LGBT प्राईड मंथ – लैंगिक तादात्म्य

डॉ. अस्मिता बालगावकर -

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये राहात असताना व्यक्ती मी कोण आहे याचा विचार करीत असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या लैंगिक अवयवानुसार त्याची मुलगा किंवा मुलगी अशी ओळख ठरविली जाते. समाजात माणसाची मूलभूत विभागणी पुरुष किंवा स्त्री या दोन गटात होऊन त्यात पुरुषत्व किंवा स्त्रीत्वाच्या अपेक्षांचा समावेश असतो. परंतु एखाद्या व्यक्तीची लिंग ओळख ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी मिळालेल्या लिंगाशी संबंधित असू शकते किंवा त्यापेक्षा वेगळी सुद्धा असू शकते. मग वेगळी म्हणजे नेमकी काय काय असू शकते? तर त्यात आत्तापर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासावरून LGBTQIA+ यामधील एखादी ओळख असू शकते. Lesbian समलैंगिक स्त्री, समलैंगिक पुरुष Bisexual उभयलिंगी व्यक्ती, Transgender जन्मावेळी असलेल्या लिंगापेक्षा वेगळी लिंग ओळख, Queer प्रश्नार्थक अर्थाने जे आपल्या शारीरिक इच्छा ठरवू शकत नाहीत, Intersex लोक शारीरिक लैंगिक अवयवाद्वारे पुरुषही नसतात किंवा स्त्रीसुद्धा नसतात. त्यांचे लैंगिक अवयव निश्चित होऊ शकले नाहीत, and Asexual म्हणजे ज्यांना स्त्री आणि पुरुष दोघांबरोबर लैंगिक संबंधात रस नाही त्यांना अलैंगिक (Asexual) प्रकारा मध्ये समावेश केला जातो. आणि त्या पुढे येणारे + चिन्ह सांगते की या सर्व श्रेण्या किंवा प्रकारापेक्षा वेगळं अजून काही असूही शकतं, जे भविष्यात अजून कळेल.

भिन्न लिंग ओळख असण्याचे कारण अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचे असू शकते. शास्त्रज्ञांना अद्याप लैंगिक अभिमुखतेचे नेमके कारण माहीत नाही. परंतु ते आनुवांशिक, हार्मोनल आणि सभोवतालच्या परिस्थिती प्रभावांच्या जटिल परस्परसंवादामुळे उद्भवले जाऊ शकते आणि ते निवड म्हणून पाहता येत नाहीत असे शास्त्रज्ञ सांगतात. काही व्यक्तींना काही जेनेटिक कारणांमुळे किंवा जैविक कारणांमुळे अशी ओळख प्राप्त होते. हार्मोनमुळे सुद्धा काही लोकांना असे अनुभव येतात. अनेकदा घरात अनेक स्त्रियांमध्ये फक्त एखादा मुलगा लहानाचा मोठा होतो आणि त्या वातावरणाचा परिणाम म्हणून सुद्धा त्याची लिंग ओळख भिन्न होते. तो मुलीसारखा बोलू चालू वागू लागतो. काही लोक लैंगिक अनुभवात बदल म्हणून, वेगळेपण म्हणून, नवीन काहीतरी अनुभवावे म्हणून, साहस म्हणूनही असे काही संबंध ठेवतात. एकंदर कारणांचा शोध घेतला असता असंख्य कारणे दिसून येतात.

जगात सध्या साधारण बावीस वेगवेगळ्या लैंगिकता अस्तित्वात असल्याचं मानलं जातं. अनेकजण हे पाश्चिमात्य फॅड आहे असेही म्हणतात. सगळ्याच लैंगिक जाणिवा या बाहेर सर्रासपणे व्यक्त होताना दिसत नाहीत. यातल्या अनेक सामाजिक दबावाखाली कुठेतरी दडवून, लपूनछपून व्यक्त होत असतात. समाजात पण अनेकदा व्यक्तीच्या मनात प्रश्न उपस्थित होत असतात. मी कोण? स्त्री का पुरुष? माझं शरीर पुरुषाचं आहे पण मन? हे वाटणं चूक आहे की बरोबर? मी पाप करतोय का? असं का होतंय? मला एक स्त्री असून दुसर्‍या स्त्री विषयी आकर्षण का वाटतंय? हे असलं आयुष्य माझ्या एकट्याच्याच वाट्याला का आलं असावं? मी कुठं चुकलो असेन म्हणून मला असं जगावं लागतंय का? मला स्वत:ला व्यक्त करायचं असेल तर मी कसं करावं? कोणापुढे कराव? मला समाज आणि माझं कुटुंब स्वीकारेल का, हे अनैसर्गिक बेकायदेशीर आहे का… या सार्‍या प्रश्नांतून जो संघर्ष सुरू होतो तो संघर्ष एकाचवेळी जसा स्वत:शी असतो, तसाच तो बाहेरच्या जगाशी सुद्धा असतो.

