली असते. काहीतरी नवीन तयार केले जाते, तेव्हा त्या शोधाला चौकट दिली जाते व ते त्या क्षणाला चिन्हांकित करते.
जीवसृष्टी शिकते, जुळवून घेते आणि नवीन शोधदेखील लावते. मानवांनीच निरीक्षणाचे स्पष्टीकरणात, स्पष्टीकरणाचे अमूर्ततेत आणि अमूर्ततेचे पद्धतीत रूपांतर केले. औपचारिक विज्ञानाच्या उदयाने गणितीय रचना आणि प्रयोग अंमलात आणले गेले, परंतु या गोष्टी समजून घेण्यात माणूस कमी पडला. त्यामुळे विज्ञानाला स्वरूप, भाषा आणि स्वीकारार्हता मिळाली, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला नाही.
विज्ञानाचा मार्ग कधीच सरळ नव्हता; ठरवून असे काही केलेही जात नव्हते. पूर्वीच्या काळी प्रयोगशाळा वगैरे काही नव्हत्या. जे शोध होत गेले, ते अपघातांतून जन्माला आले. आगीच्या उपयोगाचा शोध योगायोगाने लागला. काही अन्नपदार्थ किण्वनामुळे (Fermentation) खराब होऊ शकत असल्याचे कळू लागले; काही विशिष्ट दगडांमध्ये चुंबकत्व असू शकत असल्याचे लक्षात आले. खराब झाल्याने नाकारल्या गेलेल्या आंबलेल्या पदार्थांना एके काळी प्राचीन भारतातील आयुर्वेद-औषधांचे मुख्य घटक बनवले गेले. तांदळावर वाढणार्या, ‘कुजलेला पदार्थ’ म्हणून सुरुवातीला मानल्या गेलेल्या बुरशीचा जपानमध्ये ‘साकी’ या पेयासाठी उपयोग करण्यात आला. एके काळी चीनमध्ये ‘कलाकुसर’ म्हणून नावाजलेले सिस्मोग्राफ ‘शांतपणे दूरच्या भूकंपांची नोंद करू शकते’ हे नंतरच्या काळात समजले. माया संस्कृतीतील ‘गूढवादी’ म्हणून हिणवले गेलेले वसाहतवादी खगोलशास्त्रज्ञ असल्याचे व अचूकतेने शुक्र ग्रहाचा शोध लावून त्याचा भ्रमण मार्ग निश्चित करत असल्याचे नंतर लक्षात आले.
योगायोग वा अपघात यांमुळे शोध लागल्यानंतर माणूस स्वस्थ बसला नाही. या शोधप्रक्रियेतून तो काही गोष्टी शिकल्या. प्रथम निरीक्षण केले – एखाद्याने जे जुळत नव्हते ते लक्षात घेतले. मग प्रश्न आला : ‘हे सतत का घडत आहे? त्याचे स्पष्टीकरण काय असू शकते?’ प्रश्न विचारण्याच्या या कृतीमुळे घटनेपासून पुराव्याकडे जाणे शक्य झाले. तिथून निष्कर्ष निघाले : नमुने अमूर्त केले गेले, तत्त्वे स्पष्ट केली गेली आणि नवीन चौकटी जन्माला आल्या. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सतत प्रश्न विचारणे, घटनांची चिकित्सा करत राहणे. या चिकित्सक वृत्तीनेच जगभरातील अनेक नवीन शोधांना जन्मास घातले होते.
विसाव्या शतकात अॅलेक्झांडर फ्लेमिंग हा स्कॉटिश डॉक्टर काही दिवसांच्या सुट्टीहून परतल्यानंतर, काचेच्या बशीतील तो अभ्यासत असलेले बॅक्टिरिया मेलेले आढळले. या मृत बॅक्टेरियांना बाहेर टाकून बशी स्वच्छ न करता तो प्रश्न विचारू लागला : ‘या बॅक्टेरियांना कुणी मारले?’ या क्षुल्लक वाटणार्या गोष्टीचा अर्थ लावत असताना त्याने प्रतिजैविकांचा शोध लावला. वैद्यकशास्त्राचे जगच पूर्णपणे बदलून टाकणार्या पेनिसिलीनचा शोध या चिकित्सक वृत्तीतून झाला.
