भोर येथे ‘अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन’ संपन्न

धनंजय कोठावळे -

19 ऑगस्ट, 2021

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी दि. 14 ते 20 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील सहावे पुष्प म्हणून गुरुवारी (दि. 19) सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत भोर येथे ‘अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन’ संपन्न झाले.

भोर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, आणि राजगड ज्ञानपीठ यांच्या संयुक्त सहकार्याने अनंतराव थोपटे महाविद्यालयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन आयोजित करण्यात आले होते. हे संमेलन ऑनलाइन आणि शासनाचे ‘कोविड 19’संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून, मर्यादित लोकांच्या उपस्थितीत ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी झाले. विचार संमेलनाची सुरुवात ‘अंनिस’ भोर शाखेच्या कलावृंदाने सादर केलेल्या ‘आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो…’ या गीताने झाली. उद्घाटन पाण्याचा दिवा सभास्थानी राज्य कार्यकारी समिती सदस्य मिलिंद देशमुख यांनी पेटवला व त्यांनी त्याच्या पाठीमागचे विज्ञान समजून सांगितले. हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर यांनी संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर डॉ. शैलाताई दाभोलकर यांनी आपले विचार उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. ‘अंनिस’ कार्यकर्ते हे घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजतात, याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ आहे, तशीच चालू ठेवावी आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार समाजापर्यंत पोचवावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

विचार संमेलनात ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रदूत – स्वामी विवेकानंद’, साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे तर्कसंगत विचार’, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाची अंधश्रद्धा निर्मूलनातील भूमिका’, तसेच वसई येथील आयटी इंजिनिअर आणि ‘अंनिस’ कार्यकर्ता डॅनियल मस्करणीस यांनी ‘ख्रिश्चन समाजातील अंधश्रद्धा आणि त्यावरील उपाय’ या विषयांवर आपले विचार मांडले.

अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करताना, ‘स्वामी विवेकानंद हे कसे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अग्रणी होते’ हे अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. “1892 पासून 1896 पर्यंत चार वर्षेस्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत निरनिराळ्या प्रांतांमध्ये दौरा केला. दौरा करत असताना त्यांनी भारतातली स्थिती आपल्या भाषणांमध्ये कथन केली. “भारतीय समाजाला काय रोग झालेला आहे आणि त्या रोगावर काय इलाज करायला हवा,’ याची माहिती स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणातून आणि अनेक मित्रांना पाठविलेल्या पत्रांमधून देत असत. ‘भारतामध्ये प्रचलित असलेल्या अनेक जुन्या दुष्ट रूढी, चाली-रीती आणि परंपरा या दलितांचे दैन्य वाढवणार्‍या आहेत आणि त्यांना त्रास देणार्‍या कशा आहेत,’ ज्या ब्राह्मण लोकांनी कधीही आपल्या पाचशे पिढ्यांमध्ये वेदांच्या पुस्तकांना हातही लावला नव्हता, असे पुरोहितलोक ‘वेदांमध्ये असे लिहिले आहे, वेदांमध्ये तसे लिहिले आहे,’ असे म्हणून बडेजाव मिरवतात आणि स्वतःच्या मनाने काहीही थापा मारतात. सगळ्यात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे हे पुरोहितलोक समाजाला असे सांगतात, की ‘गायीची हत्या करता कामा नये. कारण गायीची हत्या केल्याने पाप लागते.’ आणि स्वतः मात्र त्यांनी कधी विचार केलेला नाही की, त्यांच्या पूर्वीचे जे ब्राह्मण होते, त्यांना प्रत्येक जेवणामध्ये गायीचं मांस खाण्यास अतिशय आवडायचं. एवढंच काय; त्यांच्याकडेच मोठे महत्त्वाचे पाहुणे आले तर त्या पाहुण्यांना गायीचे मांस खायला दिल्याशिवाय संतुष्ट होणार नाहीत, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि असे हे ब्राह्मण आता मात्र लोकांना वेदांच्या नावाखाली फसवत असतात,”

या संमेलनामध्ये प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित असलेले साप्ताहिक साधनासंपादक विनोद शिरसाठ यांनी आपल्या भाषणामध्ये शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची विचारसरणी कशी तर्कसंगत; त्याचबरोबर तर्कशुद्ध होती, याविषयी अतिशय परखड असे भाष्य केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होण्यापूर्वी, डॉ. दाभोलकर हे ‘साधना’चे संपादक असताना नऊ वर्षेशिरसाठ यांनी त्यांच्याबरोबर काम केले. “डॉ. नरेंद्र दाभोलकर आपल्या विचारांची मांडणी करताना बुद्धिप्रामाण्यवादापेक्षा विवेकवादावर भर देत, नास्तिकतेपेक्षा किंवा निरीश्वरवादापेक्षा तर्कनिष्ठ विचारांवर भर देत असत.”