अशा संघर्षाला सामोरे जाणार्‍या लोकांसाठी, वेगळी लैंगिक ओळख असलेल्या समुदायासाठी जगभरात जून महिना हा अभिमान महिना (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. आम्ही जे काही आहोत, जसे आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि ही ओळख घेऊन अभिमानाने जगण्याचा संदेश ही चळवळ देते. या महिन्यात जगभरात तसेच भारतातही अनेक कार्यक्रम एलजीबीटीक्यू समुदायाकडून राबविले जातात. प्राइड मंथच्या संकल्पनेची सुरुवात स्टोनवॉल दंगलीपासून सुरु झाली. साधारण १९७० च्या दशकात समलैंगिक ही संज्ञा मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात झाली. समलिंगी मुक्तीसाठी दंगलींची मालिका २८ जून १९६९ पासून सुरू होऊन अनेक दिवस चालली. लोअर मॅनहॅटनमध्ये असलेल्या ‘स्टोनवॉल इन’ या गे बारवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर दंगलीची सुरुवात झाली. आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला आमच्या लैंगिक भूमिकेनुसार राहण्याचे-वागण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि सर्वच माणसांना मिळणारे मूलभूत मानवी हक आणि संधीची समानता आम्हालाही मिळायला हवी ही यांची मूलभूत मागणी होती.

दंगलीनंतर वर्षभरात, अनेक अमेरिकन शहरांमध्ये प्रथम गौरव मोर्चा काढण्यात आले. फ्रेड सार्जंट, जे काही पहिल्या मोर्चाचे आयोजक होते. त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला या मोर्चाचा उद्देश हा ‘स्टोनवॉल’मधील दंगलीचे स्मरण करणे आणि त्यांच्या स्वातंत्र्य, अधिकार आणि हकांसाठी लढा देणे हा होता. त्यामुळे पहिले काही मोर्चे हे उत्सवापेक्षा निषेधासाठी होते. सुरुवातीला ही चळवळ गे आणि लेस्बियन लोकांसाठी सुरू झाली असली, तरी कालांतराने त्यात LGBTQIA+ पर्यंत व्यापक होत गेली.

स्टोनवॉल दंगली आणि पहिल्या प्राईड मार्चनंतर, एलजीबीटी गटांची संख्या झपाट्याने वाढली आणि काही वर्षांनी ही अभिमानाची चळवळ संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये पसरली. अन्यथा, त्या आधीही असे अनेक लोक होते, पण ते सामाजिक दबावामुळे उघडपणे मान्य करत नव्हते. परंतु या गौरव मोर्चामुळे लोक हळूहळू बाहेर पडून हे उघडपणे स्वीकारू लागले आणि साजरे करू लागले. समाजाने, कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने अशा लोकांना स्वीकारून त्यांना माणुसकीने आणि समानतेने वागण्याची संधी देणे यासाठीचा हा लढा पुढे जाऊन प्राईड मंथ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. २०२० पर्यंत, जगभरातील अनेक देशांत प्रमुख शहरी भागात हे अभिमानास्पद उत्सव जूनमध्ये आयोजित केले जाऊ लागले.