१९६७ मध्ये जोसिलिन बेल वर्नेल हिला रेडिओ तरंगांचा अभ्यास करताना नेहमीच्या तरंगांच्या पार्श्वभूमीवर काही वेगळे आवाज ऐकू येत होते. ‘कशाचीतरी लुडबुड असावी’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता ‘हे असे नियमितपणे काय ऐकू येते’ याचा ती शोध घेऊ लागली. ‘असे काय ऐकू येत असावे?’ या प्रश्नाने ती अस्वस्थ झाली. ती याबद्दल खोलपणे विचार करू लागली व त्याचीच फलश्रुती म्हणजे पल्सरचा शोध… त्यातूनच अवकाशातील न्यूट्रान तारे पल्सर यांच्या अस्तित्वाचा शोध लागला. अवकाशात प्रदक्षिणा घालणारे न्यूट्रान तारे पृथ्वीच्या जवळपास येतात, तेव्हा ते दीपगृहातील प्रकाश पुंजाप्रमाणे स्पंदन करतात, हे तिच्या लक्षात आले. या स्पंदनांच्या शोधामुळेच अवकाशातील बृहत् आकारातील तार्यांच्या खुणा खगोलशास्त्रज्ञांना सापडल्या.
अशा प्रकारची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या इतिहासात सापडतील; परंतु यांतील बहुतेक शोधांच्या योगायोगामागे एक आकृतिबंध असल्याचेही लक्षात येईल. या आकृतिबंधात ‘घटनेची ओळख – त्याकडे संपूर्ण लक्ष – त्यातून सर्वसामान्य प्रश्न – व शेवटी त्यातील अमूर्तता’ असा हा शोधाचा प्रवास असतो. महत्त्वाचे म्हणजे, ‘तेथे कुठेही विसंगती नसून ती अर्थपूर्ण असू शकते’ हे मानण्याचा तो निर्णय होता. शोधाची सुरुवात त्या घटनेबद्दलच्या शंका विचारण्याच्या धाडसातून झाली.
अगदी अलीकडील शोधातसुद्धा आपल्याला हाच आकृतीबंध ठळकपणे दिसेल. २००४ साली ग्राफीनचा शोध लागला. ग्राफीन हा निसर्गात सुलभपणे, शुद्ध स्वरूपात सापडणार्या ग्राफाइटपासून तयार होणारा पदार्थ आहे. निसर्गातील सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी तो एक आहे. अत्याधुनिक वैज्ञानिक साधन सामग्री असूनसुद्धा अड्हेसिव्ह टेप व पेन्सिलचे शिसे यांवरील काही मोजक्या प्रयोगांतून तयार झालेला अत्यंत कठीण, तरी लवचीक; हलका, तरी उच्च प्रतिकारशक्ती असलेला पदार्थ म्हणून त्याचा वेगळेपणा उठून दिसतो. २०१२ साली शोधलेल्या CRISPR या जनुकांचे अचूक तुकडे करणार्या यंत्रणेची गोष्टसुद्धा अशीच अफलातली आहे. १९९० पासून डोकेदुखी वाटणार्या बॅक्टेरियांच्या जीनोममध्ये आढळणारे जनुकांच्या पुनरावृत्तीचे गूढ या यंत्रणेमुळे उलगडले व पुढील जनुकीय संशोधनाची वाट सुलभ झाली.
‘शोध’ हे केवळ अपघात वा योगायोग यांची निष्पत्ती नसून ‘घटनेचा अर्थ कसा लावला जातो’ यातून ठरतो. यातून त्यांची निष्पत्ती ठरत जाते. घटनेबद्दलच्या शंका व इतरांच्या लक्षात न आलेल्या गोष्टींकडे चिकित्सकपणे बघून, त्यांतून अर्थ शोधणे, हे शोधाचे मर्म आहे.
शोधांना आपण सहजासहजी कप्पेबद्ध करू शकत नाही. त्यांची व्याख्या करणेही शक्य नाही. अनपेक्षित गोष्टींचे निरीक्षण करण्यापासून त्याची पुनर्रचना करणार्या कल्पना तयार करण्यापर्यंत त्यांची व्याप्ती असते.
शोधांकडे आपण एखादा नमुना वा अंदाजाचे प्रमाणीकरण म्हणून बघू शकत नाही. ती आपल्यातील विचारशक्तीलाच आव्हान देणारी प्रक्रिया असते. ती समस्याचा आवाका ठरविणारी असू शकते. किंवा जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकू शकते. या प्रक्रियेत काही वेळा एकसंधपणाही नसतो. तरीसुद्धा समस्येचे स्वरूपच बदलून टाकण्याची किमया ती करू शकते!