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये मुस्लिम समाजाचे; किंबहुना सत्यशोधक समाज मंडळाचे कसे योगदान आहे, हे निरनिराळी उदाहरणे देऊन समजावून सांगितले. “विशेषकरून आजच्या तरुणाईला दलवाई-दाभोलकर यांचे विचार आणि कार्याची ओळख होणे फार गरजेचे आहे. विवेक आणि विज्ञान हे तरुणाईच्या विचार- वर्तनातून सहजपणे व्यक्त झाले पाहिजे. आपण आज अनेक प्रकारचे सुख उपभोगतो. कारण आपले भविष्य उज्ज्वल होण्यासाठी अनेक प्रबोधकांनी जनक्षोभ स्वीकारून, चिखलफेक झेलून आयुष्य वेचले आहे,” “तालिबानी लोक सध्या कायदा आपल्या हातात घेऊन मुस्लिम धर्माच्या महिलांनी बुरखा वापरावा, त्यांनी घराच्या बाहेर पडू नये, शिक्षणामध्ये सहभागी होऊ नये, संगीतामध्ये सहभागी होऊ नये, अशा प्रकारची अत्यंत कठीण अशी बंधनं घालत आहेत. मात्र पुरुषांनी कसे वागावे यासाठीचे कुठलेही निर्बंध नाहीत. पण अशा वाईट परिस्थितीमध्ये काही मुस्लिम महिला प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन त्या तालिबान्यांचा निषेध करीत आहेत आणि आमच्यावर अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली अत्याचार करू नयेत, अशा प्रकारची मागणी त्या करीत आहेत. त्यांचाही आवाज भविष्यात बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही.”

वसई येथील आयटी इंजिनिअर डॅनिअल मस्करणीस यांनी ख्रिश्चन समाजातील अंधश्रद्धा; त्यामध्ये विशेषकरून रोमन कॅथलिक धर्मामधील जुन्या अंधश्रद्धांवर बोट ठेवले आणि त्याच्याविषयी त्यांचा मंच काय काम करत आहे, याविषयीचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी, “रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन समाजामध्ये अकराव्या शतकापर्यंत धर्मगुरूंना लग्न करण्यास परवानगी होती. परंतु कोणा एकाच्या मनामध्ये धर्मगुरूंनी लग्न करू नये, असे आले आणि त्यांनी त्या वर्षीपासून धर्मगुरूंना लग्न करण्यास बंदी केली. त्यामुळे गेली हजार वर्षे हे बंधन धर्मगुरूंवर घातल्यामुळे आपण पाहात आहोत की, काही लहान मुले आणि काही महिलांचे काही धर्मगुरूंकडून कशाप्रकारे लैंगिक शोषण केले गेलेले आहे; त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त हा एका कुमारी मातेच्या पोटी जन्माला आला आणि कुमारी मातेला मुलगा झाला; आणि तो महान धर्मगुरू झाला, धर्माचा नेता झाला; म्हणजे जी कुमारी माता असते, ती महान असते, अशा प्रकारचे प्रतिपादन अनेक वर्षे रोमन कॅथॉलिक समाज करीत आहे. ही गोष्ट सध्याच्या काळाला शोभून दिसत नाही. म्हणून धर्मामध्ये बदल करायला हवा, अशा प्रकारचा समज आणि विचारसरणी आता धर्मामध्ये येत चाललेली आहे. ही अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून युवावर्ग आता प्रयत्नशील आहे.”

“ भाकरी आणि द्राक्षासव हे दोन म्हणजे येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त आहे,” अशा प्रकारची अंधश्रद्धा आजही आहे, असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की, “आदम आणि इव्हा यांनी निषिद्ध फळ खाल्ल्याने त्यांच्या हातून पाप झाले आणि त्या पापातून मनुष्याची निर्मिती झाली. अशा प्रकारे नवजात अर्भक सुद्धा पापी जन्माला आलेले आहे, असं म्हणण्याची पद्धत आहे आणि त्याला शुद्ध करायचं असेल तर त्याच्या चेहर्‍यावर विशिष्ट प्रकारचे पाणी टाकून त्याला पवित्र करायचे, त्याला शुद्ध करायचे. अशा प्रकारचा विधी ‘बाप्तिस्मा’ या नावाखाली चर्चमधील धर्मगुरू करतात. या आणि अशा अनेक अंधश्रद्धा आता बंद व्हायला हव्यात.” अशा प्रकारची चळवळ मंच करीत आहे.

