शामसुंदर महाराज सोन्नर -
महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे. अत्यंत कमी वयात त्यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. हे छत्र सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे नव्हे, तर तत्कालीन वर्चस्ववादी व्यवस्थेने त्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले. अत्यंत कमी वयात त्यांच्यावर झालेल्या या आघाताची त्यांच्या काळजावर खोल जखम होती. परंतु ही जखम कुरवाळीत न बसता मुक्ताबाई स्वतः धीराने उभ्या राहतात; इतकेच नव्हे, तर आपल्यापेक्षा वयाने मोठे असणार्या भावंडांना खचलेल्या अवस्थेत धीर देण्याचे काम मुक्ताबाई करतात. यावरून त्यांच्या प्रगल्भपणाची उंची किती मोठी आहे, हे ध्यानात येण्यासारखे आहे.
महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारत एका वेगळ्या सामाजिक कठीण अवस्थेतून जात होता. वर्णव्यवस्था, त्यातून येणारी जातव्यवस्था, कर्मकांडाचे वाढलेले स्तोम यामुळे समाज पुरता गांजला होता. आपण गांजले गेलो असल्याची कोणतीही जाणीव समाजातील सामान्य नागरिकांना नव्हती. वर्णव्यवस्थेमुळे देश सामाजिकदृष्ट्या दुभंगला होता, तर कर्मकांडामुळे सामान्य माणसांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत होते. अशी सैरभैर झालेली व्यवस्था ही कधीही परकीय आक्रमकांना देशावर आक्रमण करण्यासाठी सोयीची असते. या संधीचा गैरफायदा घेत परकीय आक्रमकांनी आपल्या देशाचा बराच भाग ताब्यात घेतला होता. त्यावेळी ही परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्रात संतांची प्रबोधन चळवळ उभी राहिली. त्या वेळच्या सर्व विचारवंतांना एकत्र आणण्याचे काम संत नामदेव महाराज यांनी केले. त्यात ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तिनाथ, सोपान, चोखा मेळा आणि त्यांचे कुटुंबीय, गोरोबाकाका, सावता महाराज अशा सर्व जातींतील संतांना एकत्र आणले. त्यातून ‘वारकरी’ ही भक्तिपरंपरा उभी राहिली. या भक्तिपरंपरेची आखणी नामदेव महाराज यांनी केली, तर पाया ज्ञानेश्वर महाराज यांनी रचला.
वारकरी परंपरेत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्वच संतांनी केलेला आहे. हे श्रेष्ठत्व सहज मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. त्यात सर्वांत लहान असलेल्या मुक्ताबाईला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली.
वडील विठ्ठलपंत यांनी विवाह झालेला असताना संन्याशाची दीक्षा घेतली; परंतु पुढे गुरूंच्या आज्ञेवरून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली. संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमात असल्याबद्दल त्यावेळच्या कर्मठ लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याचे कारण पुढे केलेले असले तरी तिथल्या कर्मठांनी हा बहिष्कार आळंदीच्या कुलकर्णी पदावर डोळा ठेवून केला असल्याचा दावा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केला. कारण काहीही असो; पण या बहिष्कृतपणाचे लाजिरवाणे जिणे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी वडिलांची चाललेली घालमेल छोटी मुक्ताबाई पाहत होती. तिच्या बालमनावर त्याचे परिणाम होत होते. आपल्यावरील नाही, तर किमान मुलांच्यावरील बहिष्कार उठविला जावा, यासाठी विठ्ठलपंत प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यावेळच्या कर्मठांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली. आपल्या मुलांच्यावरील बहिष्कार उठावा, यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी