धर्माचे राज्य कधी येईल?

अनिल चव्हाण - 9764147483

(मला मेलीला काय कळतंय?)

गुंड्याभाऊ आणि गुरुजींची गहन चर्चा चालली होती. गुरुजींनी गळ्यात अडकवलेली पिशवी बाजूला ठेवली आणि म्हणाले, “प्रभू श्रीराम! अजून किती वर्षेअन्याय सहन करायचा हिंदूंनी? बहुसंख्य असून सुद्धा आपल्याला इथे किंमत नाही! आपल्याच देशात आम्ही अन्यायग्रस्त झालो.”

“होय गुरुजी, कधी एकदा हिंदूंच राज्य येईल, असं झालंय मला!” गुंड्याभाऊने री ओढली.

“गुंड्याकाका, तुम्हाला हिंदूंचं राज्य आणायचेय? मग आता राज्य कोणाचे आहे?” माम्या म्हणाला. “देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, मोठमोठे अधिकारी, न्यायाधीश, सचिव सगळे हिंदूच आहेत ना? हे प्रमाण 90 टक्क्यांच्या वर जाईल! अजून हिंदूचे राज्य म्हणजे काय?”

“मला मेलीला काय कळतंय? पण एवढे जण हिंदू असतील तर आपल्या देशात राज्य हिंदूंचेच आहे ना?” काऊ म्हणाली.

“तसे नाही वहिनी, राज्य हिंदूंचे असेल तर आपल्यावर अन्याय का होतो? कारण कायदा हिंदू ग्रंथाप्रमाणे चालत नाही.” गुंड्याभाऊ बोलला.

“कुठे होतोय अन्याय?” माम्या.

“हे पाहा, ‘त्यांना’ चार-चार बायका करण्याची परवानगी आहे; आणि आपल्याला एकच! हा अन्याय नाही का?” गुरुजींनी बाजू मांडली.

“आणि त्यामुळे ‘त्यांची’ लोकसंख्या सुद्धा प्रचंड वाढते. आज ते 14 टक्के आहेत, उद्या 24 होतील, 40 होतील, 80 होतील आणि सगळा भारत एक दिवस व्यापतील.” गुंड्याभाऊने भर घातली.

“अहो ‘त्यांची’ संख्या वाढेल, तेव्हा तुमचीही वाढणारच ना? की तुम्ही सर्वजण ब्रह्मचारी राहणार आहात? या गुंड्याभाऊ सारखे!” आई मिश्कीलपणे बोलली.

“आईसाहेब, त्यांनी चार-चार बायका केल्यावर त्यांची संख्या चौपट नाही का वाढणार?” गुंड्याभाऊ म्हणाला.

“काय..! चार-चार बायका..!” आदिला आश्चर्याचा गोड झटका बसला.

“मला मेलीला काय कळतंय? पण मुसलमान समाजात पुरुषांपेक्षा बायका इतक्या जास्त आहेत? एकदम चौपट?” काऊनेही आश्चर्य व्यक्त केले.

“गुरुजी, बायका चार करायला परवानगी दिली किंवा चाळीस दिली, तरी तेवढ्या बायका उपलब्ध असतात का? अहो, निसर्गनियमानुसार जेवढी मुले जन्मतात, तेवढ्याच मुली. एकाने चार बायका करायचं म्हटलं तर 75 टक्के पुरुष रिकामेच राहतील! आणि हो, लोकसंख्यावाढ पुरुषांच्या विवाहसंख्येवर अवलंबून नाही, तर स्त्रियांच्या संख्येवर ठरते. सध्या लोकसंख्यावाढीच्या प्रमाणात धर्मानुसार फारसा फरक नाही.” माम्याने एका दमात सांगून टाकले.

“म्हणजे चार बायका करणे योग्य आहे म्हणा तर…?” गुरुजी.

“मी असं कुठं म्हटलं? चार बायका करणं हे चुकीचंच आहे; पण त्याचा संबंध लोकसंख्यावाढीशी नाही, स्त्रियांच्यावरील अन्यायाशी आहे.”

“का? पुरुषांवरील अन्यायाशी सुद्धा आहे की. हिंदू पुरुषावर अन्याय का?” गुंड्याभाऊ.

“म्हणजे असा चार बायकांचा अधिकार पुरुषांना हवा काय? कोपर्‍यातला झाडू पाहिलास का?”आईने तंबी दिली.

“गुंड्याकाका, हिंदू स्त्रियांना हा अधिकार फुकट मिळालेला नाही. त्याला चार्वाक-बुद्धापासून फुले पतिपत्नी, डॉ. आंबेडकर यांच्यापर्यंतच्या संघर्षाचा वारसा आहे. यासाठी तर डॉ. बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कम्युनिस्ट, समाजवादी, आंबेडकरवादी, कामगार, शेतकरी, स्त्रिया यांनी आंदोलने केलीत, तेव्हा हिंदू कोड बिल पास झाले.” मामाने इतिहास सांगितला.

“मग मुस्लिम पुरुषांना अधिकार का?” गुंड्याभाऊ.

“हे चूकच आहे. हा मुस्लिम स्त्रियांवरील अन्याय आहे. या अन्यायाविरोधात लढण्यासाठी मुस्लिम स्त्रियांना इतर समाजाने पाठिंबा दिला पाहिजे. पण तुम्ही लोक तर तिच्या ‘हिजाब’वरून तिचे शिक्षणच बंद करायला निघाले आहात.” माम्या.

“पण हे लोक असे का करत आहेत?” वीराचा प्रश्न.

“अगं, आधीच महागाई, बेरोजगारी, कोरोना यामुळे हवालदिल झालेल्या सामान्य माणसाला मुसलमान, दलित यांच्याकडे बोट दाखवत ‘आपल्यावर अन्याय झाला, आपल्यावर अन्याय झाला,’ असं सारखं ओरडून लोकांना कट्टर करायचं. एकदा का कट्टरता शिरली की, मग विवेक, विज्ञान, सारासार विचार खुंटीला. मग टाळ्या-थाळ्या, गोमूत्र, गोशेण, प्लास्टिक सर्जरी, मंत्र-तंत्र याबरोबर तोंडी लावायला ‘अखंड भारत’ आहेच. असं यांचं चाललंय,” माम्या.

“मला मेलीला काय कळतंय? पण आपल्या संविधानात जातिभेद नाही, वर्णभेद नाही, लिंगभेद नाही; न्याय, स्वातंत्र्य, समता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्याच्याखाली देश एकत्र होऊ शकतो की.” काऊ म्हणाली.

“हो, आपले संविधान अखंड भारतच काय; अखंड विश्व एकत्र करू शकते. आमच्या पुस्तकात त्याची प्रास्ताविका आहे. म्हणून दाखवू काय?” आदि आणि वीरा एकासुरात ओरडले.

“या लहान मुलांना कळते आणि मोठ्यांना कळेना.” आईने शेरा मारला आणि गुरुजींनी आपली पिशवी गळ्यात अडकवली.

लेखक संपर्क ः 97641 47483


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]