न्यूटन यांनी फक्त गतीचे वर्णन केले नाही, तर त्यांनी ‘बळ’ व ‘वस्तुमान’ या संकल्पना जगासमोर ठेवल्या. मॅक्सवेल यांनी फक्त विद्युत्-चुंबकीय क्षेत्राचे प्रारूप जगासमोर ठेवले नाही, तर विद्युत्-चुंबकीय क्षेत्राच्या दोन्ही बाजू व त्याची व्याप्ती यांवर प्रकाश टाकला. आईनस्टाईन यांनी न्यूटनच्या समीकरणात फक्त सुधारणा केली नाही, तर ‘काल व अवकाश’ यांची वेगळी व्याख्या त्यांनी जगासमोर ठेवली. येथे फक्त आकडेवारी नसून संकल्पनांना नवीन चौकट दिली असल्याचे लक्षात येईल.
‘वैज्ञानिक प्रगती केवळ नवीन सिद्धान्तांमुळे झाली नसून आपल्या निरीक्षणांना मदत करणार्या, त्यांचे मोजमाप करणार्या व आपल्या कल्पनांना उत्तेजन देणार्या वैज्ञानिक साधनांमुळे झाली आहे’ असे तज्ज्ञांचे मत आहे.
टेलिस्कोपमुळे आपण पृथ्वीच्या कक्षेबाहेरचे अवकाशातील जग पाहू शकलो… उपग्रह, आकाशगंगा, काळ-अवकाशाची वक्रता हे आपल्या दृष्टिपथात आले. मायक्रोस्कोपमुळे एकपेशीय जंतू, जीवाणू, विषाणू व सजीवांच्या पेशींची रचना इत्यादी बाबी आपल्याला कळल्या. संगणकांनी गुंतागुंतीचे विश्लेषण करण्यासाठीची आकडेमोड करण्यास, जीनोमसारख्या व्यवस्थेतील बारकाव्यांचा विदा गोळा करण्यास, गुरुत्व तरंगांचा शोध घेण्यास मदत करत आहेत. यांतील प्रत्येक साधन विज्ञानाचा वेग वाढविणाचे व आपल्यातील नवीन संकल्पनांचे प्रारूप तयार करण्याचे, या संकल्पनांच्या कक्षा रुंदावण्याचे कठीण काम करत आहे. ही साधने फक्त विज्ञानाचा वेग अनेक पटींनी वाढवत नाहीत, तर वैज्ञानिक संकल्पनांची सर्वस्वी वेगळ्या स्वरूपात मांडणी करत आहेत. ही साधने आपल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यास मदत करत आहेत. एवढेच नव्हे, तर आपल्या प्रश्नांचे स्वरूपच बदलून आपल्यासमोर सर्वस्वी वेगळे जग उभे करत आहेत. गंमत अशी आहे की, यांतील कुठलेही साधन स्वतःहून प्रश्न तयार करू शकत नाहीत, संकल्पनांची मांडणी करू शकत नाहीत. ते काम माणसांनाच करायचे आहे. माणसातील सर्जनशीलता, त्यांनी उभे केलेले प्रारूप, त्यांच्या मनातील संकल्पना, या संकल्पनांचे त्यांनी लावलेले अर्थ, त्यांनी घेतलेले निर्णय हेच विज्ञानाला आणखी पुढे नेऊ शकतात.
एक मात्र खरे की, ‘शीघ्र गती’ हा वैज्ञानिक प्रगतीचा निकष ठरू शकत नाही. कारण ही गती चौकट बदलू शकत नाही. आपल्या ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढविणारी व/वा अत्यंत वेगाने आकडेमोड करणारी ही साधने आपण निर्दिष्ट केलेल्या संकल्पनांच्या सीमित चौकटीतच राहून काम करतात. टेलिस्कोप आपल्याला ‘गुरू’ या ग्रहाचे उपग्रह स्पष्टपणे दाखवतो, परंतु या अखंड विश्वाचे सर्वस्वी वेगळे प्रारूप उभे करून त्याचा नेमका अर्थ गॅलिलिओच सांगू शकला. ‘आण्विक स्फोट झाल्यास काय काय होऊ शकेल’ याचा अचूक अंदाज संगणक करू शकेल, परंतु क्वांटम सिद्धांताची मांडणी फक्त माणूसच करू शकतो.
