-
![](https://anisvarta.co.in/wp-content/uploads/2023/04/Thane-Holichi-poli.jpg)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी संपन्न झाला. त्याचा वृत्तांत.
पिंपरी–चिंचवड : पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे तीन ठिकाणी पोळ्या वाटप करण्यात आले. चिंचोली झेंडे मळा येथे ८०० पोळ्या व २५ नारळांचे वाटप करण्यात आले. मिलिंद देशमुख, श्रीराम नलावडे, भारत विठ्ठलदास, विजय सुर्वे, विवेक सांबरे, स्मिता देशमुख, मुकेश सोमय्या, सुधीर मुरुडकर, अंजली देशमुख हे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.बिजलीनगर येथील रॉबिनहूड संस्थेच्या कार्यकर्त्यांकडे ४०० पोळ्या सुपूर्त करण्यात आल्या. शुभांगी घनवट यांचा यात पुढाकार होता. चिखली येथील शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबविला. या ठिकाणी ६०० पोळ्यांचे वाटप करण्यात आले. प्रज्ञा, यशवंत, तेजस, विरेंद्र, आत्माराम, सोनाली, स्वाती आदी कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला.
बाणेर शाखा – कपिल अखिला सोसायटीत बाणेर शाखेतर्फे ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ असे आवाहन करण्यात आले. सोसायटीचे अध्यक्ष कोठावडे, सचिव नितीन घुले यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी झाला. विश्वास पेंडसे, डॉ. रवी वरखेडकर, अलका जाधव, श्रीनिवास गडकरी, सर्जेराव कचरे, भगवान काळभोर, बापट, आपटेकाका या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी उपक्रम यशस्वी झाला.
पुणे शहर – पावसाचा व्यत्यय येऊनही पुणे शहर शाखेच्या वतीने पुणे स्टेशन येथे १००० पोळ्यांचे संकलन करून वाटप करण्यात आले. श्रीपाल ललवाणी, अॅड. शीला परळीकर, अनुराधा काळे, वसंत कदम, अनिल वेल्हाळ, अॅड. रोहित एरंडे, राहुल माने, प्रकाश सोनवणे, अलका नगराळे, प्रकाश भारद्वाज यांचा यात सहभाग होता.
चाकण येथे होळीची पोळी दान
चाकण शाखा– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कलाविष्कार मंच, स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठान, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘होळी करा लहान पोळी करा दान’ हा उपक्रम चाकण येथील कातकर वस्ती, शेल पिंपळगाव येथील अनाथाश्रमात राबविला. समितीचे हे १४ वे वर्ष आहे.
या वेळी अंनिस समितीच्या कार्याध्यक्षा प्रमिला गोरे मॅडम, कलाविष्कार मंचचे अध्यक्ष विशाल बारवकर, जिल्ह्याचे संघटक नारायण करपे सर, शामभाऊ राक्षे, विजयकुमार तांबे, अनिल टोपे, मधुसूदन शेवकरी, अनुष्का करपे, देविका महाजन, माधव शेवकरी, सचिन आल्हाट उपस्थित होते. तसेच चक्रेश्वर देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मण बापू वाघ, रमा हुलावळे व चाकण ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
‘होळीची पोळी दान करा’ कार्यक्रम ठाणे येथे उत्साहात साजरा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखेतर्फे वंदना शिंदे (जिल्हाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनात ‘होळीची पोळी लहान करा पोळी दान करा’ कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. दिनांक ६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी होळीनिमित्त पोळी संकलनाचे काम नेहमीप्रमाणे अंनिस कार्यकर्ते, वंदना शिंदे, पुष्पाताई तापोळे आणि अजित डफळे यांनी ठाणे पश्चिम येथील वसंत विहार को-ऑप सोसायटीमधून केले. पोळ्या बनवून छान पाकिटात घालून सुपूर्द करत सर्व रहिवाशांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.
यानंतरचा टप्पा होता, संकलित केलेल्या पोषक चविष्ट पोळ्यांचे लगोलग वितरण. त्याची जबाबदारी अंनिस सदस्य अँब्रोस चेट्टियारने स्वीकारली होती. माई आणि अजित पोळ्या घेऊन वाघबीळ नाका, घोडबंदर रोड येथे पोहोचले. तेथून अँब्रोसचे मित्र दीपक भालेराव तसेच कन्हैया पाटील यांच्या मदतीने जुने वाघबीळ गाव येथील वस्तीमध्ये पोळ्या वितरणाचे ठरले होते त्याबरहुकूम काम झाले. कन्हैया पाटील व त्यांचे मित्र कृष्णा सूर्यवंशी व तेथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भोसले यांच्या साहाय्याने रहिवाशांना पोळी वितरणाचा कार्यक्रम आखला गेला होता. होळीच्या पोळीची गोड भेट माईं, अँब्रोस आणि अजित यांनी शुभेच्छांसह घरोघरी जाऊन वाटली. रहिवासी आनंदाने उत्साहाने प्रतिसाद देत होते. लहानथोर सर्वांच्याच मनात त्यांच्या भोसले, डॉक्टर कन्हैया पाटील, कार्यकर्ते यांच्याबद्दल आदर दिसून येत होता. सदर वस्तीतील लोकांना पिण्याचे पाणी, वीज इ. सर्व सुविधा पुरविण्यात कन्हैया पाटील, डॉ. भोसले यांचा पुढाकार आहे. अशा प्रकारे दोन सामाजिक कार्य करणारे गट एकत्र सेवा प्रदान करतानाचे दुर्मीळ चित्र दिसले.
–अँब्रोस चेट्टियार, म. अंनिस ठाणे शहर.