एलजीबीटी ध्वज किंवा इंद्रधनुष ध्वज १९७८ पासून लेस्बियन, गे, उभय लैंगिक आणि पारलिंगी स्वाभिमानाचा प्रतीक म्हणून वापरला जात आहे. यामध्ये असणारे विविध रंग एलजीबीटी समुदायातील विविधतेचे प्रतीक आहेत. सुरुवातीला त्यात सहा रंगांचे पट्टे होते. नंतर ७ रंग, ८ रंगाचे पट्टे येऊन त्यात अनेक बदलही झाले. भारतात देखील अनेक वेळा या ध्वजाचा वापर एलजीबीटी समुदायाच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून केला गेला आहे. प्राईड फ्लॅगमधील प्रत्येक रंग काहीतरी सूचित करतो. लाल रंग जीवन, नारिंगी रंग उपचार, पिवळा रंग नव्या कल्पना, हिरवा रंग भरभराट, निळा रंग शांतता, जांभळा रंग आत्मा, बाणाच्या टोकासारखा त्रिकोणी भाग ज्यात काळा आणि बदामी या रंगाच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो तर पांढरा, निळा, गुलाबी रंग ट्रान्स लोकांचे प्रतिनिधित्व करतो, पिवळा आणि जांभळे वर्तुळ हे इंटरसेक्स समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतात.

अनेकदा लहानपणापासूनच व्यतीला भिन्न लिंग ओळख असलेले कळून येते. परंतु सामाजिक दबावाच्या भीतीने त्या भावना, विचार दडपून टाकले जाते. मग अनेकदा किशोरवयीन कालखंडात लैंगिक वर्तन प्रकर्षाने वेगळे जाणवू लागल्यावर ती ओळख दिसून येते. कुटुंब, समाज याला विरोध करेल या भीतीने अशा व्यक्ती घरापासून दूर, वेगळे अलिप्त राहू लागतात. अनेक कुटुंबात प्रखर विरोध होऊन अशा लोकांना अक्षरशः घरातून हाकलून दिले जाते. अनेकदा भीक मागून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय उरत नाही. शिक्षण व आर्थिक पाठबळ असेल तर ठीक, अन्यथा अनेक व्यक्ती गुन्हेगारी वर्तनाकडेही वळतात. यासाठी या लोकांना समजून घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे गरजेचे असते. भारतात ट्रान्सजेन्डर लोकांबद्दल अनेक अंधश्रद्धा सुद्धा दिसून येतात. जसे की विवाह आणि जन्माच्या वेळी यांचा आशीर्वाद घेणे हितकारक ठरते. हिजड्यांना आशीर्वाद देण्याची किंवा शाप देण्याची शक्ती आहे असे मानले जाते आणि अनेक हिंदू मानतात की त्यांचे आशीर्वाद प्रजनन, समृद्धी आणि दीर्घायुष्य आणू शकतात. अशा प्रसंगी ते लोक नृत्य करतात, गाणी गातात आणि पैसे घेऊन निघून जातात. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जरी ही गोष्ट हितकारक असली, तरी त्यात काहीही तथ्य नसते.

जगभरात सुरुवातीच्या काळात अशा प्रकारचे संबंध ठेवणे हे फक्त समाजविरोधीच नव्हे, तर कायद्याने सुद्धा गुन्हा होता. अशा प्रकारचे संबंध हे अनैसर्गिक समजले जायचे. जून १९९९ मध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिटंन यांनी ‘स्टोनवॉलचा वर्धापन दिन’ तो अमेरिकेत प्रत्येक जून महिना हा गे आणि लेस्बियन प्राइड मंथ म्हणून घोषित केला. २०११ मध्ये, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संपूर्ण ङॠइढ समुदायाचा समावेश करण्यासाठी अधिकृतपणे मान्यताप्राप्त प्राईड मंथचा विस्तार केला. २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर, जो बायडेन यांनी सुद्धा युनायटेड स्टेट्समध्ये एलजीबीटी अधिकारांसाठी प्रयत्न करण्याचे वचन दिले. भारतातही गे सेक्सला २०१८ साली फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यातून बाहेर काढले गेले.

सर्वसामान्य लोकांनी अशा वेगळी लिंग ओळख असणार्‍या लोकांना सहकार्य करणे, मदत करणे, सामावून घेणे हे तर केलेच पाहिजे, परंतु कमीत कमी अशा लोकांना चिडवणे, त्यांची टिंगलटवाळी करणे, अफवा पसरवणे, त्रास देणे, बहिष्कृत करणे या गोष्टी प्रकर्षाने टाळायला हव्यात. आणि जर कोणी अशा लोकांना त्रास देत असेल तर त्यांना हे समजून सांगायला सुद्धा हवे. प्रत्येक व्यक्तीकडे माणुसकीने पाहणे गरजेचे आहे. शेवटी आयुष्याचा एकच मंत्र असू द्या, जगा आणि जगू द्या…

– डॉ. अस्मिता बालगावकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]