अतिप्रगत शोधांत ‘पॅटर्न शोधून त्यांच्या जोड्या बनविणे’ अभिप्रेत नाही. शोध नेहमीच चौकट बदलतो वा चौकटीचे पुनर्निमाण करतो. जेव्हा चौकट बदलली जाते, तेव्हा ‘आउट ऑफ दि बॉक्स’ जाऊन विचार करावा लागतो… नवीन संकल्पनांचा वेध घ्यावा लागतो, दृष्टी बदलावी लागते व त्यासाठी वेळ पडल्यास नवीन गणिताचा शोध घ्यावा लागतो.
१९१५ मध्ये एमी नोएदर हिने ‘Symmetry Becomes Law’ हा सिद्धान्त मांडून भौतिकशास्त्रात परिवर्तन घडवले. तिच्या मते, भौतिक प्रणालीतील प्रत्येक सतत सममितीसाठी (symmetry)एक संबंधित नियम असतो. तिच्या या संकल्पनेत अगोदरच्या कुठल्याही सिद्धान्ताचा विस्तार नव्हता, तर तिने नव्या सिद्धान्ताची पुनर्व्याख्या केली होती.
१८६०च्या सुमारास जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी विद्युत्शक्ती व चुंबकत्व वेगवेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची गणितीय समीकरणाद्वारे मांडणी केली. या समीकरणातून त्यांनी विद्युत्चुंबकीय तरंगांचा शोध लावला. सूर्यप्रकाशातसुद्धा हे तरंग असल्याची त्यांनी मांडणी केली. त्यांनी केवळ निसर्गातील घटनांचा आढावा न घेता त्याच्यातील सुप्त रचना उलगडून दाखवली.
आईनस्टाईनच्या कालखंडापर्यंत असलेल्या वैज्ञानिक चौकटीबद्दलच आईनस्टाईन शंका घेत होता. त्याला भौतिकशास्त्रातील नियम प्रकाशाच्या स्थिर गतीशी विसंगत वाटू लागले. त्याचा विशेष सापेक्षतेचा सिद्धान्त (Special Relativity) ही एक नवीन संकल्पना होती. समीकरणे बदलून सोडवण्याऐवजी आईनस्टाईनने गृहीतके पुन्हा परिभाषित केली. ‘अवकाश आणि काळ आता निरपेक्ष राहिले नाहीत, तर निरीक्षकसापेक्ष आहेत’ अशी त्याने मांडणी केली. ही पूर्वीच्या सिद्धान्तांची पुनर्मांडणी नव्हती, तर त्यांना पूर्णपणे नाकारून नवीन सिद्धान्ताचा प्रस्ताव होता; आणि त्यातूनच सामान्य सापेक्षता सिद्धान्ताचा (General Relativity) पाया घातला गेला. या सिद्धांतात ‘गुरुत्वाकर्षण’ शक्ती म्हणून नाही तर अवकाश-काळाची वक्रता असते. आईनस्टाईनने नवीन प्रश्न विचारले, जुन्या प्रश्नांचे उत्तर म्हणून नव्हे.
पॉल डिराक यांनी विशेष सापेक्षता सिद्धान्ताचे संबंध क्वांटम सिद्धान्ताबरोबर जोडण्याचे काम केले. यासाठीची त्यांची समीकरणे भौतशास्त्रावरच आधारित होती. त्यांचे समीकरण इलेक्ट्रॉन्सचे वर्णन करत होते. अँटीमॅटरच्या अस्तित्वाचा अंदाज त्यात होता. डिराकच्या गणिताने तोपर्यंत कुणीही न पाहिलेल्या पॉसिट्रानच्या अस्तित्वाचा अंदाज केला. त्यानंतरच्या चार वर्षांत प्रयोग करून त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यात आले.
१९४० च्या दशकात, रिचर्ड फाईनमन या अमेरिकी अणुशास्त्रज्ञाने एक विचित्र प्रश्न विचारून क्वांटम मेकॅनिक्सची पुनर्कल्पना केली : जर कणांचा (Sub-atomic particles) प्रत्येक संभाव्य मार्ग प्रत्यक्षात अंतिम परिणामात योगदान देत असेल तर? याचे उत्तर म्हणून त्याने संभाव्यता, हस्तक्षेप आणि बहुगुणितता स्वीकारणार्या गतीचे एक वेगळे व अत्यंत नवीन चित्र उभे केले.