अंनिसचे राज्य सल्लागार डॉ. अरुण बुरांडे यांनी प्रास्ताविकात भोर शाखेने स्थापनेपासून गेल्या 25 वर्षांत राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच विविध उपक्रमांतील यशस्वी सहभाग व अंमलबजावणीबद्दल भोर शाखेचा वेळोवेळी ‘मध्यवर्ती’कडून गौरव व कौतुक मेळावा आयोजित केला गेला. स्वतः डॉ. नरेंद्र दाभोलकर उपस्थित राहिले. त्यांनी भोर शाखेचा गौरव म्हणून उपस्थित सर्व कार्यकर्ते, वाचक, जाहिरातदार व हितचिंतक अशा 150 जणांना सलग 2 वर्षे (सन 2004 व 2005 मध्ये) भोजन दिले, अशी आठवणही सांगितली.

स्वागताध्यक्ष डॉ. भाग्यश्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि चळवळीला भविष्यात नेहमी मदत करणार असल्याचे, पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. संमेलनादरम्यान संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘निर्भय, नीतिवान, विज्ञाननिष्ठ डॉ. नरेंद्र दाभोलकर’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्मरणिकेचे संपादन ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य विभाग सदस्य धनंजय कोठावळे यांनी केले आहे. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आदी मान्यवरांनी संमेलनाला दिलेले शुभेच्छा संदेश स्मरणिकेत प्रकाशित करण्यात आले. त्या संदेशांपैकी भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या संदेशाचे प्रातिनिधिक स्वरुपात अभिवाचन करण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन ‘अंनिस’ भोर शाखेच्या कार्याध्यक्ष सविता कोठावळे व फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्या सुजाता भालेराव यांनी केले.

संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी मांडली. तसेच यापुढे दरवर्षी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीनही आयोजक संस्थांच्या सहकार्याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन’ आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. समारोप सत्राचे अध्यक्ष, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख यांनी यापुढेही संविधानातील मूल्यांचा प्रचार व प्रसारासाठी महाविद्यालयात आपल्या सर्वांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे घोषित केले.

विचार संमेलनाची सांगता ‘अंनिस’च्या भोर शाखेच्या कलावृंदाने सादर केलेल्या ‘हम होंगे कामयाब’ या गीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य विभाग सदस्य धनंजय कोठावळे, भोर शाखेचे सल्लागार डॉ. सुरेश गोरेगावकर व गोविंद भिलारे (नाना), भोर शाखेचे अध्यक्ष सुरेश शाह, उपाध्यक्ष डॉ. ए. सी. बिराजदार, प्रधान सचिव सुरेश सुतार, प्रा. रवींद्र भालेराव, अशोक शिंदे, अधिकराव सुतार, विवेक पोळ, विजय कारभळ, विशाल सावंत, नीलेश घोडेस्वार, सुनंदा गायकवाड, प्रतीक सुतार, विवेक कोठावळे, वैभव कोठावळे, चंद्रकांत गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विचार संमेलनासाठी पुण्याहून ‘महाराष्ट्र अंनिस’चे मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल लालवाणी, अनिल वेल्हाळ, वसंत कदम, राहुल माने, अविनाश शेंबटवार, राहुल केदारी, प्रा. ज्ञानदेव सरोदे, अनिल तिकोणकर आदी राज्य व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बारामतीचे बाळकृष्ण भापकर सर हे ‘महाराष्ट्र अंनिस’ची ग्रंथदिंडी घेऊन आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘अंनिस’ व ‘साधना प्रकाशन’तर्फे पुरोगामी विचारधारेची मांडणी करणार्‍या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. धनंजय क्षीरसागर, डॉ. विद्या कदम, मा. सुरेश शाह, डॉ. वीरेश बिरादार, डॉ. ए. सी. बिराजदार, डॉ. विद्या बुरांडे, डॉ. इम्रान खान यांनी भरघोस मदत केली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. ज्ञानोबा घोणे यांनी आभार मानले.

धनंजय कोठावळे, भोर


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ]