कोरोना आणि मानसिक आजार

डॉ. प्रदीप जोशी -

कोरोनासंसर्ग आपल्याकडेही थोड्या उशिराने; पण पोचलाच आणि आता तो वेगाने पसरत चालला आहे. हा वेग नियंत्रित करणे हे आपल्या हातात आहे, सरकार आणि आपणा सर्वांच्या हातात आहे.

कोरोना येतोय… चीनमध्ये आलाय… पसरतोय… भारतात येणे शक्य नाही; आला तरी टिकणार नाही, येथील टेंपरेचरपुढे तग धरणार नाही, या व अशा प्रकारच्या आपल्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया होत्या.

त्यानंतर वर्तमानपत्र, टीव्ही, रेडीओ, सोशल मीडियावर कोरोना आजार काय असतो आणि त्यासाठी घ्यावयाच्या काळजीविषयीचा माहितीचा महापूरच आला. पण अशा महासंकटाशी सामना करताना मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी फारस बोलले गेले नाही. ’मानसमित्रां’ ना याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा असे महासंकट येते, तेव्हा व्यक्ती आणि समाजाकडून येणार्या प्रतिक्रियांचा अभ्यास मानसशास्त्रज्ञांनी केला आहे. महासंकट येण्याच्या काही पायर्‍या असतात. प्रत्येक पायरीवर मानसिकतेचे विशिष्ट रेसपॉन्सेस असतात. कोणत्याही महासंकटात व्यक्ती आणि समूहाच्या मानसिकतेवर आणि पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. त्यातूनच भावनिक आणि सामाजिक संतुलन बिघडते. हा आघात एवढा मोठा असतो की, समाजाची त्याच्याशी तोंड देण्याची ताकद त्यापुढे फारच तोकडी पडते. या महासंकटाची काही वैशिष्ट्यं असतात. संकट अचानक कोसळते, नक्की काय-काय परिणाम होणार, याविषयी खात्रीपूर्वक अंदाज व्यक्त करता येत नाहीत. या संकटावर आपले काही नियंत्रण राहत नाही आणि होणारी हानी अपरिमित असते.

या महासंकटाने व्यक्तीचे मानसिक संतुलन तर बिघडतेच; पण समाजाचेही संतुलन बिघडून वेगवेगळ्या घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याच्या क्षमतेवरही आघात होतो. जिथे दाट लोकवस्ती असते, सुनियोजित यंत्रणा कार्यरत नसते, अज्ञान आणि अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात असतात, तिथे हानीचे प्रमाण जास्त असते. पहिली स्टेज असते महासंकट येण्याची सूचना मिळाल्याबरोबरची. या स्टेजमध्ये चिंता, अनिश्चितता यामुळे बेचैनी, निद्रानाश, अस्वस्थता दिसू शकते. काही जणांत मात्र डिनायल म्हणजे परिस्थितीचे गांभीर्य नाकारणे दिसते. ’छे, उगीचच काहीतरी बाऊ केला जातोय,’ असे म्हणत गोष्टी हसण्यावारी नेल्या जातात. आपल्याकडे हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसला आणि अजूनही दिसतोय. यातून सरकारी यंत्रणांना सहकार्य न करणे, खरी माहिती लपवण्यात हुशारी समजणे, असे प्रकार दिसू लागतात.

पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष संकटाचा फटका बसल्याबरोबरची. यावेळी संकट प्रत्यक्ष समोर दिसत असते. त्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही. मनात प्रचंड भीती निर्माण होते, मृत्यूची शक्यता मनाला असहाय्य करते. दु:ख, अपराधीपणा, भयंकर चिंता, हे सगळे खरे आहे की खोटे, असा संभ्रम पडणे अशा गोष्टी दिसतात. अशा वेळी जीव वाचवणे; स्वत:चा व आपल्या परिवाराचा याला प्राधान्याने मिळते व बाहेरील मदतीवर जास्त अवलंबून राहावे लागते.

या वेळीच काही लोकांत स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांनाही मदत करण्याची वृत्ती उफाळून येते. याला ’हिरोईक स्टेज’ म्हणतात. या महामारीत आपल्याला दिसतेय की आपण अजून याच ठिकाणी आहोत. आपण नीट काळजी घेतली नाही, घरच्यांना नीट सांभाळले नाही, अशी भावना मनात घर करून राहते. यानंतर इतरांना दोष देण्याच्या प्रक्रिया सुरू होतात. मग डॉक्टर कसे चुकले, ते कसा कामचुकारपणा करताहेत, सरकार कसे कमी पडते आहे, या परिस्थितीला खरे तर मी सोडून कोण-कोण जबाबदार आहे, ते शोधून त्याविषयी ओरड करणे सुरू होते. खरे तर आलेला प्रसंग कोणाच्याच नियंत्रणात नसतो, म्हणून तर ते महासंकट असते. या परिस्थितीशी लढतानाचा निद्रानाश, दु:ख, नैराश्य, पॅनिक न्क्झाईटी, अंधश्रद्धा यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसते.

यानंतर काही आठवडे, महिन्यांनी आजाराचा जोर ओसरणार आहे. पण मानसिक धक्का पोचलेल्या समाजाला पुन्हा सर्वसामान्य व्हायला बराच काळ लागणार आहे. आजाराचे, प्रत्यक्ष मृत्यूची शक्यता ओसरल्यावर सोसलेले नुकसान दिसू लागते. काही कुटुंबांत झालेल्या जीवित हानीचे, आर्थिक खर्चाचे, व्यवसायात झालेल्या नुकसानीचे स्वरूप समोर येईल आणि त्यातून स्वत:वर, नातेवाईकांवर, समाजावर आणि सरकारवरचा राग उफाळून येण्याची शक्यता असेल. यावेळी चिंता, नैराश्य याबरोबरच आत्महत्यांचे विचार व प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. चोर्‍यामार्‍या, दंगेधोपे यांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याचवेळी व्यसनाधीनताही वाढलेली दिसू लागेल.

यानंतरच स्टेज, जी अनेक महिने ते वर्षांपर्यंत दिसते; तीत कौटुंबिक तणाव, नैराश्य, चिंता, व्यसनाधीनता आणि ’पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’ राहील, असा हा आजार दिसतो. या आजारात धोका निघून गेल्यावरही आजाराची भीती कायम राहते. त्या तणावपूर्ण दिवसांची स्वप्नं पडत राहतात आणि ते दिवस व ती वचिंता परत-परत जागेपणीसुध्दा अनुभवली जाते. काहींना कायम निद्रानाश जडतो.

सतत स्वच्छता पाळण्याच्या गरजेपोटी शक्यता आहे की, बर्‍याच जणांच्या मनात घाण आणि किटाणू यांची भीती कायम राहील आणि सतत हात धुणे, अंघोळ करणे, कठडे धूत राहणे अशा प्रकारचा ’मंत्रचळ’ नावाचा आजार दिसू लागेल. तेव्हा आजचा काळ तर परीक्षेचा आहेच; पण भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल.