राजीव देशपांडे -

मानवी जीवनात सण-उत्सवांना निश्चितच महत्त्व आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर सण-उत्सवांची नुसती रेलचेल. सणादिवशी गोडधोड करून खाणे-खिलवणे, भेटीगाठी घेणे, नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी वगैरे, वगैरेे अशा मर्यादित आनंदी अवकाशात महागाईचे चटके सोसत का होईना; पण सणांचे साजरेपण व्हायचे. शिवजयंती किंवा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळेस दगडफेक, मग पोलिसी गोळीबाराच्या घटना घडायच्या. अशा घटनांना सण-उत्सवाला लागलेले गालबोट म्हटले जायचे. पण हल्ली कोणताही सण-उत्सव आला की धडकीच भरते. कोणताही सण-उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, याची अजिबात खात्री राहिलेली नाही. हिंदू-मुस्लिम समाजात ध्रुवीकरण करून त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सणांचा एक हत्यार म्हणून सत्ताधारी भाजपकडून वापर केला जात आहे. एक बाजूला सण-उत्सवातील कर्मकांडीपणा वाढवत त्यांना धर्मांध स्वरूप दिले जात आहे, तर दुसर्या बाजूला बाजाराला आवश्यक असणारा भपकेबाजपणा, दिखाऊपणा वाढला आहे. त्यामुळे सण-उत्सवातील निखळ आनंद धर्मांधता आणि बाजारूपणा यांच्या कोंडीत सापडला आहे. एप्रिलमध्ये रमजानच्या काळात रामनवमी, हनुमान जयंतीदिवशी देशातील वेगवेगळ्या भागात धार्मिक मिरवणुकीच्या निमित्ताने घडलेल्या हिंसक घटना, वेगवेगळ्या ठिकाणच्या धर्मसंसदेत केली जाणारी द्वेष निर्माण करणारी तथाकथित साधूंची भाषणे, आवाहने याची नोंद घेतली तर देशभरात पसरवली गेलेली द्वेषपूर्ण परिस्थिती निश्चितच जाणवेल.
पण केवळ सण-उत्सवांचाच वापर धार्मिक ध्रुवीकरणांसाठी केला जात आहे, असे नाही तर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, पोषाख, भाषा यांचाही वापर करत केवळ आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी अशी एकमेकांच्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरणाची परिस्थिती आजच्या सत्ताधार्यांकडून निर्माण केली जात आहे. एकीकडे, धार्मिक ध्रुवीकरण करत लोकांचे लक्ष धार्मिक प्रश्नांकडे वळवायचे, तर दुसरीकडे वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची भाववाढ, बंद पडणारे कारखाने, शेतकर्यांवरील संकटे या सर्व प्रश्नांवरून जनतेचे लक्ष धार्मिक गोष्टींकडे वळवायचे, त्याच प्रश्नांवर चर्चा घडवून आणायच्या. त्यामुळे जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न आपोआप बाद होतात. सध्या हेच चालू आहे. त्यासाठीच या सणांचा राजकीय वापर चालला आहे.
या पार्श्वभूमीवर पुढे वर्षभर चालणार्या ‘प्रा. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान’ परिषदेचे उद्घाटक डॉ. विवेक सावंत आणि त्यानंतरच्या सरोजमाईंच्या सत्कारप्रसंगी झालेल्या वक्त्यांच्या भाषणातून या अभियानाची गरज आणि आव्हाने याची जाणीव अधिक प्रकर्षाने आपल्याला झाली आहे. ही आव्हाने पेलत हे अभियान आपण नक्कीच यशस्वी करू, यात काहीच शंका नाही.