जानकी अम्मल : उत्तुंग व्यक्तिमत्त्व

डॉ. नितीन अण्णा -

विज्ञानक्षेत्रात पहिली डॉक्टरेट मिळवणार्‍या भारतीय शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांची माहिती आपण मागच्या अंकात घेतली; मात्र त्यांच्याआधी एका भारतीय महिलेला अमेरिकन विद्यापीठानं विज्ञानक्षेत्रात मानद डॉक्टरेट बहाल केली होती. अमेरिकन विद्यापीठास ज्या व्यक्तीचा सन्मान करावा वाटला, अशी कोण ही महिला होती? जात आणि लिंग यांचं बंधन नाकारत, त्यामुळं येणारे अडथळे पार करत आपली कारकीर्द घडवणारी, संशोधन करताना अपार कष्ट उपसणारी, वनस्पतीशास्त्रातील आपल्या कामातून जगभर दबदबा निर्माण करणारी; तरीही आयुष्यभर साधं जीवन जगणारी एक बंडखोर महिला, आपल्या तत्त्वासाठी म्हातारपणात पर्यावरणरक्षण मोहीम हाती घेऊन सरकारशी चार हात करणारी रणरागिणी.. जानकी एडावलेठ कक्कट ऊर्फ डॉ. जानकी अम्मल.

जानकीचा जन्म 4 नोव्हेंबर, 1897 रोजी केरळमधील थलासरी शहरातील एका खूप मोठ्या घरात झाला. मोठं घर; दोन्ही अर्थानं. तिचे वडील दिवाणबहादूर एडावलेठ कक्कट कृष्णन, हे ब्रिटिश आमदनीतील मद्रास प्रेसिडेन्सीचे उपन्यायाधीश होते. तिला किती भावंडं असतील विचार करा..! आजवरचे ऐकलेले सगळे आकडे कमी पडतील. ती 19 भावंडं होती! वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्याचा वारसा जानकी यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांकडून मिळाला. तिचे आजोबा ‘जॉन चाईल्ड हॅनिंगटन’ हे ब्रिटिश आमदनीतील रेसिडेंट. त्यांच्या कुन्ही कुरुवयी या स्थानिक स्त्रीशी असलेल्या प्रेमसंबंधातून जानकीची आई देवी कुरुवयी जन्माला आली. हॅनिंगटन यांनी आपल्या या अनौरस लेकीसाठी अगदी तोलामोलाचा जावई पाहिला, दिवाणबहादूर एडावलेठ कक्कट कृष्णन.. दिवाणसाहेबांचे निसर्गावर, वनस्पतीशास्त्रावर प्रेम. हॅनिंगटन यांनादेखील वनस्पतीशास्त्राची आवड होती. त्यानिमित्ताने या दोघांची गट्टी जमली आणि विधुर दिवाणसाहेबांच्या आयुष्यात देवी कुरुवयी आली. कुन्ही आणि देवी कुरुवयी या थिया जातीच्या. या मागासलेल्या जातीचा शेकडो वर्षे माडी काढून विकणं हा पिढीजात धंदा. तिकडं, आईची जात पोरांना मिळते. साहजिकच जानकीलादेखील हीच जात चिकटली. दिवाणसाहेबांना पहिल्या पत्नीपासून सहा पोरं होती. देवी कुरुवयी घरात आली आणि घराचं शब्दशः ‘गोकुळ’ झालं. त्यांना तब्बल तेरा पोर झाली; विशेष म्हणजे सर्व दीर्घायुषी ठरली. या तेरापैकी आपल्या जानकीचा नंबर दहावा. तिच्या पाठीवर अजून एक भाऊ झाला, तरी पाळणा काही थांबेना. शेवटी निसर्गच म्हणाला, ‘ऐसी दीवानगी, देखी नहीं कही..’ आणि एकदाच पोरगा-पोरगीचं जुळं ‘होलसेल’मध्ये देऊन त्यांच्यापुढे हात टेकले. दिवाणसाहेबांची लायब्ररी भरपूर मोठी होती. त्यांचे वनस्पतींवर प्रयोगदेखील सुरू असायचे. उत्तर मलबार प्रदेशात आढळणार्‍या पक्ष्यांवर त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे लहानपणीच झाडं, फुलं, प्राणी, पक्षी अशा जीवसृष्टीतील सर्वच घटकांबद्दल जानकीच्या मनात लहानपणापासून कुतूहल निर्माण झालं. समवयीन मुलींप्रमाणं घरकाम, बागकाम, शिवणकाम, भरतकाम इत्यादी कला शिकण्यासोबतच शाळेत जाऊन विद्या प्राप्त करायची संधी या कक्कट भगिनींना होती. थलासरीमधील ‘सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट’मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करून जानकीनं मद्रासमधील क्वीन्स मेरीज कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली. नंतर मद्रासमधीलच प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तिने ऑनर्स पदवी मिळवली. वर्ष होतं 1921.

