राहुल थोरात -
दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मानवतावादी विश्व समाज यांच्या कार्यकर्त्यांसोबत चौमू, जिल्हा – जयपूर, राजस्थान या ठिकाणी डॉ. राजेंद्र बराला यांच्या बराला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आम्ही बैठक घेतली. डॉ. बराला हे राजस्थान मधील एक प्रसिद्ध सर्जन असून त्यांचे दीडशे बेडचे भव्य हॉस्पिटल आहे. ते मानवतावादी विश्व समाज या संस्थेचे राज्य अध्यक्ष आहेत.

या बैठकीमध्ये डॉ. राजेंद्र बराला यांचेसह जगदीश प्रसाद यादव, नानू राम सैनी, मीना राजेंद्र बराला, मालीराम, राम कुंवर, लालाराम, सौमात्रा, हरीश मानव, निखिल चौधरी व हरियाणा येथील तर्कशील सोसायटीचे सुभाष तितरम हे उपस्थित होते. सुभाष तितरम यांच्या पुढाकारानेच ही बैठक आयोजित केली होती.
या बैठकीसाठी आम्ही जेव्हा तेथे गेलो तेव्हा डॉ. राजेंद्र बराला यांच्या ओपीडी समोर किमान ३० ते ४० पेशंट बसलेले होते. त्या सर्वांना दुसर्या डॉक्टरच्या ओपीडी कडे डॉ. बरालांनी पाठवले व पुढील अडीच ते तीन तास आम्ही या ‘ओपीडी’मध्ये घालवले. त्याची ओपीडी रूम ही ओपीडी कम सामाजिक संस्थेचे कार्यालयात वाटत होते. एका बाजूला ‘मैं नास्तिक क्यूँ हूँ’ हे भगतसिंग यांचे फोटोसह मनोगत आहे. तर दुसर्या बाजूला पेरियार रामास्वामी नायकर यांचे मनोगत आहे. तर एका भिंतीवर मानवतावादी विश्व समाज या संस्थेचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन वृक्ष दाखवलेला आहे. येणार्या-जाणार्या सर्व पेशंटनी हे पोस्टर पहावे व याच्याबद्दल विचार करावा यासाठी हे विचार या ठिकाणी लावण्यात आल्याचे डॉक्टर बराला यांनी सांगितले. पेशंटच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि वैचारिक आरोग्य ही दुरुस्त करण्याचे काम या ओपीडीमधून होत असल्याचे लक्षात आले. या संबंधातले त्यांचे अनुभव त्यांनी आमच्यासोबत शेअर केले. त्यामध्ये आलेला प्रत्येक पेशंट हे काय लिहिलेलं आहे याच्याबद्दल कशी विचारणा करतो व त्याचे आम्ही कसे समाधान करतो, हेही त्यांनी आम्हास सांगितले.
सुरुवातीला त्यांनी आमचे महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये आल्याबद्दल स्वागत केले. आमच्याकडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संघटनात्मक बाबीची माहिती दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना, त्याचबरोबर शाखा, जिल्हा, राज्य संघटन कसे चालते. जबाबदारीची विभागणी कशी आहे, याच्याबद्दलची माहिती दिली. गेली ३५ वर्षं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र नियमितपणे कसे सुरू आहे. समितीने गेल्या ३५ वर्षांत कोणकोणती पुस्तके प्रकाशित केलेली आहेत व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानातून निर्माण झालेल्या दोन्ही कायद्याविषयी ची माहिती दिली. तर रमेश माने यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पंचसूत्री काय आहे. संत व समाज सुधारकांचा वारसा अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशा पद्धतीने चालवते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वर्षभर कोणकोणते उपक्रम राबवले जातात, याच्याविषयीची माहिती दिली. संवाद चालत राहिला. उपस्थित सर्वांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून आणि खुनानंतर चळवळ कशी उभी राहिली, यासह खून खटल्याची सद्य:स्थिती काय आहे असेही विचारले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. उपस्थित सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या बैठकीमध्ये आम्ही राजस्थानमध्ये असलेल्या ‘अंधश्रद्धा’ याविषयी माहिती घेतली. सुरुवातीला त्यांनी मानवतावादी विश्व समाज काय आहे, कुठल्या विचारधारेवर मानवतावादी विश्व समाज काम करतो, नास्तिकता म्हणजे काय, ईश्वर, अल्लाह, गॉड याच्याबद्दल मानवतावादी विश्व समाजाच्या काय संकल्पना आहेत, राजस्थानमध्ये असलेल्या अंधश्रद्धेच्या बाबतीत मानवतावादी विश्व समाज आज कोणकोणत्या टप्प्यावर काम करतो याची इत्थंभूत माहिती त्यांनी आम्हाला दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन ही संपूर्ण विचारधारा कशी चालवली जाते आणि सर्वांत मोठे अंधश्रद्धेचे मूळ ईश्वर, अल्ला, गॉड आहे. ही मोठी अंधश्रद्धा संपल्याशिवाय इतर अंधश्रद्धा दूर होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने कठोरपणे नास्तिक बनावयास हवे आणि म्हणून राष्ट्रवादापेक्षा मानवतावाद महत्त्वाचा आहे. आणि तो आपण अंगीकारला पाहिजे. ही मानवतावादी विश्व समाजाची मनोभूमिका ही त्यांनी आम्हाला सांगितली.
राजस्थानमध्ये शहाणा, भोपा, तांत्रिक, गोल्डा, बाबाजी भगतजी यांच्या माध्यमातून कशा अंधश्रद्धा पसरवल्या जातात, याचा राजस्थानमधील समाजजीवनावर कसा परिणाम होतो, हेही त्यांनी आम्हाला सांगितले.
मानवतावादी विश्व समाजाने पूर्ण नास्तिकतेची विचारधारा स्वीकारलेली दिसून येते. पूर्वी नास्तिक ही शिवी समजली जायची, पण आता स्वतःला नास्तिक म्हणून घेणे ही अभिमानाची बाब आहे. याच्यावर मानवतावादी विश्व समाज ठाम असल्याचे दिसून आले. सद्य:स्थितीत नास्तिकतेचा विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया याचा कसा वापर करता येईल, याबाबत मानवतावादी विश्व समाजाचे कार्यकर्ते सजग असल्याचे दिसून आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित हिंदी पुस्तके उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना भेट दिली आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला.
– राहुल थोरात, रमेश माने
