किशोर बळी - 9421677181

ही तुझ्या घराची होळी, थोडा विचार कर।
अन् कोण शेकतो पोळी, थोडा विचार कर ॥धृ॥
खांद्यावर बंदूक ठेवली तुझ्या नि माझ्या।
पण कुणी झाडली गोळी, थोडा विचार कर॥
गल्लोगल्ली मानवतेचे रक्त सांडते।
ही धर्मांधांची टोळी, थोडा विचार कर॥
यदा-कदाचित् तुझी लेक वा बहीण असावी।
ऐकून तिची आरोळी, थोडा विचार कर॥
त्यांनी त्यांच्या पिढ्या-पिढ्यांची सोय लावली।
अन् तुझी राखरांगोळी, थोडा विचार कर॥
काय ना दिले शिवरायांनी – भीमरायांनी?।
पण तुझी फाटकी झोळी, थोडा विचार कर॥
कुणीतरी या गोंधळातही सूर लावला।
तू ऐक गझलेच्या ओळी, थोडा विचार कर ॥
– किशोर बळी
‘अक्षरदीप’, गुरुकुल नगर, मलकापूर,
अकोला – 444004 मोबा. 9421677181