आता जानकी 24 वर्षांची झाली होती. घरच्यांना वाटत होतं, तिनं आता लग्न करून टाकावं; मात्र जानकीला अजून खूप शिकायचं होतं, संशोधन करायचं होतं. तिनं ख्रिश्चन वूमन कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली. तिथं शिकवत असतानाच संशोधनाची संधी शोधत होती. वय वाढत होतं, जानकी 27 वर्षांची झाली; त्यात तिला मामेभावाचं स्थळ सांगून आलं. आता सगळीकडून ‘प्रेशर’ तयार व्हायला लागलं. कदाचित लग्न झालं असतं अन् जानकीचं रूपांतर टिपिकल गृहिणीमध्ये झालं असतं.

परंतु ‘बार्बोर शिष्यवृत्ती’ तिला संधीचं नवं द्वार उघडणारी ठरली. आशियाई महिलांना परदेशात संपूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी ही स्कॉलरशिप अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठामार्फत दिली जायची. जानकीनं त्यांच्याशी संपर्क केला होता, त्यांचं उत्तर ऐन मोक्याच्या वेळी आलं. आता जानकीला घरून कुणी अडवणार नव्हतं. जानकी ‘मिशिगन’मध्ये पोचली. तिथं तिनं प्लांट सायटोलॉजीचा अभ्यास करून मास्टर्स पदवी मिळवली.

प्लांट सायटोलॉजीमध्ये वनस्पतीतील पेशींचा अभ्यास केला जातो. जसं प्राण्यांमध्ये संकर घडवून आणताना कोणत्याही प्राण्याच्या मादीचं कोणत्याही प्राण्याच्या नराशी मीलन घडवून नवीन प्रजाती निर्माण करता येत नाही. ते प्राणी किमान एका प्रवर्गातील हवे असतात, तसेच संकर शक्य होईल की नाही, हे गुणसूत्रं ठरवत असतात. त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये कलम करणं, संकर घडवून आणणं यामागे देखील विज्ञान असते.

एकाच कुळातल्या; पण वेगळ्या पोटजातीच्या वनस्पतींचा संकर या विषयामध्ये केलेल्या मौलिक संशोधनामुळं जानकीला ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पीएच.डी.शी समकक्ष असलेली मानद पदवी बहाल करण्यात आली. आता जानकी डॉ. जानकी झाल्या. 1932 मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी त्रिवेंद्रम येथील ‘महाराजा कॉलेज ऑफ सायन्स’मध्ये प्राध्यापकी सुरू केली. तीन वर्षे त्यांनी प्राध्यापकी केली, तरी त्यांचा मूळ पिंड संशोधकाचा होता. ती संधी त्यांना लवकरच मिळाली.

भारतात 1904 मध्ये खासगी साखर कारखाने सुरू झाले होते; मात्र भारतीय वंशाच्या उसामध्ये उतारा कमी मिळायचा. म्हणून हे कारखाने ऊस बाहेरदेशातून आयात करायचे. बाहेरदेशातील बियाणे भारतीय वातावरणात टिकायचे नाही, रोपं जगायची नाहीत. कोईमतूरमधील नव्यानं सुरू झालेल्या ‘इम्पिरियल शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेमध्ये भारतीय वातावरणात जगेल अशा उसाच्या वाणामधील गोडी वाढवण्याचं संशोधन सुरू होतं. जानकी यांनी इथं उसाचं ‘क्रॉसब्रीड’ करताना कोणत्या संकरामध्ये ‘सुक्रोज’चं प्रमाण सगळ्यात जास्त मिळतं, याचं निरीक्षण केलं. शेवटी उसाचा गवताशी केलेला संकर सर्वांत जास्त यशस्वी झाला आणि 1938 मध्ये एस स्पोंटेनियम (S. Spontaneum) हा वाण तयार झाला; ज्यातून साखरेचं प्रमाण वाढलं.