अशा प्रकारे संपूर्ण चौकटच बदलून नवीन शोध घेणार्यांत, विसाव्या-एकविसाव्या शतकात चमकलेल्या, पश्चिमी देशांतील ख्यातनाम वैज्ञानिकांची मक्तेदारी होती, असे समजण्याचेही कारण नाही. माणसाच्या शोधक्षमतेची व्याप्ती किती मोठी असू शकते, याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. उदाहरणार्थः
“विसाव्या शतकात युरोप-अमेरिकेतील पाठ्यपुस्तकांत कॅल्क्युलस येण्यापूर्वी चौदाव्या शतकात भारतातील केरळ येथील स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समधील गणितज्ञांनी त्रिकोणांसाठी इनफायनाईट सीरीजची कल्पना मांडली होती. त्या मांडणीत युक्त्या-प्रयुक्त्यांचा अंशसुद्धा नव्हता. केवळ निरीक्षणांवरून अंदाज करून अमूर्ततेत रुजलेल्या सुसंगत गणितीय शोधपरंपरेवरून ही मांडणी केली गेली होती.
“आठव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत इस्लामी सुवर्णयुगाचा काळ होता. इब्न अल हैथमसारख्या विद्वानांनी प्रकाशशास्त्राबद्दल (Optics) अभ्यास करून काही निष्कर्ष काढले होते; प्रकाशाच्या भूमितीची मांडणी केली होती. या काळातील अनेक विद्वान पद्धतशीर प्रयोगाबद्दल आग्रहाची भूमिका मांडत होते. सोळाव्या शतकातील युरोपमधील फ्रान्सिस बेकन या विज्ञानाची तात्त्विक मांडणी करणार्या तत्त्वज्ञाच्या अगोदर काही शतकांपूर्वीच मुस्लीम राज्यात विज्ञानाला महत्त्व दिले जात होते, हे कदाचित आपण विसरू शकत नाही.
“चीनमधील खगोलशास्त्रज्ञ आकाशातील ग्रहांच्या गतीविषयी, ग्रहण कालाविषयीची पिढ्यान्पिढ्या अचूक माहिती गोळा करत होते. त्यांची ही माहिती केवळ वर्णनात्मक नसून त्यातील तत्त्वांच्या व निष्कर्षांच्या नोंदी केल्या जात होत्या.
“दक्षिण अमेरिकेतील माया संस्कृतीने (इ.स.पू. २००० ते इ.स. २५०) खगोलावर आधारित कॅलेंडर प्रणाली वापरली आणि खगोलशास्त्रीय ज्ञानावर आधारित परंपरा रूढ केल्या. त्यांनी रूढ केलेल्या वास्तुकला, प्रतिमाशास्त्र व अचूक वेळेचे निदान यांमागे खगोलशास्त्राचा आधार होता. यामुळे विज्ञान व खगोलशास्त्र यांच्यातील सीमारेषा पुसट झाल्या.
“अगदी अलीकडील उदाहरण घ्यायचे ठरविल्यास चिएन-शियुंग वू, रोझलिंड फ्रँकलिन व कॅथरिन जॉन्सन या महिला वैज्ञानिकांनी आपापल्या अभ्यासक्षेत्राला नवीन चौकटीत बसविले. या वैज्ञानिकांनी फक्त आकडेमोड करून विदा गोळा न करता आपापल्या विषयाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.
ही उदाहरणे म्हणजे शोधाच्या इतिहासातील फक्त तळटिपा नसून शोधाचा हा इतिहास जागतिक स्तरावर सर्व संस्कृतींत थोड्या-फार प्रमाणात अस्तित्वात असल्याचे लक्षात आणून देणारी निदर्शक आहेत. केवळ पॅटर्न न ओळखता विज्ञानविषयांना नवीन चौकट देण्यात त्यांचे योगदान होते.
प्रत्येक कालखंडातील समाजातील काही जण तरी वेगळ्या वाटेवरून जाण्याचा प्रयत्न करत होते व त्यांनीच आपल्यातील सर्जनशीलता व प्रखर बुद्धिमत्ता यांचा वापर करून मानवी जीवनाला नवीन आकार दिला, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला हे शोधाच्या इतिहासाच्या या धावत्या वर्णनावरून लक्षात येते.
– प्रभाकर नानावटी
संदर्भ : बिष्णोई यांच्या The Frame Before the Frame : A Prehistory of Discovery या लेखावर आधारित.