इंद्रायणीच्या डोहात देहत्याग केला. कोवळ्या मुक्ताबाईसह सर्व भावंडे पोरकी झाली. त्यानंतरही या मुलांवरील बहिष्कार तर उठवला नाहीच; उलट अधिक छळ करायला सुरुवात केली. या कठीण प्रसंगात मुक्ताबाई अधिक खंबीरपणे उभी राहिली, प्रगल्भ आणि समाजदार होत गेली. तिची समजदारी तिच्या जीवनातील काही प्रसंग आणि साहित्यातून प्रकट झालेली दिसते. आई-वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतल्यानंतरही कर्मठ लोकांनी त्यांचा छळ सुरू केला. ज्ञानेश्वर आळंदीत भिक्षा मागण्यासाठी गेलेले असताना काही कर्मठांनी त्यांच्या हातातील झोळी हिसकावून घेतली. ती भिक्षा मातीत मिसळली. तेव्हा उद्विग्न झालेले ज्ञानेश्वर रागावून आपल्या झोपडीचा दरवाजा (ताटी) लावून बसतात. त्यांची समजूत काढण्याचे काम मुक्ताबाईने केले. ही समजूत काढण्यासाठी जे अभंग म्हटले ते ‘ताटीचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. या अभंगात त्यांनी संतांची लक्षणे सांगून राग आवरण्याचा सल्ला ज्ञानेश्वर महाराज यांना दिला. मुक्ताबाई म्हणतात-
संत जेणे व्हावे । जग बोलणे सहावे ॥
रागे भरावे कवणाशी । आपण ब्राह्म सर्व देशी ॥
तुम्ही जर संत आहात तर संतांनी जगाचे बोलणे सहन केले पाहिजे. सर्व जगच जर ब्राह्म आहे, तर आपण कुणावर रागावणार आहात, असा सवाल करून पुढील अभंगात जग जर अग्नी झाले तर संतांनी पाणी व्हावे, असे सांगताना मुक्ताबाई म्हणतात-
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥
संतांची चांगली लक्षणे सांगत असतानाच संतत्वाचे सोंग घेणार्यांचाही चांगलाच समाचार मुक्ताबाई घेतात. त्या म्हणतात-
वरी भगवा झाला नामे । अंतरी वश्य केला कामे ॥
तया म्हणो नये साधू । जगी विटंबना बाधू ॥
हे ‘ताटीचे अभंग’ म्हणजे आजही संतांची लक्षणे जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. ‘ताटीच्या अभंगां’शिवाय इतरही खूप अभंगांची निर्मिती मुक्ताबाईने केलेली आहे. ज्यात-
मुंगी उडाली आकाशी । तिने गिळीले सूर्याशी ॥
अशा गूढ अभंगाचाही समावेश आहे.
स्त्री-पुरुषांच्या भेदाच्या पलिकडे जाण्याची शिकवणही मुक्ताबाई चांगदेवांसारख्या योग्याला देतात. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकून चांगदेव भेटायला येतात. भेटीनंतर ते ज्ञानेश्वर महाराज यांना आपल्याला शिष्य करून घ्यावे, अशी विनंती करतात. पण ज्ञानेश्वर महाराज त्यांना तुम्हाला योग्य वेळी गुरुप्राप्ती होईल, असे सांगतात. मग चांगदेव या चारी भावंडांसोबत आळंदी येथे राहतात. एके दिवशी पहाटे मुक्ताबाई इंद्रायणी नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या असतात. नेमके त्याच वेळेस चांगदेव अंघोळीसाठी ‘इंद्रायणी’वर येतात. छोट्या मुक्ताबाईला अंघोळ करताना पाहून चांगदेव मागे फिरतात. तेव्हा मुक्ताबाई विचारतात, ‘चांगदेव, का परत फिरलात?’ तेव्हा चांगदेव सांगतात, ‘एक स्त्री आंघोळ करीत असताना तिथे मी कसा थांबू?’
तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, ‘अरे चांग्या, एवढा वयस्कर झालास तरी अजून तुझ्यातला स्त्री-पुरुष हा भेद गेला नाही.’ मग मुक्ताबाई त्याला उपदेश करतात. चांगदेव गुरू म्हणून मुक्ताबाईच्या चरणी लीन होतात. आतापर्यंत योगी म्हणून आपण खूप नाव मिळविले; पण त्याचा काही उपयोग नाही. खर्या ज्ञानाची प्राप्ती तर आता झाली. म्हणजे हा माझा नवा जन्म आहे.
चांगदेव म्हणे आज जन्मा आलो । गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ॥
अशा या मुक्ताबाईचे स्थान संतमालिकेत खूप महत्त्वाचे मानले जाते.