इथं संशोधन करत असताना डॉ. जानकी यांना विषमतेला सामोरं जावं लागलं. तिथं जानकी या एकमेव महिला; त्यात अविवाहित असल्यामुळं ‘उपलब्ध आहे,’ असा पुरुषी गैरसमज, त्यात त्या थिया या तथाकथित खालच्या जातीच्या. त्यामुळं हाताखालच्या लोकांकडून हवं तसं सहकार्य मिळत नसे. दुसर्‍या संस्थेतून कामाची ऑफर होती. मात्र संशोधन महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलं असल्यानं त्यांनी संशोधन मध्येच सोडलं नाही. सहकारी लोकांचे, प्रचलित व्यवस्थेचे विचार बुरसटलेले; त्यामुळे मानसिक हल्ले तर होतच राहणार. या हल्ल्यांना घाबरून घरी बसलं की सगळंच संपलं. डॉ. जानकी लगेच हार मानणार्‍या नव्हत्याच.

दुसर्‍या महायुद्धात बॉम्बहल्ले पचवून संशोधनावर लक्ष केंद्रित करताना डॉ. जानकी यांनी अशीच चिकाटी दाखवली होती. एडिंबर्ग येथे ऑगस्ट 1939 मध्ये अनुवंशशास्त्राची सातवी परिषद आयोजित केली होती. या परिषदेला हजर राहण्यासाठी जानकी इंग्लंडला गेल्या. सप्टेंबरमध्ये दुसर्‍या महायुद्धाला सुरुवात झाली आणि जर्मनीने तुफान बॉम्बहल्ले सुरू केले. भारतात परत येणं तर शक्य नव्हतं. लंडन येथील ‘जॉन इनिस हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूशन’मध्ये सहाय्यक पेशीशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ती नोकरी करत असतानाच एक दिवस घरावर जर्मन विमानं भिरभिरू लागली. त्यांच्या बॉम्बहल्ल्यांनी घरातील वस्तू इकडं-तिकडं पडल्या, खिडक्या, कपाटं, आरशाच्या काचा फुटल्या तरी त्यांनी विचलित ना होता ‘ती’ रात्र बेडखाली झोपून काढली आणि दुसर्‍या दिवशी आपल्या संशोधनाच्या कामात स्वतःला पुन्हा वाहून घेतलं होतं. डॉ. जानकी यांचं नाव तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ संशोधक म्हणून सर्वत्र गाजत होतं. त्यांनी भारतात परत येऊन देशाच्या उभारणीसाठी मदत करावी, असं पंडित नेहरू यांनी त्यांना कळवलं; आणि त्या आल्यादेखील. भारतात आढळणार्‍या वनस्पतींच्या प्रजाती ओळखून त्यांचं दस्तावेजीकरण करण्याचं काम ‘बोटॅनिकल सर्व्हेऑफ इंडिया’ करत होती. या संस्थेसाठी संशोधन करताना डॉ. जानकी यांनी प्रचंड पायपीट केली. त्यांनी संपूर्ण देशभरातील पर्वतराजी, दर्‍या-खोर्‍या पालथ्या घातल्या.

हे करत असताना त्यांचा आदिवासी जनतेशी संपर्क आला आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की, अन्नधान्य जास्त उगवण्याचा प्रयत्न करताना, कृषिक्षेत्र वाढवताना वारेमाप जंगलतोड झाली. यामध्ये सर्वाधिक नुकसान आदिवासी लोकांचं झालं आहे; मात्र त्यांच्याकडे कुणाचं लक्षच नाही. त्यांनी आदिवासींचे औषधी वनस्पतींबाबत पारंपरिक ज्ञान एकत्रित करण्यासाठी ‘लोकवनस्पती’ विषयाचा स्वतंत्र कक्ष निर्माण केला झाला. आदिवासींचे राहणीमान, वनस्पतींवर असलेली त्यांची उपजीविका यांचा अभ्यास इथं केला जातो. 1970 मध्ये वयाच्या 73 व्या वर्षी मद्रास विद्यापीठातील ‘सेंटर फॉर अ‍ॅाडव्हान्सड स्टडीज इन बॉटनी’ या केंद्रामध्ये ‘एमेरेटस सायंटिस्ट’ म्हणून जबाबदारी स्वीकारली, संशोधन सुरू ठेवलं. त्याच सुमारास शासनाशी संघर्ष करायलाही अम्मा पदर खोचून उभी राहिली. केरळमध्ये ‘सायलेंट व्हॅली’ नावाचं सदाहरित जंगल आहे. तिथं सरकारने जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला. नेहमीप्रमाणे स्थानिकांना रोजगार मिळेल, विकास होईल, अशी गाजरं दाखवण्यात आली; मात्र या प्रकल्पामुळं शेकडो दुर्मिळ जातीच्या वनस्पती आणि पशु-पक्षी असलेली जैवविविधता नष्ट होणार होती. तिथं सुरू असलेल्या आंदोलनात डॉ. जानकी यांनी सहभाग घेतला. आंदोलनाला यश आलं, प्रकल्प रद्द करण्यात आला. आज ‘सायलेंट व्हॅली’ला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे.

भारत सरकारने त्यांचा 1977 मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. त्यांना हयातीत; तसेच मृत्यूनंतर देखील अनेक मानसन्मान मिळाले. सी. व्ही. रामन यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स’मध्ये त्यांना संस्थापक-सदस्य म्हणून मान देण्यात आला. 1957 मध्ये ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’च्या सभासदपदी त्या निवडून आल्या. 1956 मध्ये मिशिगन विद्यापीठाने त्यांना मानद एल.एल.डी. पदवी देखील प्रदान केली. त्यांचा पहिला शोधनिबंध 1931 मध्ये, तर शेवटचा शोधनिबंध 1984 मध्ये प्रसिध्द झाला होता. अगदी शेवटचा शोधनिबंध त्यांनी मृत्यूपूर्वी काही दिवस आधी लिहिला होता. 4 फेब्रुवारी, 1984 रोजी त्यांना अगदी सुखासुखी मरण आलं आणि संशोधन थांबलं. तोवर त्यांना कोणताही गंभीर आजार जडला नव्हता. मोजका आहार, वनभ्रमंती आणि योग्य जीवनशैली यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभलं होतं. त्यांच्या कार्याला मानवंदना म्हणून भारत सरकारने ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ 1999 पासून सुरू केला आहे. वनस्पतीशास्त्र संशोधनातील उत्कृष्ट कार्यास प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने दरवर्षी हा पुरस्कार जागतिक पर्यावरणदिनी दिला जातो. 2018 मध्ये कोल्हापूर विद्यापाठातील डॉ. श्रीरंग यादव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डॉ. यादव हे आजवरचे एकमेव महाराष्ट्रीयन आहेत. लंडनमधील ‘जॉन इनिस सेंटर’मध्ये विकसनशील देशातील संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आता जानकी अम्मल यांच्या नावानं शिष्यवृत्ती दिली जाते. जम्मू येथील बोटानिकल गार्डनला जानकी अम्मल नाव देण्यात आलं आहे, जिथं 25 हजार वनस्पतींच्या प्रजाती जतन केल्या आहेत.

अम्मल म्हणायच्या, “गांधी नावाच्या जादुगारामुळे निर्भयतेची देणगी मिळाली, जी आयुष्यभर पुरली.” गांधीवादी अम्मल यांचं राहणीमान अगदी साधं असायचं. साधीशी साडी (बहुतेक वेळा पिवळ्या रंगाची) आणि लांबसडक केसाचे दोन सैलसर फुगे बांधलेले. थंड वातावरण असेल तर पिवळे जाकीट किंवा स्वेटर. स्वतःबद्दल जास्त काही बोलायचं नाही. अम्मल या स्वतः संसारात पडल्या नाहीत; मात्र आज सारे जग त्यांना जानकी अम्मल या नावाने ओळखते. ‘अम्मल’ म्हणजे आई, जे विशेषण म्हणून कधी काळी त्यांना लावलं गेलं आणि आज त्यांच्या नावाचा भाग झाला आहे. आयुष्याची इतिकर्तव्यता वेगळी काय असते. जाती आणि लिंगआधारित विषमतेची संघर्ष करताना जानकी खचली नाही, म्हणून आज सारे जग तिला अम्मल म्हणते.. तिच्या संघर्षाला सलाम!

संपर्क : 89564 45357


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ]